संत ज्ञानेश्वर : (इ. स. १२७५ ते १२९६)महाराष्ट्रातील एक थोर योगी, तत्त्वज्ञानी आणि संतकवी. महाराष्ट्रातील भागवत तथा वारकरी संप्रदायाचा तत्त्वज्ञ प्रवर्तक. बाप विठ्ठलसुत, ज्ञानाबाई, ज्ञानदेव या नावांनीही त्यांना ओळखले जाते. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथसंप्रदायाची गुरुपरंपरा सांगितली आहे, ती अशी : आदिनाथ > मत्स्येंद्रनाथ > गोरक्षनाथ > गहिनीनाथ > निवृत्तिनाथ > ज्ञानदेव. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व बहुतेक अभंग-गाथा ह्यांत ते स्वतःच्या नावाचा निर्देश ज्ञानदेव असाच करतात; परंतु ⇨ नामदेव, ⇨मुक्ताबाई, ⇨ एकनाथ इ. संतांच्या वाङ्मयात ज्ञानेश्वर असाही उल्लेख अनेकदा येतो.
आपेगाव (तालुका पैठण) हे ज्ञानेश्वरांच्या पूर्वजांचे मूलस्थान. आडनाव कुळकर्णी. हे माध्यंदिन शाखेचे यजुर्वेदी ब्राह्मण. गोत्र पंचप्रवरान्वितवत्स. आज ज्ञात असलेले त्यांचे पहिले पूर्वज त्यांच्या पणज्यांचे पणजे हरिपंत कुळकर्णी हे इ. स. ११३८ च्या सुमारास आपेगावचे कुळकर्णपण पाहत असत. या घराण्यातील ज्ञानेश्वरांचे आजोबा गोविंदपंत यांस त्यांची पत्नी निराई हिच्यापासून पंचावन्नाव्या वर्षी एक पुत्र झाला. त्याचे नावविठ्ठल. हेच विठ्ठलपंत ज्ञानदेवांचे जनक होत. विठ्ठलपंतांनी वेद, काव्य, व्याकरण व विविध शास्त्रे ह्यांचे अध्ययन केले. ऐन तारुण्यातच वैराग्य, भक्ती व ज्ञान उत्पन्न होऊन पुष्करादी तीर्थांची यात्रा करावी, म्हणून मातापित्यांना वंदन करून त्यांनी तीर्थाटन केले आणि इंद्रायणीतीरी असलेल्या आळंदीस आले. तेथे थोर ब्राह्मण सिदोपंत ह्यांची भेट घेऊन त्यांचे चरण त्यांनी वंदिले. सिदोपंतांच्या आश्रमात त्यांनी वास्तव्य केले. नंतर त्यांच्याच रखुमाई या कन्येशी विठ्ठलपंतांचे शास्त्रोक्त रीतीनेलग्न झाले.
विठ्ठल-रखुमाई हे दोघे पतिपत्नी पंढरपूरला सिदोपंतांबरोबर यात्रेसगेले. पुढे आपेगावी येऊन गृहस्थाश्रम स्थिरपणे करावा की तीर्थाटन करीत देह झिजवावा, असा प्रश्न विठ्ठलपंतांच्या मनात घोळत होता. विठ्ठलपंत आपेगावी न परतताच सिदोपंतांचा निरोप घेऊन नामसंकीर्तन करीत तीर्थाटनास गेले आणि बरीच तीर्थे पाहून परत आळंदीस येऊन ते सिदोपंतांस भेटले. सिदोपंतांची आज्ञा घेऊन अखेरीस त्यांच्याबरोबरच आपेगावी येऊन त्यांनी मातापित्यांचे दर्शन घेतले. मातापिता दोघेही फार वृद्ध होती. स्वानंदपूर्ण स्थितीत ती दोघे वैकुंठवासी झाली; परंतु विठ्ठलपंत विरक्तहोते.
