Wednesday, August 20, 2025

वाचण्यासारखे काही....

ग्रंथालयांशिवाय लंडनची कल्पना करणेही अशक्य आहे. इथल्या एका ग्रंथालयात ‘चांभार’ (The Chamars : George W. Briggs) हे पुस्तक आहे, यावर एखाद्या परदेशी अभ्यासकाने १९२० मध्ये पुस्तक लिहावे ! केवळ एका जातीबद्दल नाही तर आपल्याकडच्या सगळ्या जातींवर, जिल्ह्यांवर इंग्रजी अभ्यासकांनी अभ्यासपूर्ण अशी प्रदीर्घ मांडणी केली आहे, नोंदी ठेवल्या आहेत. इतर कोणी नोंदी केल्या असतील, तर तेही संग्रही ठेवले आहे. एखाद्या साध्या विषयाने खुणावले की त्यात बुडी मारायची आणि निष्ठेने संशोधन करायचे, हा इंग्रज माणसाचा स्वभाव आहे.

इंग्रजांनी जगावर राज्य केले, याची कारणे अनेक असतील. 'दस्ताऐवजीकरण’ त्यापैकी महत्त्वाचे. ज्यांच्यावर राज्य करायचे, तो परिसर-संस्कृती पार कोळून प्यायची, ही त्यांची खासियत. 'डॉक्युमेंटेशन’ हे इंग्रजांचे बलस्थान.

पृथ्वी सूर्याभोवती फिरते, असे युरोपात कोपर्निकसनंतर गॅलिलिओ सांगू लागला, तेव्हा त्याला नजरकैदेत राहावे लागले. त्याच कालावधीत संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेल्याची वार्ता आपल्याकडे पसरवली जात होती. मात्र नंतर युरोपातल्या ‘रेनेसॉं’ने तिथले जगच बदलून गेले. रेनेसॉं हा युरोपच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा काळ. अंधश्रद्धा, धार्मिक कट्टरता यांना त्यामुळे धक्का बसला. विज्ञान, विवेक, स्वतंत्र विचार यांना प्रोत्साहन मिळाले. माणसाच्या विचारविश्वाला नवे आयाम मिळाले. याचा सर्वाधिक फायदा इंग्लंडने करून घेतला. 

शिस्तबद्ध अभ्यासाची सवय असल्याने इंग्रज माणसाने अनेक कठीण विषय समजून घेतले. साम्राज्यविस्ताराच्या वाटा शोधल्या. साम्राज्य टिकवण्याचे मार्ग शोधले. प्रशासनावर पकड मिळवली. साहित्य-कला-संस्कृतीचा आवाका मिळवला. एखाद्या विषयाच्या मुळाशी जाऊन तो विषय समजून घेणे, व्यवस्थित नोंदी करणे, गॅझेट्स तयार करणे आणि तर्कसंगत निष्कर्षांपर्यंत पोहोचणे ही त्यांना सवयच लागली. आजही आपल्याकडच्या अनेक घटनांवर, मुद्द्यांवर इंग्रजी अभ्यासक अभ्यासपूर्ण पुस्तके लिहितात. 

इंग्रजांनी तेव्हा अवघा भारत मोजला, भूमापन केले. त्यानंतर आजतागायत आपल्याला ते जमलेले नाही. अठराव्या शतकात इंग्रजांनी हा खंडप्राय देश मोजला. ‘The Great Arc : The Dramatic Tale of How India Was Mapped and Everest Was Named' हे पुस्तक वाचले की हा पूर्ण प्रवास समजतो. हे पुस्तकही ब्रिटिश इतिहासकार जॉन की यांनी लिहिले आहे. विल्यम लॅम्ब्टन नावाचा इंग्रज अधिकारी या भूमापनासाठी आपले सर्वस्व देतो. रानावनात ऊन-वारा-पावसात काम करताना सत्तराव्या वर्षी तिथेच मरण पावतो. त्याची समाधी आजही वर्ध्याजवळ हिंगणघाटला आहे. 

