Monday, November 22, 2021

प्रकल्प : बी ए भाग ३

प्रकल्प म्हणजे काय ?

बी ए भाग ३ साठी गट प्रकल्प १० गुणांसाठी आहे. विद्यार्थी गटाने अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.

प्रकल्पाची उद्दिष्टे

1. स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.
2. स्वतःमध्ये उपजतच असणा-या निरीक्षण, निवेदन, संकलन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे.
3. तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.
4. कल्पकता, सृजनशीलता, संग्रहवृत्ती, श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडवणे.
5. आत्मविश्वास प्राप्त करणे.
6. या व्यतिरिक्त निवडलेल्या विषयाची खास वैशिष्ट्ये अभ्यासणे, विचार मांडण्याची क्षमता इत्यादी.

प्रकल्पकार्य लेखन कसे कराल ?

प्रकल्पकार्य करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच केलेल्या प्रकल्पकार्याचे सुयोग्य प्रकारे लेखन करणेही महत्त्वाचे आहे, कारण निवेदन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे आणि तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे ही प्रकल्पाची उद्दिष्टे तुमच्या प्रकल्पकार्य लेखनातून मूर्त स्वरूप घेणार आहेत. प्रकल्पकार्य लेखन कसे करावे, याचे मुद्देसूद मार्गदर्शन पुढे दिलेले आहे;

1. प्रकल्पाचे नाव : (विषयासह)  निवडलेल्या अभ्यासक्रमातील विषयाचे नाव प्रथम लिहा. नंतर त्या विषयातील निवड केलेल्या प्रकल्पाचे नाव लिहा.
2. प्रकल्पाचा प्रकार : निवड केलेला प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा उल्लेख करा, सर्वेक्षणात्मक प्रकल्प, संग्रहात्मक प्रकल्प, संकलनात्मक प्रकल्प, रचनात्मक प्रकल्प, तक्त्यांच्या निर्मितीचा प्रकल्प
3. प्रकल्पाची उद्दिष्टे : निवड केलेल्या प्रकल्पाची सुयोग्य उद्दिष्टे लिहा. ती महत्त्वाची असतात. 
4. प्रकल्पाचे साहित्य : विषयासंबंधित पाठ्यपुस्तक, लेखनसाहित्य, उपयुक्त साधने यांचा उल्लेख करा.
5. प्रकल्पाची कार्यपद्धती : प्रकल्प साकारत असताना करण्यात येणा-या कृतींचा उल्लेख क्रमवार पद्धतीने करा.
6. प्रकल्पाचे निवेदन : यामध्ये निवड केलेल्या प्रकल्प करण्यामागचा हेतू अधिक स्पष्ट करून मांडा.
7. प्रकल्पाचे सादरीकरण : संकलित केलेल्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी करा. संकलन करतेवेळी आलेल्या विशेष अनुभवांची नोंद करा. तसेच त्यावेळी मिळालेल्या सहकार्याचा, मदतकार्याचाही उल्लेख करा. घेतलेल्या संदर्भसाहित्याची नोंद करा. सूची करा. 
8. आकृत्या व चित्रांकनासाठी : येथे प्रकल्पाशी संबंधित चित्रे, आकृत्या, नकाशे चिकटवा आणि योग्य प्रकारे सुशोभन करा.
9. प्रकल्पपुर्तीसाठी वेळोवेळी केलेल्या विशेष बाबींची नोंद – यामध्ये निवड केलेल्या प्रकल्पाबाबतीतील वैशिष्ट्यपूर्ण बाबींची नोंद करा.
10. मूल्यमापन : यामध्ये केलेल्या प्रकल्पाची कोणकोणती उद्दिष्टे साध्य झाली? कोणते ज्ञान प्राप्त झाले? प्रकल्पासंबंधीचे स्वतःचे मत किंवा अभिप्राय लिहा. तसेच प्रकल्प पर्ण करताना मिळालेल्या स्वानंदाचा उल्लेख एक-दोन वाक्यांत करा. 

प्रकल्पासाठी यादी

1. माहिती संकलन : थोर संत, थोर समाजसुधारक, थोर राष्ट्रपुरूष, थोर शास्त्रज्ञ, थोर खेळाडू, थोर समाजसेवक, थोर समाजसेविका, साहित्यिक इत्यादी.
2. संग्रह : म्हणीसंग्रह, वाक्प्रचार संग्रह, अभंगसंग्रह, श्लोक संग्रह, सुविचार संग्रह, कवितासंग्रह, भावगीत संग्रह, पोवाडा संग्रह, समरगीत संग्रह, देशभक्तीपर गीत संग्रह, इत्यादी.
3. प्रदर्शन : चित्रकलाकृती प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, पुस्तके प्रदर्शन, विज्ञानप्रकल्प प्रदर्शन, विविध प्रकारच्या गंथांचे प्रदर्शन इत्यादी.
4. तक्ते : शैक्षणिक विषयातील विविध घटकांचे. 
(वरील मजकूर केवळ आराखडा माहितीसाठी आहे.) 

                                                                 🏈🏈🏈

Monday, September 27, 2021

साहित्याचे प्रयोजन : बी ए भाग ३

साहित्याचे प्रयोजन

साहित्याचे प्रयोजन काय, ह्या प्रश्नाची चर्चा प्राचीन काळापासून आजतागायत अनेक लेखक, समीक्षक, वाङ्‌मयमीमांसक यांनी केली आहे. ह्या प्रयोजनांची चर्चा लेखकसापेक्ष व वाचकसापेक्ष म्हणजेच साहित्याचा निर्मितिव्यापार व आस्वादव्यापार अशा दोन्ही अंगांनी वारंवार होत राहिली आहे. प्रसिद्घी, यश, कीर्ती, मानसन्मान, धनप्राप्ती, मतप्रचार, सामाजिक सुधारणा, दुष्ट रुढींचा नाश, हितोपदेश, राष्ट्रभक्ती व देवभक्ती अशी नानाविध प्रयोजने लेखकांनी मनाशी बाळगून प्राचीन काळापासून आजतागायत साहित्यनिर्मिती केली आहे. काही प्रयोजने विशिष्ट काळ, परिस्थिती यांना अनुलक्षून प्रभावी ठरतात. उदा., पारतंत्र्य काळात स्वातंत्र्यप्राप्ती हाच एकमेव वा प्रधानहेतू मनाशी बाळगून अनेक साहित्यिकांनी लेखन केले. मराठीमध्ये शि. म. परांजपे, स्वातंत्र्यवीर सावरकर, साने गुरुजी प्रभृती लेखकांनी आपली लेखणी देशकार्यासाठीच राबवली; पण साहित्यनिर्मितीचा स्थल-काल-परिस्थितिनिरपेक्ष विचार केला, तर उच्च कोटीच्या अलौकिक आनंदाची प्राप्ती हेच साहित्याचे सार्वकालीन, सर्वदूर, सर्वत्र आढळणारे प्रयोजन असल्याचे दिसून येते. असा सर्जनशील आनंद लेखकाला निर्मितीसाठी, तर वाचकाला आस्वादासाठी प्रवृत्त करतो. सर्जनशीलतेच्या पातळीवर उच्च दर्जाची कलात्मक निर्मिती साधणे, हे लेखकाच्या आनंदाचे निधान होय. आत्माविष्कार व आत्मशोध ह्या प्रेरणाही लेखकाला लिखाणासाठी उद्युक्त करतात.

