Friday, November 25, 2022

मराठी शुद्धलेखनाचे नियम

महामंडळाचे अठरा नियम पुढीलप्रमाणे आहेत, 

  • नियम १:
    • १.१ स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.
      उदाहरणार्थ : गुलकंद, चिंच, तंटा, निबंध, आंबा.
    • १.२ तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्पाने पर‑सवर्ण लिहिण्यास हरकत नाही. मात्र अशा वेळी अनुस्वारानंतर येणार्‍या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच पर‑सवर्ण म्हणून वापरावे.
      उदाहरणार्थ : पंकज = पङ्कज, पंचानन = पञ्चानन, पंडित = पण्डित, अंतर्गत = अन्तर्गत, अंबुज = अम्बुज.
    • १.३ पर‑सवर्ण लिहिण्याची सवलत फक्त तत्सम शब्दांपुरती मर्यादित आहे. संस्कृत नसलेले मराठी शब्द शीर्षबिंदू (अनुस्वार) देऊनच लिहावेत.
      उदाहरणार्थ : ‘दंगा, झांज, बंड, खंत, संप’ हे शब्द ‘दङ्गा, झाञ्ज, बण्ड, खन्त, सम्प’ असे लिहू नयेत.
    • १.४ अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी पर‑सवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते.
      उदाहरणार्थ : वेदांत = वेदांमध्ये, वेदान्त = तत्त्वज्ञान देहांत = शरीरांमध्ये, देहान्त = मृत्यू.
    • १.५ काही शब्दांमधील अनुस्वारांचा उच्चार अस्पष्ट असतो.कधीकधी तो उच्चारलादेखील जात नाही. अशा शब्दांवर अनुस्वार देऊ नये.
      उदाहरणार्थ : ‘हंसणे, धांवणे, जेव्हां, कोठें, कधीं, कांहीं’ हे शब्द ‘हसणे, धावणे, जेव्हा, कोठे, कधी, काही’ असे लिहावेत
  • नियम २:
    • २.१ य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणार्‍या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा. ‘ज्ञ’ पूर्वीचा नासोच्चारही केवळ शीर्षबिंदूने दाखवावा.
      उदाहरणार्थ : संयम, संरचना, संलग्न, संवाद, दंश, दंष्ट्रा, मांस, सिंह, संज्ञा हे शब्द ‘संय्यम, संव्‍रचना, संल्लग्न, संव्वाद, दंव्श, दंव्ष्ट्रा, मांव्स, सिंव्ह, संव्ज्ञा’ असे लिहू नयेत.
  • नियम ३:
    • ३.१ नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.
      उदाहरणार्थ : लोकांना, मुलांनी, तुम्हांस, लोकांसमोर, घरांपुढे.
    • ३.२ आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही असा अनुस्वार दिला पाहिजे.
      उदाहरणार्थ : राज्यपालांचे, मुख्यमंत्र्यांचा, तुम्हांला, आपणांस, शिक्षकांना, अध्यक्षांचे.
  • नियम ४: वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे अनुस्वार देऊ नयेत. या नियमानुसार ‘घरें, पांच, करणें, काळीं, नांव, कां, कांच, जों, घरीं’ हे शब्द ‘घरे, पाच, करणे, काळी, नाव, का, काच, जो, घरी’ असे लिहावेत.

र्‍हस्व‑दीर्घ

  • नियम ५:
    • ५.१ मराठीतील तत्सम इ‑कारान्त आणि उ‑कारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत.
      उदाहरणार्थ : कवि = कवी, बुद्धि = बुद्धी, गति = गती.
      इतर शब्दांच्या अंती येणारा इकार व उकार दीर्घ लिहावा.
      उदाहरणार्थ : पाटी, जादू, पैलू.
    • ५.२ ‘परंतु, यथामति, तथापि’ ही तत्सम अव्यये र्‍हस्वान्त लिहावीत.
    • ५.३ व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे र्‍हस्वान्त तत्सम शब्द मराठीत दीर्घान्त लिहावेत.
      उदाहरणार्थ : हरी, मनुस्मृती, वर्गीकरण पद्धती, कुलगुरू.
    • ५.४ ‘आणि’ व ‘नि’ ही मराठीतील दोन अव्यये र्‍हस्वान्त लिहावीत.
    • ५.५ सामासिक शब्द लिहिताना समासाचे पूर्वपद (पहिला शब्द) तत्सम र्‍हस्वान्त शब्द असेल (म्हणजेच मुळात संस्कृतात र्‍हस्वान्त असेल) तर ते पूर्वपद र्‍हस्वान्तच लिहावे. दीर्घान्त असेल तर ते दीर्घान्तच लिहावे.
      उदाहरणार्थ : बुद्धि – बुद्धिवैभव  लक्ष्मी – लक्ष्मीपुत्र.
      साधित शब्दांनाही हाच नियम लावावा.
      उदाहरणार्थ : बुद्धि – बुद्धिमान, लक्ष्मी – लक्ष्मीसहित.
    • ५.६ ‘विद्यार्थिन्, गुणिन्, प्राणिन्, पक्षिन्’ यांसारखे इन्‑अन्त शब्द मराठीत येतात तेव्हा त्यांच्या शेवटी असलेल्या ‘न्’चा लोप होतो व उपान्त्य र्‍हस्व अक्षर दीर्घ होते. परंतु हे शब्द समासात पूर्वपदी आले असता (म्हणजेच समासातील पहिला शब्द असता) ते र्‍हस्वान्तच लिहावेत.
      उदाहरणार्थ : विद्यार्थिमंडळ, गुणिजन, प्राणिसंग्रह, स्वामिभक्ती, पक्षिमित्र, योगिराज.
  • नियम ६:
    • ६.१ मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल, तर त्याचा उपान्त्य (म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा) इकार किंवा उकार र्‍हस्व लिहावा.
      उदाहरणार्थ : किडा, विळी, पिसू, इथे, निघो फुगा, खुनी, सुरू, कुठे, उठो.
    • ६.२ मात्र तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही. तत्सम शब्दांतील उपान्त्य इकार किंवा उकार मुळाप्रमाणे र्‍हस्व किंवा दीर्घ लिहावेत.
      उदाहरणार्थ : दक्षिणा, गीता अनुज्ञा, पूजा.
  • नियम ७:
    • ७.१ मराठी अ‑कारान्त शब्दाचे उपान्त्य इकार व उकार दीर्घ लिहावेत.
      उदाहरणार्थ : कठीण, नीट, रतीब, विहीर ऊस, चिरूट, तूप, मूल.
      तत्सम (मुळात संस्कृत असलेल्या) अ‑कारान्त शब्दांतील उपान्त्य इकार व उकार मुळाप्रमाणे र्‍हस्व किंवा दीर्घ लिहावेत.
      उदाहरणार्थ : गणित, विष गुण, मधुर दीप, न्यायाधीश रूप, व्यूह.
    • ७.२ मराठी शब्दांतील अनुस्वार, विसर्ग किंवा जोडाक्षर यांच्या पूर्वीचे इकार व उकार सामान्यतः र्‍हस्व लिहावेत.
      उदाहरणार्थ : चिंच, डाळिंब, भिंग खुंटी, पुंजका, भुंगा छिः थुः किल्ला, भिस्त, विस्तव कुस्ती, पुष्कळ, मुक्काम.
      परंतु तत्सम शब्दांत ते मुळाप्रमाणे र्‍हस्व किंवा दीर्घ लिहावेत.
      उदाहरणार्थ : अरविंद, चिंतन कुटुंब, चुंबक निःपक्षपात, निःशस्त्र चतुःसूत्री, दुःख कनिष्ठ, मित्र गुप्त, पुण्य ईश्वर, नावीन्य पूज्य, शून्य.
  • नियम ८:
    • ८.१ उपान्त्यी दीर्घ ई किंवा ऊ असलेल्या मराठी शब्दांचा उपान्त्य ई‑कार किंवा ऊ‑कार उभयवचनी सामान्यरूपांच्या वेळी र्‍हस्व लिहावा.
      उदाहरणार्थ : गरीब – गरिबाला, गरिबांना चूल – चुलीला, चुलींना.
      अपवाद – दीर्घोपान्त्य तत्सम शब्द.
      उदाहरणार्थ : परीक्षा – परीक्षेला, परीक्षांना दूत – दूताला, दूतांना.
    • ८.२ मराठी शब्द तीन अक्षरी असून त्याचे पहिले अक्षर दीर्घ असेल, तर अशा शब्दाच्या सामान्यरूपात उपान्त्य ई‑ऊ यांच्या जागी ‘अ’ आल्याचे दिसते.
      उदाहरणार्थ : बेरीज – बेरजेला, बेरजांना  लाकूड – लाकडाला, लाकडांना.
      मात्र पहिले अक्षर र्‍हस्व असल्यास हा ‘अ’ विकल्पाने होतो.
      उदाहरणार्थ : परीट – पर(रि)टास, पर(रि)टांना.
    • ८.३ शब्दाचे उपान्त्य अक्षर ‘ई’ किंवा ‘ऊ’ असेल, तर अशा शब्दाच्या उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी ‘ई’च्या जागी ‘य’, आणि ‘ऊ’च्या जागी ‘व’ असे आदेश होतात.
      उदाहरणार्थ : काईल- कायलीला, कायलींना  देऊळ – देवळाला, देवळांना.
    • ८.४ पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी ‘सा’ असल्यास त्या जागी उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी ‘शा’ होतो (‘श्या’ होत नाही).
      उदाहरणार्थ : घसा – घशाला, घशांना  ससा – सशाला, सशांना.
    • ८.५ पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी ‘जा’ असल्यास उभयवचनी सामान्यरूपात तो तसाच राहतो (त्याचा ‘ज्या’ होत नाही).
      उदाहरणार्थ : दरवाजा – दरवाजाला/जांना मोजा – मोजाला/जांना
    • ८.६ तीन अक्षरी शब्दातील मधले अक्षर ‘क’चे किंवा ‘प’चे द्वित्व असेल, तर उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी हे द्वित्व नाहीसे होते.
      उदाहरणार्थ : रक्कम – रकमेला/मांना  छप्पर – छपराला/रांना.
    • ८.७ मधल्या ‘म’पूर्वीचे अनुस्वारसहित अक्षर उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी अनुस्वारविरहित होते.
      उदाहरणार्थ : किंमत – किमतीला/तींना  गंमत – गमतीला/तींचा
    • ८.८ ऊ‑कारान्त विशेषनामाचे सामान्यरूप होत नाही.
      उदाहरणार्थ : गणू – गणूस  दिनू – दिनूला.
    • ८.९ धातूला ‘ऊ’ किंवा ‘ऊन’ प्रत्यय लावताना धातूच्या शेवटी ‘व’ असेल, तरच ‘वू’ आणि ‘वून’ अशी रूपे होतात; पण धातूच्या शेवटी ‘व’ नसेल, तर ‘ऊ’ आणि ‘ऊन’ अशी रूपे होतात.
      उदाहरणार्थ : धाव – धावू, धावून गा – गाऊ, गाऊन कर – करू, करून.