लॅम्ब्टन गेल्यावर त्याचा सहकारी जॉर्ज एव्हरेस्ट ही सूत्रे हातात घेतो. वयाच्या ५६व्या वर्षांपर्यंत अहोरात्र त्यासाठी काम करतो. अभ्यास करतो, तहानभूक विसरून देशभर फिरून सर्वेक्षणे करतो. माउंट एव्हरेस्टला त्याचे नाव द्यावे, एवढे उत्तुंग काम उभे करतो. या धांदलीत लग्न करायचे मात्र राहून जाते. ५६व्या वर्षी एव्हरेस्ट लंडनला परततो. तिथे पबमध्ये बीअर पिताना एका सुंदरीच्या प्रेमात पडतो. २३ वर्षांच्या तरूण मैत्रिणीशी लग्न करतो. सहा मुलांचा बाप होतो ! आपले लोक सार्वजनिक कारणासाठी झोकून देऊन असा अभ्यास करणार नाहीत. पबमध्ये जाऊन छान दारू पिणार नाहीत. ५६व्या वर्षी प्रेमात वगैरेही पडणार नाहीत !

'असा लुटला भारत'  (The Theft of India) हे आणखी एक महत्त्वाचे पुस्तक. '१४९८ ते १७६५ पर्यंतची युरोपियन देशांनी भारताची केलेली लूट' असे या पुस्तकाचे उपशीर्षक आहे. सरिता आठवले यांनी अनुवाद केला असून मेहता प्रकाशनने ते प्रकाशित केले आहे. दुसरे महत्त्वाचे पुस्तक म्हणजे 'अराजक' (The Anarchy) हे होय. 'ईस्ट इंडिया कंपनी : एका व्यापारी कंपनीचा जुलमी कारभार' असे याचे उपशीर्षक असून विल्यम डॅलरिंपल हा लेखक आहे. रेश्मा कुलकर्णी यांनी मराठीत अनुवाद केलेल्या पुस्तकाचे प्रकाशक मेहता आहेत.

कलकत्ता (कालिकत, कोझिकोडे) मलबार, मद्रास, सुरत, मुंबई, कोचीन, कोरोमंडल, गोवा, चितगाव, पाँडिचेरी, बंगाल इत्यादी ठिकाणी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फेंच यांनी व्यापारासाठी वसाहती केल्या. या सर्वांच्या व्यापारासाठी ईस्ट इंडिया कंपनी होत्या. मन मानेल तसा व्यापार आणि लूट करून पैसा मिळवणे हाच त्यांचा उद्देश होता.

पोर्तुगीजांनी अमेरिकेतून इकडे टोमॅटो, बटाटे, अननस, सीताफळ, पपई, निवडुंग, पेरू, पॅरान फ्रूट, काजू, शेंगदाणे, रताळी, मका, मिरची, रातांबा, अल्फाॅन्सो आंबा, तंबाखू, झेंडू (मेक्सिको) भारतात आणले, हे आश्चर्याचे वाटते. गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी दीड हजार खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल उभारले होते. ते अल्बुकर्कने स्थापन केले होते. तेथेच गोव्याला सेंट कॅथेड्रेल चर्च बांधले गेले. भारतातून सोरा (potassium nitrate), नीळ, काळी मिरी, कापड, मसाले युरोपियन प्रदेशात नेले जात. 

त्या काळातील शिवाजीराजे, संभाजीराजे आणि कान्होजी आंग्रे यांचे उल्लेख 'असा लुटला भारत' या पुस्तकात येतात. औरंगजेब, मीर जाफर (बंगाल), चंदासाहेब (कर्नाटक) यांचे उल्लेख आहेतच. १६६२ मध्ये पोर्तुगीजांनी चार्ल्स दुसरा याला मुंबई बेट आंदण दिले. त्याने पोर्तुगालच्या ब्रगांझा घराण्यातील कॅथरीनशी विवाह केला होता.

इंग्रजांनी १६७२ ला मॉरिशसचे डोडो हे पक्षी मारले. त्यांचे एक्सपेरिमेंट नावाचे जहाज तेथे गेले होते. नंतर मॉरिशसमध्ये डोडो पक्षीच नामशेष झाला. इंग्रज थॉमस रो यांने १६१६ मध्ये जहांगीर बादशहाला इंग्लिश घोडागाडी, उंची मद्य व दोन मॅस्टिप जातीचे कुत्रे भेट दिले. हे कुत्रे अतिशय क्रूर असतात. दोन सेवक त्यांना पालखीतून फिरवायला आणि दोन त्यांच्यांवरच्या माशा उडवण्यासाठी होते. त्या काळात साधारण श्रीमंत माणसाकडेही वीस गुलाम असत. विशेषतः ते मलबारमधून विकत घेतले जात. स्त्रियांच्याकडे दासी व पुरुषांच्याकडे गुलाम असत. मात्र तत्काळात भारतात रोगराई, अन्याय, अत्याचार, दुष्काळ, शेतसारा, मद्यपान यामुळे लोकसंख्येचा दर सतत खालावत होता. भारत प्रचंड गरीब होता. इंग्रज, डच, पोर्तुगीज आणि फ्रेंचांनी या भारताची जवळ जवळ तीनशे वर्षे लूट केली.

