Friday, December 29, 2023

अडगळीत गेलेले शब्द....!

अडगळीच्या खोलीत गेलेले शब्द

ऑफिस मधून घरी आलो तर मुलगी क्राफ्ट चा पसारा मांडून अस्ताव्यस्त मांडी घालून काहीतरी  करत होती.
म्हंटलं "काय गं अशी फतकल मारून बसलीस मधेच!”
तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह?
फतकल ??? 

मध्ये बहिणीकडे गेलो असताना भाचीला म्हंटलं, "माझी बॅग जरा खुंटीला लटकवून ठेव.” तर फिदीफिदी हसली,
म्हणते "शी s s खुंटी ?"
What’s that?”

आता काय सांगू तिला. माझा जन्म आमच्या वाड्यात झाला, त्यामुळे खुंटी, कोनाडा, फडताळ, ओगराळ, रोळी, घंगाळं,
ओटी, परसदार, माडी, पोटमाळा हे रोजच्या वापरातील शब्द होते.

किती उशीर झाला रे शिऱ्या, दिवा “मालव” आता. असं आज्जी हमखास म्हणायची. कोकणात दिवा दवड म्हणतात.
जेवताना आजी नेहमी “गोविंद” (एक घास) काढून ठेवायची.

हल्ली…..
वाती “वळायच्या” नसतात तर विकत मिळतात.
जेवणाचं “पान” वाढायचे नसते तर serve करायचे असते.
भात वाढ म्हणायचे नसते तर भात दे म्हणायचे असते.
देवघरातील वात “शांत” करायची नसते तर विझवायची असते.

चंदनाचे खोड आणि सहाणे ची जागा रेडिमेड गंधाच्या खडूने घेतलीय. पिंजरीची जागा टिकली न घेतलीय. बुश शर्ट ची जागा टी शर्ट ने घेतलीय. नऊवारी लुगड्याची जागा शिवलेल्या “saree” नं घेतलीय.

खाण्याची “बशी” नसते तर प्लेट/डिश असते.
चहाची बशी हा प्रकार तर इतिहास जमा झालाय.
थालीपीठ थापायला पळसाचे/केळीच पान नसतं तर प्लास्टिक शीट असते. ते भाजायला बिडाची काहिल जाऊन नॉनस्टिक तवा आलाय. कात्रीची सीझर झालीय, तर शिवण यंत्र sewing machine झालंय.

मूळात शीर्षक दिसताच लक्षात येते की ‘अडगळ’ हा शब्दच अडगळीत गेला आहे. पूर्वी प्रत्येक घरात एक अडगळीची खोली असायची. सगळ्या नको असलेल्या, परंतु कधीतरी कामास येणार्‍या वस्तू तेथे जाऊन पडायच्या... 

जुनी घरे आठवताच तसे शब्द खूपच आठवायला लागतात. ओटी, ओसरी, पडवी, परसू, माजघर, बळद, कोठीघर हे शब्द विसरायला झाले आहेत.  ‘वळचण’ हा असाच एक अडगळीत गेलेला शब्द. वळचण म्हणजे छपराचा भिंतीच्याही पुढे आलेला भाग. ऊन-पावसापासून घराचे संरक्षण होण्यासाठी तो तसा ठेवलेला असायचा.

घराची वळचण ही गुरा-ढोरापासून आगंतुकापर्यंत सगळ्यांचं विसाव्याचं ठिकाण होतं. कोणीही तेथे विश्रांती घ्यावी असं.
पागोळं म्हणजे काय? वळचणीवर पाऊस पडल्यानंतर बहुतेक पाणी ‘पन्हळी’ तून जमिनीत जातं. पण तरीही बरेच चुकार थेंब पन्हळीतून न येता इकडून तिकड़ून खाली येतात; ती पागोळी.

‘फडताळ’… फडताळ म्हणजे भिंतीतील कपाट. खुंटी, कोनाडे, देवड्या हे असेच अडगळीत गेलेले शब्द.
जुन्या घरातील न्हाणीघर (बाथरूम) असंच. ऐसपैस चुलाण्यावर पंचवीस-तीस लिटरचा हंडा तापत असायचा. दगडी चौरंग, अंग घासायला ‘वज्री’, ‘घंगाळ’ असायचे. तेही असेच कालबाह्य झाले.

गृहिणीची कुंकवाची पेटी, त्यातील आरसा, फणी, करंडा, मेणाच्या डाबल्या सहित गडप झाली. सामान्य स्त्रीला शृंगारासाठी एवढं साहित्य पुरेसं व्हायचं. आता व्हॅनिटी बॉक्सेस आल्या. प्रसाधनं त्याच्यात, डोळ्यात व दुकानात मावेनाशी झाली. लहान मुलीच्या वेण्या घट्ट लोकरीच्या धाग्याने बांधल्या जायच्या, त्याला ‘आगवळ’ म्हणायचे. हाही शब्द अडगळीतच गेलेला.

स्वयंपाकघरातील चूल गेली त्याचबरोबर चूल, वैल, निखारे हे शब्दही गेले. स्वयंपाकघरातील सतेली, तपेली, कथली, रोवळ्या, गंज हे शब्द आठवेनासे झाले. ओगराळं हा शब्दही असाच अडगळीत गेलेला. पंचपाळे, चौफुले, कावळे हे सगळे हरवले. देवघराबरोबर सहाण, गंधाची थाटी गायब.

‘काथवट’ हा शब्द तर इतिहासजमा झालेला. काथवट म्हणजे लाकडी परात, हिंदीतली ‘मन चंगा तो कथोटी में गंगा’ ही म्हण त्यावरूनच आलेली.

कपड्यांचा विचार करताना तठव, जाजम, बसकर, सुताडे सगळे हरवून गेलेले. सोवळ्यात नेसण्याचा पितांबर हा शब्द ऐकू येतो, पण उत्तरवस्त्र ‘पाभरी’ हरवून गेली. सोवळ्यात नेसण्याची ‘धाबळी’ सोवळ्याबरोबर कालबाह्य झाली.

सोन्याचे भाव गगनाला भिडले आणि जुने सोन्याचे अलंकार विसरले गेले. कोठीघरातील कोठय़ा आहेत; पण कणग्या, ढोल्या - ज्यात भरपूर धान्य भरलेले असायचे त्या गडप झाल्या. सूप खुंटीवरून बाउल मधे आलं.

एखाद्या वर्षी जेव्हा शेतात खूपच भरपूर धान्य येईल तेव्हा अडीअडचणीसाठी अंगणात मोठेमोठे ‘पेव’ खणून त्यात ते धान्य साठविले जाई. एकेका पेवात कमीत कमी दहा-दहा पोते साठविले जाई.

जेवण्याची पितळी, वाटकावन, बसकर, मडक्यांची उतरंड, फुंकणी, उखळ, मुसळ, खल आणि बत्ता, जातं, खुंटा, पावशेरा, शेर, मण, गुंज, आतपाव, छटाक वगैरे गायब झाले.
बदलत्या काळाबरोबर पिकदानी सोडून सगळीकडे बिनधास्त आणि बिनदीक्त पान, पानपराग आणि माव्याच्या पिचकाऱ्या टाकणे हा जणू आता हक्क झाला आहे.

‘अ’ अडकित्त्याचा हळूहळू हद्दपार होऊ घातला आहे.
उंचीवर घर असेल तर घरात प्रवेश करण्यासाठी उताराचा रस्ता असायचा, त्याला चोप म्हणत असत.. घरात प्रवेश केल्यावर लगेचच दोन्ही बाजूला बैठक असायची, तिला ढाळज किंवा ढेळज म्हणत.. ही पण अडगळीतील नावे आहेत …

लाइट आले आणि अनेक तर्‍हेचे दिवे गडप झाले.
काळानुसार आणि गरजेनुसार असे अनेक शब्द गडप होत असतात तसेच खूप नवेनवे शब्दही वापरात येत असतात. भाषा ही सतत समृद्धच होत असते. विकास आणि प्रगती ही सतत चालूच राहणार आहे, फक्त गेल्या अर्धशतकात पूर्वी प्रचलित असलेल्या पण विसरल्या गेलेल्या शब्दांची सहज आठवण झाली म्हणून हा सारा शब्दप्रपंच, इतकेच…! 

काही अडगळीत मावळत चाललेले मराठी शब्द

तांबडं, कडूसं, येरवाळी, इदुळा, आवसं, पारुख, घटका, पळे, औंदा, यंदा, परूस, टिच, इत, हात, वाव, काखवाव,  मैल, फर्लांग, मोगली, कुड, बारव, आड, कनिंग, कनगुलं, डुरकुलं, झाप, डालगं, दुरडी, परडी, टोपलं, तिकाटनं, मेडकं, आडू, वलन, वासा, भानुसा, खुराडा, आंगण, वटा, रांजण, सारवण, पोतारा, वळचण, पागोळ्या, कलवड, सूरपारंबा, विटी-दांडू, लोम्पाट, हुतुतू, शिवनाभानी, दस्ताडपुगडं, लंगडी, जिबल्या, चुळचुळमुंगळा, आकरा टोकरा, आईचं पत्र हरवलंय, माचाळ, पोहरा, कोरड्यास, कालवण, घासलेट, टकूचं, कुंची, शेलकाट, पैरण, बाराबंदी, आंगरटं, छाटण, मुडासं, पटका, टोपी, लुगडं, चोळी, पोलकं, फडका, गवन,  कांबळ, वाकळ, घोंगडं, लेपाटं, पासोडी, रकटं, चादर, वाकी, मासोळी, बाळी, भिकबाळी, बुगडी, बिंदली, कुडकी, वजरटीक, सर, कमरपट्टा, करदुडा, तोडा, वाळा, औत, कुळव, फरांडी, डुबं, तिफण, चाडं, नळं, जानवळं, इळत, इडी, दिंड, फाळ, फारुळं, रुमणं, शीवळ, जु, कुरडिकं, खिळ, सापती, कुळव, पास, दातुळ, काडवान, आवूड, बराड, काकरी, मुरडान, तास, आडतास, वसान,  दोरकांड, दावं, कानी, कासरा, चऱ्हाट, चिलबल, बिरडं, येटान, बुटयेटान, आक्री, आक, तुंबा, आरा, पुट्टा, कुनी, धाव, डोंबाळा, घोडकं, ढकली, खुटला, पाटली, शिड्या, मुंगा, खोडकी, ढोणगी, चारबैली, सहाबैली, हाताळी, वेसण, म्होरकी, चौरी, माचाटी, झुली, मुंगसं, चावऱ्या, छकडा, नळा, राखोळी, वळती, आटोळा, गोफण, पिचका, बुजगावणं, कुडी, गांजवा, चुकारी, उतार्‍या, अर्धली, करडू, ताटली, परात, तंबुलं, लोटकं, तवली, भगोनं, हांडा, घंगाळं, चरवी, गुंडगी, चमचा, वग्राळं, पळी, चाटू, कावळा, वाडगा, परात, पितळी, वाटी, तांब्या, पेला, गडू, गडवा, चंबू, किटली, खिसनी, गाळणी, शेवगा, झाऱ्या, सांडशी, चिमटा, काठवट, बेलणं, उखळ, ठोंबा, मुसळ, सूप, जातं, खुटा,  पाटा, वरवंटा, कंदिल, चिमणी, टाक, दौत, शाई, पत्र, टिप कागद, इळा, खुरपं, कोयतं, नारगत, भाला, खलबत्ता, शेम्ब्या, झूल, वाळंन, फुकारी, दिवळी, फरताळ, तुळई, किलचान, हालकडी, आडू, सवनं, माचाड, वरवटा, बाजवा, आड्याळं, दंड्याळं, लाखान, मिट्या, आसूड, इळत, वडवान, मोट, नाडा, सोंदुर, चाक, कणा, कणंपट्टी, चाकपट्टी, फावडं, घमेलं, कुऱ्हाड, कुदळ, सांगुळा, थारुळा, हौद, हेळ, मोगळा, पाचुंदा, पलान, दंड, आटवनी, आवातनं, न्याहारी, वानवळा, भलरी, काढणी, मळणी, बडवणी,  बुचाड, खळं, माजनं, ढवरा, भंडारा, रास, मदान, वावडी, हातनी, वाफा, सरी, वरंबा, सारा, वसारी, आमुनं, इर्जिक, सांगड, पैरा, शेम्ब्या, झूल, चंगाळं, फुकारी, मोगा, मोरवा, झाकणी, सुगाड, शेर, आटवा, चिपटं, मापटं, कोळवं, नीळवं, खंडी, मण,पसा, वंजळ, भारा, उतरंड, ढेपन, आळी, चावडी,  गावपांढर, शीव, गावकूस.