किरकोळ

  • नियम ९: पूर हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही ग्रामनामास लावताना दीर्घोपान्त्य लिहावा.
    उदाहरणार्थ : नागपूर, तारापूर, सोलापूर.
  • नियम १०: ‘कोणता, एखादा’ ही रूपे लिहावीत. ‘कोणचा, एकादा’ ही रूपे लिहू नयेत.
  • नियम ११: ‘खरीखरी, हळूहळू’ यांसारख्या पुनरुक्त शब्दांतील दुसरा व चौथा हे स्वर मूळ घटक शब्दांमध्ये ते दीर्घ असल्याने दीर्घ लिहावेत, परंतु पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील, तर ते उच्चाराप्रमाणे र्‍हस्व लिहावेत.
    उदाहरणार्थ : दुडुदुडु, रुणुझुणु, लुटुलुटु.
  • नियम १२: एकारान्त नामाचे सामान्यरूप या‑कारान्त करावे. ए‑कारान्त करू नये.
    उदाहरणार्थ : करणे – करण्यासाठी, फडके – फडक्यांना.
  • नियम १३: लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते. त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे अनुस्वारयुक्त असावे.
    उदाहरणार्थ : असं केलं मी म्हटलं त्यांनी सांगितलं.
    अन्य प्रसंगी ही रूपे ए‑कारान्त लिहावीत.
    उदाहरणार्थ : असे केले मी म्हटले त्यांनी सांगितले.
  • नियम १४: ‘क्वचित्, कदाचित्, अर्थात्, अकस्मात्, विद्वान्’ यांसारखे मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द अ‑कारान्त लिहावेत.
    उदाहरणार्थ : क्वचित, कदाचित, अर्थात, अकस्मात, विद्वान.
    कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे.
    उदाहरणार्थ : ब्रिटिश, हाउस.
    इंग्रजी शब्द, पदव्या किंवा त्यांचे संक्षेप यांच्या शेवटचे अ‑कारान्त अक्षर आता व्यंजनान्त (म्हणजेच पायमोडके) लिहू नये.
    उदाहरणार्थ : एम.ए., पीएच.डी., अमेरिकन, वॉशिंग्टन.
  • नियम १५: केशवसुतपूर्वकालीन पद्य व विष्णुशास्त्री चिपळूणकरपूर्वकालीन गद्य यांतील उतारे छापताना ते मुळानुसार छापावेत. तदनंतरचे (केशवसुत व चिपळूणकर यांच्या लेखनासह) लेखन मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखनविषयक नियमांस अनुसरून छापावे.
    केशवसुतांचा काव्यरचनाकाल – १८८५ ते १९०५.
    चिपळूणकरांचा लेखनकाल – १८७४ ते १८८२.
  • नियम १६: ‘राहणे, पाहणे, वाहणे’ अशी रूपे वापरावीत. ‘रहाणे, राहाणे पहाणे, पाहाणे वहाणे, वाहाणे’ अशी रूपे वापरू नयेत. आज्ञार्थी प्रयोग करताना मात्र ‘राहा, पाहा, वाहा’ यांबरोबरच ‘रहा, पहा, वहा’ अशी रूपेही वापरण्यास हरकत नाही.
  • नियम १७: ‘इत्यादी’ व ‘ही’ हे शब्द दीर्घान्त लिहावेत. ‘अन्’ हा शब्द व्यंजनान्त लिहावा.
  • नियम १८: पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना र्‍हस्व‑दीर्घाच्या बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळता येणे शक्य नसल्यास कवीला तेवढ्यापुरते स्वातंत्र्य असावे.

*  *  *

लक्षात ठेवा

‘‑मंत’ आणि ‘‑मान’ हे प्रत्यय अ‑कारान्त आणि आ‑कारान्त नामे सोडून इतर नामांना लागतात, जसे – बुद्धिमंत/बुद्धिमान, हनुमंत/हनुमान तर ‘‑वंत’ आणि ‘‑वान’ हे प्रत्यय फक्त अ‑कारान्त आणि आ‑कारान्त नामांना लागतात, जसे – धनवंत/धनवान, दयावंत/दयावान. अपवाद – लक्ष्मीवंत, लक्ष्मीवान. चारही प्रत्यय नामांपासून विशेषणे तयार करतात.

Saturday, November 5, 2022

तुळस-शाळिग्राम

तुळशी विवाह कथा

तुळशी (वनस्पती) पूर्वजन्मी एक मुलगी होती, तिचे नाव होते वृंदा, ती राक्षसाच्या कुळात जन्मलेली होती, ती लहानपणापासूनच भगवान विष्णूची भक्त होती. ती मोठ्या प्रेमाने भगवान विष्णूची पूजा करीत असे. जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तीच लग्न राक्षस कुळातील एक राजा जालंधर या राक्षसाशी झाले. जालंधरची उत्पत्ती समुद्रातून झाली होती.