साहित्याचे प्रयोजन हे जसे लेखकाच्या दृष्टीने तसेच वाचकाच्या दृष्टीनेही प्रतिपादिले जाते. वाचक साहित्याचे वाचन कशासाठी करतो, ह्या प्रश्नाचे उत्तर शोधतानाही समीक्षकांनी विविध उपपत्ती, प्रणाली मांडल्या आहेत. चार घटका मनोरंजन, विरंगुळा, दैनंदिन जीवनातील ताणतणावापासून सुटका, स्वप्नरंजन, उद्‌बोधन, जिज्ञासातृप्ती, ज्ञान व माहिती मिळविणे, दैनंदिन समस्यांवर तोडगा शोधणे, अशा अनेकविध कारणांनी वाचक साहित्याकडे वळत असतात व काही प्रमाणात त्यांना साहित्याकडून वरील प्रकारचे समाधान लाभतही असते; तथापि वाचकाच्या ठायी साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी सहृदयता असेल व त्याची वाङ्‌मयीन अभिरुची विकसित, संपन्न व प्रगल्भ झालेली असेल, तरच त्याला दर्जेदार व श्रेष्ठ प्रतीच्या साहित्याच्या आस्वादातून उच्च कोटीचा अलौकिक आनंद मिळू शकतो, लौकिक व्यवहारनिरपेक्ष सौंदर्याची प्रचीती येते. त्याच्या जीवनविषयक जाणिवा समृद्घ होऊन आयुष्याचा नवा अर्थ प्रत्ययास येतो. साहित्यात मानवी जीवनाचे प्रतिबिंब पडत असते. व्यक्तिगत रीत्या प्रत्येकाचे अनुभव तसे मर्यादितच असतात; पण श्रेष्ठ साहित्यिकाने निर्मिलेल्या उच्च दर्जाच्या साहित्यकृतीतून मानवी मनाचे व जीवनाचे विस्तृत, वैविध्यपूर्ण, सर्वांगीण व परिपूर्ण दर्शन घडते. अशा साहित्याच्या परिशीलनातून वाचकाच्या अनुभूतीच्या कक्षा विस्तारत जातात. त्याला कल्पनेच्या पातळीवर अनेकविध प्रकारचे अनुभव घेता येतात. त्याला पूर्वपरिचित असलेल्या अनुभवांच्या साहित्यातील दर्शनातून पुनःप्रत्ययाचा; तर सर्वस्वी अपरिचित असलेल्या अनोख्या, अद्‌भुत, अज्ञात, नावीन्यपूर्ण अशा अनुभवांच्या साहित्यातील दर्शनातून नवप्रत्ययाचा अलौकिक आनंद मिळतो. मानवी जीवनाची अफाट व्याप्ती व खोली तसेच व्यामिश्र, बहुआयामी, नानाविध परिमाणे त्याला साहित्याच्या परिशीलनातून जाणवतात. जीवनातील गुंतागुंतीच्या गहनगूढ समस्यांवर उद्‌बोधक प्रकाश पडतो. मानवतेचे अधिष्ठान असलेल्या नैतिक, सामाजिक, सांस्कृतिक मूल्यांची नव्याने जाणीव होते व त्याची एकूण मानवी जीवनाविषयीची जाण समृद्घ, प्रगल्भ बनते. कोणत्याही सर्जनशील साहित्यातून त्या त्या मानवसमूहाच्या भाषेतील व संस्कृतीतील सूक्ष्मता आणि प्रगल्भता व्यक्त होत असते; मनुष्य आणि भौतिक-आधिभौतिक जग यांच्यातील संबंधांची अभिव्यक्ती होत असते. सर्जनशील साहित्य हा खरेतर एक ज्ञानगर्भ व्यवहार असतो आणि साहित्यसमीक्षा व वेगवेगळे साहित्यसिद्घांत आपापल्या परीने वेगवेगळ्या उपपत्ती व अर्थनिर्णयनप्रणाली मांडून ह्या ज्ञानात्म सर्जनशील व्यवहाराचा उलगडा करण्याचाच प्रयत्न करीत असतात. अशा वेगवेगळ्या भूमिकांतून व दृष्टिकोनांतून जगभरातल्या वाङ्‌मयांचे भाषिक इतिहास लिहिण्याचे प्रयत्नही आजवर वेळोवेळी झालेले आहेत. विशिष्ट भाषेतील समग्र वाङ्‌मयकृतींचा आणि वाङ्‌मयविषयक घडामोडींचा एका विवक्षित दृष्टिकोनातून केलेला पद्घतशीर व परंपराधिष्ठित ऐतिहासिक अभ्यास म्हणजे वाङ्‌मयेतिहास. साहित्याचा हा इतिहास विशिष्ट समाजाच्या वाङ्‌मयीन संचिताचा व त्याचबरोबर सामाजिक-सांस्कृतिक दस्तऐवजाचा ऐतिहासिक आलेख असतो. मानवी संस्कृती समृद्घ करणाऱ्या ललित व वैचारिक साहित्यास लाभलेल्या वैविध्यपूर्ण व व्यापक परिमाणांची कल्पना अशा वाङ्‌मयेतिहासातून व साहित्यसमीक्षेतून येऊ शकते.

Tuesday, September 21, 2021

संत ज्ञानेश्वर : बी ए भाग ३

संत ज्ञानेश्वर : (इ. स. १२७५ ते १२९६)महाराष्ट्रातील एक थोर योगी, तत्त्वज्ञानी आणि संतकवी. महाराष्ट्रातील भागवत तथा वारकरी संप्रदायाचा तत्त्वज्ञ प्रवर्तक. बाप विठ्ठलसुत, ज्ञानाबाई, ज्ञानदेव या नावांनीही त्यांना ओळखले जाते. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथसंप्रदायाची गुरुपरंपरा सांगितली आहे, ती अशी : आदिनाथ > मत्स्येंद्रनाथ > गोरक्षनाथ > गहिनीनाथ > निवृत्तिनाथ > ज्ञानदेव. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व बहुतेक अभंग-गाथा ह्यांत ते स्वतःच्या नावाचा निर्देश ज्ञानदेव असाच करतात; परंतु ⇨ नामदेव, ⇨मुक्ताबाई, ⇨ एकनाथ इ. संतांच्या वाङ्मयात ज्ञानेश्वर असाही उल्लेख अनेकदा येतो.

आपेगाव (तालुका पैठण) हे ज्ञानेश्वरांच्या पूर्वजांचे मूलस्थान. आडनाव कुळकर्णी. हे माध्यंदिन शाखेचे यजुर्वेदी ब्राह्मण. गोत्र पंचप्रवरान्वितवत्स. आज ज्ञात असलेले त्यांचे पहिले पूर्वज त्यांच्या पणज्यांचे पणजे हरिपंत कुळकर्णी हे इ. स. ११३८ च्या सुमारास आपेगावचे कुळकर्णपण पाहत असत. या घराण्यातील ज्ञानेश्वरांचे आजोबा गोविंदपंत यांस त्यांची पत्नी निराई हिच्यापासून पंचावन्नाव्या वर्षी एक पुत्र झाला. त्याचे नावविठ्ठल. हेच विठ्ठलपंत ज्ञानदेवांचे जनक होत. विठ्ठलपंतांनी वेद, काव्य, व्याकरण व विविध शास्त्रे ह्यांचे अध्ययन केले. ऐन तारुण्यातच वैराग्य, भक्ती व ज्ञान उत्पन्न होऊन पुष्करादी तीर्थांची यात्रा करावी, म्हणून मातापित्यांना वंदन करून त्यांनी तीर्थाटन केले आणि इंद्रायणीतीरी असलेल्या आळंदीस आले. तेथे थोर ब्राह्मण सिदोपंत ह्यांची भेट घेऊन त्यांचे चरण त्यांनी वंदिले. सिदोपंतांच्या आश्रमात त्यांनी वास्तव्य केले. नंतर त्यांच्याच रखुमाई या कन्येशी विठ्ठलपंतांचे शास्त्रोक्त रीतीनेलग्न झाले.

विठ्ठल-रखुमाई हे दोघे पतिपत्नी पंढरपूरला सिदोपंतांबरोबर यात्रेसगेले. पुढे आपेगावी येऊन गृहस्थाश्रम स्थिरपणे करावा की तीर्थाटन करीत देह झिजवावा, असा प्रश्न विठ्ठलपंतांच्या मनात घोळत होता. विठ्ठलपंत आपेगावी न परतताच सिदोपंतांचा निरोप घेऊन नामसंकीर्तन करीत तीर्थाटनास गेले आणि बरीच तीर्थे पाहून परत आळंदीस येऊन ते सिदोपंतांस भेटले. सिदोपंतांची आज्ञा घेऊन अखेरीस त्यांच्याबरोबरच आपेगावी येऊन त्यांनी मातापित्यांचे दर्शन घेतले. मातापिता दोघेही फार वृद्ध होती. स्वानंदपूर्ण स्थितीत ती दोघे वैकुंठवासी झाली; परंतु विठ्ठलपंत विरक्तहोते.

सिदोपंत आपेगावी आले आणि विठ्ठल-रखुमाई या दोघांना बरोबर घेऊन आळंदीस आले. अनेक वर्षे झाली तरी विठ्ठलपंतांस अपत्य झाले नाही. त्यांनी पत्नीस सांगितले की, वाराणसीस जाऊन संन्यास घ्यावासा वाटतो. तेव्हा रखुमाईने संततीवाचून संन्यास घेऊ नये, ही गोष्ट पतीसपटवा,असे आपल्या पित्यास सांगितले; मात्र विठ्ठलपंतांचे मन वळले नाही. पत्नी निद्रेत असता त्यांनी गृहत्याग केला, असे ज्ञानेश्वरादींना पैठणस्थब्राह्मणांनी दिलेल्या बोपदेवलिखित शुद्धिपत्रात म्हटले आहे.

विठ्ठलपंत वाराणसीस गेले. तेथील एका प्रसिद्ध संन्यासी महंतांपासून त्यांनी संन्यासदीक्षा घेतली. ह्या संन्यासी महंतांचे नाव नामदेवांनी सांगितलेलेनाही. श्रीपाद म्हणून त्यांचा निर्देश केला आहे. संन्यासी व्यक्तीचा श्रीपादह्या आदरार्थी अभिधानाने निर्देश करावा, असे यतिधर्मसंग्रह ह्या संन्यासाश्रमाच्या धर्मशास्त्राच्या संस्कृत ग्रंथात म्हटले आहे.