विचार करा यातील किती शब्द आजकल वापरले जातात व आपल्या पुढील पिढीपर्यंत किती शब्द पोचतील.
                                                               
                                       🪴

Monday, December 25, 2023

गेले ते दिवस...!

आमचाही एक जमाना होता
पुर्वी बालवाडी हा प्रकारच नव्हता. 
पुढे सहा सात वर्षानंतर स्वतःच शाळेत जावे लागत असे. 
जर शाळेत गेलो नाही तरी कोणाला काही वाटायचे नाही.
सायकलने/ बसने पाठवायची पद्धत नव्हती,
मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल 
अशी भीती आमच्या आईवडिलांना कधी वाटलीच नाही.
पास / नापास हेच आम्हाला कळत होतं...
टक्केवारी आणि आमचा
संबंध कधीच नव्हता.😆

शिकवणी लावली,
हे सांगायला लाज वाटायची....
कारण "ढ" असं
हीणवलं जायचं...🤣

पुस्तकामध्ये झाडाची
पानं आणि मोरपीस ठेवून
आम्ही हुशार होऊ शकतो,
असा आमचा दृढ विश्वास
होता...😏

कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या 
पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता 
हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं.
दरवर्षी जेव्हा नव्या
इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, 
पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे,
हा आमच्या जीवनातला
एक वार्षिक उत्सव
असायचा...🤗

वर्ष संपल्यावर पुस्तके विकणे आणि विकत घेण्यात 
आम्हाला काहीही लाज वाटत नसे. 😝

आईवडिलांना आमचे शिक्षण म्हणजे 
त्यांच्यावर बोजा असेही नव्हते.🙂

कोण्या मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर 
व दुसऱ्याला मागच्या carrierवर बसवून, 
आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो
हे आता आठवतही नाही...🤭

सरांचा शाळेत मार खाताना
आणि पायांचे अंगठे धरुन उभं राहताना, 
कान लाल होऊन पिरगळला जाताना 
आमचा 'इगो' कधीही आडवा येत नव्हता, 
खरं तर आम्हाला 'इगो' काय असतो, 
हेच माहीत नव्हतं...😀

मार खाणं, ही आमच्या दैनंदिन जीवनातील 
एक सामान्य प्रक्रिया होती.
मारणारा आणि मार खाणारा
दोघेही खूष असायचे.
मार खाणारा यासाठी की,
'चला, कालच्यापेक्षा तरी
आज कमी धोपटला गेलो
म्हणून' आणि मारणारा
'आज पुन्हा हात धुवून
घ्यायला मिळाले म्हणून......' 😂

बिनचपला, बूटांचे कोणत्याही चेंडू आणि लाकडी 
बॅटने वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर क्रिकेट
खेळण्यातले काय सुख होते, 
ते आम्हालाच माहीत होते.
आम्ही पॉकेटमनी कधीच मागितला नाही, 
आणि वडिलांनी कधी दिला नाही.
आमच्या म्हणून काही गरजाच नसायच्या. 
छोट्याशा असल्याच तर घरातले 
कोणीतरी पूर्ण करून टाकायचे. 
सहा महिन्यातून चिरमुरे फरसाण खायला 
मिळालाच तरी आम्ही बेहद खूश होतो.🤣

दिवाळीत लवंगी फटाक्यांची लड सुटी करून 
एकेक फटका उडवत बसणे यात काही 
अपमानास्पद आम्हाला वाटायचं नाही. 
कोणी दुसरा फटाके फोडत असेल 
त्याच्या मागे मागे धावायचो.🏃‍♂️

आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगूच
शकलो नाही की, आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो, 
कारण आम्हाला 'आय लव यू'
म्हणणं माहीतच नव्हतं...😘

आज आम्ही असंख्य टक्के टोमणे खात, 
संघर्ष करत दुनियेचा एक हिस्सा झालोय. 
काहींना जे हवं होतं, ते त्यांनी मिळवलंय
तर काहींना काय माहीत....? 😇

शाळेतील ते डबल/ ट्रिपल सीटवर फिरवलेले, 
स्कूल बाहेरच्या त्या हापपॅन्टवाल्या गोळीवाल्याकडून 
काय काय ज्या मित्राच्या कृपेने मिळायचे ते मित्र,
कुठे हरवलेत ते...! 😌

आम्ही जगात कुठेही
असू पण हे सत्य आहे की,
आम्ही वास्तव दुनियेत
जगलो, आणि वास्तवात
वाढलो........! 

कपड्यांना सुरकुत्या पडू
न देणं आणि नात्यांमध्ये औपचारिकता जपणं
आम्हाला कधी जमलंच नाही. 
भाकरी आणि भाजीशिवाय मधल्या सुटीतला काही 
डबा असतो हे आम्हाला माहीतच नव्हतं.🍲

आपल्या नशिबाला चुकूनही दोष न देता 
आम्ही आनंदाने आजही स्वप्नं पहातोय. 
कदाचित ते स्वप्नच आम्हाला जगायला मदत करतायत. 
जे जीवन आम्ही जगलो त्याची वर्तमानाशी 
काहीच तुलना होणार नाही.....! 🌿

आम्ही चांगले असू
किंवा वाईट, पण
आमचाही एक 'जमाना' होता.....🦚

🌱
एका तरुणाने त्याच्या वडिलांना विचारले :

"तुम्ही लोक आधी कसे जगत होता हो ?
तंत्रज्ञानात प्रवेश नाही, विमाने नाहीत
इंटरनेट नाही, संगणक नाहीत
नाटके नाहीत, टीव्ही नाहीत
गाड्या नाहीत, मोबाईल फोन नाहीत ?"

त्याच्या वडिलांनी उत्तर दिले :

"आजची तुमची पिढी कशी जगत आहे त्याचप्रमाणे,
भक्ती नाही, ज्ञान नाही
संत माहीत नाहीत, ग्रंथ माहीत नाहीत
शांती नाही, संयम नाही
धर्मनिष्ठा नाही, कुळधर्म-कुळाचार नाही
प्रार्थना नाहीत, शाकाहार नाही
सण-उत्सव नाही, करुणा नाही
सन्मान नाही, आदर नाही
आदर्श नाहीत, लाज नाही
नातीगोती नाहीत, नम्रता नाही
आरोग्याचे भान नाही, वेळेची जाण नाही
खेळ नाही, वाचन नाही
सेवाभाव नाही."

आम्ही, १९५० ते १९८० दरम्यान जन्मलेले लोक आहोत. आमचे जीवन एक जिवंत पुरावा आहे.

👉 खेळताना आणि सायकल चालवताना आम्ही कधीही हेल्मेट घातले नाही.
👉 शाळा सुटल्यावर संध्याकाळपर्यंत खेळायचो. आम्ही कधीच टीव्ही पाहिला नाही.
👉 आम्ही इंटरनेट मित्रांसोबत नाही तर खऱ्या मित्रांसोबत खेळलो.
👉 आम्हाला कधी तहान लागली तर आम्ही नळाचे पाणी प्यायलो बाटलीचे पाणी नाही.
👉 आम्‍ही कधीही आजारी पडलो नाही, तरीही आम्‍ही चार मित्रांसोबत एकच ग्लास ज्यूस शेअर करायचो.
👉 आम्ही रोज भरपूर भात खात असलो तरी आमचे वजन कधीच वाढले नाही.
👉 अनवाणी पायी फिरूनही आमच्या पायाला काही लागले नाही.
👉 आमच्या आई आणि वडिलांनी आम्हाला निरोगी ठेवण्यासाठी कधीही कोणत्याही सप्लिमेंट्सचा वापर केला नाही.
👉 आम्ही स्वतःची खेळणी तयार करायचो आणि त्यांच्याशी खेळायचो.
👉 आमचे आईवडील श्रीमंत नव्हते. त्यांनी आम्हाला प्रेम दिले, सांसारिक साहित्य नाही.
👉 आमच्याकडे सेलफोन, डीव्हीडी, प्ले स्टेशन, एक्सबॉक्स, व्हिडिओ गेम्स, पर्सनल कॉम्प्युटर, इंटरनेट चॅट कधीच नव्हते, पण आमचे खरे मित्र होते.
👉 आम्ही आमच्या मित्रांच्या घरी विनानिमंत्रित गेलो आणि त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वाद घेतला.
👉 तुमच्या जगाच्या विपरीत, आमचे जवळ जवळ राहणारे नातेवाईक होते त्यामुळे कौटुंबिक वेळ आणि नातेसंबंध एकत्र आनंदात होते.
👉 आपण ब्लॅक अँड व्हाईट फोटोंमध्ये असू शकतो पण त्या फोटोंमध्ये तुम्हाला रंगीबेरंगी आठवणी सापडतील.

आम्ही एक अद्वितीय आणि सर्वात समजूतदार पिढी आहोत, कारण आम्ही शेवटची पिढी आहोत ज्यांनी त्यांच्या पालकांचे ऐकले.

तसेच, प्रथम ज्यांना त्यांच्या मुलांचे ऐकावे लागले. 😂

आम्ही तेच आहोत जे अजूनही हुशार आहोत आणि तुमच्या वयात असताना कधीही अस्तित्वात नसलेले तंत्रज्ञान वापरण्यासाठी आता तुम्हाला मदत करत आहोत...!

शेवटी गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी....!

                                      🦋

Friday, September 15, 2023

देवबाभळी : बी ए भाग २

संगीत देवबाभळी : एक थरारून सोडणारा नाट्यानुभव

देवबाभळीअसे निरस नाव असलेलं एखादं नाटक असेल असं कधी वाटलं नव्हतं, त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते संगीत नाटक असेल आणि त्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे तो एक थरारून टाकणारा नाट्यानुभव असेल असंही कधी वाटले नव्हते. पण म्हणतात ना Truth is stranger than fiction. तसंच काहीसं माझं या नाटकाच्या बाबतीत झालं आहे. पुण्यातील वास्तव्यात हे नाटक पाहण्याचा योग आला आणि जे पाहिले त्यामुळे भरून पावलो. हे नाटक पाहिलं नसतं तर एका चांगल्या आनंदाला निश्चितच मुकलो असतो. 

खरं तर हे नाटक आहे संत तुकारामांची पत्नी आवली आणि विठूरायाची पत्नी देवी रुख्मिणी यांच्यावर. या नाटकात केवळ या दोघींच्याच भूमिका आहेत. तुकाराम महाराज आणि विठ्ठल यांचा उल्लेख वारंवार झाला तरी या नाटकात पात्र म्हणून प्रत्यक्षात रंगमंचावर ते कधीच येत नाहीत पण ते अवघे नाटक व्यापून उरले आहेत. त्यांचे अस्तित्व सतत जाणवत राहते. मग प्रश्न असा आहे की देवबाभळी हे नाव आले तरी कसे ? 