वृंदा एक अतिशय समर्पित स्त्री होती, ती नेहमीच आपल्या पतीची सेवा करत असे. एकदा देव-दानव यांच्यात युद्ध झाले, जेव्हा जालंधर युद्ध करायला जाताना त्याला वृंदा म्हणाली…स्वामी, जो पर्यंत तुम्ही युद्धावर असाल मी तुमच्या विजयासाठी उपासना करिन आणि तुम्ही पर्यंत येईपर्यंत हा संकल्प मी सोडणार नाही असे वचन मी तुम्हाला देते. त्यानंतर असुरराज जालंधर युद्धात गेले आणि वृंदा व्रताचा संकल्प सोडून उपासनेला बसली, व्रताच्या परिणामामुळे देवतांना जालंधरवर विजय मिळवला आला नाही, जालंधर विजयी होईल ह्या भीतीने सर्व देवता श्रीविष्णूंकडे गेले.

जेव्हा प्रत्येकाने भगवंताला प्रार्थना केली तेव्हा श्रीविष्णू असे म्हणाला की, वृंदा ही माझी परम भक्त आहे, मी तिच्याबरोबर फसवणूक करू शकत नाही. मग देव म्हणाले, आम्हाला तुमच्या शिवाय कोण मदत करणार महाविष्णू आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत, तुम्हीच या संकटातून आम्हाला वाचवा.

 

तेव्हा भगवान विष्णूंनी जालंधरचे रूप घेतले आणि वृंदाच्या राजवाड्यात पोचले. वृंदाने आपला नवरा पाहताच आपली उपासना थांबवली. ती ताबडतोब पूजेवरुन उठली आणि त्याच्या पायाला स्पर्श केला, जसा वृंदाचा संकल्प सुटला देवतांनी जालंधरला ठार मारले आणि जालंधरचे कापलेले डोके राजवाड्यात येऊन पडले. जेव्हा वृंदाने पाहिले की माझ्या नवऱ्याचे डोके कापले गेले आहे, तर मग समोर उभे असलेला हा कोण आहे?

तिने विचारले, तू कोण आहेस ज्याला मी स्पर्श केला, मग श्रीविष्णू त्यांच्या मूळरूपात आले परंतु काही बोलू शकले नाहीत, वृंदाला सर्व काही समजले, तिने श्रीविष्णूना शाप दिला आणि पाहताक्षणी श्रीविष्णूंचे पाषाणात रूपान्तर झाले.

सर्व देवता रडू लागल्या आणि लक्ष्मी रडून प्रार्थना करू लागली, ते पाहून वृंदाने श्रीविष्णूंना शापातून मुक्त करून आपल्या पतीसोबत सती गेली.

काही दिवसांनी जेव्हा तिच्या राखेतून एक वनस्पती बाहेर आली तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, आज पासून ह्या वनस्पतीचे नाव तुळशी असून, माझ्या पाषाणरुपी स्वरूपाचे म्हणजेच शाळीग्रामचे तुळशीसह पूजन केला जावे. तुळशीशिवाय केलेली पूजा माझ्याकडून स्वीकारली जाणार नाही.

तेव्हापासून सर्वजण तुळशीची पूजा करू लागले. कार्तिक महिन्यात तुळशीचे शाळीग्राम म्हणजेच श्रीविष्णूच्या पाषाण स्वरूपाशी लग्न लावायची प्रथा पडली. देव-उत्थानी एकादशीच्या दिवशी हा तुळशी विवाह साजरा केला जातो.

Wednesday, July 20, 2022

अण्णा भाऊ साठे : बी ए मराठी

अण्णा भाऊ साठे

तुकाराम भाऊराव साठे (१ ऑगस्ट १९२० ते १८ जुलै १९६९)  अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. अजरामर अशा या साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. उपजत बुद्धिवादी म्हणून त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेता येतो. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजविण्याचे महत्त्वपूर्ण काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र यांच्यासह सीमा प्रदेशातील विविध भागांतील हजारो ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले. त्याच्यामुळे लोक प्रेरित झाले.अण्णा भाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. १९४४ मध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांच्या सोबत त्यांनी लालबावटा कला पथक स्थापन केले. याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते. ते १९४० च्या दशकामध्ये कार्यरत राहिले आणि तेविया अब्राम्स यांच्यानुसार, भारतातील साम्यवादाच्या आधी स्वातंत्र्याच्या नंतरची "१९५० च्या दशकातील सर्वात रोमांचक नाटकीय घटना" होती. भारतीय स्वातंत्र्य्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, "ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है!" इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते, जी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होती आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये, ज्याने भाषिक विभागातून वेगळे मराठीभाषी राज्य (बॉम्बे राज्य) निर्माण करण्याची मागणी केली होती.

अण्णा भाऊ नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला. इ.स. १९५८ मध्ये, बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की, "पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे" यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले. या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरित, साठेंचे कार्य बौद्ध धर्माऐवजी मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होते. त्यांनी म्हटले आहे की, "दलित लेखकांना सध्याच्या सांसारिक व हिंदू अत्याचारांपासून दलितांना मुक्त करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कारण दीर्घकालीन पारंपरिक श्रद्धांना त्वरित नष्ट केले जाऊ शकत नाही.

अण्णा भाऊ यांनी मराठी भाषेत अनेक कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा (१९५९) समाविष्ट आहे, जिला इ.स. १९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. साठेंच्या लघुकथांचा संग्रह मोठा आहे, ज्यामध्ये अनेक कथा बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली.

अण्णा भाऊंच्या पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरामध्ये, साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भुखमरीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढिवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकिराला चित्रित केले. नायक आणि त्याच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकारी द्वारे अटक आणि छळ दिला जातो, आणि अखेरीस फकिराला फाशी देऊन ठार मारले जाते.

मुंबई मधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला. त्यांनी तो डायस्टोपियन परिवाराच्या रूपात दाखवला.. त्यांनी त्यांच्या "मुंबईची लावणी" आणि "मुंबईचा गिरणीकामगार" या दोन गाण्यांतून मुंबईला 'दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान और अन्यायपूर्ण' असे म्हटले आहे. 

अण्णाभाऊंच्या साहित्यात त्यांची कथा-कादंबरीची निर्मितीही ठळकपणे नजरेत भरते. जिवंत काडतूस, आबी, खुळंवाडी, बरबाद्या कंजारी (१९६०), चिरानगरची भुतं (१९७८), कृष्णाकाठच्या कथा हे त्यांचे काही कथासंग्रह; तर चित्रा (१९४५) ही त्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर फकिरा (१९५९, आवृ.१६– १९९५), वारणेचा वाघ (१९६८), चिखलातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ (१९६३), वैजयंता ह्यांसारख्या कादंबऱ्यांचा समावेश होतो. त्यांच्या फकिरा ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचापुरस्कार मिळाला. वास्तव, आदर्श आणि स्वप्नरंजन यांचे मिश्रण त्या कादंबरीत आहे. सत्प्रवृत्तीचा, माणुसकीचा विजय हे अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांचे मुख्यसूत्र होय. त्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले : वैजयंता (१९६१, कादंबरी वैजयंता ), टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी आवडी ),डोंगरची मैना (१९६९, कादंबरी माकडीचा माळ ), मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी चिखलातील कमळ ), वारणेचा वाघ (१९७०, कादंबरी वारणेचा वाघ ), अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी अलगूज ), फकिरा (कादंबरी फकिरा ). या शिवायव इनामदार (१९५८), पेंग्याचं लगीन, सुलतान ही नाटकेही त्यांनी लिहिली. 