सिदोपंत आपेगावी आले आणि विठ्ठल-रखुमाई या दोघांना बरोबर घेऊन आळंदीस आले. अनेक वर्षे झाली तरी विठ्ठलपंतांस अपत्य झाले नाही. त्यांनी पत्नीस सांगितले की, वाराणसीस जाऊन संन्यास घ्यावासा वाटतो. तेव्हा रखुमाईने संततीवाचून संन्यास घेऊ नये, ही गोष्ट पतीसपटवा,असे आपल्या पित्यास सांगितले; मात्र विठ्ठलपंतांचे मन वळले नाही. पत्नी निद्रेत असता त्यांनी गृहत्याग केला, असे ज्ञानेश्वरादींना पैठणस्थब्राह्मणांनी दिलेल्या बोपदेवलिखित शुद्धिपत्रात म्हटले आहे.
विठ्ठलपंत वाराणसीस गेले. तेथील एका प्रसिद्ध संन्यासी महंतांपासून त्यांनी संन्यासदीक्षा घेतली. ह्या संन्यासी महंतांचे नाव नामदेवांनी सांगितलेलेनाही. श्रीपाद म्हणून त्यांचा निर्देश केला आहे. संन्यासी व्यक्तीचा श्रीपादह्या आदरार्थी अभिधानाने निर्देश करावा, असे यतिधर्मसंग्रह ह्या संन्यासाश्रमाच्या धर्मशास्त्राच्या संस्कृत ग्रंथात म्हटले आहे.
ज्ञानेश्वरांनी संन्यासविषयक अभंगगाथेतही संन्यासी व्यक्तीचा श्रीपाद ह्या आदरार्थी सामान्य संज्ञेने निर्देश केला आहे. काही चरित्रकार (उद्धवचिद्धनकृत श्रीज्ञानेश्वरचरित्र) ह्या विठ्ठलपंतांच्या संन्यासी गुरूचा नृसिंहाश्रम असा, तर काही (बोपदेवलिखित शुद्धिपत्र) रामानंद असा, निर्देश करतात.अर्थात हे रामानंद कबीरकालीन प्रसिद्ध रामानंद नव्हते. विठ्ठलपंतांच्या संन्यासग्रहणानंतर त्यांना चैतन्याश्रम हे अभिधान गुरूंनी दिले.
इकडे आळंदीस रखुमाईने जीवित सार्थक व्हावे म्हणून अश्वत्थाची सेवा आरंभिली. तेथे कालांतराने वाराणसी येथील एक संन्यासी आले. योगायोगाने तेच विठ्ठलपंतांचे गुरू होते. रखुमाईने नमस्कार केला. महंतांनी ‘पुत्रवती हो’ असा आशीर्वाद दिला. तिला हसू आले, विनोद वाटला. महंतांनी विचारले, ‘मिस्किलपणे का हसतेस ?’ ती म्हणाली, ‘पतीने संन्यास घेतला आहे; मग आपले बोल खरे कसे होणार?’ महंतांनी सगळी हकीकत विचारून घेतली. रखुमाईने मातापित्यांची महंतांशी भेट करविली. महंतांची अर्घ्यपाद्यपूजा व भोजन झाले.
महंत रामेश्वरच्या यात्रेला निघाले होते. सिदोपंतांनी प्रार्थना केली की, दयावंत होऊन वाराणसीस लगेच परतून जावयांचे मन वळवा. महंतांना वाटले : आपण विठ्ठलपंतांस अवेळी म्हणजे पत्नी तरुण व संतती नाही अशा स्थितीत संन्यास दिला, ह्याचा दोष आपणासही लागतो, आपले पुण्य लयाला जाते. विठ्ठलपंतांनी, आपल्यामागे तसा पाश नाही इ. खोटेच सांगून गुरूंपासून संन्यास घेतला, असे काही चरित्रकारांनी ह्या संदर्भात सांगितले आहे; परंतु नामदेव तसा उल्लेख श्रीज्ञानेश्वरांची आदिमध्ये करीत नाहीत. हा अनुल्लेख गुरूंच्या ह्या उक्तीशी सुसंगत ठरतो. खोटे सांगून संन्यास घेतला असता तर गुरूंकडे दोष गेला नसता म्हणून महंतांनी लगेच वाराणसीस प्रयाण केले व चैतन्याश्रमाला बोलावून घेतले. चैतन्याश्रमाने मान्य केले की, ‘कांतेचा त्याग करून मी आलो आहे.’ महंतांनी आज्ञा केली की, ‘पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकार.’