यासाठी नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक असलेल्या प्राजक्त देशमुख यांना त्याचे श्रेय द्यावे लागेल. तुकारामांची पत्नी आवली हिच्या पायात बाभळीचा काटा मोडतो. तो काटा काढण्यासाठी कोण मदत करतं तर प्रत्यक्ष विठुराया. विठुरायाने पायातला काटा काढला तरी पायातल्या वेदनेची आणि जखमेची ठसठस घेऊन आवली नाटकभर वावरते. विठुराया केवळ तेवढं करून थांबत नाही, तर तिच्या मदतीला आपली पत्नी रुख्मिणी हिला पाठवतो. त्यावेळी आवली पोटुशी असते. देवबाभळीचा काटा मोडणं हे खरं तर निमित्त ! पण या निमित्ताने विठुरायाचे आपल्या भक्तांवरील प्रेम दिसते. या निमित्तानेच रुख्मिणी आवलीच्या घरी येते. या दोघींचंही दुःख कुठेतरी एकसमान आहेत. पण त्या दोघींच्या मनातील वेदना, स्त्री सुलभ भावना आणि आपल्या पतीबद्दल असलेलं प्रेमही यानिमित्ताने दिसून येतं. या सगळ्या गोष्टींना कारण ठरते ती देवबाभळी !

नाटकाचा पडदा उघडतो आणि शेणानं आपलंअंगण सारवणारी आवली दृष्टीस पडते. सारवताना ती गात असते. सकाळचे प्रसन्न वातावरण दृष्टीला पडते. स्वयंपाकघरातून डोकावणारी सूर्यकिरणे दिसतात. चुलीतला धूर दृष्टीस पडतो. आवली भाकऱ्या करते आणि भंडाऱ्याच्या डोंगरावर असणाऱ्या आपल्या पतीला म्हणजेच तुकाराम बुवांना त्या नेऊन देत असते. तुकारामबुवांना हाक मारताना ' आवो आवो...' अशा तिच्या आर्त हाका हृदयाला स्पर्शून जातात. डोंगर उतरताना आवलीच्या पायात बाभळीचा काटा घुसतो आणि ती खाली कोसळते. पुढचं तिला आठवत नाही. 

आवलीला शुद्ध येते तेव्हा ती आपल्या स्वयंपाकघरात पडलेली असते. चुलीजवळ कोणीतरी स्त्री भाकऱ्या करताना तिला दिसते. आपल्या घरात ही कोण नवीन बाई ? तुकारामबुवांनी काही नवीन तर.. ? अशी शंका तिच्या मनात येते. ती त्या स्त्रीला विचारते, ' कोण ग तू ? आणि माझ्या घरात कशी आलीस ? ' तेव्हा ती सांगते, ' माझं नाव लखुबाई. मला तुमची काळजी घ्यायलाच पाठवलं आहे. ' ही लखुबाई म्हणजेच रुख्मिणी. प्रत्यक्ष विठ्ठलाच्या सांगण्यावरून ती इथं आली आहे. तशी आवली कजाग बाई. विठ्ठलाला चक्क शिव्या घालत असते. पण त्याचं कारणही तसंच असतं. तिचा पती म्हणजेच तुकाराम महाराज विठ्ठलाच्या नादी लागलेले असतात. आपल्या पत्नीकडे, घराकडे, संसाराकडे त्यांचे काडीमात्रही लक्ष नाही. त्यामुळे ती विठ्ठलाला शिव्या देते. आपल्या पतीला हे ' पंढरीचे भूत ' लागले आहे आणि त्याने आपल्या सगळ्या संसाराचे वाटोळे केले आहे अशी तिची भावना असते. 

आवली विठ्ठलाला ' चिघळलेली जखम ' म्हणते. देवाच्या नादी लागण्याचा, नामस्मरणाचा काय उपयोग आहे असे म्हणते. पण आता घरात आलेल्या रुख्मिणीला मात्र तिचे हे विठ्ठलाला म्हणजे आपल्या पतीला शिव्या देणे आवडत नाही. अशी ही कजाग आवली असली तरी वरून काटेरी फणसासारखी दिसणारी आहे. अंतर्यामी मात्र फणसाचे गोड गरे आहेत. अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती ही की आवली विठ्ठलाला शिव्या देत असली तरी त्यानिमित्ताने का होईना पण ती घेते त्याचेच नाव ! याअर्थाने आवलीही विठ्ठलभक्त आहेच ! 

रुख्मिणी तिचा पाय हातात घेते. त्याला मलमपट्टी करते. तिच्याच घरात तिच्यासाठी भाकऱ्या बडवून तिला मदत करते. तेव्हा रुख्मिणी विचारते, ' यातला मला एखादा तुकडा दिला तरी चालेल. ' तेव्हा आवली म्हणते, ' तुकडा कशापायी ? पूर्ण भाकरीच देईन की तुला. ' यातून आवलीचा प्रेमळ स्वभावही दिसून येतो. रुख्मिणी चुलीजवळ बसून जेव्हा भाकरी करते, तेव्हा चुलीतल्या निखाऱ्याचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडतो. त्याने तिचा मुळातच तेजपुंज असलेला चेहरा उजळून निघतो. तिचं भाकरी करणं, भाकरी शेकणं हे कुठेही नाटकातलं वाटत नाही, इतकं ते जिवंत साकारण्यात ती आणि दिग्दर्शक दोघेही यशस्वी झाले आहेत. आवली जेव्हा घर सारवते, तेव्हाही ते नाटकातलं दृश्य वाटतच नाही. घर सारवणं नाहीतरी आजकाल कोणाला माहिती आहे ? पण आजच्या पिढीला ते यात माहिती होऊ शकेल. 

आवलीचा तुकारामबुवांवर राग आहे तसाच रुख्मिणीचा सुद्धा विठ्ठलावर आहे. पंढरपुरात विठ्ठल आणि रुख्मिणीची देऊळं वेगवेगळी आहेत. विठल हा श्रीकृष्णाचाच अवतार आहे. श्रीकृष्ण जेव्हा द्वारकेला आला, तेव्हाही त्याने राधेशी असणारी प्रीती, स्नेहभाव कायमच ठेवला होता. त्यामुळे रुख्मिणी रागावून दिंडीर वनात निघून गेली होती. तोच संदर्भ इथे आहे. या कारणानेच रुख्मिणी विठ्ठलावर नाराज आहे. विठ्ठलाला आपल्यापेक्षा आपले भक्त अधिक प्रिय आहेत अशी तिची तक्रार आहे. विठ्ठलाने जेव्हा आवलीच्या पायातला काटा काढला, तेव्हा स्त्री सुलभ भावनेतून रुख्मिणी बघायला आली की कोण ही की जिच्या पायातला काटा आपला पती काढतो आहे.  आवली त्याच्या भक्ताची पत्नी आहे. त्याची काळजी घेणारी ती आहे. ती गर्भार अवस्थेतही आपल्या पतीला जेवण घेऊन येते. म्हणून विठुराया रुख्मिणीला आवलीच्या घरी जाऊन तिची सेवा करायला सांगतो. 

अशा या परिस्थितीत आवली आणि रुख्मिणी जवळ येतात. एकमेकींची दुःख समजून घेतात. त्यांच्यातील संवाद हृदयस्पर्शी तर आहेतच पण खूप काही सांगून जाणारे आहेत. तुकाराम बुवा घरात अजिबात लक्ष देत नाहीत. त्यांच्या स्वयंपाकघरातील डबे, भांडी रिकामी आहेत. खरं तर आवलीच माहेर श्रीमंत होतं. ती आपल्या माहेरी परत जाऊ शकली असती. रुख्मिणी तिला विचारते, ' मग काय आहे तुमच्याकडे ? कसा चालतो तुमचा संसार ? ' त्यावेळी आवली उपरोधिकपणे तुकारामबुवांचा अभंग वापरून उत्तर देते, ' आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने...' त्यावेळी प्रेक्षक अंतर्मुख होतात. 

रुख्मिणी विचारते, ' मग तू निघून का जात नाहीस ? ' त्यावर आवलीने दिलेले उत्तर सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारे आहे. ती म्हणते, ' निघून जाऊन काय करू ? मी आहे म्हणून त्यांना जेवण तरी मिळते. माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला रुसून निघून जाण्याचा अधिकार कुठे आहे ? मी काही रुख्मिणी थोडीच आहे रुसून निघून जायला ? आणि निघून गेल्यावर घरी परत यावंसं वाटलं तर आल्यावर घर तरी जागेवर असेल का ? मग कुठे जायचं ? ' यातून तिने रुख्मिणीला बोध तर केला आहेच पण आजकाल क्षुल्लक कारणावरून नवऱ्यावर चिडून घरातून निघून जाणाऱ्या मुली, काही झाले की लगेच घटस्फोट घेणाऱ्या मुली यांच्यासाठीही दोन मोलाचे शब्द यातून तिने सुनावले आहेत असे वाटते. एकदा का घर सोडून निघून गेल्या आणि नंतर परत यावेसे वाटले तरी घर ( पती ) जागेवर असेलच याची शाश्वती कोणी द्यावी ? 

रखुमाई म्हणते, ' मी आणि तू दोघं गाभाऱ्याच्या बाहेर आहोत, पण तू मात्र गाभाऱ्याबाहेर राहूनही गाभाऱ्याचा घुमारा झालीस. ' आवली जशी रुख्मिणीला तिची चूक दाखवून देते, तशीच रुख्मिणी सुद्धा आनंदाने जीवन जगण्याचा मार्ग आवलीला सांगते. ती पावसात आवलीला घेऊन जाते. हात पसरून सांगते, ' बघ पावसात असं मनसोक्त भिजायचं असतं सगळं विसरून. मुक्त, आनंदी व्हायचं असतं. ' या नाटकातील संवाद असेच हृदयाला हात घालणारे आहेत. नाटकाचा काळ प्राचीन असला तरी आजही हे संवाद स्त्री मनाची अवस्था स्पष्ट करतात. ' करपायच्या आत खरपूस झाल्या झाल्या उलथायची भाकरी, फोडणी तांबूस झाल्या झाल्या ओतायची भाजीत, उतू जायच्या आत उतरवायचं भांडं ... का ? कडेलोटाच्या क्षणापर्यंत पोहोचून पुन्हा माघारी का गं फिरायचं आपण बायकांनीच ? ' आणखी एका संवादात म्हटलं आहे, रखुमाई आवलीला म्हणते, ' स्वतःसाठी जग. जगताना स्वतःसाठी काहीतरी जपून ठेव. ' ' प्रत्येकानं आपापल्या वाट्याचं शेत नांगरून ठेवायचं असतं. पाऊस पडेल किंवा नाही याची चिंता करायची नसते. ' ही वाक्यं कुठेतरी गीतेतल्या उपदेशाशी नातं सांगणारी आहेत असं मला वाटतं. आपलं कर्तव्य आपण प्रामाणिकपणे करावं. बाकी गोष्टी आपल्या हातात नसतात. पुढचं ईश्वरावर सोपवावं असंच गीतेत सांगितलं आहे ना ! 