याशिवाय जोनाथन गिल हॅरिसचे 'द फर्स्ट फिरंगीज' हे पुस्तकही वाचण्यासारखे आहे. रेखा देशपांडे यांनी त्याचा अनुवाद केलेला आहे. अना फेल्ड हाऊस यांचे 'नदी आणि स्त्रीत्व' हे पुस्तक विजया देव यांनी अनुवादित केले आहे. ही दोन्ही पुस्तके पद्मगंधा प्रकाशनने प्रकाशित केलेली आहेत. टोनी जोसेफ यांचे 'द अर्ली इंडियन्स' आणि युवा नोआ हरारी यांचे 'सेपियन्स' (मानवजातीचा संक्षिप्त इतिहास) ही दोन्ही पुस्तके आपल्या ज्ञानात अधिकच भर घालतात. अशी खूप पुस्तके आहेत पण त्यांच्याविषयी आणखी केव्हातरी...!


(सुरुवातीच्या 'चांभार' या पुस्तकाबद्दलचा मजकूर संजय आवटे यांचा आहे.)
                                     🪴

Wednesday, August 6, 2025

गवळी समाज

महाराष्ट्रातील हिंदु गवळी समाज हा प्रामुख्याने उत्तर कोकणात रहाणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या व्यवसायावरून त्यांना गवळी असे म्हटले गेले असले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय हा भातशेती हाच आहे.कोकणपट्टीतील भूमीपुत्र गवळी, कुणबी, आगरी या शेतकरी जातींचा पारंपरिक पोशाख.

पुरुष : कमरेला रुमाल किंवा लंगोटी, अंगात बंडी, डोईला टोपी किंवा पागोटे.
स्त्रिया : गुढग्यापर्यंत येणारे मांडकास पद्धतीने नेसलेले नऊवारी लुगडे.

कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.

स्त्रियांमध्ये नाकात मोठी नथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित. त्याला 'मांडकास नेसणे’ असेही म्हणतात.

गौरी गणपती, शिमगा-होळी हे मुख्य सण. पुरुषांचा बाल्याचा नाच आणि स्त्रियांचा फेऱ्यांचा नाच हे नृत्यप्रकार.

तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळ्यांचे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.

याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे,नाशिक, हिंगोली,परभणी, अमरावती,बुलडाणा,जळगाव,अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.यादव खोत, दापोली तालुक्यातील पीचडोली गावचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळी गावचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवली गावचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्या मुळे काही लोकांनी पुढे पुढे मराठेशाही सरकारात, इंग्रजलष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.

कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरात मध्ये वडोदर्यातील गायक्वाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.

सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर विश्राम रामजी घोले' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.

खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले. व त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते. व त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.

माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा राहिले होते. त्यांनी महाराष्ट्रीय दाभोळी यादव समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.

कर्जत तालुक्यातील कै . नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुप्रीन्तेन्दंत ऑफ पोलीस या मोठ्या हुद्या पर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ” यादव शिक्षण प्रसारक मंडळी ” या नावाची संस्था काढली. असो अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.

कुणबी, आगरी, कराडी, वाडवळ, कुणबी-मराठा या गवळ्यांशी साधर्म्य असलेल्या जाती कोकणात आहेत. त्यापैकी कुणबी, आगरी व गवळी हे भातशेती करू लागले. मीठ पिकवण्याचा अधिकार आगरी या जातीकडेच होता. वसई, सोपारा, ठाणे, नागोठाणे, चौल, अलिबाग, दाभोळ परिसरांत त्यांनी वसाहती केल्या होत्या. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीकाठी वसलेले चौल हे एक बंदर आहे. सोपारे-चेऊल हे बंदरही त्यावेळी प्रसिद्ध होते. बिंबराजाच्या पूर्वी कोकणामध्ये यादवांच्या वसाहती होत्या.​छत्रपती श्रीशिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याच्या कालखंडात व नंतर मराठेशाहीच्या काळात गवळी, कुणबी, आगरी, कोळी समाजाने सहभाग व सहकार्य केले होते. आजही राजधानी रायगड किल्ल्याच्या आजूबाजूला गवळी समाजाची अनेक गावे आहेत.भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून ‘गवळी’ हे नाव पडलेले आहे तरी मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्‍नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे. यांमध्ये आगरातले गवळी (कोकणातले गवळी) आणि घाटावरचे गवळी असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणें आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्यें विवाहसंबंध होत नाहींत. पुनर्विवाह व घटस्फोट या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शाली प्रमाणे पांघरून घेत असत.

जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी आणि सोबतच मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.

सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळती जुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्‍यावर टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत. समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला "आजीस" किंवा "म्हातारी बय" आणि बहिणीला "बाय' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्‍ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.गवळी समाजाचे मुख्य दैवत बाळकृष्ण व भैरी (काळभैरव) हे होय. यांच्या कुलदेवतांमध्ये भैरी, खंडोबा, जोगेश्वरी, भवानी, एकविरा, सालबाई, मोठ्याबाया (सातआसरा), चेडोबा (रक्षकवीर) या मुख्य देवता आहेत. खंडोबा, भैरी (काळ भैरव), भवानी, एकविरा आई, वेताळ, जल आसरा बाया व इतर ग्राम देवता ह्यांना गवळी समाज आपले रक्षक व मार्गदर्शक देवता मानत आलाय.

गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.

कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, विन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.समाजात कुलदैवताला घरचा देव बोलले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात. समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहेगवळ्यांमध्ये लग्न समारंभ तांदूळ, हळद, लग्न असा तीन दिवस असतो. लग्नासाठी बसवलेले देव हे घराण्याच्या रितीप्रमाणे कोंबड्या किंवा बकऱ्याचा मानपान देऊन उठवले जातात. देवक हे आंबा किंवा उंबराच्या झाडाचे असते. मांडवात एका खांबाला आंब्याची, उंबराची फांदी बांधून तिची पूजा केली जाते. त्याला मुहूर्तमेढ किंवा उंबरमेढ म्हणतात. लग्नासाठी बसवलेले देव उठवल्यावर हळदउतरणी हा विधी होतो.

लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.

समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्त्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.

लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्त्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा सतिर (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.

कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही गवळी, कुणबी, आगरी-कोळी समाजात परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत गवळी समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रमान असतो. मुख्यत्वे सवाष्ण आणि विधवा असा भेद कमी केला जातो. बऱ्याच विधिमंध्ये विधवा महिला देखील सहभागी होऊ शकतात. लग्नसोहोळ्यात विधींची माहीतगार असणारी विधींची गीते (धवळे) गाणारी व्यक्ती ही विधवा स्त्री असेल तरी चालते. तिचा मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार संपूर्ण लग्नसमारंभ पार पडतो. यातून समाजातली मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.

समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, उटणे, हळद वैगरे मंगलविधी, देवक हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी,आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.


कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येत असे.

गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.गवळी लोकांतील गावे व आडनावे
(आपटा, कांबा, वडवली, सावरोली, बेलोशी, खोपोली, माणगाव, डोंगरोली, तळा, म्हसळा, महाड, नागोठणे, इंदापूर, तारने, बामणघर, साखरी, पाली, वाघिवली, रोहा, घोसाळे, कोलाड,मंडणगड,चरई)

मुंबई, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी जिल्हा...आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, ठसाळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पागार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, करंजकर, शिळीमकर,हिवरकर.देखनाळे,बहिरट,बिडकर,कलागते,मिसा,किन्होळकर,गार्वे,वैराळकर,इंगोले,डाकवे,देवर्षी, हुच्चे, परळकर,अलंकर, अवधूत, कविस्कर,नागापुरे, मेहेतर पायकर, परलकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे ,डाखोरे,साखरे ,पारध ,देव्हारे ,मंदाडे झित्रे,लोहंबरे,कवरके,देसाई देशमुख,दादगाये, नाथ

गवळी लोकांची जुन्या पिढीतील नावे
पुरुषांचीः- कान्हा, काळू, केरू, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, धर्मा, तानु, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, भिमा, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वालकू, विठू
समाजातील धनवान किंवा प्रतिष्ठित लोक प्रतिष्टेसाठी नंतर मूळ नावात बदल करून नावापुढे जी किंवा राव लावत असत.

