Sunday, August 29, 2021

समर्थ रामदास : बी ए भाग ३

समर्थ रामदास
(१६०८– २ फेब्रुवारी १६८२). ज्ञानी, भक्तिमान आणि कर्मयोगी संतकवी. मूळचे नाव नारायण; उपनाव ठोसर. ‘रामदास’ हे त्यांनी पुढे स्वतःसाठी घेतलेले नाव. एक थोर सिद्धपुरुष म्हणून लोक त्यांना आदरपूर्वक ‘समर्थ रामदास’ असे आजही म्हणतात.

रामदासांचा जन्म मराठवाड्यातील जांब ह्या लहानशा गावचा. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत, आईचे राणूबाई. राम आणि सूर्य ह्यांची उपासना त्यांच्या घरात होती.सूर्याजीपंत अनेक मुमुक्षूंना ‘अनुग्रह’ देत. रामदासांचे वडील बंधू गंगाधर ‘श्रेष्ठ’ आणि ‘रामी रामदास’ ह्या नावांनीही ओळखले जातात. रामदास आठ वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले आणि गंगाधर हे वडिलांचा संप्रदाय चालवू लागले.

वडिलांकडून आणि पुढे वडील बंधूंकडून आपल्याला मंत्रोपदेश मिळावा, म्हणून रामदासांनी प्रयत्न केला होता; परंतु दोन्ही वेळी तो निष्फळ ठरला. रामदासांच्या एका अभंगावरून असे दिसते, की प्रत्यक्ष रामचंद्रांनीच स्वप्नात येऊन ‘श्रीराम जयराम जयजयराम’ हा त्रयोदशाक्षरी मंत्र त्यांना दिला.

आई आणि वडील बंधू ह्यांनी रामदासांचे लग्न, त्यांची इच्छा नसतानाही ठरविले; पण मंगलाष्टकांमधले ‘सावधान’ हे शब्द ऐकताच भर लग्नमंडपातून ते पळून गेले, असे म्हटले जाते. त्यानंतर तपश्चर्येसाठी ते नासिकला गेले आणि नासिकजवळील टाकळी ह्या गावी असलेली एक गुहा त्यांनी त्यासाठी निवडली. राममंत्राचा तेरा कोटी जप, वेदशास्त्रे, वेदान्त, काव्ये, पुराणे ह्यांचा अभ्यास; गायत्री-पुरश्चरणे; संगीतसाधना त्यांनी येथेच केली. त्यानंतर ते भारत भ्रमणास निघाले (१६३२). काशी, प्रयाग, गया, अयोध्या, श्रीनगर; हिमालयातील बद्रिनारायण आणि केदारनाथ अशी अनेक ठिकाणे त्यांनी पाहिली. अयोध्येत त्यांचे वास्तव्य सर्वाधिक म्हणजे अकरा महिने होते. पंजाबात जाऊन तेथील शीख धर्मगुरूंना ते भेटले. मानसरोवराची प्रदक्षिणा केली. पुरीच्या जगन्नाथाचे दर्शन घेतले.

दक्षिणेतीलही अनेक तीर्थांना त्यांनी भेटी दिल्या. महाराष्ट्रातही ते हिंडले. ह्या प्रवासात समर्थांनी अनेक साधुमहात्म्यांच्या भेटी घेतल्या. राम, हनुमान ह्यांची मंदिरे उभी केली. मठ स्थापन केले. समर्थांच्या आयुष्यातील ह्या यात्रापर्वात त्यांना भारताच्या लोकस्थितीचे दर्शन घडले. ते झाल्यानंतर समाजातील देवधर्माचे अराजक मोडावे, खऱ्या परमार्थाची स्थापना करावी आणि ऐहिक पुरूषार्थ साधणारी समाजव्यवस्था घडवावी, ही त्यांची साध्ये ठरली. ती सिद्ध करण्यासाठी ते कृष्णातीरी आले (१६४४). हे त्यांच्या आयुष्यातले अखेरचे पर्व.