एकंदरीत हे नाटक आपल्याला थेट विठ्ठलाशी जोडणारा सांगीतिक अनुभव देतं. या नाटकात एकाच रंगमंचावर जणू देहू नगरी अवतरली आहे. तुकारामबुवांचा वाडा, आवलीच स्वयंपाकघर, भंडाऱ्याचा डोंगर, इंद्रायणीचा घाट हे सगळे दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. यात प्रकाश योजना, नेपथ्य या साऱ्यांचा भाग आहेच. आवली किंवा रुख्मिणी कपडे धुताना, इंद्रायणीच्या पाण्यात हात घातल्यानंतर होणारा आवाज इतका हुबेहूब आहे की खरोखरच इंद्रायणी नदी तिथे असल्याचा भास होतो. यात पारंपरिक संगीत वाद्यांचा वापर केला आहे. तबला, पखवाज, संवादिनी, सतार आदी वाद्यांचे स्वर मन प्रसन्न करणारे आहेत. प्राजक्त देशमुख यांचे संवाद आणि अभंगरचना यांना शुभांगी सदावर्ते (आवली) आणि मानसी जोशी (रुख्मिणी /लखुबाई) यांनी न्याय दिला आहे असे म्हणण्यापेक्षा त्याचे सोने केले आहे असे म्हणणे योग्य ठरेल. आनंद भाटे यांचे तुकाराम महाराजांच्या अभंगांचे पार्श्वगायन भक्तिरसाचा अनुभव देणारे आहे.

शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी यांचा जिवंत अभिनय हे नाटकाचं वैशिष्ट्य. आवली जेव्हा तुकारामांना साद घालते तेव्हा तिचे, ' आवो आवो ' हे शब्द अक्षरशः काळजाचं पाणी पाणी करतात एवढी ताकद, एवढी आर्तता त्या स्वरात आहे. मानसी जोशी विठ्ठलाच्या मूर्तीशी संवाद करीत असताना ती केवळ मूर्तीशी बोलते आहे असे वाटतच नाही. प्रत्यक्ष विठ्ठलच समोर आहे असे वाटते. तुकाराम बुवांची गाथा वाचताना आवली आणि रुख्मिणी दाखवल्या आहेत. आवलीचे गूढ रम्य स्वप्न, वाऱ्याने उडणारी तुकोबांच्या गाथेची पाने, इंद्रायणीत पडून वाहून जाणारी गाथेची पाने हे सगळे प्रसंग कमालीचे जिवंत वाटतात. चित्रपटाच्या तुलनेत दृश्ये दाखवताना नाटकांना अनेक मर्यादा पडतात पण इथे त्या सगळ्या मर्यादा असूनही सगळं काही रंगमंचावर जिवंत करण्यात दिग्दर्शक, नेपथ्यकार आणि प्रकाश योजनाकार यशस्वी झाले आहेत. प्रेक्षकांना एक भव्यदिव्य अनुभव त्यांनी दिला आहे. 

भद्रकाली प्रॉडक्शनने अनेक दर्जेदार नाटके दिली, त्याच परंपरेतील हे नाटक आहे. मच्छिन्द्र कांबळी यांची दर्जेदार नाटकांची परंपरा प्रसाद कांबळी यांनी नुसतीच चालू ठेवली नसून आणखी पुढे नेली आहे. देवबाभळी हे संगीत नाटक असूनही इतर संगीत नाटकांपेक्षा आगळेवेगळे. प्रसाद कांबळी या नाटकाचे निर्माते आहेत. आनंद ओक यांचे संगीत आहे. विशेष म्हणजे या नाटकातील गीते शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी दर वेळी प्रत्यक्ष गातात. इतर नाटकांप्रमाणे त्या गीतांची रेकॉर्ड लावली जात नाही. 

प्राजक्त देशमुख यांचे संवाद हृदयाला भिडणारे आहेत. लोकसंगीत, अभंग, ओवी इ. चा सुरेख वापर या नाटकात केला गेला आहे. संतपरंपरा, लोकपरंपरा आणि अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन हे या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. या नाटकाला एकूण ४४ पारितोषिके मिळाली आहे. महाराष्ट्र शासन, साहित्य अकादमी इ. विविध पुरस्कार मिळाले आहेत. अनेक विक्रम या नाटकाने रचले आहेत. फोर्ब्स या जगप्रसिद्ध मासिकाने या नाटकाची सर्वाधिक लोकप्रिय नाटक म्हणून नोंद घेतली आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी हे नाटक गौरविले आहे. 

केवळ दोनच स्त्री पात्रे एवढा सशक्त अभिनय करून दोघींच्या बळावर एखादे नाटक एवढे यशस्वी करू शकतात हे विस्मयचकित करणारे आहे. त्यासाठी शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी या दोघीना सलाम. या नाटकाची वाटचाल लवकरच पाचशेव्या प्रयोगपर्यंत होईल. काही दिवसांनी या नाटकाचे प्रयोग थांबवण्याचा निर्णय कलाकारांनी घेतला आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनपर्यंत एकदाही हे नाटक पाहिले नसेल त्यांनी एकदा तरी ते जरूर पाहावे असे आहे.

                              विश्वास देशपांडे
                                       🪴

Tuesday, July 18, 2023

अण्णा भाऊ साठे : बी ए भाग २

लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचा रशियात पुतळा उभा राहाणार म्हटल्यावर कोणत्या मराठी व्यक्तीचे मन आनंदाने उचंबळणार नाही. आपल्या राज्यातील एका समाजसेवक आणि साहित्यिकाचा अशाप्रकारे गौरव होणं ही सर्वांसाठीच अभिमानाची बाब ठरते. रशियाची राजधानी मॉस्को येथे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला. मॉस्कोतील रुडमिनो मार्गरेटा फॉरेन लँग्वेज स्टडीज या संस्थेनं अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारला. या पुतळ्याचे अनानवरण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं.

भारतातील अनेक महापुरुषांचे अनेक पुतळे जगभरात उभारण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी भारतीय समुदाय प्रामुख्याने आहे त्या ठिकाणी भारतीय महापुरुषांचे पुतळे असणे ही नित्याची बाब मानली जाते. पण रशियात अण्णा भाऊंचा पुतळा का उभा करण्यात आला आणि अण्णाभाऊंचं आणि रशियाचं नेमकं नातं काय याबद्दल अनेकांना कुतूहल निर्माण झालं आहे. याच प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे.

अण्णा भाऊ साठे हे मराठीतील प्रथितयश लेखक होते. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या, गीतांनी, कथांनी मराठी जनतेचे ७ दशकाहून अधिक काळ प्रबोधन आणि मनोरंजन केलं आहे. त्यांनी विविध कलाप्रकार आणि साहित्याचे प्रकार हाताळले होते. त्यातील महत्त्वाचा एक प्रकार म्हणजे अण्णा भाऊंनी लिहिलेलं 'माझा रशियाचा प्रवास' हे प्रवासवर्णन. या पुस्तकामुळे आपल्याला कल्पना येऊ शकते की अण्णाभाऊ साठे आणि तत्कालीन रशियाचे काय नाते होते.

स्तालिनग्रादचा पोवाडा...
अण्णा भाऊ साठे हे विचारांनी साम्यवादी होते. त्यांना कार्ल मार्क्स, फ्रेडरिक एंजल्स, लेनिन यांच्या विचारांचे आकर्षण होते. कामगार, शोषित वर्ग, समाजातील तळागाळातील लोकांचे कल्याण हे साम्यवादामुळे होईल असे त्यांना मनापासून वाटत होते. पृथ्वी ही शेषनागाच्या शिरावर नसून कामगाराच्या तळ हातावर उभी आहे असं ते म्हणत. रशियात लेनिन यांच्या नेतृत्वात कामगार, विस्थापित, शोषित वर्गाने लढा दिला आणि त्या ठिकाणी असलेली सरंजामशाही भांडवलशाहीच्या जोरावर असलेली सत्ता उलथवून टाकली. त्यानंतर रशियात साम्यवादी विचारधारेचे राज्य आले. देशातील साधनसंपत्तीवर सर्वांचा समान हक्क आहे हे साम्यवादाचे सूत्र ज्या ठिकाणी प्रत्यक्षपणे लागू करण्यात आले होते त्यामुळे अण्णा भाऊंच्या मनात रशिया विषयी कुतूहल आणि आदर दोन्ही निर्माण झाला. त्यांनी रशियन क्रांतीवरील पुस्तकं, लेनिन यांची पुस्तकं, तसेच रशियन साहित्यिकांनी लिहिलेली विविध पुस्तकं वाचली होती. त्यांच्या या सर्व विचारमंथनातून त्यांनी दुसऱ्या महायुद्धावेळी झालेल्या स्टालिनग्राडच्या लढाईवर 'स्तालिनग्राडचा पोवाडा' लिहिला होता. या लढाईत रशियन सैन्याने जर्मनीची नाझी सैन्याचा धुव्वा उडवला होता. अण्णा भाऊंच्या मते ही लढाई केवळ दोन देशातील नव्हती तर दोन विचारधारेंचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांची देखील होती. त्यामुळे अण्णा भाऊ या लढाईचं वर्णन 'दलितांचा आशाकिरण रशियाचा प्राण' असे करतात. भांडवलदारांचे हस्तक बनलेल्या नाझी जर्मनीच्या सैन्यावर रशियन सैन्याने मिळवलेला विजय हा सर्वसामान्यांचा विजय असल्याचे भाऊंनी आपल्या पोवाड्यातून म्हटले आहे. हा पोवाडा पुढे रशियन भाषेत देखील अनुवादित करण्यात आला होता आणि रशियाच्या लोकांना तो प्रचंड आवडला होता.

तुम्ही तर तुरुंगात असता.....
या सर्व गोष्टींमध्ये रशियाला भेट देण्याची आस त्यांच्या मनात निर्माण झाली. रशियातले लोक कसे असतील, तिथे गरिबी आहे की नाही, तिथे कलाकार लोक कसे असतात हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. 'माझा रशियाचा प्रवास' मध्ये ते लिहितात, आपण वाटेल ते करून सोव्हियत संघराज्य पाहावे, असं मला फार वाटत होतं. ती आशा माझ्या मनात सारखी दिवसेंदिवस प्रबल होत होती. रशियातील ते कामगार राज्य कसे असेल, तिथे कॉ. लेनिनने केलेली क्रांती, मार्क्सचे महान तत्त्वज्ञान कसे साकार झाले असेल ती नवी दुनिया, नवी संस्कृती, नवी सभ्यता कशी फुलत असेल, या विचाराने माझं मन भारावलं होतं. रशिया पाहण्याची त्यांची इच्छा इतकी प्रबळ झाली होती की १९४८ मध्ये त्यांनी दोन वेळा पासपोर्टसाठी अर्ज केला होता. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी अण्णा भाऊंना बोलावून विश्वासात घेऊन सांगितले होते की, "बाबा तू आमचा वैरी आहेस, आम्ही चांगले लोक आहोत म्हणून तू बाहेर आहेस नाहीतर तुझी जागा तुरुंगात." त्यानंतर अनेक वर्षं सरली पण रशिया प्रवासाचं स्वप्न अधुरं राहिलं ते राहिलंच. १९६१ मध्ये त्यांच्या 'फकिरा' कादंबरीला पुरस्कार मिळाला आणि इंडो-रशियन कल्चरल सोसायटीकडून भारताच्या शिष्टमंडळात रशियाला भेट देण्यासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. अण्णा भाऊंचे एक स्वप्न साकार होणार होते आणि नेहमी कुर्ता, पायजमा आणि कोल्हापुरी वहाणा वावरणारे अण्णा भाऊ आता सुटाबुटात रशियाला जाणार होते. अण्णा भाऊ रशियाला जाणार म्हणून त्यांच्या मित्र परिवारातील लोक आनंदून गेले. सर्व महाराष्ट्रातून त्यांना लोकांनी प्रवासासाठी पैसे पाठवण्यात आले. लोकांच्या मदतीच्या ओघामुळे एकाच दमात यामुळे आपला खर्च निवारल्याचं अण्णाभाऊ सांगतात. मुंबईहून दिल्ली, दिल्लीहून ताश्कंद आणि ताश्कंदहून मॉस्को असा प्रवास त्यांनी केला. अण्णा भाऊ रशियाला जाणार म्हटल्यावर त्यांचे अनेक आप्तस्वकीय, मित्र त्यांना निरोप देण्यासाठी आले होते. लोकांनी हार-फुलं घातले, लोक वेगवेगळ्या सूचना देत होते. रशियात गेल्यावर हे पाहा ते पाहा. तिथे झोपड्या किती हे पाहा, तिथले सिनेमे नाटक पाहा, गरिबी उद्योग पाहा अशा शेकडो सूचना लोक त्यांना देत होते. कुणी शुभेच्छा देत होतं, कुणी त्यांना काळजी घेण्याबाबतचे सल्ले देत होत होतं या सर्व गोष्टी स्वीकारत स्वीकारत ते दिल्लीला जाणाऱ्या विमानात बसले. दिल्लीत आल्यावर ते ज्येष्ठ साम्यवादी नेते खासदार कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या घरी उतरले. कॉ. डांगे यांच्या पत्नी उषाताई डांगे यांनी त्यांचे स्वागत केले. अण्णा भाऊंची त्यांनी आस्थेनी विचारपूस केली. सोबत काय घेतलं काय नाही, तयारी झाली की नाही या सर्व गोष्टी त्यांनी विचारल्या. काही कमी जास्त असेल तर वस्तू खरेदी करून आणण्याची त्यांची तयारी होती. त्यांनी ज्या प्रेमाने माझ्या पाठीवरून हात फिरवला त्यावरून मला माझ्या आईची आठवण झाली असं अण्णा भाऊंना वाटले.