तेव्हा चैतन्याश्रम स्वदेशी परतले. संन्यासाश्रम टाकून त्यांनी पुनश्च गृहस्थाश्रम पत्करला. त्यामुळे ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकले. अशीबारा वर्षे निघून गेली. चार अपत्ये झाली; ती म्हणजे ⇨ निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर,⇨ सोपानदेव व ⇨ मुक्ताबाई. मुलगे व्रतबंधाला योग्य झाले. द्विजवृंदाच्या अनुज्ञेनुसार विठ्ठलपंत भार्या, पुत्र व गृह यांचा त्याग करूनव द्विजवृंदाला नमस्कार करून देहान्त प्रायश्चित्त घेण्यासाठी निघून गेले.
बहिष्कारामुळे आपली वंशावळी जातिकुळावेगळी झाली असल्या-मुळे प्रायश्चित्त घेणे अवश्य आहे, असा विचार विठ्ठलपंतांनी केला. त्यांनी ब्रह्मसभा भरविली व त्या सभेत ‘ह्या दीनाला अपराधाची क्षमा करा ‘अशी प्रार्थना केली. तेव्हा निवृत्ती ब्रह्मसभेला उद्देशून म्हणाले, ‘आम्हांला मार्ग सांगा ‘. द्विजांनी सांगितले की, ‘पैठणला जा, तिकडून शुद्धिपत्रआणा,ते मान्य होईल. निवृत्ती म्हणाले, ‘आमची परंपरा सगुण व निर्गुण ह्यांच्या पलीकडील आहे. जाती, कुळ, वर्ण किंवा विश्वातील पंच-महाभूते, विराट, महत् ह्यांपैकी आम्ही काही नाही, निजबोधस्वरूप आहोत.’ ह्यावर ज्ञानेश्वर म्हणाले, ‘आपली पावन अवस्था असली, तरी धर्मशास्त्राच्या पद्धतीने आपण चालले पाहिजे.’ ह्यावर सोपान म्हणाले, ‘पांडव, व्यास वाल्मीकी, वसिष्ठ ह्यांचे तरी कुळ किंवा जाती शुद्धकुठे आहे ⇨ तसेच आमची भक्ती हाच आत्मस्थितीचा उपाय होय, जाती किंवा कुळ नव्हे.’
ज्ञानदेवरचित ज्ञानेश्वरीची सांस्कृतिक व राजकीय पार्श्वभूमी फारसंपन्न होती. ज्ञानदेवांच्या कालखंडात महाराष्ट्रातील भौतिक व आध्या-त्मिक संस्कृतीचा उत्कर्ष होत होता. ज्ञानेश्वरी हे त्या उत्कर्षाचेचउत्कृष्ट फलित होय. सातशे वर्षे झाली; तरी धर्म, तत्त्वज्ञान व काव्यह्यांची अनुपम परिणती म्हणजे ज्ञानेश्वरी असे अजून म्हणता येते. तत्पूर्वीसु. शंभर-दीडशे वर्षे मराठी भाषेतील साहित्य विकास पावत होते. हाकाळ महाराष्ट्राच्या इतिहासात फार महत्त्वाचा आहे. स्वतः ज्ञानदेवांनीच श्रीरामचंद्र ह्या यादव राजाचे यदुवंश-विलास,सकळकळानिवास व न्यायाचा पोषक क्षितीश म्हणून वर्णन केले आहे. दोनशे-अडीचशे वर्षांच्या ह्या कालखंडात देवगिरीच्या यादवांचे राज्य विस्तारत व विकास पावत होते.
भास्कराचार्य, हेमाद्री, बोपदेव ह्यांच्यासारखे विद्वान ह्या कालखंडात झाले. ⇨ भास्कराचार्य हे भारताच्या गणित व ज्योतिष विद्येचे शिरोमणीच होते. भास्कराचार्यांच्या वंशातील सात पिढ्या लगोलग चतुरस्र विद्वानांच्या झाल्या. ज्योतिष, वैद्यक, धर्मशास्त्र, न्याय, मीमांसा, वेदान्त व व्याकरण ह्यांचे अध्ययन विदर्भासह महाराष्ट्रातील निरनिराळ्या पाठशाळांमध्ये चालू होते. बोपदेवांनी व्याकरणावर दहा, वैद्यकावर नऊ, साहित्यशास्त्रावर तीन, भागवतावर चार व ज्योतिषावर एक असे २७ प्रबंध लिहिले होते.