ज्ञानेश्वरांनी संन्यासविषयक अभंगगाथेतही संन्यासी व्यक्तीचा श्रीपाद ह्या आदरार्थी सामान्य संज्ञेने निर्देश केला आहे. काही चरित्रकार (उद्धवचिद्धनकृत श्रीज्ञानेश्वरचरित्र) ह्या विठ्ठलपंतांच्या संन्यासी गुरूचा नृसिंहाश्रम असा, तर काही (बोपदेवलिखित शुद्धिपत्र) रामानंद असा, निर्देश करतात.अर्थात हे रामानंद कबीरकालीन प्रसिद्ध रामानंद नव्हते. विठ्ठलपंतांच्या संन्यासग्रहणानंतर त्यांना चैतन्याश्रम हे अभिधान गुरूंनी दिले.

इकडे आळंदीस रखुमाईने जीवित सार्थक व्हावे म्हणून अश्वत्थाची सेवा आरंभिली. तेथे कालांतराने वाराणसी येथील एक संन्यासी आले. योगायोगाने तेच विठ्ठलपंतांचे गुरू होते. रखुमाईने नमस्कार केला. महंतांनी ‘पुत्रवती हो’ असा आशीर्वाद दिला. तिला हसू आले, विनोद वाटला. महंतांनी विचारले, ‘मिस्किलपणे का हसतेस ?’ ती म्हणाली, ‘पतीने संन्यास घेतला आहे; मग आपले बोल खरे कसे होणार?’ महंतांनी सगळी हकीकत विचारून घेतली. रखुमाईने मातापित्यांची महंतांशी भेट करविली. महंतांची अर्घ्यपाद्यपूजा व भोजन झाले.

महंत रामेश्वरच्या यात्रेला निघाले होते. सिदोपंतांनी प्रार्थना केली की, दयावंत होऊन वाराणसीस लगेच परतून जावयांचे मन वळवा. महंतांना वाटले : आपण विठ्ठलपंतांस अवेळी म्हणजे पत्नी तरुण व संतती नाही अशा स्थितीत संन्यास दिला, ह्याचा दोष आपणासही लागतो, आपले पुण्य लयाला जाते. विठ्ठलपंतांनी, आपल्यामागे तसा पाश नाही इ. खोटेच सांगून गुरूंपासून संन्यास घेतला, असे काही चरित्रकारांनी ह्या संदर्भात सांगितले आहे; परंतु नामदेव तसा उल्लेख श्रीज्ञानेश्वरांची आदिमध्ये करीत नाहीत. हा अनुल्लेख गुरूंच्या ह्या उक्तीशी सुसंगत ठरतो. खोटे सांगून संन्यास घेतला असता तर गुरूंकडे दोष गेला नसता म्हणून महंतांनी लगेच वाराणसीस प्रयाण केले व चैतन्याश्रमाला बोलावून घेतले. चैतन्याश्रमाने मान्य केले की, ‘कांतेचा त्याग करून मी आलो आहे.’ महंतांनी आज्ञा केली की, ‘पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकार.’

तेव्हा चैतन्याश्रम स्वदेशी परतले. संन्यासाश्रम टाकून त्यांनी पुनश्च गृहस्थाश्रम पत्करला. त्यामुळे ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकले. अशीबारा वर्षे निघून गेली. चार अपत्ये झाली; ती म्हणजे ⇨ निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर,⇨ सोपानदेव व ⇨ मुक्ताबाई. मुलगे व्रतबंधाला योग्य झाले. द्विजवृंदाच्या अनुज्ञेनुसार विठ्ठलपंत भार्या, पुत्र व गृह यांचा त्याग करूनव द्विजवृंदाला नमस्कार करून देहान्त प्रायश्चित्त घेण्यासाठी निघून गेले.

बहिष्कारामुळे आपली वंशावळी जातिकुळावेगळी झाली असल्या-मुळे प्रायश्चित्त घेणे अवश्य आहे, असा विचार विठ्ठलपंतांनी केला. त्यांनी ब्रह्मसभा भरविली व त्या सभेत ‘ह्या दीनाला अपराधाची क्षमा करा ‘अशी प्रार्थना केली. तेव्हा निवृत्ती ब्रह्मसभेला उद्देशून म्हणाले, ‘आम्हांला मार्ग सांगा ‘. द्विजांनी सांगितले की, ‘पैठणला जा, तिकडून शुद्धिपत्रआणा,ते मान्य होईल. निवृत्ती म्हणाले, ‘आमची परंपरा सगुण व निर्गुण ह्यांच्या पलीकडील आहे. जाती, कुळ, वर्ण किंवा विश्वातील पंच-महाभूते, विराट, महत् ह्यांपैकी आम्ही काही नाही, निजबोधस्वरूप आहोत.’ ह्यावर ज्ञानेश्वर म्हणाले, ‘आपली पावन अवस्था असली, तरी धर्मशास्त्राच्या पद्धतीने आपण चालले पाहिजे.’ ह्यावर सोपान म्हणाले, ‘पांडव, व्यास वाल्मीकी, वसिष्ठ ह्यांचे तरी कुळ किंवा जाती शुद्धकुठे आहे ⇨ तसेच आमची भक्ती हाच आत्मस्थितीचा उपाय होय, जाती किंवा कुळ नव्हे.’

ज्ञानदेवरचित ज्ञानेश्वरीची सांस्कृतिक व राजकीय पार्श्वभूमी फारसंपन्न होती. ज्ञानदेवांच्या कालखंडात महाराष्ट्रातील भौतिक व आध्या-त्मिक संस्कृतीचा उत्कर्ष होत होता. ज्ञानेश्वरी हे त्या उत्कर्षाचेचउत्कृष्ट फलित होय. सातशे वर्षे झाली; तरी धर्म, तत्त्वज्ञान व काव्यह्यांची अनुपम परिणती म्हणजे ज्ञानेश्वरी असे अजून म्हणता येते. तत्पूर्वीसु. शंभर-दीडशे वर्षे मराठी भाषेतील साहित्य विकास पावत होते. हाकाळ महाराष्ट्राच्या इतिहासात फार महत्त्वाचा आहे. स्वतः ज्ञानदेवांनीच श्रीरामचंद्र ह्या यादव राजाचे यदुवंश-विलास,सकळकळानिवास व न्यायाचा पोषक क्षितीश म्हणून वर्णन केले आहे. दोनशे-अडीचशे वर्षांच्या ह्या कालखंडात देवगिरीच्या यादवांचे राज्य विस्तारत व विकास पावत होते.

भास्कराचार्य, हेमाद्री, बोपदेव ह्यांच्यासारखे विद्वान ह्या कालखंडात झाले. ⇨ भास्कराचार्य हे भारताच्या गणित व ज्योतिष विद्येचे शिरोमणीच होते. भास्कराचार्यांच्या वंशातील सात पिढ्या लगोलग चतुरस्र विद्वानांच्या झाल्या. ज्योतिष, वैद्यक, धर्मशास्त्र, न्याय, मीमांसा, वेदान्त व व्याकरण ह्यांचे अध्ययन विदर्भासह महाराष्ट्रातील निरनिराळ्या पाठशाळांमध्ये चालू होते. बोपदेवांनी व्याकरणावर दहा, वैद्यकावर नऊ, साहित्यशास्त्रावर तीन, भागवतावर चार व ज्योतिषावर एक असे २७ प्रबंध लिहिले होते.

बोपदेवांचे भागवतावरील हरिलीला, मुक्ताफळ, परमहंसप्रिया व मुकुट हेचार ग्रंथ विद्वन्मान्य झाले होते. ह्याचा अर्थ असा की, महाराष्ट्रातश्रीमद्भागवताचा महिमा फार होता;नाथसंप्रदायाचाही प्रभाव होता, हे ज्ञानदेवांच्या तीन पिढ्यांवर नाथसिद्धांचा अनुग्रह होता ह्यावरून लक्षात येते. शांकर अद्वैताला महाराष्ट्रात फारच मोठी प्रतिष्ठा लाभली होती, हे ज्ञानेश्वरीवरून लक्षात येते. अजंठा, वेरूळ इत्यादी लेण्यांवरून महाराष्ट्रात ज्ञानदेवांच्या अगोदर सुमारे हजार-बाराशे वर्षे मूर्ती, चित्र व स्थापत्य ह्या कला अनेक अंगांनी विकसित होत होत्या, ह्याचे प्रत्यंतर मिळते. महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे ही हेमाडपंती शैलीची आहेत, असे म्हणतात; म्हणजे असे की, स्थापत्यकलाही फार लोकप्रिय झाली होती. ज्ञानेश्वरी हे त्या भव्य संस्कृतीचे सुंदर व पवित्र प्रतीक व प्रतिबिंबच आहे, असे म्हणावेलागते; इतक्या श्रेष्ठ साहित्यकृतीला श्रेष्ठ सांस्कृतिक पार्श्वभूमीच प्राप्तव्हावी लागते. त्याशिवाय ती निराधार ठरते, तिची सामाजिक उपपत्तीलागू शकत नाही.