अण्णा भाऊंच्या प्रवासाची सुरुवात....
कॉ. डांगे यांचे आशीर्वाद घेऊन ते दिल्ली विमानतळावरुन 'चित्तोड की रानी' या विमानाने ताश्कंदला निघाले. रशियात येण्यापूर्वीच अण्णा भाऊंची नाव साहित्यिक वर्तुळात परिचित होते. स्तालिनग्राडचा पोवाडा लोकप्रिय ठरला होता, 'चित्रा' कादंबरी आणि त्यांची 'सुलतान' ही कथा अनुवादित झाली होती. अण्णा भाऊंची ओळख करून देण्यासाठी जो मजकूर छापून येत होता त्यात 'सुलतान फेम' अण्णाभाऊ साठे असा उल्लेख असे. रशियात गेल्यावर काय पाहायचं हा प्रश्न शिष्टमंडळाला विचारण्यात आला. अण्णा भाऊ ज्या शिष्टमंडळात होते त्यात एकूण सहा लोक होते. ते सर्व विविध क्षेत्रातील लोक होते. त्यांच्या आवडी निवडी विविध होत्या. दोन जण डॉक्टर होते ते म्हणाले इथे ऑपरेशन कसे होतात हे आम्हाला पाहायचंय, एक आमदार होते ते म्हणाले इथली संसदीय कामकाज पाहायचंय, लोकशाही कशी आहे ते पाहायचंय असे म्हणाले, एक जण तर स्वतःवरच शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी आले होते, एक वकील होते त्यांना न्यायदान पद्धती पाहायची होती. एक पियानोवादक होते त्यांना पियानोवादन ऐकायचे होते. सर्वजणांनी आपल्याला काय काय पाहायचे हे सांगितले. शेवटी त्यांनी अण्णा भाऊंना विचारले, "मि. साठे तुम्हाला काय पाहायचेय?" त्यावर अण्णा भाऊ म्हणाले, "मला फक्त इथल्या फुटपाथनं भटकायचं आहे." त्यांचं उत्तर ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले.

रशियात मात्र ही गोष्ट अण्णा भाऊंना दिसली नाही.
रशियात अण्णा भाऊंनी अनेक गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या. पण त्यांना सर्वांत जास्त आकर्षण कुणाचे असेल तर सामान्य माणसाचे. सामान्य माणसाला या नव्या सत्तेबद्दल काय वाटतं, तो कसा राहतो वागतो कसा या सर्व गोष्टी त्यांच्या जिव्हाळ्याच्या होत्या. तिथले भव्य प्रासाद त्यांनी पाहिले की त्यांना पहिले तिथल्या कामगाराची आठवण होत असे ज्याने ती वास्तू उभी केली आहे. तिथली स्वच्छता, टापटीप, शिस्त या सर्वांच्याच ते प्रेमात पडले होते. रेल्वे स्थानकावर त्यांनी पोस्टर्स पाहिले आणि ते अत्यंत स्वच्छ होते. त्यावरून ते म्हणतात, इथे रशियात बहुतेक पान खाऊन लोक थुंकत नसावेत. तिथल्या स्थानकावर कागदाचा एक तुकडा नसतो याचे देखील त्यांना आश्चर्य वाटले होते. असे पोस्टर मुंबईत असते तर त्याचे काय झाले असते याची मजेशीर कल्पना अण्णाभाऊंनी केली आहे. 'असं पोस्टर घाटकोपरच्या स्थानकावर लागलं असतं तर मीनाकुमारीला मिशा काढणाऱ्या आणि पृथ्वीराज कपूरच्या मिशा भादरणाऱ्या कलाकाराने काय केलं असतं?' असा प्रश्न अण्णा भाऊ विचारतात. अण्णा भाऊंनी लेनिनग्राडला भेट दिली तेव्हा त्यांना सर्वांत जास्त काय आवडलं असेल तर जागोजागी लोक पुस्तक वाचताना दिसतात हे दृश्य. तेथे त्यांनी अनेक ऐतिहासिक वास्तू पाहिल्या. 'रशियन माणूस हा इतिहास जतन करतो आणि निर्माण देखील करतो' असं ते म्हणतात. मॉस्को शहरात आल्यावर त्यांनी शहरातील गॉर्की रस्त्याला भेट दिली. इतक्या मोठ्या रस्त्याला लेखकाचे नाव देण्यात आले हे पाहून ते भारावून गेले. रशियात कलावंत आणि लेखकाला मान असल्याची नोंद त्यांनी घेतली.

शिवाजी महाराजांच्या राज्यातून मी आलो आहे....
अण्णाभाऊ यांचे ज्या ठिकाणी भाषण असायचे त्या ठिकाणी दोन दुभाषे असत. एक व्यक्ती मराठीतून इंग्रजीत भाषांतर करत असे आणि दुसरी व्यक्ती इंग्रजीचे रशियन मध्ये भाषांतर करत असे. मॉस्कोतील पहिल्या भाषणात ते म्हणाले होते, "कदाचित मराठीत होणारे हे भाषण ऐकण्याची तुम्हावर ही पहिलीच वेळ असावी. परंतु भारतात महाराष्ट्र हे एक राज्य आहे. त्या राज्यात साडेतीन कोटी लोक मराठी बोलतात नि ती माणसं तुमच्या सारखीच नेक नि झुंजार आहेत. तुमचा अफानासी भारतात आला होता. पण त्याचं पहिलं पाऊल माझ्या मराठी धरणीवर, महाराष्ट्र राज्यात, शिवाजी राजाच्या मातृभूमीत पडलं होतं. त्या राज्याच्या मराठीत मी बोलत आहे." त्या भाषणानंतर लोकांची झुंबड उडाली आणि त्यांना ते महाराष्ट्राविषयी विविध प्रश्न विचारू लागले.

रशियात शिक्षणाची नदी वाहते....
रशिया बद्दल बोलताना अण्णाभाऊ साठे म्हणाले होते, रशियात शिक्षणाची नदी वाहते. आणि माणसांना विद्येचं वेड लागलं आहे. म्हणूनच प्रगतीने त्यांचा पदर धरला आहे. त्यांनी सोव्हियत युनियन मध्ये सुरू असलेले सामुदायिक शेतीचे प्रयोग देखील पाहिले. खेड्यात आणि शहरात कसलंच अंतर उरलं नाही याचं त्यांना कौतुक वाटलं होतं. ताश्कंद जवळ असलेल्या स्तालिन सामुदायिक शेताला त्यांनी भेट दिली होती. त्याबद्दलचं त्यांचं निरीक्षण होतं की तेथे दीड हजार हेक्टरच्या जमिनीत ११०४ शेतकरी काम करतात आणि त्यात ४७५ महिला आहेत. त्या भागात चार शाळा असून शेतकऱ्यांच्या मुलांना तिथं शिक्षण दिलं जातं. सोबतच दुधदुभतं आणि कुक्कुटपालन कसं केलं जातं हे त्यांनी पाहिलं. अण्णाभाऊ म्हणतात, मी रशियाच्या समाजवादाच्या यशाबरोबर त्यांचे अपयशही हुडकित होतो. ऐश्वर्याबरोबर दारिद्र्यही मी शोधत होतो. परंतु मला ते दारिद्र्य दिसत नव्हते. दारिद्र्य हे दडत नसते.

पाहण्याचे प्रयत्न प्रामाणिक.....
"कॉ. लेनिन यांनी तिथे समाजवादी दुनिया निर्माण केली आहे. ती मला स्वप्नसृष्टी सारखी भासत होती आणि स्वप्नसृष्टीत माझे भ्रमण सुरू आहे" असं अण्णा भाऊ म्हणतात. सत्ता कुणाचीही असली आणि कितीही निर्दयी असली तरी दारिद्र्य कधीच लपून राहत नाही आणि रशियात दारिद्र्य नाही याचं त्यांना अप्रूप वाटत होतं. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या निवडक अण्णा भाऊ साठे वाङमय या पुस्तकात समीक्षक वसुंधरा पेंडसे-नाईक यांचा लेख आहे. त्यांनी अण्णा भाऊंच्या प्रवासवर्णनाचे विश्लेषण केले आहे. त्या म्हणतात की, "अण्णा भाऊंचं प्रवासवर्णन म्हणजे एका सच्च्या श्रमिकाच्या कलावंत मनाला दिसलेला रशिया या पुस्तकात आपल्याला भेटतो. ते पर्यटन स्थळ, सौंदर्यस्थळापेक्षा माणसाच्या अंतरंगात जास्त रमतात. सर्वांशी आत्मीयतेने साधलेल्या संवादातून त्यांना रशियातील माणूस पाहायचा होता." अण्णा भाऊ साठे हे साम्यवादी विचारधारेचे होते त्यामुळे त्यांना रशियातील सर्वच गोष्टी चांगल्या दिसल्या असाव्यात असा एक टीकेचा सूर अण्णा भाऊंच्या प्रवासवर्णनाबद्दल उमटला होता. पण त्यांच्या लेखनाची ही मर्यादा लक्षात घेतली तरी देखील त्यांचे प्रवास वर्णन हे माणूस शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे मत वसुंधरा पेंडसे-नाईक यांनी मांडले आहे.


                               तुषार कुलकर्णी
                         बीबीसी, मराठी प्रतिनिधी
                                     🪴

Sunday, June 4, 2023

दोन पिढ्यांतील अंतर..

एक पिढी शिक्षण घेऊन गाढव बनली आणि आता नवी पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनत आहे. 

परीक्षेत १००% पाहिजेत, कराटे क्लासमध्ये Black बेल्ट मिळवायचा आहे. त्यानंतर Dance क्लास attend करायचा. भगवतगीता स्पर्धेत जायचं आहे. श्लोकांचा अर्थ कळला नाही तरी ते तोंडपाठ करायचेच. कारण first prize मिळालंच पाहिजे !! मग drawing competition असते. तिथून बाहेर निघाला की चालला तबला वाजवायला...संगीत विशारद बनायला.