उदा. गोमा:- गोमाजी, धर्मा:- धर्माजी, बाबू:- बाबुराव.

बायकांचीं:- कुंदा, काळी, गुणी, गंगा, चंद्री, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागु, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे बाई लावले जात असे.

उदा. गंगी:- गंगुबाई, जनी:- जनाबाई, तानी:- तानुबाई.

                                       🪴

Saturday, August 2, 2025

आता आमोद सुनास जाले...

दिठी हा चित्रपट मार्च २०२१ मध्ये आला. आता आमोद सुनास आले  या दि. बा. मोकाशी यांच्या कथेवर. दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचा. दोघी या चित्रपटानंतर !  याच्याशी निगडीत एक जुना लेख...! विजया पवार यांचा. 

आंध्रात फिरायला गेलो होतो. तेंव्हा काळहस्तीश्वर मंदिरात जाण्याचा योग आला होता. तिथून परत आलो आणि एकदा मॅजेस्टिक मध्ये पुस्तकं चाळत असताना "श्री वेंकटेश्वर आणि श्री काळहस्तीश्वर" अश्या नावाचे पुस्तक दिसले. लेखक होते रा चिं ढेरे. तेंव्हा पेपरात त्यांच्या "श्री विठ्ठल एक महासमन्वय" या पुस्तकाची जाहिरात येत होती. कुतूहल होते म्हणून दोन्ही पुस्तके घेतली आणि घरी आलो. वेळ मिळाला तसे विठ्ठलाचे पुस्तक वाचायला काढले. पण मन काही रमेना. मग वेंकटेश्वराचे पुस्तक काढले. तिथेही माझा लेखकाशी सूर जुळेना. म्हणून मग पुस्तके बाजूला ठेवली. 

माझं असं कधी कधी होतं की पुस्तकाशी माझी नाळ जुळत नाही. मग मी पुस्तकाला आणि स्वतःला त्रास देत नाही. बहुतेक त्या पुस्तकाची माझ्या आयुष्यात वेळ आलेली नाही असे म्हणून ते बाजूला ठेवतो. यथावकाश ते पुस्तक मला बोलावतेच. अश्या प्रकारे पुस्तकाने साद घातलेली असली की ते अगदी कडकडून भेटते. त्यातले विचार अगदी सहज समजतात आणि त्यावर मनातल्या मनात संवाद देखील छानपैकी सुरू होतो असा माझा अनुभव आहे. त्या अनुभवाला स्मरून मी ढेरे सरांची पुस्तके शेल्फवर ठेवून दिली. 

मागच्या महिन्यात निर्गुणी भजनांची सिरीज लिहिताना गोरक्षनाथांचा उल्लेख केला होता. त्यावर एका वाचकाशी साद प्रतिसाद करत असताना त्या वाचकाने रा चिं ढेरेंचे "नाथ संप्रदायाचा इतिहास" हे पुस्तक वाचा असा सल्ला दिला होता. आणि मग शेल्फवरील ढेरे सरांची पुस्तके साद घालू लागली. म्हटलं, "आनंदा, वेळ झाली बहुतेक या पुस्तकांची". पण चाल ढकल करत होतो. तेव्हढ्यात ढेरे सर इहलोक सोडून गेल्याची बातमी आली. एक दोन मित्रांनी सरांच्या सर्व ग्रंथसंपदेचे फोटो फेसबुकवर टाकले. त्यात नाथ संप्रदायाचा इतिहास दिसले. आणि मग मात्र मी मॅजेस्टिक मधे गेलो. तिथून ढेरे सरांची सगळी पुस्तकं घेतली. पण वाचायला सुरवात केली ती नाथ संप्रदायाच्या इतिहासाकडून. 

मला माझे मडके कच्चे आहे ते माहिती आहे. त्यामुळे मनात थोडी धाकधूक होती. अजून या पुस्तकाची माझ्या आयुष्यात वेळ आली की नाही? त्यातले विचार समजण्याइतका मी तयार झालो की नाही? असे प्रश्न मनात होते. कदाचित निर्गुणी भजनांवर लिहीत असताना वाचनाला आणि विचाराला दिशा मिळाली असेल त्यामुळे पुस्तक माझ्याशी बोलू लागले. आणि ते काय बोलत आहे ते मला समजू लागले. ढेरे सरांचा प्रचंड व्यासंग आणि विचार मांडण्याची अनाग्रही पद्धत जाणवत होती. एका ज्ञानतपस्व्याच्या जवळ आपण बसलो आहोत असा अनुभव होत होता. 