बहिणाबाईने एका अभंगात भागवत धर्माचा म्हणजे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेवांनी रचला, असे म्हटले आहे; कारण तोपर्यंत धर्माची मुख्य भाषा किंवा माध्यम संस्कृत भाषाच होती. भगवद्गीतेचा व भागवताचा प्रचार सर्वत्र होता; परंतु हे ग्रंथ संस्कृतमध्ये अडकले होते. लोकभाषेला परमार्थ विचाराचे समर्थ माध्यम प्रथम ज्ञानदेवांनी केले. संस्कृत ही देववाणी होती व धर्मामृत ह्या देववाणीत बंद होते. ह्या अमृताला पैजेने जिंकणारीदेशी भाषा ज्ञानदेवांनी निर्मिली; धर्म, तत्त्वज्ञान व साहित्यकला ह्यांचे सामान्यजनांपर्यंत पोहचवणारे माध्यम निर्माण केले. शांतरस प्रतिपादिला.तो रस श्रेष्ठ ठरविल्यामुळे विवेकबुद्धीला उजाळा मिळाला आणि भक्तिमार्गाला ज्ञानेश्वरांनी शुद्ध केले.

शिवाय भगवान बुद्धांपासून शंकराचार्यांपर्यंत संन्यासाश्रमच श्रेष्ठ असे परमार्थाचे साधन मानले गेलेव ज्ञानदेवांपर्यंत संन्यासच श्रेष्ठ मानला जात होता; परंतु अनासक्तीचा गृहस्थाश्रमच परमार्थाचा श्रेष्ठ मार्ग म्हणून प्रथम ज्ञानदेवांनी दाखवून दिला. संन्यासमार्गाऐवजी गृहस्थाचा भक्तिमार्ग उजळविला. विश्व हे परमेश्वराचे सत्य स्वरूपच होय, त्याचाच उल्हास होय, असे सांगून,सगुण व निर्गुण ह्या दोन्ही एकाच परमसत्याच्या बाजू होत, असे वारंवार प्रतिपादले.ज्ञानदेवांची निश्चित ग्रंथरचना म्हणजे भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अनुभवामृत, चांगदेवपासष्टी व अभंगगाथा ही होय. अभंगगाथेत काहीथोडे अभंग प्रक्षिप्त असावेत, अशी शंका राहते.

लोककथा : जंगलचा राजा (बी ए भाग ३)

जंगलचा राजा !

एकदा एका अस्वलाने झाडामागे लपून सिंहाला जंगलात फिरताना पाहिलं.जंगलचा राजा सिंह जंगलात रुबाबात फिरे. थोडसं चालून मग पुन्हा एकदा मागे वळून बघे.अस्वलाला वाटलं...'आपण ही जंगलचा राजा व्हावं. सिंहासारखं रुबाबात फिरावं.'अस्वलानं ठरवलं... आता आपण रोज सिंहाचा पाठलाग करायचा. तो कसा चालतो? तो कसा बसतो? तो कसा खातो? तो कसा फिरतो? हे नीट पाहायचं. मग आपण ही तसंच करायचं. जंगलचा राजा व्हायचं. तेव्हापासून रोज ते अस्वल, सिंहाच्या पाळतीवर राहिलं. लांबून झाडामागून सिंहाच्या बारीक सारीक गोष्टी पाहू लागलं.

सिंहाचं ऐटित चालणं. झाडाखाली त्याचं डौलदार बसणं. सिंहाची भरदार आयाळ. त्याचं राजा सारखं जंगलात फिरणं.पण, चार-पाच दिवसात अस्वल कंटाळलं. अस्वलाला वाटलं...खरं म्हणजे जंगलचा राजा मीच व्हायला पाहिजे. कारण सिंहापेक्षा मी जाडजूड आहे. सिंहाला तर फक्त मानेवरच आयाळ आहे. माझ्यातर सर्व अंगावर सिंहासारखी आयाळ आहे. आणि मी पण झाडाखाली डौलात बसतोच की! जंगलामधे फिरतोच की!पण...

मला सिंहासारखं चालता येत नाही म्हणून मी जंगलचा राजा होत नाही! मी सरळ चालतना मागे वळून पाहात नाही म्हणून जंगलचा राजा होत नाही!

बस्स!! आता ठरलं तर... आज पासून चालताना मधे-मधे मागे वळून पाहायचं आणि जंगलचा राजा व्हायचं. त्या दिवसापासून ते अस्वल चालताना मागे वळून पाहू लागलं. आपण चालताना मागे वळून पाहातो, हे इतर प्राणी पाहतात की नाही? हे पण पाहू लागलं.

'मी किती जाडजूड आहे पाहा. माझी अंगभर आयाळ पाहा. माझं रुबाबदार चालणं पाहा. आता तरी मला राजा म्हणा..असं भेटेल त्या प्राण्यांना सांगू लागलं.पण...

तरीही जंगलातले छोटे मोठे प्राणी त्याला राजा म्हणेनात. अस्वलाच्या पाठी हेच प्राणी ख्वॅ ख्वॅ, फॅक्वॅक फॅक्वॅक करुन हसायचे. शेपट्या हलवून, तोंडं वाकडी करुन त्याला चिडवायचे.अस्वल वैतागलं. भलतंच चिडलं. चराचरा केस खाजवत, कराकरा दात चावू लागलं.अस्वलाने ठरवलं... 'आजच काय तो फैसला करू.

जंगलातल्या या चुटूक पुटूक प्राण्यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. आपला रुबाब, आपली चाल त्या सिंहालाच दाखवू. सिंहाशीच सरळ सरळ पंगा घेऊ. माझी राजेशाही चाल पाहताच सिंह आपोआपच मान खाली घालून जंगलातून निघून जाईल. मग या जंगलचा मीच राजा होईन!! अस्वल जे घरातून उठलं ते तरातरा सिंहासमोरच गेलं. सिंह झाडाखाली सुस्तावला होता. अस्वल सिंहाच्या सरळ समोर जाऊन ऊभं राहिलं. सिंहाने शेपटी उडवत अंगावरच्या माशा हाकलल्या. मान वाकडी करत डाव्या पायाने आयाळ खाजवली.अस्वल सिंहासमोरच सिंहासारखं चाललं. म्हणजे थोडसं चालून त्याने पुन्हा पुन्हा मागे वळून पाहिलं. चालताना सिंहासारखं ऐटित चालण्याचा प्रयत्न केला.आता...

'हा कोण नवीन रुबाबदार राजा?' असं म्हणत सिंह चवताळून उठेल. किंवा... आपली ऐटबाज चाल पाहून सिंह हे जंगल सोडून पळूनच जाईल, असं अस्वलाला वाटलं होतं.पण....

सिंहाने अस्वलाकडे पाहिलं ही नाही! त्याला काही किंमतच दिली नाही. सिंह आपल्याच मस्तीत होता. सिंह आरामात शेपटी उडवत माशा हाकलवत होता. आता मात्र अस्वल भलतं म्हणजे भलतंच चिडलं. त्याच्या अंगावरचे केस ताठ झाले. त्याने उजव्या हाताची नखं झाडावर कराकरा घासली. अस्वलाने ठरवलं... आता आपण सिंहापेक्षा वरचढ व्हायचंच. राजा सिंह सरळ चालताना मधे मधे मागे वळून पाहातो. ठीक आहे. पण आपण आता.. मागे मागे बघतच सरळ चालायचं. आणि जंगलचा राजा व्हायचं. अस्वल मागे मागे पाहात पुढे चालू लागलं. राजा होईन म्हणता म्हणता सरळ खड्यात पडलं!