Albert Einstein बनवून देणाऱ्या Multi -National School आल्या. पण Albert हा Einstein 
बनण्यासाठी शाळेत गेला नव्हता. एक अमिताभ बनला तर 
हजारो acting school उभ्या राहिल्या. पण अमिताभ अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही School मध्ये गेला नव्हता. आता लवकरच मोदी तयार करणाऱ्या शाळा उभ्या राहतील. आणि पालक लाखो रुपये फी भरून त्यात मुलांना पाठवतील. आज मुलाच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च एका वर्षाला होतो, तितके रुपये त्याच्या पालकांना संपूर्ण शिक्षण घेण्यासाठी सुद्धा लागले नाहीत. 

आता शाळा सुरु केल्या आहेत investors नी. मागणी तसा पुरवठा ह्या तत्त्वावर. पालकांना आपल्या मुला-मुलीला 
रेसचा घोडा बनवायचं आहे, ही मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केली. दप्तराचं आणि पालक-शिक्षकांचं अपेक्षांचं ओझं वाहणारी मुले म्हणजे 
चालती बोलती प्रेते बनत चालली आहेत. जरा शुद्धीवर आली की  "what is square of 12?" असं विचारून त्यांचं बालपण चिरडून टाकतात. 

श्री मोदी ह्यांनी मुलांना एक प्रश्न विचारला होता-" तुमच्यापैकी किती जण घाम गळेपर्यंत खेळतात?" तेव्हा एकाही मुलाने हात वर केला नाही. कारण आता मुले AC मध्ये जन्म घेतात, AC मध्ये वाढतात. चिप्स खातात, soft ड्रिंक पितात आणि 
mobile वर game खेळत बसतात. ऊन, पाऊस, वारा 
ह्याच्याशी संबंध येत नाही. पडणं-लागणं, खेळात हरणे 
माहीतच नाही. School bus आली नाही तर शाळेपर्यंत चालत जाण्याची ताकद मुलांमध्ये नाही. वय वर्ष ६ पार होत नाही तर डोळ्याला चष्मा लागतो. हात पायांच्या एक तर 
काड्या होतात नाहीतर लठ्ठपणा वाढतो. 
कारण शारीरिक कष्ट संपले, 

आणि Modified food starch, maltodextrin, hydrolyzed corn gluten, disodium inosinate/ guanylate, yeast extrac, hydrolyzed soy protein 
मिसळलेले पदार्थ खाणे सुरु झाले. ह्या ingredients ची खासियत म्हणजे ते मुलांच्या पोटात शिरून जास्त काळ टिकतात आणि पोटातील पोषके शोषून घेतात. मुलांची hormonal आणि जैविक वाढ रोखतात. ज्यामुळे मुले दुबळी होत जातात. हे घटक पिझ्झा-बर्गरमध्ये असतात. म्हणून भारत लवकरच diabetes चे सर्वाधिक रुग्ण असलेला देश बनणार 
आहे. सोबत इतरही विकार येत आहेत. 

शेंगदाणे, चणे, रवा, तांदूळ, बाजरी, सुका मेवा आणि फळे ह्यात घातक ingredients नसतात. लापशी, सातू, शिरा, पोहे किंवा अंड्याचे घरी बनवलेले पदार्थ मुलांना उत्तम पोषण पुरवतात. ते मिळत नसल्यामुळे मुलांची शारीरिक वाढ नीट होत नाही. प्रतिकार क्षमता संपते. मग vitamins , DHA , minerals देणारे product विकत आणून ते खायला देतात. वास्तविक, शरीर हा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे. ह्याच शरीराला योग्य आहार, कष्ट मिळाले तर कुठेही तयार न होऊ शकणारं रक्त तयार होतं. साध्या भाज्या, अस्सल भारतीय जेवण मिळालं की शरीराची यंत्रणा स्वतः काम करते. म्हणून ताज्या भाज्या, भाकरी खाणारी आणि मिनरल्स, calcium, proteins माहीत नसलेली माणसे १०० वर्षे जगली आणि हे माहीत झालेली माणसे फक्त ६० वर्षे जगतात…तेही अनेक रोग सोसत, औषधे घेऊन !!

खेळ, व्यायाम, भटकंती आणि दर्जेदार वाचन न केल्यामुळे मुलांना मानसिक कमतरता जाणवते. संघर्ष माहीत नसतो आणि team work कळत नाही. मित्र फक्त WhatsApp , face बुकवर भेटतात. प्रत्यक्ष भेट नाही. सुख-दुःखाची 
देवाणघेवाण नाही आणि मित्राचा-मैत्रिणीचा मानसिक आधार नाही. दिलखुलास हसणे आणि ओक्साबोक्शी रडणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. ह्या दोन्ही क्रिया मुलांना करता येत नाहीत. आपोआपच, जरा मनाविरुद्ध घडलं की लहान मुले-मुली आत्महत्या करतात. बरीच एकुलती एक मुले दुसर्याशी जमवून घेण्याची सवय नसल्यामुळे पुढे लग्न झाल्यावर वर्षभरात घटस्फोट घेतात. ज्या मुलांना बहीण नसते, चांगली मैत्रीण नसते त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा
दृष्टिकोन संकुचित बनतो. ह्या उणिवांचा शिक्षणात विचार केलेलाच नाही.भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षणतज्ज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरु झाला. 
मोठे उद्योजक, पुढार्यांनी शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला धूळ चारली. एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या admission ची तयारी 
सुरु होते. कृष्णाला जन्मण्याआधी मारायची तयारी मामाने
केली होती. आता मुल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा 
घोडा बनवायची तयारी सुरु होते. आता मुलाने बोलायला सुरुवात केल की थेट E =MC squareम्हणायचं बाकी राहिलं आहे.

अशी मुले सर्व formulaपटापट म्हणून दाखवतील पण स्वतःचा formula कधीही शोधू शकणार नाहीत.guitar शिकतील पण स्वतःची संगीतरचना करू शकणार नाहीत. 
लता मंगेशकर, 
सचिन तेंडूलकर, 
मेरी कोम 
ह्यांचं अनुकरण अचूक करतील. 
पण स्वतःची ओळख निर्माण करणार नाहीत. कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं. जगायची कला, 
गीत-संगीतातील आनंद, निसर्ग संपदेची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार, साहित्य ह्याला बाजारू किंमत नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान
मुलांना मिळतंय, त्यात ते पारंगत होत आहेत. काही जणांना campus मध्ये दर महिना ४ लाखांपेक्षा जास्त पगार असणारी नोकरी मिळतेय....पण त्यात देशाचं नाही, भांडवलदारांच हित साधला जातंय. पुढची पिढी मोठी पदवी मिळवेल पण न स्वतः जगण्याचा आनंद लुटू शकतील, न दुसऱ्याला जगण्याची मजा मिळू देतील...

अगदी हाच धोका ओळखून जपानमध्ये शाळेत AC लावत नाहीत. तिथे मुलांना घोकंपट्टीपेक्षा practical वर भर देतात.
वेली स्वतःच अन्न स्वतः तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात?...असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर 
भाजी लावायला शिकवतात. त्या रोपांची-वेलींची जोपासना करायला लावतात. "निप्पोन technology " ने केलेल्या तपासणीत म्हटलं आहे की शाळेच्या आवारातील वेलींमुळे 
तापमान चार अंश कमी झालं आहे. आणि मुले 
पाना-फुलांसोबत भावनिक नातं जोडू लागली 
आहेत. जर्मनी मुलांना Transference शिक्षण देते. तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेऊन दुसरीपर्यंत लेखन करू देत नाहीत. पाचवीपर्यंत practical 
चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई सेविका, प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल 
ह्याची सतत तपासणी होते. दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्राचं प्रशिक्षण देतात. सगळे science मध्ये
भरत नाहीत. अनावश्यक विषय शिकवत नाहीत. 

चीन हा cycle प्रेमी देश ४ वर्षाच्या मुलांना cycle चालवण्याचं शिक्षण देतो. त्यानंतर theory कमी 
आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात. प्रत्येक विद्यार्थी उद्या देश 
चालवणार ह्याचा विचार Netherlands सारखा देशही करतो. एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत. चारी दिशांनी अनेक विषय आणि क्लासचा मारा 
सोसण्याचे काम भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते.

शिक्षण काय असतं? रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात पहा.
टागोरांची "शांतीनिकेतन" शाळा झाडांखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई. एकदा टागोर झाडाखाली 
बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्यासमोर पुस्तकात डोकं खुपसून बसली होती. आणि उरलेली बरीच मुले खेळत-बागडत होती. 
कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सुगंध घेत
फिरत होता.तेवढ्यात एक पालक तिथे आले. पाहतात तर काय...गुरुदेव शांतपणे बसले होते आणि फक्त चार मुले 
पुस्तकात डोके खुपसून बसली होती व इतर मुले 
हसण्यात-नाचण्यात रमली होती. सुटा-बुटातील पालक 
महाशय टागोरांना म्हणाले- “या नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का?” 
टागोर म्हणाले, “चिंता वाटते, पण नाचणाऱ्या-बागडणार्या 
मुलांची नाही तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या मुलांची. 
ही मुले खेळण्या-बागडण्याच्या वयात मोठ्या माणसांसारखी वागत आहेत. ही मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत. प्रौढ तर
मीसुद्धा अजून झालो नाही. खरं तर मलाही झाडावर चढावं असं वाटतं. पक्ष्यांशी बोलावंसं वाटतं. भरपूर खेळावंसं वाटतं. 
पण माझं शरीर आता साथ देत नाही."

टागोर जगण्यासाठी शिकवत होते. आता शिकण्यासाठी जगावे लागते. जास्त ज्ञान, जास्त कला घेऊन मुले धावत असतात. आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात ! मग एक रेस सुरु होते 
आणि जगायचं राहून जातं !!

नाना पाटेकर

Wednesday, February 8, 2023

रोमिला थापर आणि इतिहास


असहमतीची संकल्पना परकीय नाही.

आज जगभर, आणि विशेषतः भारतातील सामाजिक वर्तुळांमध्ये विविध मतप्रवाहांना असलेला अवकाश आणि विविध मतप्रवाहांबद्दलचा आदर या गोष्टींचा संकोच होताना दिसत आहे. बहुसंख्यांक आणि अन्य यांतील ‘अन्यां’नी व्यापलेली जागा हळूहळू कमी होत आहे. अशा वेळी, विशेषतः लोकशाही पद्धतीने सत्तेवर आलेल्या सत्ताधाऱ्यांकडूनच असहमतीचे आवाज दाबले जात असताना, इतिहासाचा धांडोळा घेत मागच्या अनेक शतकांमध्ये असहमतीच्या या आवाजांचे काय स्थान होते आणि इतिहास घडताना या आवाजांचा काय प्रभाव होता याचे महत्त्वपूर्ण विवेचन या निबंधामधून रोमिला थापर यांनी केले आहे. असहमती ही संकल्पना पश्चिमेकडून आयात केली आहे असे जे म्हटले जाते ते त्यांना पूर्णपणे अमान्य आहे, आणि भारताच्या इतिहासातली वेगवेगळ्या कालखंडातली उदाहरणे घेऊन त्यांनी ते स्पष्ट केले आहे.