उपेक्षित गुन्हेगार म्हणून कलंकित ठरवले गेलेले, दलित आणि श्रमिक यांच्या समृद्घीचे स्वप्न अण्णाभाऊ पाहात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या लढाऊ आणि विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर झालेले होते. ‘जग बदल घालुनी घाव। सांगूनि गेले मज भीमराव॥’ हे त्यांचे गीतखूप गाजले. त्यांनी लिहिलेल्या लावण्यांत ‘माझी मैना गावावर राहिली’ आणि ‘मुंबईची लावणी’ या अजोड आणि अविस्मरणीय आहेत.

अण्णाभाऊंची निरीक्षणशक्ती अत्यंत सूक्ष्म आहे. त्यांच्या लेखन शैलीला मराठमोळा, रांगडा पण लोभस घाट आहे. नाट्यमयता हाही त्यांच्यालेखनशैलीचा एक खास गुण. ज्या विपर्यस्त जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभव आत्मसात केले, त्यांतील क्षणांचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखनात जाणवतो. लवचिक भावचित्रे अंगासरशा मोडीने साकार करण्याची त्यांची लकबही स्वतंत्र आहे. लेखनावर त्यांनी जीव जडवला होता; त्यांनी ते विपुल केले.

रशियाच्या ‘इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटी’ च्या निमंत्रणावरून ते १९६१ साली रशियाला गेले. तेथील अनुभवांवर आधारित माझा रशियाचाप्रवास हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिले.

महाराष्ट्रातील विद्यापीठांत अण्णाभाऊंवर अकरा प्रबंध सिद्घ केले गेले आहेत. पुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘अण्णाभाऊ साठे’ अध्यासन सुरु करण्यात आले आहे. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे, तर २२ परकीय भाषांत भाषांतरे झाली आहेत.

“अण्णा भाऊंच्या गोष्टींत अथवा लिखाणात विनोद नसतो, असं नाही; पण त्यांचा प्रकृतीधर्म आहे गंभीर लेखकाचा. ज्यांन फार भोगलं आहे, सात पडद्यांतून नव्हे, तर समोरासमोर जीवनातल्या क्रूर सत्याचं ज्याला दर्शन घडलं आहे. अशा पोटतिडकीने लिहणाऱ्या साहित्यिकाचा आत्मा त्यांना लाभला आहे. म्हणून साहजिकच त्यांच्या गोष्टी मोठ्या वैशिट्यपूर्ण असतात. म्हणून तत्कालीन सर्व बड्या कथाकारांपेक्षा ते निराळे आहेत. या लेखकाला प्रतिभेचे देणं लाभलं आहे. जीवनात आग ओकणाऱ्या हरतर्हेच्या गोष्टींच्या अनुभव त्यांच्या गाठी आहे. त्यांच्या मनात एकप्रकारचा पीळ आहे. ते अन्यायाविरुद्ध बंड उभारणाऱ्या वृत्तीचा पूजक आहे.” वि.स. खांडेकर

Sunday, April 17, 2022

सीमाभागातील कवी : कृ. ब. निकुंब : बी ए भाग ३


कृष्ण बलवंत निकुंब 

यांचे शालेय शिक्षण सरकारी हायस्कूल, नाशिक येथे झाले आणि महाविद्यालयीन शिक्षण हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालय नाशिक येथे झाले. मुंबई विद्यापीठातून ते एम.ए.ची परीक्षा प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. कर्नाटक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून आणि लिंगराज महाविद्यालय, बेळगाव येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. तसेच कर्नाटक विद्यापीठाच्या मराठी पदव्युत्तर केंद्रात निवृत्त मानसेवी प्रमुख प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती.

‘ऊर्मिला’ (१९४४), ‘उज्ज्वला’ (१९४५), ‘अनुबन्ध’ (१९६५), ‘अभ्र’ (१९७५) हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ‘पत्रं पुष्पम्’ हे मराठी कवितांचे संकलन व संपादन त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे ‘फणसाचं पान’ या गोविंदाग्रजांच्या निवडक कवितांचे, आणि ‘साहित्य पराग’ हे अर्वाचीन मराठी कवितांचे संकलन व संपादन त्यांनी केले आहे. ‘साहित्यसमीक्षा’ हे समीक्षालेखन त्यांनी केलेले आहे. ‘पारख’ या समीक्षात्मक ग्रंथात त्यांनी संत नामदेव, संत तुकाराम, मोरोपंत, केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज, बी, इत्यादी कवींच्या काव्याचे मूल्यमापन केले आहे. हा ग्रंथ १९७३ साली प्रसिद्ध झाला आहे. ‘पावसाचं घर’ आणि ‘सायसाखर’ (१९५४) हे त्यांचे बालगीतसंग्रह असून ‘मृगावर्त’ (१९७०) या खंडकाव्याचे लेखनही त्यांनी केले आहे.

कृ.ब.निकुम्ब यांना साहित्याबरोबरच चित्रकला, आणि संगीत ह्या कलामध्ये रुची होती. केशवसुतांपासून बदललेल्या मराठी कवितेच्या परंपरेत निकुम्बांची कविता अवतरली. भावगीत रचनेचे, काव्यरचनेचे विविध प्रकार कणिका, सुनीते, गझल या सार्‍यांचा समावेश त्यांच्या रचनांमध्ये होता. अपुर्‍या आकांक्षा आणि भग्न ध्येये हे त्यांच्या कवितेचे विषय झाले. सौम्य आणि शांत प्रकृती हे त्यांच्या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य होते. जीवनात जे-जे उदात्त आणि कोमल आहे त्याचे वर्णन त्यांनी आपल्या कवितेतून केले. निसर्गाची अनेक भावमधुर रूपे त्यांच्या कवितेतून साकारली. तसेच मानवी भाव-भावनांचा तरल आविष्कार त्यांच्या कवितेतून झाला. उत्तरोत्तर त्यांची कविता अधिकाधिक सूक्ष्म चिंतनशील होत गेली. तसेच वैयक्तिक अनुभूतींचे कलात्मक आविष्करण त्यांच्या कवितेतून होत गेले.

‘घाल घाल पिंगा वार्‍या’ हे त्यांचे गीत अजूनही आवडीने ऐकले जाते. लोकान्तापेक्षा एकान्तात रमणारा काव्यप्रेमी, स्वप्नाळू, सौंदर्यासक्त कवी म्हणून निकुम्ब ओळखले जातात. अनेक संतकवींच्या, आधुनिक कवींच्या काव्याची आस्वादक समीक्षा करून त्यांनी या काव्यांचे मोठेपण रसिकांना जाणवून दिले आहे.

‘अंतःकरणातील भावना काव्यरूपात प्रकट होणे, म्हणजे उंबराला फूल येणे’ अशी त्यांनी व्यक्त केलेली भावना त्यांच्या काव्यविषयक दृष्टीकोनाचा प्रत्यय आणून देते.

ज्योत्स्ना कोल्हटकर

सीमाभागातील कवी : इंदिरा संत : बी ए भाग ३

इंदिरा नारायण संत 

या पूर्वाश्रमीच्या इंदिरा गोपाळराव दीक्षित. विजापूर जिल्ह्यातील ‘इंडी’ या तालुक्याच्या गावी दीक्षितांच्या कुळात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील गोपाळ सीताराम दीक्षित हे प्रशासकीय सेवेत मामलेदार होते. वडिलांची गावोगावी बदली झाल्याने कानडी मुळाक्षरे व थोडेसे लेखन-वाचन त्यांनी घरीच केले. ‘तवंदी’ हे त्यांच्या वडिलांचे मूळ गाव होते. घरच्या वाङ्मयीन वातावरणामुळे इंदिराबाईंच्या मनात कविता लेखनाची आवड बालपणातच निर्माण झाली. घरी ‘रामायण’ व ‘महाभारत’ यांसारखे ग्रंथ; भारतगौरव ग्रंथमालेच्या कादंबर्‍या; मनोरंजन, उद्यान इत्यादी मासिकांचे अंक यांसारखे खूप साहित्य होते. या वाचनाने या पुस्तकांतून भेटणार्‍या लालित्याचा, भावात्मकतेचा खोल ठसा त्यांच्या अंतःकरणावर उमटला आणि याचा परिणाम म्हणजे त्यांना कविता लेखनाचा छंद जडला. त्यांच्या घरचे सात्त्विक संस्कार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होण्याकरिता उपयोगी पडले.