Monday, September 20, 2021

इतर वाचन : बी ए भाग ३

जादा वाचनासाठी... 
जीवनासाठी शिक्षण कसे निर्माण करावे  ? 
अभय बंग यांचा साधनातील लेख वाचा... 
Click here 👇

Wednesday, September 1, 2021

लोककथा : गजेंद्रमोक्ष (बी ए भाग ३)

अंबरीश आणि अजामिळ ही दोन वयानं मोठी माणसं आणि उपमन्यू व ध्रुव ही लहान मुलं; यांचा देवानं कसा सांभाळ केला हे समर्थानी सांगितलंआहेच. आता कथा आहे ती हत्तींचा राजा गजेंद्राची! या पाच उदाहरणांमध्ये हा एकच पशू आहे. गजराज गजेंद्र हा आधीच्या जन्मात पांडय़ देशाचा राजा इंद्रद्युम्न म्हणून विख्यात होता. तो मोठा विरक्त विष्णुभक्त होता. परमात्मप्राप्ती हेच त्याच्या जीवनाचं मूळ ध्येय होतं आणि ते साध्य करण्यासाठी तो मलय पर्वतावर सदोदित तपाचरणात निमग्न असे. असाच एकदा तो साधनामग्न असतानाच अगस्त्य मुनी तिथे आले. मूळ कथा सांगते की, आपला योग्य आदरसत्कार न करता राजा साधनारत असल्याचं पाहून मुनी संतप्त झाले आणि त्यांनी राजाला शाप दिला की, ‘‘तू गजबुद्धीनुसार मंद वर्तन केलं आहेस, तर तू पुढच्या जन्मी हत्ती म्हणूनच जन्म घेशील!’’  ‘गजेंद्रमोक्ष स्तोत्रा’त एक विराट रूपक उलगडते, आणि त्या शापाच्या जागी वरच दिसू लागतो. असं वाटलं की, राजा ज्या परम विशेष ध्येयानं जगत आहे ते परमात्म प्राप्तीचं ध्येय त्याला लवकरात लवकर कसं साधेल, ही चिंता मुनिवरांनाही लागली. यापुढील राजाचे जन्मही त्यांनी जाणले आणि मग असा जन्म मिळावा ज्यात हे ध्येय तात्काळ साध्य व्हावं, या विचारानेच हत्तीचा जन्म लाभला. त्या जन्मातही राजा हा हत्तींचा राजा गजेंद्र म्हणूनच जन्मला. एकदा तो अनेक हत्तिणींसह वनात फिरत असताना तहानेनं व्याकूळ होऊन कमलपुष्पांनी युक्त अशा सरोवराकडे निघाला. त्या सरोवरात जलपान केल्यानंतर त्यानं जलक्रीडा सुरू केली. जलक्रीडेत हत्तिणींसह दंग असलेल्या गजेंद्राचा एक पाय एका नक्रानं (मगरीनं) पकडला. हा नक्रदेखील गेल्या जन्मीचा हुहू हा गंधर्व होता आणि देवल ऋषींच्या शापामुळे या मगरयोनीत जन्मला होता. गजेंद्रासमोर आकार आणि शक्तीच्या दृष्टीने हा नक्र अत्यंत तुच्छ भासत होता. त्यामुळे गजेंद्राने जोराचा हिसडा देऊन त्याला दूर फेकण्याचा प्रयत्न केला, पण नक्राची पकड अधिकच घट्ट झाली. गजेंद्राने आटोकाट प्रयत्न करूनही काही उपयोग होईना आणि मग हत्तिणींनीही बळ लावून काही होईना तेव्हा गजेंद्राचे अनेक आप्त-मित्र गोळा झाले. तेही ताकदीने मोठे होतेच. त्या सर्वानी सर्व ताकद पणाला लावून गजेंद्राला सरोवराबाहेर खेचण्याचा प्रयत्न चालविला. पण जसे ते हत्ती गजेंद्राला बाहेर खेचत त्याच वेगाने तो नक्र गजेंद्राला सरोवरात ओढत असे. हा खेचाखेचीचा क्रम हजारो र्वष सुरू होता, असं पुराण सांगतं! थकून सर्व आप्तमित्रांनी प्रयत्न सोडून दिल्यावर अखेर आपण बुडून मरणार ही जाणीव गजेंद्राला झाली. जसजसा तो पाण्यात बुडू लागला तसतसं त्याला जन्म व्यर्थ गेल्याचं जाणवलं. एक कमलपुष्प सोंडेत घेऊन त्याने आकाशाकडे उंचावत भगवंताची विनवणी सुरू केली. ही शरणागत प्रार्थना म्हणजे गेल्या जन्मीच्या भावसंस्कारांतून प्रकट झालेलं स्तोत्रच आहे. ‘गजेंद्रमोक्ष स्तोत्र’ म्हणून ते विख्यात आहे. तर विनवणीमागचा भाव हा होता की, ‘‘हे भगवन, मी जन्मभर तर तुझी भक्ती केली नाही, पण अखेरच्या क्षणी का होईना, मी एक कमलपुष्प तुला अर्पण करू इच्छितो त्याचा स्वीकार कर!’ गजेंद्राने कमलपुष्प सोंडेत धरलं होतं आणि वेगाने तो पाण्यात बुडू लागला होता. आता सोंडेचा अगदी थोडा भाग पाण्यावर असतानाच गरुडावर बसलेल्या भगवान विष्णूंनी धाव घेतली. त्यांनी प्रथम सुदर्शनचक्र सोडून त्या नक्राचा शिरच्छेद केला आणि गजेंद्राची त्या सरोवरातून सुटका केली. शापमुक्त झाल्याने तो नक्र गंधर्व रूपात प्रकटला आणि गजेंद्रही विष्णुभक्ताच्या रूपात प्रकटला.

Sunday, August 29, 2021

समर्थ रामदास : बी ए भाग ३

समर्थ रामदास
(१६०८– २ फेब्रुवारी १६८२). ज्ञानी, भक्तिमान आणि कर्मयोगी संतकवी. मूळचे नाव नारायण; उपनाव ठोसर. ‘रामदास’ हे त्यांनी पुढे स्वतःसाठी घेतलेले नाव. एक थोर सिद्धपुरुष म्हणून लोक त्यांना आदरपूर्वक ‘समर्थ रामदास’ असे आजही म्हणतात.

रामदासांचा जन्म मराठवाड्यातील जांब ह्या लहानशा गावचा. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत, आईचे राणूबाई. राम आणि सूर्य ह्यांची उपासना त्यांच्या घरात होती.सूर्याजीपंत अनेक मुमुक्षूंना ‘अनुग्रह’ देत. रामदासांचे वडील बंधू गंगाधर ‘श्रेष्ठ’ आणि ‘रामी रामदास’ ह्या नावांनीही ओळखले जातात. रामदास आठ वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले आणि गंगाधर हे वडिलांचा संप्रदाय चालवू लागले.

वडिलांकडून आणि पुढे वडील बंधूंकडून आपल्याला मंत्रोपदेश मिळावा, म्हणून रामदासांनी प्रयत्न केला होता; परंतु दोन्ही वेळी तो निष्फळ ठरला. रामदासांच्या एका अभंगावरून असे दिसते, की प्रत्यक्ष रामचंद्रांनीच स्वप्नात येऊन ‘श्रीराम जयराम जयजयराम’ हा त्रयोदशाक्षरी मंत्र त्यांना दिला.

आई आणि वडील बंधू ह्यांनी रामदासांचे लग्न, त्यांची इच्छा नसतानाही ठरविले; पण मंगलाष्टकांमधले ‘सावधान’ हे शब्द ऐकताच भर लग्नमंडपातून ते पळून गेले, असे म्हटले जाते. त्यानंतर तपश्चर्येसाठी ते नासिकला गेले आणि नासिकजवळील टाकळी ह्या गावी असलेली एक गुहा त्यांनी त्यासाठी निवडली. राममंत्राचा तेरा कोटी जप, वेदशास्त्रे, वेदान्त, काव्ये, पुराणे ह्यांचा अभ्यास; गायत्री-पुरश्चरणे; संगीतसाधना त्यांनी येथेच केली. त्यानंतर ते भारत भ्रमणास निघाले (१६३२). काशी, प्रयाग, गया, अयोध्या, श्रीनगर; हिमालयातील बद्रिनारायण आणि केदारनाथ अशी अनेक ठिकाणे त्यांनी पाहिली. अयोध्येत त्यांचे वास्तव्य सर्वाधिक म्हणजे अकरा महिने होते. पंजाबात जाऊन तेथील शीख धर्मगुरूंना ते भेटले. मानसरोवराची प्रदक्षिणा केली. पुरीच्या जगन्नाथाचे दर्शन घेतले.

दक्षिणेतीलही अनेक तीर्थांना त्यांनी भेटी दिल्या. महाराष्ट्रातही ते हिंडले. ह्या प्रवासात समर्थांनी अनेक साधुमहात्म्यांच्या भेटी घेतल्या. राम, हनुमान ह्यांची मंदिरे उभी केली. मठ स्थापन केले. समर्थांच्या आयुष्यातील ह्या यात्रापर्वात त्यांना भारताच्या लोकस्थितीचे दर्शन घडले. ते झाल्यानंतर समाजातील देवधर्माचे अराजक मोडावे, खऱ्या परमार्थाची स्थापना करावी आणि ऐहिक पुरूषार्थ साधणारी समाजव्यवस्था घडवावी, ही त्यांची साध्ये ठरली. ती सिद्ध करण्यासाठी ते कृष्णातीरी आले (१६४४). हे त्यांच्या आयुष्यातले अखेरचे पर्व.

ह्या पर्वात ते राजकारण म्हणजेच धर्मसंस्थापनेचे कार्य अखेरपर्यंत करीत राहिले. समर्थांना अभिप्रेत असलेला राजा हा परमार्थसंस्थापक आणि सज्जनांचा रक्षक असा होता. अशा राजाचे राज्य हे त्यांच्या दृष्टीने रामराज्य होते. अशा रामराज्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी निर्माण करणे, म्हणजेच समर्थ करू पाहत असलेली धर्म-संस्थापना होती. समर्थांनी वापरलेल्या ‘राजकारण’ ह्या शब्दाचा अर्थ ह्या संदर्भात समजून घेणे आवश्यक आहे.

राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होत. शिवाजी महाराजांच्या राजकीय उलाढालींत रामदासांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता, हे जरी खरे मानले, तरी शिवाजी महाराजांनी हाती घेतलेल्या स्वराज्यस्थापनेच्या कार्याला अनुकूल अशी मनोवृत्ती रामदासांनी लोकांत निर्माण केली, हे दिसून येते.

इस्लामी राजवटीत, भयापोटी लोकांनी डोहांत वा नद्यांत बुडविलेल्या अनेक देवतामूर्ती बाहेर काढून रामदासांनी त्याची पुन्हा प्रतिष्ठापना केली. धर्मप्रचारासाठी देवळे बांधली. देवांचे सार्वजनिक उत्सव सुरू केले. सामाजिक जीवनाची नैतिक परिशुद्धी करणे हे रामदासांच्या राजकारणाचे मर्म होय.

परमार्थाचा अधिकार पुरूषांप्रमाणेच स्त्रियांनाही आहे, असे रामदास मानीत. अक्काबाई आणि वेणूबाई ह्या त्यांच्या अनुयायी स्त्रिया प्रसिद्ध आहेत; त्यांच्याखेरीज अन्य अनेक स्त्रियांनी रामदासांचे अनुयायीत्व स्वीकारले होते. त्यांत काही मुसलमान फकीरही होते. उच्च पातळीवरील धर्मविचारंत हिंदू, मुसलमान असा भेद त्यांनी केला नाही.

समर्थांच्या पट्टशिष्याचे नाव कल्याण (मूळ नाव अंबाजी). तो त्यांचा मुख्य लेखनिक होता. दिनकर स्वामी, गिरिधर इ. त्यांचे अन्य शिष्यही प्रसिद्ध आहेत. समर्थांनी चाफळ येथे श्रीरामाची स्थापना केली. ह्या देवस्थानास हिंदू सरदारांची, तसेच विजापूरच्या इस्लामी राज्याचीही इनामे मिळाली. शिवाजी महाराजांनीही वर्षाला दोनशे होन इनाम दिले.अनेक गावेही इनाम म्हणून दिली.

शिवाजी महाराजांनी समर्थांचा उपदेश घेतला होता. तथापि महाराजांच्या स्वराज्यसंस्थापनेच्या कामात समर्थांचा प्रत्यक्ष संबंध होता, असे दाखविणारा आधार मिळत नाही.शिवराय-समर्थ भेट ही प्रथम स्वराज्यस्थापनेच्या अवघी दोनच वर्षे आधी (१६७२) झाली, असे काहींचे म्हणणे आहे. पण ज्या पत्रावरून ही पहिली भेट असे म्हणतात, ती पहिली भेट म्हणजे (राजे यांची पहिलीच भेट आहे. वाडीचे लोकास खटपटेस आणावे......... इ. मजकूर ह्या पत्रात आहे) त्या गावाची पहिली भेट असाही अर्थ निघू शकतो.

शिवाजी महाराजांच्या निधनानंतर (१६८०) दोन वर्षांनी समर्थांचे सज्जनगडावर निधन झाले.मर्थांच्या ग्रंथकर्तृत्वात दासबोध आणि रामायण (दोन कांडे) ह्यांचा प्रथम उल्लेख केला पाहिजे. दासबोध हा सर्मथांचा आणि रामदासी संप्रदायाचाही प्रमुख ग्रंथ. ७,७५१ ओव्यांच्या आणि दोनशे समासांच्या आजच्या दासबोधापूर्वी समर्थांनी एकवीस समासांचा एक दासबोधही रचलेला होता. मानवी सद्‍गुणांची वाढ व्हावी, लोक कर्तृत्वसंपन्न आणि परमार्थप्रवण व्हावेत, ही तळमळ दासबोधात दिसते.

रामदासी रामायणाची ‘सुंदर’ आणि ‘युद्ध’ अशी दोनच कांडे आहेत. समग्र रामायण रामदासांनी लिहिले नाही. सुंदरकांडाची श्लोकसंख्या १०१ असून युद्धकांडातील एकूण श्लोक १,३६२ इतके आहेत. ‘निमित्य मात्र ते सीता विबुधपक्षपुरता’  असे रामायणाचे सार रामदासांनी सांगितले आहे.

स्फुट कविता, प्रासंगिक कविता, आत्मारामसारखी वेदान्त प्रकरणे, अभंग, श्लोक, भूपाळ्या इ. अन्य बरीच रचना समर्थांची आहे. करुणाष्टक, मनाचे श्लोक, ‘सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची....’ ही महाराष्ट्र घरोघरी म्हटली जाणारी श्रीगणेशाची आरती ह्या रचना तर विख्यात आहेत. रामदासांनी ‘समर्थ’ होण्यापूर्वी तपश्चर्या केली,बहुश्रुतपणा मिळविला, कवित्व प्राप्त करून घेतले. ह्या साधनेत निराशेचे क्षणही अनेकदा आले. अशा प्रासंगिक निराशेचे व उद्वेगाचे प्रतिबिंब त्यांच्या करुणाष्टकात पडलेले आढळते. मनाच्या श्लोकांचा उर्दू अनुवाद शहा तुराव चिश्ती ह्या इस्लाम धर्मीयाने सु. अडीचशे वर्षांपूर्वी केला आहे. रामदासांनी संगीताभ्यास केला होता. केदार, बागेश्री, आसावरी, काफी अशा विविध रागांमध्ये त्यांनी बांधलेली पदे, त्यांच्या काही पदांतून आढळणारे तबल्याचे किंवा नृत्याचे बोल ह्यांतून हे लक्षात येते.

रामदासांच्या लेखनातून विखुरलेले साहित्यविषयक विचार शोधून रामदासांचे साहित्यशास्त्र (१९७३) ह्या नावाचा ग्रंथ भा. श्री. परांजपे ह्यांनी लिहिला आहे.

इंग्रजी अंमलापूर्वीच्या काळात रामदासांची बरीच चरित्रे लिहिली गेली, पण ती पौराणिक पद्धतीची आहेत. समर्थशिष्य गिरिधरस्वामी, हनुमंतस्वामी, महिपतिबुवा,दिनकरस्वामी, मेरुस्वामी, उद्धवसुत आदींनी लिहिलेल्या चरित्रांचा उल्लेख करता येईल.

संत एकनाथ : बी ए भाग ३

महाराष्ट्राचे खरे नाथ : संत एकनाथ

(१५३३-१५९९). महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ संतकवी. जन्म पैठण येथे. संत भानुदासांचे पणतू. वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे रुक्मिणी. त्यांचे वडील मोठे पंडित असावेत, असे एक मत आहे. बालपणीच आईवडील निवर्तल्यामुळे एकनाथांचे संगोपन त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केले. वयाच्या बाराव्या वर्षी एकनाथांनी देवगिरी येथील जनार्दनस्वामींकडे जाऊन त्यांचे शिष्यत्व पतकरले. तेथे सहा वर्षे राहून संस्कृत शास्त्रपुराणांचे व ज्ञानेश्वरी सारख्या अध्यात्मग्रंथांचे अध्ययन त्यांनी केले. गुरुकृपेने परमेश्वरी साक्षात्कार झाल्यावर एकूण सात वर्षे त्यांची तीर्थयात्रेत घालविली. या तीर्थयात्रेत प्रथम काही दिवस जनार्दनस्वामी त्यांच्याबरोबर होते.

तीर्थयात्रेनंतर त्यांनी गृहस्थाश्रभ स्वीकारला. गिरिजा हे त्यांच्या पत्नीचे नाव. एकनाथांना हरिपंडित नावाचा एक मुलगा आणि गोदागंगा या नावाच्या दोन मुली होत्या. कर्नाटकातील डंबळ येथील बाळकृष्णवंत चंद्रकेत ह्यांना दुसरी मुलगी दिली होती. प्रसिद्ध मराठी पंडित कवी मुक्तेश्वर हा गोदेचा मुलगा. कवी शिवराम पूर्णानंद हा नाथांचा मुलीकडून पणतू. हरिपंडित हा कर्मठ व सनातनी असल्याने काही काळ एकनाथांचा विरोधक होता. आळंदीस जाऊन नाथांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला (१५८३) आणि त्यानंतर ज्ञानेश्वरीची संहिता शुद्ध केली (१५८४).

पैठण येथेच फाल्गुन वद्य षष्ठीस त्यांनी देह ठेवला. अस्पृश्याच्या चुकलेल्या मुलास कडेवर घेऊन महारवाड्यात पोहोचवणे, श्राद्धाला ब्राह्मण येईनात तेव्हा शिजवलेले अन्न अस्पृश्यांना खाऊ घालणे व गाढवाला गंगोदक पाजणे यासारख्या एकनाथांच्या चरित्रातील आख्यायिकावरून अद्वैत वेदान्ताचा व्यापक अर्थ त्यांच्या अंगी प्रत्यक्ष बाणलेला होताहे दिसून येते. एकनाथ विठा रेणुकानंदन, जनी जनार्दन रामा जमार्दन आणि दासोपंत ह्या पाच समकालीन सत्पुरुषांना नाथपंचक म्हटले जाते. यांपैकी दासोपंतांची बरीच आणि जनी जनार्दनांची काही मराठी रचना उपलब्ध आहे.