वाचता वाचता पान एकतीस वर आलो. त्यात पिण्ड ब्रह्माण्ड या विषयावरचा गोरक्षनाथांचा सिद्धांत या मुद्द्यावर बोलताना ढेरे सरांनी ज्ञानोबा माउलींच्या अमृतानुभवातील नवव्या प्रकरणातील आत्मरतिचे वर्णन करणारी रचना दिली आहे. त्या रचनेचे पहिले वाक्य वाचले आणि एकदम ज्ञानतपस्वी ढेरे सर प्रेमळ अनुभवी मित्रासारखे झाल्यासारखे वाटले. ढेरे सरांनी दिलेली माऊलींची ती पूर्ण रचना आधी देतो आणि मग त्यामुळे माझ्या एका जुन्या कोड्याची उकल कशी झाली ते सांगतो. 

आतां आमोद सुनांस जाले । श्रुतीसि श्रवण रिघाले ।
आरिसे उठिले । लोचनेंसी ।।
आपलेंनि समीरपणे । वेल्हावती विंजणे ।
कीं माथेंचि चांफेपणें । बहकताती ।।
जिव्हा लोधली रासे । कमळ सूर्यपणे विकासे ।
चकोरचि जैसे । चंद्रमा जालें ।।
फुलेंचि जालीं भ्रमर । तरुणीची जाली नर ।
जाले आपुलें शेजार । निद्राळुची ।।
चूतांकुर जाले कोकीळ । आंगचि जाले मलयनिळ ।
रस जाले सकळ । रसनावंत ।।
तैसे भोग्य आणि भोक्ता । दिसे आणि देखता ।
हे सारले अद्वैता । अफुटामाजी ।।

यातलं "आमोद सुनांस जाले" वाचलं आणि शाळेपासून पडलेलं कोडं सुटेल असं वाटू लागलं. पुलंचा माझे खाद्यजीवन म्हणून फार प्रसिद्ध लेख आहे त्यात एका ठिकाणी पुलं म्हणतात, " जो भात खदखदू लागला म्हणजे प्रियकराचे प्रेयसीवरचे लक्ष उडून आमोद सुनांस होते, त्याला काय पोषक अन्न या वैद्यकीय कोषात कोंबायचे?" हे वाक्य जेंव्हापासून वाचलंय तेंव्हापासून जीव अडकलाय. कारण आमोद सुनांस येणे याचा काही संदर्भ मिळत नव्हता. बरं आपल्या पद्धतीने अर्थ लावायचा प्रयत्न करावा तर आमोद म्हणजे आनंद. मग आनंद सुनांस येणे म्हणजे काय ते कधीच कळले नव्हते. आणि इथे नाथसंप्रदायाचा इतिहास वाचताना ढेरे सरांनी माझ्यासाठी अगदी अनपेक्षितपणे पूर्ण रचना दिली होती. आता पुलंच्या वाक्याचा संदर्भ मिळाला होता. पण अजूनही आनंद सुनांस येणे याचे कोडे सुटत नव्हते. आणि पुलंनी हे वाक्य भात शिजण्याशी कसे जोडले ते काही लक्षात येईना. तसाच झोपलो. 

सकाळी, संदर्भ मिळाला आहे या आनंदात उठलो. पण अर्थ लागायचा बाकी आहे ते आठवले. मग माझ्यातला आळशी माणूस जागा झाला. ढेरे सरांच्या पुस्तकातील आणि पुलंच्या हसवणूक या पुस्तकातील त्या पानांचा फोटो घेतला आणि दोन मित्रांना पाठवला. एक माझ्या सारखा पुलंप्रेमी तर दुसरा जुन्या मराठी भाषेचा जाणकार. म्हटलं काय अर्थ लागतो का ते सांगा. भाषापटू मित्राने अजून माझा मेसेज बघितला नसावा तर पुलं प्रेमीने लगेच सांगितले की, 'बाबा रे, मला पण याचा अर्थ अजून लागला नाही." 