घरात धार्मिक वातावरण असल्यामुळे रोज सकाळी आणि संध्याकाळी स्तोत्रे म्हणण्याची पद्धत होती त्यामुळे काव्य छंदात्मक असते याची त्यांना जाणीव झाली. घरी पोथ्या-पुराणे, संतवाङ्मय तसेच मोरोपंत, वामन पंडित, यांचे आख्यानकाव्य यांचे वाचन होत असल्याने प्राचीन मराठी कवितेचा संस्कार बालपणीच यांच्या मनावर झाला. तसेच त्यांची आई त्यांच्याकडून भूपाळ्या व तुळशीपूजा म्हणवून घेत असे. अशा प्रकारे आई-वडिलांचे, घराण्याचे सुसंस्कार लहान वयातच झाल्यामुळे त्यांची काव्याविषयीची गोडी अधिकच वाढली. या संस्काराचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांच्या काव्यावरही झाला. ‘बाहुल्या’ (१९७२) या संग्रहातील ‘सोन्याची कोयरी’ या कवितेत त्यांनी या सुसंस्कारांची जाणीव व्यक्तही केली. त्या सहा-सात वर्षांच्या असतानाच १९२० साली गदग येथे त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना ‘तवंदी’ येथे काकांकडेच राहावे लागले.

इंदिरा संतांचे बालपण ‘तवंदी’ या खेड्यात गेल्यामुळे या खेड्यातील निसर्गदृश्ये त्यांच्या अंतःकरणात ठसली . निसर्ग-सौंदर्याचा खरा आस्वाद इंदिराबाईंनी बालवयातच घेतला. त्यामुळे त्यांच्या बालपणीच्या अनुभवांना विशेष महत्त्व आहे. बालपणापासून स्पर्श, रस, रंग, गंध, रूप आणि वृत्ती इत्यादी संवेदना अनुभवांचे रसपान करीतच त्यांच्या काव्यात्म व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली.

इंदिराबाईंना लहानपणापासूनच मातीची ओढही आहे. त्या एकाच वेळेस निसर्गकन्या व भूमिकन्या आहेत. ‘मृण्मयी’ या कवितेतूनच त्यांची ही ओढ व्यक्त होते. सारा निसर्ग त्या विद्युत्कणाने असा काही जवळ केला की कवितेतील पहाड, तिरपा पाऊस, ते हिरवेपण, ते आभाळ या सर्वांना त्या प्राणानेच जीवकळा लाभली. तो निसर्ग जणू एखाद्या सतारीसारखाच त्यांच्या मनात उभा राहिला आणि त्यावर भाववृत्ती झंकारल्या. या निसर्गाचा परिणाम त्यांच्या बाह्य व अंतर्गत व्यक्तिमत्त्वावर अतिशय खोलवर गेलेले आहे.

इंदिराबाईंना बा लपणापासूनच ओव्यांचे आकर्षण होते. ओव्या गोळा करण्याचा छंद होता. या स्त्री-गीतांचा परिणाम असल्यामुळे वृत्त, जाती, राग यांचा स्वीकार न करता, ओव्यांमधील नादलय व स्वरलय आवडल्यामुळे त्या ओवी वृत्तातच कविता लिहीत. ओवी म्हणजे त्यांना उत्कृष्ट भावकविता वाटायची. शब्दांचा साधेपणा, वृत्तीचा बाळबोध नितळपणा व मोठा आशय थोडक्यात सांगण्याची शक्ती हे सारे ओवीतले गुण त्यांच्या कवितांत रुजले. एकूणच बेळगाव व तवंदी या दोन्ही गावांच्या अनुभवांनी त्यांची कविता समृद्ध झाली. शालेय शिक्षणातच त्यांच्या कविता प्रेमाला खतपाणी मिळाले. इंदिराबाईंचे दहावीपर्यंतचे शिक्षण बेळगावलाच झाले. त्यांनी वि.स.खांडेकर, ना.सी.फडके यांच्या कादंबर्‍या; बालकवींची कविता, इंग्रजी पुस्तके हे सारे शालेय जीवनातच वाचले. एकाकीपणाची जाणीवही याच काळात झाली. ‘सहवास’ या पहिल्या संग्रहातली ‘अनाथ’ ही कविता याचे दर्शन घडवते. मनातील भाव कवितेत उतरवावेत ही जाणीव त्यांना या कवितेपासून झाली. पण घरातल्या कडक शिस्तीत कवितेचे अंकुर जळून गेले. एकीकडे कटू वास्तवता व दुसर्‍या बाजूला कवितेतील स्वप्नसृष्टी! त्यामुळे त्यांच्या स्वभावाची घडण गांभीर्याकडे झुकली. महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात झाले. याच वेळी मित्र-मैत्रिणींच्या सहवासात कवितेची आवड पुन्हा निर्माण झाली. याच काळात महाविद्यालयामधले प्रसिद्ध लघुनिबंधकार नारायण माधव संत यांच्याशी इंदिराबाईंचा परिचय झाला. समानशीलत्वामुळे त्या परिचयाचे रूपांतर प्रीतीत झाले. जीवनातील खर्‍या काव्याची ओळख झाली. दोन्हीकडच्या विरोधी परिस्थितीतही १९३५ साली जूनमध्ये इंदिराबाई व संत विवाहबद्ध झाले. स्वप्न साकार झाल्याचे समाधान त्यांना वयाच्या २१व्या वर्षी मिळाले. लग्नानंतर त्यांच्या सुखी संसाराचे, संतृप्त वृत्तीचे चित्रण त्यांच्या काव्यातूनही जाणवते.

संसार, मुले, मधूनमधून नोकरी यांत रममाण होताना त्यांचे  कवितेकडे लक्ष नव्हते. १९३६पासून म्हणजे लग्नानंतर इंदिराबाईंनी पुणे, बेळगाव, मुंबई या ठिकाणी नोकरीनिमित्त वास्तव्य केले. सुखी संसाराच्या या दशकानंतर त्यांचे दुःखपर्व सुरू झाले. १९४६ साली, ना.मा.संतांच्या मृत्यूनंतर इंदिराबाई दुःखात पार बुडाल्या. या दुःखाचे चित्रण त्यांनी अनेक कवितांतून उत्कटपणे केले. ‘कातरवेळेला’ या कवितेतून हे दुःख विशेषतः व्यक्त झाले आहे. सफल प्रीतीपेक्षा जीवघेण्या दुःखाचे चित्रण त्यांच्या काव्यातून प्रतिबिंबित झाले.

मराठी काव्याच्या इतिहासात इंदिरा संत ह्या ‘विशुद्ध भावकविता लिहिणार्‍या कवयित्री’ म्हणून विख्यात आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या आधुनिक मराठी कवितेच्या युगाचे प्रणेते मर्ढेकर हे सर्वश्रुत आहेत. मागच्या कवितेचा ठसा पुसून टाकून त्यांनी नवीन वाट तयार केली. इंदिरा संतांनी ही वाट पूर्णतः स्वीकारली नसली, तरी मर्ढेकरांच्या नवकाव्याचे, प्रतिमांचे संस्कार त्यांच्या कवितेवर होत गेले. समकालीन कवयित्री पद्मा गोळे, संजीवनी मराठे, सरिता पदकी यांच्यापेक्षा इंदिराबाईंची कविता निराळी आहे. जात्यावरच्या ओव्या, लोकगीते आणि मर्ढेकरी काव्याचा नवीन प्रवाह या त्रयींनी इंदिरा संतांचे काव्य वेगळे झाले. इंदिराबाईंचे काव्य निसर्गावर आहे. तो त्यांच्या कवितेत पूर्णपणे भिनला आहे. सुखासीन पातळीवरून इंदिराबाईंच्या आयुष्यातून प्रा.संत निघून गेल्यामुळे त्यांची झालेली मानसिक व शारीरिक फरफट हे सर्वार्थानेच अचानक झालेले. त्यांच्या जीवनातील हे परिवर्तन काव्यवळणाच्या वाटा बदलवण्यासाठी कारणीभूत झाले.