चतुःश्लोकी भागवत (सु. १५५५) ही नाथांची पहिली रचना. भागवत पुराणाच्या द्वितीय स्कंधाच्या नवव्या अध्यायातील ३२ ते ३५ श्लोकांवरील १०३६ ओव्यांचे हे भाष्य आहे. सृष्टीच्या आद्यंती असलेल्या नारायणाचे व भागवत धर्माचे निरूपण त्यात आढळते. प्राकृत भाष्याग्रंथांना पंडितवर्गाकडून होणार्‍या विरोधाचे पडसाद येथे उमटले आहेत.

वरील भाष्यानंतर एकनाथांनी काही आध्यात्मिक स्वरूपाची स्फुट प्रकरणे लिहिली. शंकराचार्याच्या हस्तामलक या चौदा श्लोकांच्या स्तोत्रावर ६७४ ओव्यांची रसाळ टीका त्याच नावाने त्यांनी लिहिली. शुकाष्टक हे प्रसिद्ध संस्कृत अष्टकावरील ४४७ ओव्यांचे विवरण आहे. स्वात्मसुखात ५१० ओव्या असून गुरुस्तवन, अद्वैतभक्ती व भक्तिमार्गातील परमार्थ हे विषय त्यात आले आहेत. आनंदलहरीतील १५o ओव्यांत आत्मस्थितीतील आनंदाचे व गुरुभक्तांचे वर्णन आहे. चिरंजीवपदात साधकाला उपदेश केलेला आहे.

रुक्मिणी स्वयंवर (१५७१) हे भागवत संप्रदायातील पहिले व परंपराप्रवर्तक आख्यानक काव्य होय. भागवताच्या दशम स्कंधातील अध्याय ५२ ते ५४ मधील १४४ श्लोकांच्या व हरिवंशातील विष्णुपर्वाच्या अध्याय ५९-६o च्या आधारे एकनाथांनी त्याची रचनी केली. त्याची ओवीसंख्या १,७१२ आहे. श्रीकृष्ण-रुक्मिणीचा विवाह म्हणजे जिवाशिवांचे मीलन, अशा रूपकाभोवती हे संपूर्ण काव्य रचलेले आहे. या काव्याचा प्रभाव पुढील अनेक कवींवर पडलेला दिसतो. कृष्णदयार्णव ह्या कवीने तर आपल्या हरिवरदा या रचनेत प्रस्तुत काव्य संपूर्णपणे अंतर्भूत केले.एकनाथी भागवत ही एकनाथांची सर्वश्रेष्ठ रचना होय. भागवत पुराणाच्या एकादश स्कंधावरील ही विस्तृत टीका आहे.

भावार्थ रामायण ही त्यांची अखेरची रचना. अध्यात्म रामायण, क्रौंच रामायण, आनंद रामायण, योगवासिष्ठ इ. ग्रंथांच्या आधारे ही रचना केलेली आहे. 'बाल', 'अयोध्या', 'अरण्य', 'किष्किंधा', 'सुंदर' ही पहिली पाच कांडे आणि सहाव्या युद्ध कांडाचे ४४ अध्याय लिहून झाल्यानंतर नाथांनी देह ठेविला. त्यापुढील भाग गावबा नावाच्या त्यांच्या शिष्याने पूर्ण केला, असे परंपरा सांगते. याशिवाय मुक्तेश्वर, कोनेरीसुतशेष व एक अनाम कनी यांनी 'एका-जनार्दन' या नानानेच 'उत्तर'कांड लिहून भावार्थ रामायणाच्या पूर्तीचे प्रयत्न केले आहेत. भावार्थ रामायणाचे स्वरूप रामचरित्रावरील स्वतंत्र पौराणिक महाकाव्यासारखे आहे. एकनाथांच्या आवडत्य आध्यात्मिक रूपकांबरोबरच या काव्यात सामाजिक रूपकात्मताही आढळते. तत्कालीन यावनी सत्तेचा मराठी समाजावर झालेला अंतर्बाह्य अनिष्ट परिणाम त्यातून सूचित केला आहे.

या रचनांखेरीज बहुजनसमाजासाठी एकनाथांनी केलेली कथात्मक रचनाही वेधक आहे. सुबोध शैलीने लिहिलेल्या तुळशीमाहात्म्य व सीतामंदोदरीची एकात्मता या पुराणकथा, सांसारिकांच्या मनोवृत्तीचा आल्हादक व विनोदरम्य आविष्कार करणार्‍या हळदुली व कृष्णदान ह्या श्रीकृष्णकथा, कृपण माणसाचे हास्यजनक स्वभावचित्र रेखाटणारे कदर्यु-आख्यान, ध्रुव, प्रल्हाद, उपमन्यू आणि सुदामा यांच्या नाट्यपूर्ण लघुचरित्रकथा आणि जानेश्वरादी संतांच्या संक्षिप्त जीवनकथा ही अशा रचनेची उदाहरणे होत.

कनाथांनी गेय पदरचनाही केली आहे. ही पदे मुख्यतः श्रीकृष्ण-चरित्रपर आहेत. त्यांत सुंदर शब्दचित्रे, भावपूर्णता, कल्पकता, ध्रुव-पदांची वेधकता, मार्मिक तत्त्वसूचकता इ. वैशिष्ट्ये आढळतात. 'वारियाने कुंडल हाले', 'असा कसा देवाचा देव बाई ठकडा' इ. त्यांची पदे प्रसिद्ध आहेत.

प्राचीन मराठीतील भारूडरचनेत नवचैतन्य, विविधता व विपुलता निर्माण करण्याचे कार्य एकनाथांनीच केले. १२५ विषयांवर सु. तीनशे भारुड त्यांनी रचली. पुरातन काळापासून मराठी बहुजन-वर्गाचे आपल्या मनोरंजक व नाट्यपूर्ण गीतरचनेने रंजन करणार्‍या गोंधळी, भराडी, वासुदेव, डोंबारी, बाळसंतोष वगैरे जमातींचा एक वर्ग होता. एकनाथांनी त्यांच्या अलिखित लोककाव्याचे पुनरुज्‍जीवन केले. त्यांच्या कवित्वाची व्यापकता व लौकिकता यावरून स्पष्ट होते. आदिमाया, विंचू, जागल्या, कुडबुड्या जोशी या विषयांवरील त्यांची भारुडे प्रसिद्ध आहेत.

कनाथांची बरीचशी रचना साडेचार चरणी ओवी छंदात आहे. त्यांनी स्फुट अभंगरचनाही केली आहे. गुरुभक्ती, पारमार्थिक अनुभव व सामाजिक स्थिती हे त्यांच्या अभंगांचे मुख्य विषय आहेत. त्यांत नामदेव-तुकारामांसारखा साधकदशेतील भावोत्कट अंतःकलह आढळतात नाही. रचनादृष्टीनेही एकनाथी अभंग सैल आहेत.

कनाथांचे वाङ्मयीन, सांप्रदायिक व सांस्कृतिक कर्तृत्व त्यांच्या समन्वयवादी व्यक्तिमत्त्वाचेच निदर्शक आहे. प्रपंच व परमार्थ तसेच संतत्व आणि समाजोद्धार यांची यशस्वी सांगड आपल्या जीवनात त्यांनी घातली. जन्मजात स्वभावाबरोबरच तत्कालीन परिस्थितीनेही एकनाथांचे व्यक्तिमत्त्व घडविले.

डीच शतकांच्या ज्ञानेश्वरोत्तर कालखंडात संतसाहित्याची परंपरा खंडित व विस्कळित झाली होती. एकनाथांनी त्या पूर्वपरंपरेचे भान ठेवून वाङ्मयनिर्मिती केली; म्हणूनच ती परंपरा अखंड, एकात्म व प्रगमनशील राखण्याचे कार्य ते यशस्वीपणे करू शकले. ज्ञानेश्वरीच्याच परंपरेतील पण अधिक सुबोध भाष्यग्रंथ म्हणजे त्यांच भागवत होय.भागवतामुळे वामनपंडित, शिवकल्याण, रमावल्लभदास यांसारख्या कवींना भाष्यरचनेती स्थिर बैठक लाभली. त्यांच्या भावार्थ रामायणा-मुळे मुक्तेश्वरासारख्या कवीलारामायण व महाभारत यांच्या रूपांतराची दिशा लाभली. रुक्मिणी स्वयंवराने तर आख्यानक काव्याचा नवा प्रवाहच मराठीत रूढ केला.