ह्या पर्वात ते राजकारण म्हणजेच धर्मसंस्थापनेचे कार्य अखेरपर्यंत करीत राहिले. समर्थांना अभिप्रेत असलेला राजा हा परमार्थसंस्थापक आणि सज्जनांचा रक्षक असा होता. अशा राजाचे राज्य हे त्यांच्या दृष्टीने रामराज्य होते. अशा रामराज्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी निर्माण करणे, म्हणजेच समर्थ करू पाहत असलेली धर्म-संस्थापना होती. समर्थांनी वापरलेल्या ‘राजकारण’ ह्या शब्दाचा अर्थ ह्या संदर्भात समजून घेणे आवश्यक आहे.

राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होत. शिवाजी महाराजांच्या राजकीय उलाढालींत रामदासांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता, हे जरी खरे मानले, तरी शिवाजी महाराजांनी हाती घेतलेल्या स्वराज्यस्थापनेच्या कार्याला अनुकूल अशी मनोवृत्ती रामदासांनी लोकांत निर्माण केली, हे दिसून येते.

इस्लामी राजवटीत, भयापोटी लोकांनी डोहांत वा नद्यांत बुडविलेल्या अनेक देवतामूर्ती बाहेर काढून रामदासांनी त्याची पुन्हा प्रतिष्ठापना केली. धर्मप्रचारासाठी देवळे बांधली. देवांचे सार्वजनिक उत्सव सुरू केले. सामाजिक जीवनाची नैतिक परिशुद्धी करणे हे रामदासांच्या राजकारणाचे मर्म होय.

परमार्थाचा अधिकार पुरूषांप्रमाणेच स्त्रियांनाही आहे, असे रामदास मानीत. अक्काबाई आणि वेणूबाई ह्या त्यांच्या अनुयायी स्त्रिया प्रसिद्ध आहेत; त्यांच्याखेरीज अन्य अनेक स्त्रियांनी रामदासांचे अनुयायीत्व स्वीकारले होते. त्यांत काही मुसलमान फकीरही होते. उच्च पातळीवरील धर्मविचारंत हिंदू, मुसलमान असा भेद त्यांनी केला नाही.

समर्थांच्या पट्टशिष्याचे नाव कल्याण (मूळ नाव अंबाजी). तो त्यांचा मुख्य लेखनिक होता. दिनकर स्वामी, गिरिधर इ. त्यांचे अन्य शिष्यही प्रसिद्ध आहेत. समर्थांनी चाफळ येथे श्रीरामाची स्थापना केली. ह्या देवस्थानास हिंदू सरदारांची, तसेच विजापूरच्या इस्लामी राज्याचीही इनामे मिळाली. शिवाजी महाराजांनीही वर्षाला दोनशे होन इनाम दिले.अनेक गावेही इनाम म्हणून दिली.

शिवाजी महाराजांनी समर्थांचा उपदेश घेतला होता. तथापि महाराजांच्या स्वराज्यसंस्थापनेच्या कामात समर्थांचा प्रत्यक्ष संबंध होता, असे दाखविणारा आधार मिळत नाही.शिवराय-समर्थ भेट ही प्रथम स्वराज्यस्थापनेच्या अवघी दोनच वर्षे आधी (१६७२) झाली, असे काहींचे म्हणणे आहे. पण ज्या पत्रावरून ही पहिली भेट असे म्हणतात, ती पहिली भेट म्हणजे (राजे यांची पहिलीच भेट आहे. वाडीचे लोकास खटपटेस आणावे......... इ. मजकूर ह्या पत्रात आहे) त्या गावाची पहिली भेट असाही अर्थ निघू शकतो.

शिवाजी महाराजांच्या निधनानंतर (१६८०) दोन वर्षांनी समर्थांचे सज्जनगडावर निधन झाले.मर्थांच्या ग्रंथकर्तृत्वात दासबोध आणि रामायण (दोन कांडे) ह्यांचा प्रथम उल्लेख केला पाहिजे. दासबोध हा सर्मथांचा आणि रामदासी संप्रदायाचाही प्रमुख ग्रंथ. ७,७५१ ओव्यांच्या आणि दोनशे समासांच्या आजच्या दासबोधापूर्वी समर्थांनी एकवीस समासांचा एक दासबोधही रचलेला होता. मानवी सद्‍गुणांची वाढ व्हावी, लोक कर्तृत्वसंपन्न आणि परमार्थप्रवण व्हावेत, ही तळमळ दासबोधात दिसते.