मग थोड्या वेळाने त्याचा पुन्हा मेसेज आला. 'ते आमोद सुनांस "जाले" आहे. सगळे त्याला "आले" म्हणतात. म्हणून मला कळत नव्हते. आता जर तो शब्द "जाले" आहे हे नक्की झालंय तर बहुतेक त्याचा अर्थ "श्रोत्यांस आनंद झाला " असा असणार". मला थोडे पटले आणि थोडे नाही. तेव्हढ्यात अजून एका जाणकार मित्राचा फोन आला. त्याला म्हटलं फोटो पाठवतो. अर्थ सांग. त्याला हे पण सांगितलं की एका मित्राने श्रोत्यांस आनंद झाला असा अर्थ सांगितला आहे. फोटो पाठवले आणि लेक्चरला गेलो. मग दिवसभर आयकर कायदा आणि त्याच्यातील कलमे शिकवताना विषय विसरलो. रात्री जाणकार मित्राचा फोन आला. तो म्हणाला श्रोत्यांचा संबंधच नाही. कारण अमृतानुभव म्हणजे श्रोत्यांशी साधलेलया संवादाचे वर्णन नसून ज्ञानेश्वरांना आलेल्या अमृततुल्य अनुभवांचे वर्णन आहे. हे मला पटले. पण तो ही "सुनांस जाले" या शब्दांचा अर्थ देऊ शकला नाही. 

आता माझी अवस्था स्टेशन जवळ आलेले आहे, फलाट दिसू लागलेले आहेत, आपण आपले सामान सुमान घेऊन पॅसेंजर ट्रेनच्या छोट्याश्या दरवाजाजवळ उभे आहोत, पण गाडी स्टेशन बाहेर सिग्नलला थांबल्यावर होते तशी झाली होती. मग आठवण झाली ती संध्याताई सोमण यांची. फेसबुकवर अनेक ठिकाणी कमेंट करताना त्यांच्याकडील जुन्या ग्रंथांचे फोटो टाकतात ते आठवले. मग त्यांना फेसबुकरच फोटो पाठवले. आणि म्हटलं "आमोद म्हणजे आनंद हे कळले आहे पण ते सुनांस आले चा अर्थ सांगू शकाल का?" पण मग लक्षात आलं की मी त्यांचा मित्र नाही आहे. स्पॅम टाळण्यासाठी झुक्या बाबा मित्र नसलेल्या लोकांचे मेसेज लगेच दाखवत नाही तर त्याला मेसेज रिक्वेस्ट म्हणून पाठवतो. आणि या रिक्वेस्ट बऱ्याचदा उघडल्या जात नाहीत हे माझ्या स्वानुभवावरून मला माहीत होते. मग संध्याताईंना मित्र विनंती पाठवली. आता त्या कधी ऑनलाईन येतील? कधी मित्रविनंती स्वीकारतील? कधी माझा मेसेज बघतील? आणि कधी उत्तर देतील? या प्रश्नांच्या आवर्तात सापडून शेवटी मी आळस सोडला आणि गुगल वर "आमोद सुनांस जाले" असे शोधायला सुरवात केली. 

तर तिथे मराठी साहित्य ब्लॉगस्पॉट इन या संकेतस्थळावर, दि बा मोकाशी यांच्या "आता आमोद सुनांसि आले" या कथेचे रसग्रहण सापडले. त्यात ब्लॉग लेखकाने एका परिच्छेदात माझ्या शंकेचं निरसन केलेलं होतं. तो परिच्छेद असा आहे, 

"कथेविषयी लिहिण्याआधी थोडेफार शीर्षकाविषयी सांगणे आवश्यक आहे. संत ज्ञानेश्वरांची 'आता आमोद सुनासि आले। श्रुतीशी श्रवण निघाले' ही अमृतानुभवातल्या 'ज्ञान-अज्ञान भेद कथन' या प्रकरणातील ही ओवी ज्ञाता आणि ज्ञेय (जाणणारा आणि जे जाणायचे ती गोष्ट) यांच्यातील अद्वैत दर्शविते. आमोद म्हणजे सुगंध, सुनास म्हणजे नाक - हे एक उदाहरण. या कथेतही वेगवेगळ्या पातळीवर, वेगवेगळ्या गोष्टींतले द्वैत - अद्वैत लेखक दाखवून देतो"