बोपदेवांचे भागवतावरील हरिलीला, मुक्ताफळ, परमहंसप्रिया व मुकुट हेचार ग्रंथ विद्वन्मान्य झाले होते. ह्याचा अर्थ असा की, महाराष्ट्रातश्रीमद्भागवताचा महिमा फार होता;नाथसंप्रदायाचाही प्रभाव होता, हे ज्ञानदेवांच्या तीन पिढ्यांवर नाथसिद्धांचा अनुग्रह होता ह्यावरून लक्षात येते. शांकर अद्वैताला महाराष्ट्रात फारच मोठी प्रतिष्ठा लाभली होती, हे ज्ञानेश्वरीवरून लक्षात येते. अजंठा, वेरूळ इत्यादी लेण्यांवरून महाराष्ट्रात ज्ञानदेवांच्या अगोदर सुमारे हजार-बाराशे वर्षे मूर्ती, चित्र व स्थापत्य ह्या कला अनेक अंगांनी विकसित होत होत्या, ह्याचे प्रत्यंतर मिळते. महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे ही हेमाडपंती शैलीची आहेत, असे म्हणतात; म्हणजे असे की, स्थापत्यकलाही फार लोकप्रिय झाली होती. ज्ञानेश्वरी हे त्या भव्य संस्कृतीचे सुंदर व पवित्र प्रतीक व प्रतिबिंबच आहे, असे म्हणावेलागते; इतक्या श्रेष्ठ साहित्यकृतीला श्रेष्ठ सांस्कृतिक पार्श्वभूमीच प्राप्तव्हावी लागते. त्याशिवाय ती निराधार ठरते, तिची सामाजिक उपपत्तीलागू शकत नाही.
बहिणाबाईने एका अभंगात भागवत धर्माचा म्हणजे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेवांनी रचला, असे म्हटले आहे; कारण तोपर्यंत धर्माची मुख्य भाषा किंवा माध्यम संस्कृत भाषाच होती. भगवद्गीतेचा व भागवताचा प्रचार सर्वत्र होता; परंतु हे ग्रंथ संस्कृतमध्ये अडकले होते. लोकभाषेला परमार्थ विचाराचे समर्थ माध्यम प्रथम ज्ञानदेवांनी केले. संस्कृत ही देववाणी होती व धर्मामृत ह्या देववाणीत बंद होते. ह्या अमृताला पैजेने जिंकणारीदेशी भाषा ज्ञानदेवांनी निर्मिली; धर्म, तत्त्वज्ञान व साहित्यकला ह्यांचे सामान्यजनांपर्यंत पोहचवणारे माध्यम निर्माण केले. शांतरस प्रतिपादिला.तो रस श्रेष्ठ ठरविल्यामुळे विवेकबुद्धीला उजाळा मिळाला आणि भक्तिमार्गाला ज्ञानेश्वरांनी शुद्ध केले.
शिवाय भगवान बुद्धांपासून शंकराचार्यांपर्यंत संन्यासाश्रमच श्रेष्ठ असे परमार्थाचे साधन मानले गेलेव ज्ञानदेवांपर्यंत संन्यासच श्रेष्ठ मानला जात होता; परंतु अनासक्तीचा गृहस्थाश्रमच परमार्थाचा श्रेष्ठ मार्ग म्हणून प्रथम ज्ञानदेवांनी दाखवून दिला. संन्यासमार्गाऐवजी गृहस्थाचा भक्तिमार्ग उजळविला. विश्व हे परमेश्वराचे सत्य स्वरूपच होय, त्याचाच उल्हास होय, असे सांगून,सगुण व निर्गुण ह्या दोन्ही एकाच परमसत्याच्या बाजू होत, असे वारंवार प्रतिपादले.ज्ञानदेवांची निश्चित ग्रंथरचना म्हणजे भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अनुभवामृत, चांगदेवपासष्टी व अभंगगाथा ही होय. अभंगगाथेत काहीथोडे अभंग प्रक्षिप्त असावेत, अशी शंका राहते.