रामदासी रामायणाची ‘सुंदर’ आणि ‘युद्ध’ अशी दोनच कांडे आहेत. समग्र रामायण रामदासांनी लिहिले नाही. सुंदरकांडाची श्लोकसंख्या १०१ असून युद्धकांडातील एकूण श्लोक १,३६२ इतके आहेत. ‘निमित्य मात्र ते सीता विबुधपक्षपुरता’  असे रामायणाचे सार रामदासांनी सांगितले आहे.

स्फुट कविता, प्रासंगिक कविता, आत्मारामसारखी वेदान्त प्रकरणे, अभंग, श्लोक, भूपाळ्या इ. अन्य बरीच रचना समर्थांची आहे. करुणाष्टक, मनाचे श्लोक, ‘सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची....’ ही महाराष्ट्र घरोघरी म्हटली जाणारी श्रीगणेशाची आरती ह्या रचना तर विख्यात आहेत. रामदासांनी ‘समर्थ’ होण्यापूर्वी तपश्चर्या केली,बहुश्रुतपणा मिळविला, कवित्व प्राप्त करून घेतले. ह्या साधनेत निराशेचे क्षणही अनेकदा आले. अशा प्रासंगिक निराशेचे व उद्वेगाचे प्रतिबिंब त्यांच्या करुणाष्टकात पडलेले आढळते. मनाच्या श्लोकांचा उर्दू अनुवाद शहा तुराव चिश्ती ह्या इस्लाम धर्मीयाने सु. अडीचशे वर्षांपूर्वी केला आहे. रामदासांनी संगीताभ्यास केला होता. केदार, बागेश्री, आसावरी, काफी अशा विविध रागांमध्ये त्यांनी बांधलेली पदे, त्यांच्या काही पदांतून आढळणारे तबल्याचे किंवा नृत्याचे बोल ह्यांतून हे लक्षात येते.

रामदासांच्या लेखनातून विखुरलेले साहित्यविषयक विचार शोधून रामदासांचे साहित्यशास्त्र (१९७३) ह्या नावाचा ग्रंथ भा. श्री. परांजपे ह्यांनी लिहिला आहे.

इंग्रजी अंमलापूर्वीच्या काळात रामदासांची बरीच चरित्रे लिहिली गेली, पण ती पौराणिक पद्धतीची आहेत. समर्थशिष्य गिरिधरस्वामी, हनुमंतस्वामी, महिपतिबुवा,दिनकरस्वामी, मेरुस्वामी, उद्धवसुत आदींनी लिहिलेल्या चरित्रांचा उल्लेख करता येईल.

संत एकनाथ : बी ए भाग ३

महाराष्ट्राचे खरे नाथ : संत एकनाथ

(१५३३-१५९९). महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ संतकवी. जन्म पैठण येथे. संत भानुदासांचे पणतू. वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे रुक्मिणी. त्यांचे वडील मोठे पंडित असावेत, असे एक मत आहे. बालपणीच आईवडील निवर्तल्यामुळे एकनाथांचे संगोपन त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केले. वयाच्या बाराव्या वर्षी एकनाथांनी देवगिरी येथील जनार्दनस्वामींकडे जाऊन त्यांचे शिष्यत्व पतकरले. तेथे सहा वर्षे राहून संस्कृत शास्त्रपुराणांचे व ज्ञानेश्वरी सारख्या अध्यात्मग्रंथांचे अध्ययन त्यांनी केले. गुरुकृपेने परमेश्वरी साक्षात्कार झाल्यावर एकूण सात वर्षे त्यांची तीर्थयात्रेत घालविली. या तीर्थयात्रेत प्रथम काही दिवस जनार्दनस्वामी त्यांच्याबरोबर होते.

तीर्थयात्रेनंतर त्यांनी गृहस्थाश्रभ स्वीकारला. गिरिजा हे त्यांच्या पत्नीचे नाव. एकनाथांना हरिपंडित नावाचा एक मुलगा आणि गोदागंगा या नावाच्या दोन मुली होत्या. कर्नाटकातील डंबळ येथील बाळकृष्णवंत चंद्रकेत ह्यांना दुसरी मुलगी दिली होती. प्रसिद्ध मराठी पंडित कवी मुक्तेश्वर हा गोदेचा मुलगा. कवी शिवराम पूर्णानंद हा नाथांचा मुलीकडून पणतू. हरिपंडित हा कर्मठ व सनातनी असल्याने काही काळ एकनाथांचा विरोधक होता. आळंदीस जाऊन नाथांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला (१५८३) आणि त्यानंतर ज्ञानेश्वरीची संहिता शुद्ध केली (१५८४).