सुरुवातीलाच त्यांनी व्यक्तीचे वा व्यक्तींचे दुसऱ्यांसोबत मतभेद असणे किंवा अधिक सार्वजनिक स्तरावर पाहता, जीवनपद्धती नियत करणाऱ्या काही संस्थांशी मतभेद असणे म्हणजे असहमती अशी असहमतीची एक साधी व्याख्या केली आहे. कोणताही समाज किंवा संस्कृती अहसमतीच्या आवाजांशिवाय विकसित होऊच शकत नाही असे त्या सांगतात. असहमती हीच सामाजिक आणि सांस्कृतिक बदलाचा गाभा असते. भारतीय संस्कृती ही जणू एक एकसंध गोष्ट होती अशा रितीने आज तिचा गौरव केला जात असला, इतिहासातील विविध मतप्रवाहांमधील संघर्षाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असले, तरीही भारतीय संस्कृतीमधल्या अनेक गौरवशाली गोष्टी, मुख्यतः त्यातले ज्ञान हे विविध विचारप्रवाहांमधील आदानप्रदान आणि वादविवाद यांच्याशिवाय विकसित होऊ शकले नसते. खरे तर भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात अशा प्रकारची देवाणघेवाण, वादविवाद यांची मोठी परंपरा आहे. त्यासाठी कोणत्या पद्धती कशा प्रकारे वापरायच्या याची चर्चा आहे. त्यामुळेच एकमेकांशी मतभेद असणाऱ्या विविध प्रवाहांची उपस्थिती आणि त्यांचा एकमेकांमधील संघर्ष हा भारतीय संस्कृतीला नवीन नाही.

या निबंधामध्ये, भारताच्या इतिहासातल्या असहमतीची चर्चा करत असताना रोमिला थापर यांनी विविध कालखंडांतील दासी-पुत्र ब्राह्मण, श्रमण आणि भक्तीमार्ग चोखाळणारे संत आणि सूफी पीर अशी तीन महत्त्वाची ‘अन्यां’ची उदाहरणे घेतली आहेत. यापैकी अनेकांनी प्रस्थापित मूल्यव्यवस्थेला प्रश्न विचारले, संघर्ष केला आणि समाजाच्या वैचारिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात या तीनही उदाहरणांबद्दल त्यांनी सविस्तर विवेचन केले आहे.

दासीपुत्र ब्राह्मण

‘अन्य’चे त्यांनी घेतलेले पहिले उदाहरण इसवीसनपूर्व दुसरे सहस्त्रक ते वैदिक काळ इतके मागचे आहे. वेदांवर आधारित असलेला धर्म आणि संस्कृती यांचे या काळात वर्चस्व होते. आज वैदिक संस्कृती हीच एकमेव प्राचीन भारतीय संस्कृती होय असे प्रतिपादन आग्रहाने केले जाते. त्या काळात ‘अन्य’चे काय स्थान होते याबाबत फारच कमी माहिती आहे. त्याबद्दल फारसा शोधही घेतला गेलेला नाही. पण त्या काळच्या साहित्यातच ‘आर्य वर्ण’ आणि ‘दास’ किंवा ‘दस्यू’ अशी वर्गवारी केलेली आढळते, त्यावरून हे अन्य अस्तित्वात असल्याचे लक्षात येते. आणि त्यांच्यावर वर्चस्व गाजवणे, आणि काही प्रमाणात त्यांना सामावूनही घेणे अशा दोन्ही गोष्टी होत असाव्यात हे समजते.

श्रमण

दुसरे ‘अन्यां’चे उदाहरण त्या देतात ते थोड्या आणखी अलिकडच्या काळातील. इसवीसनानंतरच्या सुरुवातीच्या काळात प्रस्थापितांना विरोध करणारे काही गट उदयाला आले, ज्यांना एकत्रितपणे श्रमण असे संबोधले गेले – हे होते जैन, बौद्ध आणि आजीविक. काहीजण चार्वाकांनाही यामध्ये समाविष्ट करतात, परंतु ते श्रमण नव्हेत असे थापर नमूद करतात. ब्राह्मण आणि श्रमण या दोन्ही प्रवाहांमधील संघर्ष आणि देवाणघेवाण यांनी भारताच्या इतिहासातील मोठा कालखंड व्यापलेला आहे. या ‘अन्य’ प्रवाहांची, त्यांच्या संघर्षाची सविस्तर चर्चा पुस्तकात आली आहे. दोन्ही प्रवाहांमध्ये राजाश्रय मिळवण्यासाठी तसेच जनमानसात स्थान मिळवण्यासाठीही मोठी स्पर्धा होती आणि यामध्ये अखेरीस वैदिक ब्राह्मणांचा विजय झालेला दिसून येतो. मात्र तरीही वैदिक कर्मठपणाला, भेदभावाच्या संस्कृतीला समर्थपणे विरोध करणाऱ्या या गटांना नेहमीच जनमानसात आदराचे स्थान मिळत आले हे त्या आवर्जून नमूद करतात.

सूफी संत आणि भक्ती चळवळ

थापर यांनी दिलेले तिसरे उदाहरण आहे ते म्हणजे पंधराव्या-सोळाव्या शतकातील सूफी आणि भक्ती चळवळींचे. भक्ती चळवळीने काही नवे धर्म स्थापन केले नाहीत. पण पौराणिक हिंदूंच्याच दैवतांची वेगळ्या प्रकारे उपासना करण्याचे विविध मार्ग तिने चोखाळले. पारंपरिक, आणि प्रस्थापितांच्या कर्मठपणाखाली दबलेल्या धर्माला या जोखडातून मुक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कबीर, रविदास, दादू, आणि चोखामेळा अशा निम्नजातीयांना तसेच मीराबाई आणि लाल देढ यासारख्या स्त्रियांनाही या चळवळीत स्थान होते. इतकेच नव्हे तर आज आपण ज्यांना हिंदू आणि मुस्लिम अशी लेबल लावून विभागतो अशा वेगवेगळ्या पंथातील लोक यामध्ये एकत्र होते. जसे बुल्ले शाह या सूफी संताने कृष्णभक्तीवर अनेक दोहे, कवने रचली आहेत.

गांधींचा सत्याग्रह

या तीन उदाहरणांनंतर त्या असहमतीचे सातत्य मध्ययुगातून आधुनिक युगामध्ये कशा प्रकारे टिकून राहिले याकडे येतात. त्यासाठी त्या गांधींच्या सत्याग्रहाची चर्चा करतात. भारतीय इतिहासातील असहमतीच्या संकल्पनांचेच पडसाद गांधींच्या सत्याग्रहाच्या आकृतिबंधात उमटलेले दिसतात असे त्या म्हणतात. असहकार चळवळ आणि सविनय कायदेभंग या दोन्हींना भारतीय समाजात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद का मिळाला असावा असा प्रश्न उपस्थित करून त्या अशी शक्यता वर्तवतात, की अशा प्रकारच्या असहमतीच्या अंतःप्रवाहाला भारतीय समाजांनी नेहमीच मुभा दिली होती. सर्वसंगपरित्याग करून समाजातून बाहेर पडणाऱ्या आणि समाजाच्या कल्याणाची आस्था असल्याचा दावा करणाऱ्या श्रमणांना इथल्या समाजात नेहमीच नैतिक प्रतिष्ठा लाभली आहे. त्यांची शिकवण आणि त्यांचे कार्य यानुसार त्यांना लोकाश्रयही मिळाला आहे. तसेच पुढे सूफी आणि भक्ती परंपरेमध्येही सामाजिक न्यायाच्या शोधाची प्रेरणा होती, त्याचाही धागा भारतीय समाजमनात जिवंत होता. सत्याग्रहाला जनतेकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्यामागे हे सातत्य महत्त्वाचे होते असा युक्तिवाद थापर करतात.

असहमतीची आजच्या काळातील अभिव्यक्ती

आपल्या निबंधाच्या अखेरीस थापर यांनी असहमतीचे हे सातत्य आजच्या काळापर्यंत आणून भिडवले आहे. त्यासाठी त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स ऍक्ट या दोन्हींच्या विरोधात नवी दिल्ली येथील शाहीन बाग येथे जी निदर्शने झाली त्यांचे उदाहरण समोर ठेवले आहे. अत्यंत शांततेने आणि अहिंसक पद्धतीने चाललेल्या या चळवळीमधील मोठ्या प्रमाणातील स्त्रियांचा सहभाग, आणि धार्मिक परिभाषेचा वापर न करणारी, धर्मनिरपेक्ष अभिव्यक्ती यामुळे या चळवळीची नाळ मोठ्या प्रमाणात वसाहतवादविरोधी राष्ट्रवादाशी जोडलेली होती असे त्यांना वाटते.

अशा प्रकारच्या असहमतीच्या प्रसंगांना शासन कशा प्रकारे सामोरे जात आहे यावरून एक खरे लोकशाहीवादी शासन आणि नागरिकांच्या असहमतीबाबत उदासीन असणारे शासन यातील फरक लक्षात येतो असे त्या म्हणतात. जरी अगदी प्राचीन काळापासून असहमतीचे आवाज ऐकू येत असले तरीही, खऱ्या अर्थाने उदारमतवादी, लोकशाहीवादी समाजातच असहमती व्यक्त करणाऱ्या प्रश्नांचा मोकळेपणाने स्वीकार केला जातो. त्या प्रश्नांची कसून तपासणी करणे आणि चर्चेद्वारे तड लावणे या गोष्टींना प्रोत्साहन दिले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आता सार्वजनिक आहे आणि कुणीही नागरिक तो अधिकार बजावू शकतो. असहमतीचा अधिकार आणि सामाजिक न्यायाची मागणी या खऱ्या लोकशाहीच्या संकल्पनेच्या गाभ्याशी असलेल्या गोष्टी आहेत. यापुढच्या काळात असहमतीचे आवाज वाढतच जाणार आहेत, मात्र ते आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न होतो की परस्परसंवादाचा मार्ग अवलंबला जातो हे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतिहासातील अनेक उदाहरणांसह प्राचीन काळापासून आजपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर समाजातल्या ‘अन्यां’बद्दलचे हे विवेचन नक्कीच रोचक आहे. ऐतिहासिक समाजाचे यांत्रिक पद्धतीने वर्गीकरण न करता, सरसकट लेबले न लावता त्यातल्या विविध प्रवाहांचा धांडोळा घेतला पाहिजे. आज ज्या प्रकारे लोकांना विभाजित करण्यासाठी इतिहासाचा वापर केला जात आहे त्याला विरोध करण्यासाठी तर हे फारच आवश्यक आहे आणि त्यासाठी हे पुस्तक खूपच महत्त्वाचे आहे. बरेचदा अशी महत्त्वाची मांडणी इंग्रजीतच येत असल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रापुरतीच मर्यादित राहते. मिलिंद चंपानेरकर यांनी शक्य तितक्या सोप्या मराठीमध्ये केलेल्या या अनुवादामुळे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे.

भारताच्या इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये रोमिला थापर हे नाव सुपरिचित आहे. केवळ घटना आणि व्यक्तींच्या बाबतीत तथ्ये शोधून काढणे एवढ्यापुरता त्यांचा इतिहास मर्यादित नाही. समाजशास्त्र, राज्यशास्त्राच्या अंगाने इतिहासाचे आकलन करून घेण्याचा प्रयत्न करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. २०१९ मध्ये दिल्लीमध्ये त्यांनी दिलेल्या दोन व्याख्यानांचे संपादन करून सिद्ध केलेला त्यांचा निबंध ‘Voices of dissent : An Essay’ सीगल बुक्स यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये पुस्तकरूपाने प्रकाशित केला. याच पुस्तकाचा, मिलिंद चंपानेरकर यांनी केलेला मराठी अनुवाद नोव्हेंबर २०२१ मध्ये पपायरस प्रकाशनाने ‘असहमतीचे आवाज’ या नावाने प्रसिद्ध केला आहे.