‘सहवास’ (१९४१), ‘शेला’ (१९५१), ‘मेंदी’ (१९५५), ‘मृगजळ’ (१९५७), ‘रंगबावरी’ (१९६४), ‘बाहुल्या’ (१९७२) ‘मृण्मयी’ (संपादित रमेश तेंडुलकर), ‘गर्भरेशीम’ (१९८२), ‘चित्कळा’ (१९८९), ‘वंशकुसुम’ (१९९४), ‘निराकार’ (२०००) असा त्यांचा काव्यप्रवास आहे.

१९४१ साली निघालेला ‘सहवास’ हा एकच संग्रह; सफल प्रीतीच्या नंतर ‘शेला’, ‘मेंदी’, ‘मृगजळ’, ‘रंगबावरी’ हे दुसरे वळण आणि ‘बाहुल्या’, ‘गर्भरेशीम’, ‘चित्कळा’, ‘वंशकुसुम’ आणि ‘निराकार’ हे तिसरे! या शेवटच्या संग्रहातून त्यांचे चिंतनपर वर्तुळ पूर्ण होते या काव्यप्रवासात प्रतिमांना आणि रंगांना विशेष स्थान आहे. इंदिराबाईंच्या कवितेतील आत्मनिष्ठाच आशय-अभिव्यक्तीचे एकरूप दर्शवते. सारे प्रतिमाविश्व निसर्गरूपातून आले आहे. चिकाच्या पडद्याआडून जितके दिसते, तितके पण आपल्या प्रतिमांचे सुबक दर्शन तर व्हावे अशा प्रतिमांचा वापर इंदिराबाई कुशलतेने करतात. तसेच ‘माती’ हे त्यांचे आवडते प्रतीक असून ‘राधा’ व ‘मोर’ हे त्यांचे आवडते घटक आहेत.  दृश्य, स्वाद, नाद यांच्या एकात्मतेचा अनुभव यांच्या प्रतिमा देतात.

लाल, जांभळा, निळा, काळा अशा रंगप्रतिमा हे यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे. तर टिंबे, उद्गारवाचक चिन्हे, अपसारण चिन्हे व रिकाम्या जागा यांनाही इंदिराबाईंच्या कवितेत विशेष प्राधान्य आहे. शब्दप्रतिमा योजून इंदिराबाई त्यांच्या कवितेला बांध घालतात आणि त्या अनुभवाला मूर्त करतात. शाश्वत व सनातन असलेल्या सृष्टीतील प्रतिमांचा वापर त्या करतात आणि आशय-अभिव्यक्तीचा एक सुरम्य आविष्कार त्यांच्या कवितेतून सादर होतो.

कवितेव्यतिरिक्त इंदिराबाईंचे ‘शामली’ (१९५२), ‘कदली’ (१९५५) व ‘चैतू’ (१९५७) असे तीन कथासंग्रह, ‘मृद्गंध’ आणि ‘फुलवेल’ ही आत्मकथनपर ललितबंधांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘गर्भरेशीम’ या काव्यसंग्रहाला तसेच 'घुंघुरवाळा' या लोकसाहित्यावरील संपादित पुस्तकासाठी  साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. १९९५ मधल्या  जनस्थान पुरस्काराच्या (नाशिक १९९५) त्या मानकरी ठरल्या.

१९७८ मध्ये कर्‍हाड येथे महाराष्ट्र राज्य कवयित्री संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. वयाच्या ८६व्या वर्षी बेळगाव येथे त्यांचे निधन झाले.

डॉ. सुलभा हेर्लेकर

आपल्या जवळचे लेखक : बी ए भाग ३



रणजित रामचंद्र देसाई : (जन्म : ८ एप्रिल १९२८; - ६ मार्च १९९२) हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमानयोगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी, या कादंबऱ्यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे. त्यांना स्वामीकार या नावाने ही ओळखले जाते.रणजित देसाई यांची पत्नी माधवी देसाई याही लेखिका होत्या. त्यांचे नवऱ्यासोबतच्या नातेसंबंधांवर आधारित 'नाच गं घुमा' हे आत्मचरित्र अतिशय गाजले. स्वामी कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार १९७३ मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला. 

शिवाजी गोविंदराव सावंत : (३१ ऑगस्ट,१९४० ते १८ सप्टेंबर, ००२) हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबऱ्यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच मृत्युंजयकार सावंत म्हणून ओळखले जातात. शिवाजी सावंत यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबात, कोल्हापूर जिल्ह्यातील 
आजरा गावात झाला. सावंत उत्कृष्ट कबड्डीपटू होते. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आजऱ्यात झाल्यावर त्यांनी कोल्हापुरात बी.ए.चे प्रथम वर्ष पूर्ण केले आणि मग वाणिज्य शाखेतील पदविका (GCD) घेतली. टायपिंग, शॉर्टहँडचा कोर्स करून त्यांनी कोर्टात कारकुनाची नोकरी केली, आणि नंतर ते कोल्हापुरातील राजाराम प्रशालेत १९६२ ते १९७४ या काळात शिक्षक होते.

पुण्यात स्थायिक झाल्यावर १९७४ ते १९८० अशी सहा वर्षे त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या ’लोकशिक्षण’ या मासिकाचे सहसंपादक, व नंतर संपादक म्हणून काम केले. १९८३ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पुढील आयुष्यात फक्त लेखनावरच पूर्ण लक्ष केंद्रित केले.

मृत्युंजय(१९६७), या पौराणिक कादंबरीच्या प्रस्तावनेत शिवाजी सावंत यांनी हिंदीतील केदारनाथ मिश्र ह्यांचे कर्ण आणि रामधारी सिंह ‘दिनकर’ ह्यांचे रश्मिरथी ह्या दोन खंडकाव्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे.

मृत्युंजय कादंबरीच्या लेखनासाठी शिवाजी सावंत यांना थेट कुरुक्षेत्रात मुक्काम ठोकला होता. प्रदीर्घ संशोधन, चिंतन आणि मनन यांतून रससंपन्न अशा ‘मृत्युंजय’ या वास्तववादी कादंबरीचा जन्म झाला आणि शिवाजी सावंत हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोहोचले.

’मृत्युंजय’नंतर सावंतांनी ’छावा’ ही ऐतिहासिक व ’युगंधर’ ही पौराणिक विषयावरची कादंबरी लिहिली. शिवाजी सावंत यांची कादंबऱ्यांसहित अन्य पुस्तके इंग्रजी भाषेत अनुवादित झाली आहेत. युगंधरचा इंग्रजी अनुवाद सावंत यांची अमेरिकास्थित कन्या कादंबिनी यांनी केला आहे.

मृत्युंजय या कादंबरीवर आधारलेली काही मराठी-हिंदी नाटकेही रंगभूमीवर आली. मृत्युंजय ही कादंबरी दानशूरपणासाठी प्रख्यात असलेला महान योद्धा कर्णाच्या जीवनावर, तर युगांतर ही कादंबरी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारलेली आहे. मराठी भाषेत कसदार लेखन करून साहित्याची सेवा केल्याबद्दल त्यांना भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

कऱ्हाड येथे भरणाऱ्या ७६व्या 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'च्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते. आपल्या उमेदवारीच्या प्रचारासाठी गोव्यात गेले असताना मडगाव येथे, शिवाजी सावंत यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

Monday, January 17, 2022

मराठी भाषा पंधरवडा : बी ए भाग ३

मराठी भाषा पंधरवडा २०२२ निमित्त राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र निर्माण अभिजात मराठी लघुपट 'शांतता मराठीचे कोर्ट चालू आहे' ... पहा 👇Click here.. 