पैठण येथेच फाल्गुन वद्य षष्ठीस त्यांनी देह ठेवला. अस्पृश्याच्या चुकलेल्या मुलास कडेवर घेऊन महारवाड्यात पोहोचवणे, श्राद्धाला ब्राह्मण येईनात तेव्हा शिजवलेले अन्न अस्पृश्यांना खाऊ घालणे व गाढवाला गंगोदक पाजणे यासारख्या एकनाथांच्या चरित्रातील आख्यायिकावरून अद्वैत वेदान्ताचा व्यापक अर्थ त्यांच्या अंगी प्रत्यक्ष बाणलेला होताहे दिसून येते. एकनाथ विठा रेणुकानंदन, जनी जनार्दन रामा जमार्दन आणि दासोपंत ह्या पाच समकालीन सत्पुरुषांना नाथपंचक म्हटले जाते. यांपैकी दासोपंतांची बरीच आणि जनी जनार्दनांची काही मराठी रचना उपलब्ध आहे.

चतुःश्लोकी भागवत (सु. १५५५) ही नाथांची पहिली रचना. भागवत पुराणाच्या द्वितीय स्कंधाच्या नवव्या अध्यायातील ३२ ते ३५ श्लोकांवरील १०३६ ओव्यांचे हे भाष्य आहे. सृष्टीच्या आद्यंती असलेल्या नारायणाचे व भागवत धर्माचे निरूपण त्यात आढळते. प्राकृत भाष्याग्रंथांना पंडितवर्गाकडून होणार्‍या विरोधाचे पडसाद येथे उमटले आहेत.

वरील भाष्यानंतर एकनाथांनी काही आध्यात्मिक स्वरूपाची स्फुट प्रकरणे लिहिली. शंकराचार्याच्या हस्तामलक या चौदा श्लोकांच्या स्तोत्रावर ६७४ ओव्यांची रसाळ टीका त्याच नावाने त्यांनी लिहिली. शुकाष्टक हे प्रसिद्ध संस्कृत अष्टकावरील ४४७ ओव्यांचे विवरण आहे. स्वात्मसुखात ५१० ओव्या असून गुरुस्तवन, अद्वैतभक्ती व भक्तिमार्गातील परमार्थ हे विषय त्यात आले आहेत. आनंदलहरीतील १५o ओव्यांत आत्मस्थितीतील आनंदाचे व गुरुभक्तांचे वर्णन आहे. चिरंजीवपदात साधकाला उपदेश केलेला आहे.

रुक्मिणी स्वयंवर (१५७१) हे भागवत संप्रदायातील पहिले व परंपराप्रवर्तक आख्यानक काव्य होय. भागवताच्या दशम स्कंधातील अध्याय ५२ ते ५४ मधील १४४ श्लोकांच्या व हरिवंशातील विष्णुपर्वाच्या अध्याय ५९-६o च्या आधारे एकनाथांनी त्याची रचनी केली. त्याची ओवीसंख्या १,७१२ आहे. श्रीकृष्ण-रुक्मिणीचा विवाह म्हणजे जिवाशिवांचे मीलन, अशा रूपकाभोवती हे संपूर्ण काव्य रचलेले आहे. या काव्याचा प्रभाव पुढील अनेक कवींवर पडलेला दिसतो. कृष्णदयार्णव ह्या कवीने तर आपल्या हरिवरदा या रचनेत प्रस्तुत काव्य संपूर्णपणे अंतर्भूत केले.एकनाथी भागवत ही एकनाथांची सर्वश्रेष्ठ रचना होय. भागवत पुराणाच्या एकादश स्कंधावरील ही विस्तृत टीका आहे.