                                        🪴

Monday, January 30, 2023

देवनागरी लिपी

ही बऱ्याच भारतीय भाषांची प्रमुख लेखनपद्धती आहे. मराठी
बोडो, अंगिका,  मैथिलीरोमानीहिंदी इत्यादी भाषा देवनागरीत लिहिल्या जातात. देवनागरी लिपी एकंदरीत देशातल्या व देशाबाहेरच्या एकूण १९४ भाषांसाठी वापरली जाते. 
मराठी, संस्कृत, हिंदी, कोंकणी, गुजराती, काश्मिरी, सिंधी, नेपाळी आणि रोमानीसारख्या या व इतर काही भारतीय मुळे असलेल्या भाषांची प्रथम लिपी ही देवनागरी आहे. देवनागरी लिपी ही अबुगिडा लेखनपद्धतीमध्ये मोडते. जगातल्या बहुसंख्य लिपींप्रमणे देवनागरीदेखील डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. देवनागरी लिपीचा विकसनकाल हा बराच मोठा असून ह्या लिपीचा ख्रिस्तपूर्व ५०० मध्ये असलेल्या ब्राह्मी लिपीपासून आताची देवनागरी लिपीचा विकास झालेला आहे. साधारणत: इसवी सनाच्या बाराव्या शतकात स्थिरावलेल्या लेखनपद्धतीस देवनागरी असे नांव उपयोजिण्यास आरंभ झाला असावा. प्रत्येक शब्दावर एक रेषा ओढली जाते. तिला शिरोरेषा म्हणतात. तिच्यामुळे लेखन नीटनेटके व सुंदर दिसते. ही एक ध्वन्यात्मक लिपी आहे व त्यामुळे इतर लिप्यांपेक्षा (रोमन, अरबी, चिनी इत्यादी) अधिक वैज्ञानिक आहे. मराठी देवनागरी लिपीला बालबोध लिपी म्हणतात. (बालबोध नसलेली दुसरी मराठी लिपी म्हणजे मोडी लिपी.)

जगातील विविध भाषांतील बहुतांश शब्द किंवा ध्वनी देवनागरी लिपीमध्ये जवळजवळ जसेच्या तसे लिहिता येऊ शकतात आणि रोमन किंवा इतर लिप्यांपेक्षा देवनागरीत सहज लिहिलेल्या शब्दांचा तुलनात्मकदृष्ट्या हुबेहूब उच्चार करता येतो. या लिपीत एकूण ५२ अक्षरे आहेत, ज्यात १६ स्वर आणि ३६ व्यंजने आहेत. अक्षरांचा क्रमसुद्धा वैज्ञानिक आहे. स्वर-व्यंजन, कोमल-कठोर, अल्पप्राण-महाप्राण, अनुनासिक-अन्तस्थ-उष्म इत्यादी वर्गीकरणही वैज्ञानिक आहे.

भारत तसेच आशिया मधील अनेक लिप्यांचे (उर्दू सोडून) संकेत देवनागरीपेक्षा वेगळे आहेत. पण उच्चारण व वर्ण-क्रम इत्यादी देवनागरीसारखेच आहेत. त्यामुळे लिप्यंतरण करणे सोपे जाते. देवनागरी लेखनाच्या दृष्टीने सरळ, सुंदर आणि वाचनाच्या दृष्टीने सुपाठ्य आहे. देवलोक आणि नागरलोक या संबंधी विविध प्रकारच्या लेखनासाठी उपयोजिली जाणारी लिपी, ती देवनागरी लिपी होय.

आपले विचार शब्दांच्या किंवा कोणत्याही माध्यमातुन व्यक्त करण्याचे कार्य भाषा करते. तत्त्व: कुठलीही भाषा कोणत्याही लिपीत लिहिता येते. प्रत्यक्षात हे बरेचसे जमले तरी पूर्णपणे शक्य होत नाही. भाषेची लिपी त्या त्या भाषेतून उच्चारलेल्या शब्दांच्या लिखाणासाठी असते. एखाद्या भाषेत जर विशिष्ट उच्चार नसतील तर तिच्या लिपीतही ते दाखवणाऱ्या अक्षरखुणा नसतात. इंग्रजीत ख, च, छ, ठ, फ, घ, ढ, भ, ष, ळ हे उच्चार नाहीत. तमिळमध्ये ख, ग, घ, छ, ज, झ, ठ, ड, ढ, थ, द, ध, फ, ब, भ, श, स, ह ही अक्षरे लिहिता येत नाहीत, पण यांच्यापैकी काही उच्चार आहेत. त्यामुळे लिप्यंतरावर मर्यादा पडतात. उदाहरणार्थ मराठीतला 'पाटील" हा शब्द रोमन लिपीत Patil असा लिहिला जातो. त्याचा उच्चार पतिल/पतिळ/पॅतिल/पॅतिळ/पातिल/पातिळ/पाटिळ असा काहीही होऊ शकतो. देवनागरी लिपीत जगातल्या बहुसंख्य भाषांचे बहुतेक उच्चार जवळजवळ अचूक लिहिण्याची क्षमता असल्याने, तुलनात्मक दृष्ट्या या दृष्टिकोणातून देवनागरी ही एक उत्कृष्ट लिपी समजली जाते. 

मराठीमध्ये वापरला जाणारा संगणक हा शब्द देवनागरी लिपीत `संगणक' असा तर रोमन लिपीत 'sanganaka' असा लिहितात. तसेच त्याला इंग्रजी भाषेतला समानार्थी शब्द computer हा देवनागरीतून कम्प्यूटर किंवा कॉम्प्यूटर असा लिहिला आणि यशस्वीरीत्या वाचलाही जाऊ शकतो.

                                                                    0 0 0

Saturday, January 28, 2023

लेखकाचे भूत

गेल्या डझनभर वर्षांत भारतभर लेखक अमाप उत्पन्न झाले. त्यांना इंटरनेटजन्य लेखन-वाचन मंचांनी लेखक, वाचक, प्रचारक, विचारक, समीक्षक, परीक्षक, निरीक्षक, तत्त्वज्ञ, मर्मज्ञ, सर्वज्ञ, मीमांसक, अभ्यासक, संशोधक वगैरे विशेषणांनी ओळख प्राप्त झाली. त्यांना जे मंच मिळाले, त्यांना सोशल मीडिया असं म्हटलं जात असलं तरी प्रत्यक्षात ते अवघे ‘कम्युनल’ असतात. ‘सोसायटी’पेक्षा ‘कम्युनिटी’ हे नाते त्यांना बांधून ठेवते.

लेखकांची एवढी उत्पत्ती म्हणजे केवळ मोठं लोकशाहीकरण, किती थोर विकेंद्रीकरण, अशी स्तुती करत या मंचांच्या मालकांनी आपली अफाट धन केलीय. पण थोड्याच दिवसांत ही लोकशाही अगदी भारतीय समाजव्यवस्थेप्रमाणे जात, पोटजात, धर्म, पंथ, गोत्र, गाव, जिल्हा, प्रदेश, भाषा, लिंग, वर्ग, पक्ष, गट, संघटना, शिक्षण, देवदेवता, नेते, राजकीय विचारसरणी, आदर्श, चाहते वगैरे छोट्या छोट्या घोळक्यांत खांडोळी झालेली आढळून येते.

बा लेखका, या लढाईत तू कुठायंस कळलं का तुला? तू शिकार करायचा तो ससाही होतोस अन् ज्याच्याकडून ती करायची तो शिकारी कुत्राही तूच. आपली शेपटी चावायला गरगरा फिरणारा एखादा कुत्रा पाहिलास कधी? स्वत:कडे पाहिलंस तर तुला समजेल की, या प्रचंड धुमश्चक्रीत लेखका, तुझा पुरेपूर वापर केला गेलेलाय. जखमी कोण कोण झालं? अरे, तूच लेका तूच! मारामारीच्या धुंदीत तुझं तुलाच उमजेना की, रक्तबंबाळ आपणच झालोयत.

ते तर झालंच, पण इज्जत? तिच्या तर चिंध्या चिंध्या झाल्या की रं बाबा! तुझा तो लेखकीय बाणा भावनांच्या भरात तू बाजूला ठेवलास अन जातीच्या, लोकप्रियतेच्या, भक्तांच्या आणि वाचकांच्या चिथावण्यांच्या आहारी गेलास. ते भुरटे प्रकाशक बघतोयसना ना? लेखक घडवल्याची घमेंड मिरवणारे ते भुक्कड? सावध रे बाबा, सावध. फुकटची दारू व सामीष खमंग जेवण यांसाठी ते तुझ्यासारख्या अनेक लेखक-कवींना उचकवत असतात कुणा कुणा विरोधात. लेखकाकडून पैसे घेऊन पुस्तकं खपवणाऱ्यांची एक टोळी निरनिराळ्या रूपांनी लेखकाला घेराव घालते. त्याला फशी पाडते, वश करते.

लेखकाला लुबाडून आपली जिंदगी फुलवणारे असे ‘मेंटर पब्लिशर’ रग्गड उगवलेत बाबा देशात! हे परप्रकाशित लुच्चे लेखकाला झुलवत ठेवतात. कसं? ‘तुमचं पुस्तक अमूकढमूक पुरस्कारासाठी पाठवलंय, समितीतला तो माझ्या बैठकीतला आहे, त्याला मी बोललोय! अमूकतमूक संस्थेचे अध्यक्ष आपल्याच जातीचे आहेत, ते कन्सीडर नक्की करतील तुमचं पुस्तक’, अशा बाता मारून हे बिनकामाचे, बिनकण्याचे लाचार लोक लेखकाला आजन्म ‘मामा’ बनवत राहतात.

तुझं पुस्तक खूप गाजलं. विशेषत: नव्या पिढीला ते भावलं. लगेच विद्यापीठीय टोळ्या ते पुस्तक कोणत्या ना कोणत्या अभ्यासक्रमात चिकटवण्याच्या तयारीला लागतात. त्यातले काही चतुर तुझ्याभोवती घोळू लागतात. ते तुला असं भासवू लागतात की, केवळ त्यांच्या खटपटीनंच तुझा असा पुस्तकी अवतार हजारो विद्यार्थ्यांसाठी पूजनीय, वंदनीय होणार आहे. तेव्हा तुझी कृपादृष्टी आमच्यावरही पडावी! तुझे खिसे मोकळे होऊ लागतात. तुझा वेळ या टोळीच्या मनोरंजनासाठी खर्च होऊ लागतो.

असंही होऊ शकतं बरं का : तुझ्या मनात कुणी भरवतं की, ‘तुमचं पुस्तक खरंच खूप भारीय, पण ते अमूक लेखकाच्या राजकीय दबावापुढं मागं पडतंय अन् त्याचंच पुस्तक अभ्यासक्रमाला लागतंय’. मग तू पेटून उठतोस. चेकाळतोस. तुझा बराचसा वेळ आपल्या पुस्तकाच्या लॉबिंगमध्ये जाऊ लागतो. मग एक जण पुढं येईन सांगतो की, ‘आम्ही बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये मंजुरी देऊ. पण त्या पुस्तकाची स्वस्त आवृत्ती (विद्यार्थ्यांना परवडेल अशी) काढायची परवानगी तुम्ही आणावी’. झालं! बा लेखका, तुझ्या या अभ्यासक्रमिक अवताराच्या आगमनासाठी तुझा आटापिटा आरंभतो आणि तुझ्या तो विचारी, प्रगल्भ वगैरे लेखक आसुसलेला, आतुर आणि हावरट कधी बनतो, कळतही नाही.

                                                     जयदेव डोळे