सगळा घोटाळा आमोद म्हणजे आनंद या समजुतीमुळे झालेला होता. आमोद म्हणजे आनंद असा जरी अर्थ असला तरी आमोद या शब्दाला अजूनही अर्थ असू शकतात ही शक्यताच मी विचारात घेतली नव्हती. त्यामुळे पुढे सुनांस आले किंवा जाले चा अर्थ लागत नव्हता. आता जेंव्हा आमोद म्हणजे सुवास असा अर्थ घेतला तेंव्हा सुनांस म्हणजे नाक हा अर्थ लागला. आणि मग सुनता है गुरु ग्यानी या निर्गुणी भजनात कबीर कुंडलिनी साधकाच्या अवस्थेचे वर्णन करत आहेत हा मला लागलेला अर्थ आणि त्याच अवस्थेचे माउलींनी आमोद सुनांस जाले असे केलेले वर्णन एकदम जुळून आले. जेंव्हा साधकाची कुंडलिनी जागृत होते, तेंव्हा त्याला जो अनिर्वचनीय आनंद होतो त्या अमृतानुभवाचे वर्णन करताना माउली म्हणतात. 

सुवासच नाक होतो आणि स्वतःला भोगू शकतो. ध्वनीच कान होतो आणि स्वतःला ऐकू शकतो. आरसा डोळे आणि दृष्टी एकरूप होतात. माथा स्वतः चाफयाप्रमाणे सुगंधीत होतो. जीभ स्वतःच चव बनते, चकोर स्वतःच चांदणे आणि चंद्र बनतो, फुले स्वतःच भ्रमर बनतात, तरुणी स्वतःच नर बनून स्वतःचे स्त्रीत्व उपभोगू शकते. थोडक्यात सगळे रस आणि त्या रसांचे रसपान करणारे एकरूप होतात. त्यांचे अद्वैत होते. ज्याला भोगायचे आहे आणि जे भोगायचे आहे ते हे दोन्ही एकरूप होतात. ज्याला जाणायचे आहे आणि जे जाणायचे आहे ते एकरूप होतात. आणि हा अमृतानुभव असतो. असा या रचनेचा अर्थ आहे. 

आता माझी गाडी फलाटाला लागली होती. मन शांत झाले होते. मी शाळेत असल्यापासून पुलंनी घातलेले कोडे पण सुटले होते. भात शिजताना जो सुगंध दरवळतो त्यामुळे जणू तो वासच नाक होतो. वासाचे आणि नाकाचे वेगळे अस्तित्व उरत नाही. त्या दोघांचे अद्वैत होते. खरा खवैय्या प्रियकर मग तो सुवास उपभोगतो आणि त्यात इतका एकरूप होतो की तो आपल्या प्रेयसीला देखील विसरतो. 

आणि मला जाणवले की; माउली, कबीर, नाथ संप्रदाय, आणि पुलं यांना सगळ्यांना एका माळेत गुंफून ढेरे सरांनी आंतरजालाने मला एका मोठ्या रोलर कोस्टर राईडचा अनुभव दिलेला होता. तो माझ्यासाठी अतिशय रोमहर्षक होता. मला वाटले संपली राईड. म्हणून खूष होऊन फेसबुकवर आलो. तर संध्याताईंनी मित्र विनंती स्वीकारली होती. मग त्यांना हा अर्थ सांगून तो बरोबर आहे का अशी विचारणा केली. तर त्यांनी दुजोरा देताना त्यांच्याकडील एका पुस्तकाचा फोटो पाठवला. पुस्तकाचे नाव होते "अनुभवामृतातील प्रतिमासृष्टी" लेखिका "सई देशपांडे" फोटोत दिसणारे पण वाचले. आपल्याला लागलेला अर्थ बरोबर आहे याचा आनंद झाला. आणि अजून एक गंमत दिसली. एका देशपांडेंनी आपल्या पुस्तकात घातलेले कोडे शेवटी दुसऱ्या देशपांडेंनी लिहिलेल्या पुस्तकाच्या दुजोऱ्याने खात्रीलायक सुटले. 

आता ढेरे सरांचे पुस्तक खाली ठेववत नाही. विकत आणून ठेवलेली त्यांची सगळी पुस्तके मला बोलावत आहेत. बहुतेक त्या पुस्तकांची माझ्या आयुष्यातील वेळ सुरू झाली असावी. फक्त वाईट एकाच गोष्टीचे वाटते की हे सर्व, ढेरे सर इहलोक सोडून गेल्यावर घडले. आणि त्याच बरोबर थोडा आनंद देखील वाटतो की उशीरा का होईना पण मला त्यांच्या पुस्तकातील विचार थोडे फार समजू शकतील.

                                      🪴