भावार्थ रामायण ही त्यांची अखेरची रचना. अध्यात्म रामायण, क्रौंच रामायण, आनंद रामायण, योगवासिष्ठ इ. ग्रंथांच्या आधारे ही रचना केलेली आहे. 'बाल', 'अयोध्या', 'अरण्य', 'किष्किंधा', 'सुंदर' ही पहिली पाच कांडे आणि सहाव्या युद्ध कांडाचे ४४ अध्याय लिहून झाल्यानंतर नाथांनी देह ठेविला. त्यापुढील भाग गावबा नावाच्या त्यांच्या शिष्याने पूर्ण केला, असे परंपरा सांगते. याशिवाय मुक्तेश्वर, कोनेरीसुतशेष व एक अनाम कनी यांनी 'एका-जनार्दन' या नानानेच 'उत्तर'कांड लिहून भावार्थ रामायणाच्या पूर्तीचे प्रयत्न केले आहेत. भावार्थ रामायणाचे स्वरूप रामचरित्रावरील स्वतंत्र पौराणिक महाकाव्यासारखे आहे. एकनाथांच्या आवडत्य आध्यात्मिक रूपकांबरोबरच या काव्यात सामाजिक रूपकात्मताही आढळते. तत्कालीन यावनी सत्तेचा मराठी समाजावर झालेला अंतर्बाह्य अनिष्ट परिणाम त्यातून सूचित केला आहे.

या रचनांखेरीज बहुजनसमाजासाठी एकनाथांनी केलेली कथात्मक रचनाही वेधक आहे. सुबोध शैलीने लिहिलेल्या तुळशीमाहात्म्य व सीतामंदोदरीची एकात्मता या पुराणकथा, सांसारिकांच्या मनोवृत्तीचा आल्हादक व विनोदरम्य आविष्कार करणार्‍या हळदुली व कृष्णदान ह्या श्रीकृष्णकथा, कृपण माणसाचे हास्यजनक स्वभावचित्र रेखाटणारे कदर्यु-आख्यान, ध्रुव, प्रल्हाद, उपमन्यू आणि सुदामा यांच्या नाट्यपूर्ण लघुचरित्रकथा आणि जानेश्वरादी संतांच्या संक्षिप्त जीवनकथा ही अशा रचनेची उदाहरणे होत.

कनाथांनी गेय पदरचनाही केली आहे. ही पदे मुख्यतः श्रीकृष्ण-चरित्रपर आहेत. त्यांत सुंदर शब्दचित्रे, भावपूर्णता, कल्पकता, ध्रुव-पदांची वेधकता, मार्मिक तत्त्वसूचकता इ. वैशिष्ट्ये आढळतात. 'वारियाने कुंडल हाले', 'असा कसा देवाचा देव बाई ठकडा' इ. त्यांची पदे प्रसिद्ध आहेत.

प्राचीन मराठीतील भारूडरचनेत नवचैतन्य, विविधता व विपुलता निर्माण करण्याचे कार्य एकनाथांनीच केले. १२५ विषयांवर सु. तीनशे भारुड त्यांनी रचली. पुरातन काळापासून मराठी बहुजन-वर्गाचे आपल्या मनोरंजक व नाट्यपूर्ण गीतरचनेने रंजन करणार्‍या गोंधळी, भराडी, वासुदेव, डोंबारी, बाळसंतोष वगैरे जमातींचा एक वर्ग होता. एकनाथांनी त्यांच्या अलिखित लोककाव्याचे पुनरुज्‍जीवन केले. त्यांच्या कवित्वाची व्यापकता व लौकिकता यावरून स्पष्ट होते. आदिमाया, विंचू, जागल्या, कुडबुड्या जोशी या विषयांवरील त्यांची भारुडे प्रसिद्ध आहेत.

कनाथांची बरीचशी रचना साडेचार चरणी ओवी छंदात आहे. त्यांनी स्फुट अभंगरचनाही केली आहे. गुरुभक्ती, पारमार्थिक अनुभव व सामाजिक स्थिती हे त्यांच्या अभंगांचे मुख्य विषय आहेत. त्यांत नामदेव-तुकारामांसारखा साधकदशेतील भावोत्कट अंतःकलह आढळतात नाही. रचनादृष्टीनेही एकनाथी अभंग सैल आहेत.

