Friday, June 5, 2020

वारकरी संप्रदाय : बी ए भाग ३

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही वारकरी पंथ टिकून राहिला, वाढत राहिला आणि आजही तो आपल्याला पूर्वीइतकाच जोमदार दिसतो याचं आणखी एक कारण म्हणजे या पंथानं सुरुवातीपासून आपलं आविष्काराचं साधन मौखिक ठेवलं आहे. छापण्याची कला नव्हती तेव्हा हा पंथ सगळीकडे पसरला. तुकारामांचे अभंग ऐकल्यावर ब्रिटिश इतिहासकार ग्रँट सारख्या लोकांना आश्चर्य वाटले की एवढे हे अभंग खेडोपाडी म्हटले जातात पण त्याचं पुस्तक कसं नाही. मौखिक गोष्टी एकप्रकारे सुरक्षित असतात. एकदा तुम्ही पाठ केलं की स्मृतीत ते राहतं. तुकारामाच्या वह्या बुडवल्या पण मौखिक जे होतं ते कुणाला बुडवता आलं नाही. 
आजही प्रिटिंग आणि इलेक्ट्रॉनिकच्या जमान्यात हा मौखिकतेचा मुद्दा लागू आहे.वारकरी संप्रदायाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा अतिशय लोकशाहीवादी आणि विकेंद्रीकरणावर भर देणारा पंथ आहे. एकच एक केंद्र आहे असं या पंथात नाही. म्हणजे पंढरपूर या पंथात महत्त्वाचं असलं तरी देहू, आळंदी, पैठण या ठिकाणी गेलं तरी चालतं आणि त्यांनाही महत्त्व आहे. पंढरपूरलाच गेलं पाहिजे असं काही नाही. अगदी तुकारामही पंढरपूरला गेला नव्हता असे म्हणतात. तिथेच जाऊन काही केलं पाहिजे असं काही नाही. 
तुम्ही इंद्रायणीत आंघोळ करा नाही तर तुमच्या गावाच्या नदीत आंघोळ करा, गोदावरीत करा, तापीत करा तरी चालेल. ज्याला जसं शक्य आहे तसं करण्याची मुभा आहे. आणखी एक म्हणजे चालत जाणं यामध्ये एक सर्जनशीलता आहे. आपल्या शहरी माणसाला पायी चालण्यातला सर्जनशीलपणा कळणार नाही. पण आपण चालताना जे दिसतं, जे अनुभवतो, माणसांना जोडलो जातो ते अतिशय क्रिएटिव्ह असतं. ही एक आधुनिक कृती आहे.
वारकरी संप्रदायाचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्त्रियांना दिलेलं स्वातंत्र्य आणि बरोबरीचा दर्जा. मोठ्या प्रमाणात या पंथात स्त्रिया संत झालेल्या आहेत. रोमन कॅथलिक पंथात आता आतापर्यंत स्त्रियांना धर्मगुरू होता येत नव्हतं. त्या तुलनेत वारकरी पंथात अगदी जनाबाईपासून ते बहिणाबाईपर्यंत महिला संतांची परंपरा आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे बारा महिने सतत शेतात राबावं लागणाऱ्या स्त्रियांना दिंडीमुळे काही दिवसांसाठी का होईना मोकळेपणा आणि आराम मिळणे शक्य होतं. 
मुसलमानांचा या पंथातील सहभागही लक्षणीय आहे. मुसलमान संतांची मोठी परंपरा वारकरी पंथात आहे. शेख महंमदांसारखे जवळपास 25 मुसलमान संत आहेत ज्यांनी मुसलमानी परंपरेत राहून विठ्ठलावरही लिहिलं. अशा पद्धतीने सगळ्यांना सामावून घेणारा, सगळ्यांशी जुळवून घेणारा आणि टोकाला न जाणारा मार्ग या पंथात दिसतो. मीरा-कबीर यांच्यापासून ते अगदी चैतन्यप्रभूपर्यंत या पंथाने त्यांना सोबत जोडून घेतलं. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, अपुरी साधनं, नैसर्गिक संकटं अशा परिस्थितीतही ही चळवळ टिकून आहे. आज अत्यंत टोकाला जाणारी धार्मिक उन्मादी प्रवृत्ती, विशेषत: आपल्या देशाला न शोभणारी विचारसरणी वाढवणं चाललेलं आहे. 
आपली खरी परंपरा विसरून अतिशय शिताफीनं लोक आक्रमक होत आहेत. याच्याशी मुकाबला करण्याचं उत्तर आपल्याला वारकरी संप्रदायात सापडू शकेल. धर्मवेड्या लोकांची जी वृत्ती आहे ती काही आपल्या मातीतली नाही. वारकरी संप्रदाय जे तत्त्व मांडत आलाय ते आपल्या मातीतलं आहे. सर्वांना जवळ घेणं आणि पराकोटीला न नेणं हे आपल्या मातीतलं तत्वज्ञान आहे. हेच आपल्याला मार्गदर्शक ठरू शकेल. 
भालचंद्र नेमाडे

Thursday, June 4, 2020

संत तुकाराम : बी ए भाग ३

तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच' एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. 
भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य शब्दकळेत पाझरते.त् यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या.
संत तुकारामाच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगानी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे. गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला. इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही. तर ती जनसामान्यांच्या मुखांमध्ये अखंड जिवंत आहे. आपल्या कार्याची ही खरी यथोचित पावती आहे. खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोक संत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले. देव धर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत लौकिक अर्थाने संत तुकाराम हे आठव्या पिढीतील नायक होते. वि. का. राजवाडे यांनी संत चळवळीवर काही प्रमाणात टीका केलेली आहे. संत चळवळीच्या संदर्भामध्ये ते लिहितात, "संतांच्या संत चळवळीने महाराष्ट्र तीन शतके अपंग होऊन राहिला मात्र याला अपवाद संत रामदास हे होय" ज्ञानदेवांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे काम हे संत तुकारामांनी केलेला आहे.