Thursday, January 6, 2022

PG Diploma in Translation : B A III

Center for Distance Education organized Lecture Series on opportunities in P G Diploma in Translation after higher education... Here is Dr Anil Gavali from Yashwantrao Chavan Mahavidyalaya, Halkarni, Tal. Chandgad, Dist. Kolhapur 416 552 ( Maharashtra)

महानुभाव संप्रदाय : बी ए भाग ३


महानुभाव पंथ व साहित्य

यादवराजांच्या कारकीर्दीत, बाराव्या शतकात, महाराष्ट्रात महानुभाव पंथ उद्यास आला. सामान्यांना त्यांच्या भाषेत मोक्षमार्ग सुलभ करून सांगणारे जैन, नाथ, लिंगायत, आदी पंथ यापूर्वीच प्रस्थापित झाले होते. या काळात कर्मकांडाचे प्रस्थ वाढून सकाम भक्तीचे बंड माजले होत. सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या महानुभव पंथाने जातिनिरपेक्षतेचा आणि अहिंसा तत्त्वाची पुरस्कार केला.

‘महानुभाव’ या नावने हा पंथ जरी आज ओळखला जात असला, तरी त्याची ‘महात्मा’, ‘अच्युत’, ‘जयकृष्णी’, ‘भटमार्ग’, ‘परमार्ग’ अशी अन्य नावेही आहेत. गुजराततेत ‘अच्युत पंथ’ व पंजाबात ‘जयकृष्णी पंथ’ ही नावे लोकप्रिय आहेत. ही दोन्ही श्रीकृष्णभक्तीचा द्योतक आहेत. या पंथातील अनुयायी परस्परांस ‘महात्मा’ म्हणत. ‘भटमार्ग’ हे नाव पंथसंस्थापक चक्रघरांचा पट्टशिष्य नागदेव किंवा भटोबास याच्या नावावरून आलेले आहे. महानुभाव’ शब्दाचा ‘महान् अनुभवः तेजः बलं वा यस्य’ असाही अर्थ केला जातो. डॉ. वि. भि. कोलते यांच्या मताप्रमाणे या संप्रदायाचे मूळ नाव ‘परमार्ग’ असेच होते (लोकशिक्षण, वर्ष ७, अंक ४/५).

चक्रधरोक्त सिद्धांतसूत्रपाठाप्रमाणेच गीता हा या पंथाचा प्रमुख धर्मग्रंथ असून श्रीकृष्णलीलावर्णन करणारे भागवत ते प्रमाण मानतात. कृतयागात हंसावतार, त्रेतायुगात दत्तावतार, द्वापारयुगात श्रीकृष्ण आणि कलियुगात श्रीचक्रधर असे चार अवतार त्यांच्या मते असून त्यांचा दत्त हा एकमुखी होय. द्वारकाधिश कृष्ण, दत्तात्रय, द्वारावतीचे चांगदेव राऊळ, ऋद्धिपूरचे गोविंदप्रभु आणि प्रतिष्ठानचे चक्रधर असे कृष्णाचे पाच अवतार ते मानतात. त्यांपैकी श्रीदत्तात्रय, श्रीकृष्ण श्रीचक्रधर हे उभयदृश्य पूर्णावतार होत. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर ही अनादि व अनंत मूळ चार तत्त्वे असून परमेश्वर नेहमी मनुष्यरूप धारण करून अवतार घेतो. मनुष्यरूपानेच प्राणिमात्रांचे उद्धरण परमेश्वरास करता येईल, अशी त्यांची श्रद्धा आहे. प्रपंच हा अनित्य असून अनादि अविद्यायुक्त जीव बद्धमुक्त, देवता नित्यबद्ध आणि परमेश्वर हा नित्यमुक्त आहे; जीव अनंत असून परमेश्वराचे अवतारही अनंत आहेत. जीवेश्वराचा संबंध हा स्वामिभृत्यासारखा आहे, असे ते मानतात. या दृष्टीने हा पंथ द्वेती असून आत्मा आणि परमात्मा वेगळे मानणारा आहे.

अविद्येपासून मुक्त होऊन ईश्वरस्वरूपाचा आनंद भोगण्याची पात्रता जीवाच्या ठिकाणी असल्याने महानुभवांनी जीवास ‘बद्धमुक्त’ मानले आहे. प्रपंचाचे स्वरुप अष्टभैरवस्थित पंचमहाभूते व त्रिगुण यांच्यापासून निर्माण झालेली सृष्टी असे असून त्याचे ‘कारण प्रपंच’ व ‘कार्य प्रपंच’ असे दोन भाग केले आहेत. ‘कारण प्रपंच’ हा अनादि अनंत म्हणूनच नित्य आहे. कार्यरूप प्रपंच हा व्यक्त आणि अनित्य होय. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, ‘प्रपंचु संहारे’ असे म्हटले असल्यामुळे प्रपंच अनित्य वर्गातला आहे, यात शंका राहत नाही. अविद्या अनादि मानली तरी ती नित्य असली पाहिजे, असे अनुमान करण्याचे कारण नाही. कारण–अविद्या व कार्य−अविद्या मोक्षस्थितीत संपूर्ण नाश पावतात, असे बौद्ध व शंकराचार्य यांचे मत आहे, तेच श्रीचक्रधरस्वामींनी मान्य केले आहे (महाराष्ट्र जीवन,खंड १, पृष्ठ २१९). देवतांचे नऊ थोवे महानुभावीयांनी कल्पिले असून त्यांची प्रत्येक ब्रह्मांडातील संख्या एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष दहा इतकी आहे. त्या नित्यबद्ध, भावरूप पण अव्यक्त आणि ज्ञान, सुख, ऐश्वर्य, प्रकाश व सामर्थ्य यांनी युक्त असल्या, तरी परमेश्वरूप नव्हेत. देवतांचे मुख्य कार्य सृष्टीतील जीवांना त्यांच्या कर्मांची सुखदुःखात्मक फळे देणे हे आहे. अद्वैत वेदान्तामध्ये ब्रह्मस्वरूप हे अंतिम सत्य व ईश्वर हे ब्रह्माचे सोपाधिक म्हणजे गौण स्वरूप मानले आहे. महानुभाव तत्त्वज्ञानानुसार परमेश्वराचे (१) अवतरदृश्यावतार, (२) परदृश्यावतार, (३) उभयदृश्यावतार असे तीन प्रकारचे अवतार आहेत. परमेश्वर नित्यमुक्त असल्याने तोच जीवाचा उद्धार करू शकतो. त्या त्या युगातील देहधारी जीव साकार परमेश्वराच्या सन्निधानाने आपला उद्धार करून घेतात. मात्र जीवाचे उद्धरण म्हणजे अद्वैत्यांची मुक्ती नव्हे. मुक्तीनंतरही जीवाचे अस्तित्व टिकून राहते. ईश्वराकडून शब्दज्ञान झाले, तरी मोक्षमार्गाने जाण्यासाठी अनुसरणाच्या मार्गाचा अवलंब करून वयाच्या छप्पन्नाव्या वर्षापूर्वी सर्वेंद्रिये कार्यक्षम असताना संन्यास घेणे आवश्यक आहे. संन्यास घेऊन परमेश्वराला अनुसरल्यानंतर देहांतापर्यंत साधकाला ‘असती−परी’ आचरावी लागते. महानुभावांचे उपदेशी आणि संन्यासी असे दोन वर्ग असून उपदेशी वर्ग लौकिक जीवनात चातुर्वर्ण्य पाळतो. संन्यासदीक्षेनंतर मात्र जातिनिर्बंध पाळण्याची आवश्यकता नाही.

महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर हे होत. ऋद्धिपूरच्या गोविंदप्रभु या प्रमेश्वरावताराचे ते शिष्य. त्यांचे मूळचे नाव हरपाळदेव असून त्यांच्या मृत शरीरात चांगदेव राऊळ यांनी प्रवेश करून नवीन अवतार धारण केला अशी कल्पना आहे. नागदेव हे चक्रधारांचे पट्टशिष्य व पंथाचे पहिले आचार्य. चक्रधरांच्या वैदिक धर्माहून आणि लोकरुढीहून वेगळ्या शिकवणीमुळे तत्कालीन सनातनी लब्धप्रतिष्ठितांकडून त्यांना विरोध झाला व त्यांना नाहीसे करण्याचे प्रयत्न झाले.

महानुभावांच्या मराठीविषयक आत्मीयतेच्या भावनेमुळे या पंथातील व्यक्तींनी विविध वाङ्मयप्रकारांत रचना करून मराठी साहित्य समृद्ध केला आहे. स्मृति-संकलनात्मक गद्य चरित्रवाङ्मय ही या पंथाची मराठी साहित्यास लाभलेली महत्त्वाची देणगी होय. महानुभाव वाङ्मयात चरित्रे, सूत्रवाङ्मय, टीकावाङ्मय, न्याय-व्याकरणादी शास्त्रे, क्षेत्र व व्यक्तिमहात्मवर्णने, स्तोत्रे इ. प्रकारचा समावेश आहे. निरनिराळ्या काळात पंथातील प्रतिभासंपन्न कवींनी लिहिलेल्या सात काव्यांना साती ग्रंथ म्हटले जाते. यात नरेंद्रांचे रुक्मणीस्वयंवर; भास्करभट्ट बोरीकरांचे शिशुपालवध व उद्धवगीता. दामोदर पंडितांचा वछाहरण, रवळो व्यासकृत सैह्याद्रिवर्णन, पंडित विश्वनाथ बाळापूरकर यांचा ज्ञानप्रबोध आणि पंडित नारायण व्यास वहाळिये यांचे ऋद्धिपूरवर्णन यांचा समावेश होतो. हे साती ग्रंथ परमार्गाच्या परंपरेने मान्य केलेले आहेत.

श्रीचक्रधर ल श्रीगोविंदप्रभू या ईश्वरावतारांच्या लीळा त्यांच्या भक्तांकडून मिवून म्हाइंभट्टांनी चक्रधरांच्या जीवनावरील लीळाचरित्र आणि गोविंदप्रभूंच्या जीवनावरील ऋद्धिपूरचरित्र हे चरित्रग्रंथ तयार केले आणि पंथीयांच्या नित्यस्मरणाची मोठी सोय केली. केसोबासांनी लीळाचरित्रातील काही लीळा निवडून त्या संस्कृत भाषेत पद्यबद्ध केल्या व आपला रत्नमालास्तोत्र ग्रंथ निर्माण केला. नागदेवांच्या जीवनावरील समृतिस्थळ हा चरित्रग्रंथ प्रथम नरेंद्र व परशराम बासांनी तयार केला, असे म्हणतात. पुढे त्याचे मालोबास व गुर्जर शिवयास यांनी संस्करण केले. केशवराज सूरी यांनी सिद्धान्तसूत्रपाठ आणि दृष्टान्तपाठ हे पंथीय तत्त्वज्ञान विशद करणारे ग्रंथ तयारे केले. श्रीचक्रधरांनी नित्यदिनचर्या सांगणारा छोटा पण महत्त्वाचा ग्रंथ पूजावसर हा वाङ्देववास यांचा. मुनिव्यासांनी श्रीचक्रपाणी, गोविंदप्रभु व चक्रधर यांच्या ‘संबंधा’ने पवित्र झालेल्या स्थळांची स्थानपोथी लिहिली. डॉ. कोलते ह्यांच्या मते ते कर्तृत्व शंकास्पद आहे. म्हाइंभट हे मराठीतील आद्य चरित्रकार मानले जातात. धवळे व मातृकी रुक्मिणीस्वयंवर रचणारी चक्रधरशिष्या महदाइसा ही आद्य मराठी कवियत्री होय. हयग्रीवाचार्य यानी भागवताच्या दशम स्कंधावर गद्यराज हे निर्यमक श्लोकबद्ध काव्य लिहिले. पंथाच्या उत्कर्षकाळात निर्माण झालेल्या महत्त्वाच्या ग्रंथरचनेनंतर भाष्यग्रंथ व इतर प्रकारचे साहित्य लिहिले गेले. त्यात गुर्जर शिववासाने, चक्रधरांच्या वचनांवर संबंधिलेले लक्षणस्थळ, विचारस्थळ व आचारस्थळ हे ग्रंथ महत्त्वाचे होत. यांतील प्रत्येक स्थळावर पुढे अनेक भाष्ये किंवा बंद लिहिले गेले. त्यांत दत्तराज मराठे यांचा लक्षणबंद, वाईंदेशकरांचा विचारबंद विश्वनाथवास बीडकर यांचा आचारबंद विशेष महत्त्वाचे आहेत. स्थळ व बंद ग्रंथांनी चौदाव्या-पंधराव्या शतकांत मराठी गद्याचे दालन विशेष समृद्ध झाले आहे. याच काळात मराठीचा पहिला व्याकरणग्रंथ पंडित भीष्माचार्यानी लिहिला. चक्रधरांची वचने ज्या प्रसंगी निरूपिली गेली वर्णन करणारा, निरुक्तशेष ग्रंथ भीष्माचार्य वाइंदेशकर ह्यांनी तयार केला. तोही पंथीय वाङ्मयात महत्त्वाचा मानला जातो.

महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर हे स्वतः गुजराती भाषिक असले, तरी ते मराठी भाषा अयिरत बोलत. आपल्या तत्त्वज्ञानाचा मराठी या लोकभाषेत त्यांनी प्रचार केला. त्यांचा हा दृष्टिकोण पंथाचे आचार्य नागदेव यांनी कटाक्षाने आचरणात आणला. त्यामुळे केशिराजांसारख्या संस्कृतज्ञ शिष्यांकडून त्यांनी माठी भाषेत ग्रंथरचना करवून घेतली (नको गा केशवदेया : येणें, माझिया स्वामीचा सामान्य परिवारू नागवैस की : किंवा ‘तुमचा अस्मात् मी नेणे गा : मज श्रीचक्रधरे निरुपल्ली मऱ्हाटी : तियाचि पुसा :) (स्मृ. स्थ. १५, ६६). चक्रधर-नागदेवांच्या शिष्यवर्गात पारंपारिक संस्कृत पठडीत तयार झालेले शिष्य असल्याने त्यांची ग्रंथरचना संस्कृत वाङ्मयाच्या वळणावर गेली असून त्यांच्या भाषेवर संस्कृताचा मोठा प्रभाव आहे. या ग्रंथात प्रारंभी महाकाव्यसदृश सलग ग्रंथरचना झाली. पुढील काळात चौपद्या, धुवे, स्तोत्रे, आरत्या, धवळे, पदे अशी विपुल स्फुटरचनाही झाली. लक्ष्मण रत्नाकरासारख्या संस्कृत ग्रंथावरील बत्तीस लक्ष्मणांची टीप यासारखे टीपग्रंथ लिहिले गेले. त्यामुळे सूत्रभाष्य, अर्थनिर्णयशास्त्र, व्याकरणशास्त्र, साहित्यशास्त्र यांची रचना मराठीच्या प्रारंभाकाळात करून महानुभावीयांनी मराठीची उपासनाच नव्हे, तर गोपासनाही केली. महानुभवीयांच्या या वैविध्यपूर्ण वाङ्मयाची विभागणी (१) चरित्रग्रंथ, (२) सूत्रग्रंथ, (३) साती (काव्य) ग्रंथ, (४) भाष्यग्रंथ, (५) साधनग्रंथ, (६) तात्त्विक ग्रंथ, (७) गीता टीका, (८) आख्यानक काव्ये, (९) स्थलवर्णनपर ग्रंथ, (१०) इतिहासग्रंथ, (११) स्फुटरचना अशा प्रकारांत करता येईल.