कनाथांचे वाङ्मयीन, सांप्रदायिक व सांस्कृतिक कर्तृत्व त्यांच्या समन्वयवादी व्यक्तिमत्त्वाचेच निदर्शक आहे. प्रपंच व परमार्थ तसेच संतत्व आणि समाजोद्धार यांची यशस्वी सांगड आपल्या जीवनात त्यांनी घातली. जन्मजात स्वभावाबरोबरच तत्कालीन परिस्थितीनेही एकनाथांचे व्यक्तिमत्त्व घडविले.

डीच शतकांच्या ज्ञानेश्वरोत्तर कालखंडात संतसाहित्याची परंपरा खंडित व विस्कळित झाली होती. एकनाथांनी त्या पूर्वपरंपरेचे भान ठेवून वाङ्मयनिर्मिती केली; म्हणूनच ती परंपरा अखंड, एकात्म व प्रगमनशील राखण्याचे कार्य ते यशस्वीपणे करू शकले. ज्ञानेश्वरीच्याच परंपरेतील पण अधिक सुबोध भाष्यग्रंथ म्हणजे त्यांच भागवत होय.भागवतामुळे वामनपंडित, शिवकल्याण, रमावल्लभदास यांसारख्या कवींना भाष्यरचनेती स्थिर बैठक लाभली. त्यांच्या भावार्थ रामायणा-मुळे मुक्तेश्वरासारख्या कवीलारामायण व महाभारत यांच्या रूपांतराची दिशा लाभली. रुक्मिणी स्वयंवराने तर आख्यानक काव्याचा नवा प्रवाहच मराठीत रूढ केला.

बहुजनसमाजाला रूपके समजतात व आवडतात, म्हणून एकनाथांच्या रूपकप्रचुर शैलीचा अवतार झाला. मराठीचा पुरस्कार करतानाही, सर्वसंग्राहक भाषादृष्टीने त्यांनी संस्कृत भाषेचे प्रौढत्व तिला प्राप्त करून दिले आणि आपल्या भारूडरचनेत बोलीभाषेचाही स्वीकार केला. वीररसाचा आविष्कार, अभंगरचनेतील भेदक समाजचित्रण, कीर्तनोपयोगी नाट्यपूर्ण कथाकाव्य यांही बाबतींत संतसाहित्यातील पहिले कर्तृत्व एकनाथांचेच आहे. संतत्वात अभिप्रेत असलेल्या लोकसंग्रहाचे, लोकसेवेच व लोकाद्धाराचे साधन म्हणूनच एकनाथांनी कवित्वाची साधना केली म्हणूनच त्यांच्या काव्यरचनेत आशयाभिव्यक्तीचे वैचित्र्य व वैपुल्य निर्माण झाले.

तेराव्या शतकात ज्ञानेश्वर-नामदेवांनी बहुजनसुलभ भक्तिमार्गाती प्रतिष्ठापना केली. पुढील अडीच शतकांत यावनी सत्तेमुळे भक्तिमार्गाचा प्रभाव क्षीण झाला. एकनाथांनी त्या भागवत पंथाचे प्रभावी पुनरुज्जीवन केले. आपल्या भागवत टीकेने भक्तिपंथाची त्यांनी शास्त्रोक्त प्रतिष्ठापना केली आणि बहुजनवर्गाचा मेळावा त्या पंथाभोवती संघटित केला. बागवत पंथाला अशा प्रकारे शास्त्र आणि समाज यांचे दुहेरी अधिष्ठान त्यांनी प्राप्त करून दिले. जनताजनार्दन हे एक नवे तत्त्व प्रतिपादून भागवत पंथाला त्यांनी अधिक लोकाभिमुख बनविले.

या पंथाला श्रीकृष्णाप्रमाणेच श्रीराम हे दैवत नव्याने परिचित करून दिले व रामचरित्राचा वीरवृत्तिपोषक व कालोचित भावार्थही कथन केला. एकनाथांचा भागवतधर्म व रामराज्याची कल्पना म्हणजे मध्ययुगीन महाराष्ट्रातील प्रेरक विचारधन होय. मराठी भाषा, वाङ्मय, विचार आणि वर्तन या सर्व क्षेत्रांत त्यांनी समाजप्रबोधन व समाज-संघटन केले. त्यातूनच सतराव्या शतकातील स्वराज्याच्या चळवळीला अनुकूल पार्श्वभूमी तयार झाली, असे म्हणता येईल.