बहुजनसमाजाला रूपके समजतात व आवडतात, म्हणून एकनाथांच्या रूपकप्रचुर शैलीचा अवतार झाला. मराठीचा पुरस्कार करतानाही, सर्वसंग्राहक भाषादृष्टीने त्यांनी संस्कृत भाषेचे प्रौढत्व तिला प्राप्त करून दिले आणि आपल्या भारूडरचनेत बोलीभाषेचाही स्वीकार केला. वीररसाचा आविष्कार, अभंगरचनेतील भेदक समाजचित्रण, कीर्तनोपयोगी नाट्यपूर्ण कथाकाव्य यांही बाबतींत संतसाहित्यातील पहिले कर्तृत्व एकनाथांचेच आहे. संतत्वात अभिप्रेत असलेल्या लोकसंग्रहाचे, लोकसेवेच व लोकाद्धाराचे साधन म्हणूनच एकनाथांनी कवित्वाची साधना केली म्हणूनच त्यांच्या काव्यरचनेत आशयाभिव्यक्तीचे वैचित्र्य व वैपुल्य निर्माण झाले.

तेराव्या शतकात ज्ञानेश्वर-नामदेवांनी बहुजनसुलभ भक्तिमार्गाती प्रतिष्ठापना केली. पुढील अडीच शतकांत यावनी सत्तेमुळे भक्तिमार्गाचा प्रभाव क्षीण झाला. एकनाथांनी त्या भागवत पंथाचे प्रभावी पुनरुज्जीवन केले. आपल्या भागवत टीकेने भक्तिपंथाची त्यांनी शास्त्रोक्त प्रतिष्ठापना केली आणि बहुजनवर्गाचा मेळावा त्या पंथाभोवती संघटित केला. बागवत पंथाला अशा प्रकारे शास्त्र आणि समाज यांचे दुहेरी अधिष्ठान त्यांनी प्राप्त करून दिले. जनताजनार्दन हे एक नवे तत्त्व प्रतिपादून भागवत पंथाला त्यांनी अधिक लोकाभिमुख बनविले.

या पंथाला श्रीकृष्णाप्रमाणेच श्रीराम हे दैवत नव्याने परिचित करून दिले व रामचरित्राचा वीरवृत्तिपोषक व कालोचित भावार्थही कथन केला. एकनाथांचा भागवतधर्म व रामराज्याची कल्पना म्हणजे मध्ययुगीन महाराष्ट्रातील प्रेरक विचारधन होय. मराठी भाषा, वाङ्मय, विचार आणि वर्तन या सर्व क्षेत्रांत त्यांनी समाजप्रबोधन व समाज-संघटन केले. त्यातूनच सतराव्या शतकातील स्वराज्याच्या चळवळीला अनुकूल पार्श्वभूमी तयार झाली, असे म्हणता येईल.

Tuesday, May 18, 2021

मराठी व्यंजन : बी ए भाग ३

 व्यंजन : मराठीत एकूण ४१ व्यंजने आहेत. ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात. या ४१ व्यंजनांपैकी ३४ व्यंजनाचे पाच प्रकारात विभाजन केले जाते. स्पर्श व्यंजनण (ही २५ आहेत). < br/> अर्धस्वर व्यंजन (ही चार आहेत.)< br/> उष्मा, घर्षक व्यंजने (ही तीन आहेत.)< br/> महाप्राण व्यंजन (हे एक आहे.< br/> स्वतंत्र व्यंजन (हे एक आहे.)

1. स्पर्श व्यंजने (एकीण २५) :

वर्णमालिकेतील क ते य पर्यंतच्या वर्णाचा उच्चार होत असतांना तोंडातील जीभ, कंठ, टालू, मुर्धा, दात व ओठ इत्यादी अवयवांशी स्पर्श होतो यामुळे या वर्णांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात.

उदा . क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, द, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म

स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.

कठोर वर्ण

मृदु वर्ण

अनुनासिक वर्ण

१. कठोर वर्ण – ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात. उदा. क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ

२. मृदु वर्ण – ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात. उदा. ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब ,भ

३. अनुनासिक वर्ण – ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात. उदा. ङ, ञ, ण, न, म

ज्याच्या पूर्ण उच्चारासाठी स्वराची मदत घ्यावी लागते अशा भाषिक वर्णाला व्यंजन म्हणतात. व्यंजनांचा उच्चार करण्यासाठी तोंडातील काही अवयवांमार्फत हवा अडवली जाते. उदा० जिभेचा टाळूवर स्पर्श होऊन मूर्धन्य व्यंजनांचा उच्चार होतो.

विभाजनसंपादन करा

मराठी व्यंजनांचे पाच प्रकारात विभाजन केले आहे. हे प्रकार पुढीलप्रमाणे-

  • कण्ठ्य - पडजीभ व जिभेची मागची बाजू यांच्या संयोगातून निर्माण होणारे जिह्वामूलीय वर्ण- जसे अ, आ, क्, ख्, ग्, घ्, ङ्, ह्‌ आणि विसर्ग. जिव्हामूलीय (दुःखमधील विसर्गसदृश अक्षर). अकुहविसर्जनीयां कण्ठ:।, जिव्हामूलीयस्य जिव्हामूलम्।
  • तालव्य - जिभेचा स्पर्श वरील हिरडीवर होऊन त्यायोगे निर्माण होणारे वर्ण, जसे इ, च्, छ्, ज्, झ्, ञ्, य्‌, श्. इचुयशानां तालुः।
  • मूर्धन्य - जिभेचा टाळूवर स्पर्श होऊन त्यायोगे निर्माण होणारे वर्ण, जसे - ऋ, ट्, ठ्, ड्, ढ्, ण्, र्‌, ष्, ळ्‌. ऋटुरषाणां मूर्ध:।
  • दन्त्य - जिभेचा दातांना स्पर्श झाल्यावर निर्माण होणारे वर्ण, जसे - ऌ, त्, थ्, द्, ध्, न्, ल्‌, स्. लुतुलसानां दन्त:।
  • ओष्ठ्य - दोन्ही ओठांमधून निर्माण होणारे वर्ण, जसे - उ, ओ, औ, प्, फ्, ब्, भ्, म्, उपध्मानीय ('कःपदार्थ'मधले विसर्गसदृश अक्षर) उपूपध्मानीयां ओष्ठ:।

कण्ठ्य, तालव्य आदि संज्ञा प्राचीन भारतीय उच्चारशास्त्रज्ञांच्या शास्त्रीय परिभाषेतील संज्ञा आहेत. 

मराठी लिपीत क्ष (क्‍ष) आणि ज्ञ ही दोन जोडाक्षरे त्यांच्या नित्य वापरामुळे मूलध्वनी समजली जातात. हिंदीत क्ष, ज्ञ, श्र. आणि त्र ही जोडाक्षरे मूलध्वनी समजली जातात. मराठी भाषेतील ज्ञ हा दंत्य आहे, बंगालीतला ज्ञ (ज्‍ञ) तालव्य आहे, तर हिंदीतला ज्ञ (ग्य) कंठ्य आहे. मराठीतले च़, छ़, ज़, झ़ हे दंततालव्य आहेत, आणि फ़ दंतोष्ठ्य आहे.. 

'श्' व 'ष्' यांत फरक कायसंपादन करा

असा प्रश्न पडलेल्यांना आता या भागात त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. जिज्ञासूने वर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या भागांचा संयोग करून वेगवेगळे वर्ण उच्चारून पहावेत, म्हणजे त्यांतील फरक आणखी स्पष्टपणे त्याच्या लक्षात येईल.

श-सदर वर्णाचा उच्चार करतांना वरच्या दाताच्या मागील बाजूस स्पर्श करावा. म्हणजे कठोर तालुला स्पर्श करूनच 'श' वर्णाचा अचूक उच्चार करता येतो.

ष-हे मूर्धन्य वर्ण आहे. 'ष'चा उच्चार करतांना जिभेचा शेंडा तालू व कंठ यास जाऊन भिडतो.म्हणजे 'ष'उच्चारतांना जिभेचा शेंडा मूर्धास घर्षण करून जातो.अशावेळेस 'ष'अचूक उच्चार बाहेर पडतो.

मराठी वर्णमाला : बी ए भाग ३

 मराठी वर्णमाला:-

तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. बोलतांना आपले मूलध्वनी हवेत विरू नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो. ज्या सांकेतिक खुणांनी आपण मूलध्वनी लिहून ठेवतो त्या सांकेतिक खुणेला ध्वनिचिन्हे किंवा अक्षर असे म्हणतात. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. मराठी भाषेत एकूण ५९ वर्ण आहेत. या वर्णाच्या मालिकेलाच वर्णमाला किंवा मुळाक्षरे असे म्हणतात.

अ, आ, ॲ, ऑ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ऌ, लॄ, ए, ऐ, ओ, औ, अं, अ: 

क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, च़, छ़, ज़, झ़, फ़, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ

मराठीत एकूण ५९ वर्ण आहेत.

स्वर

स्वरादी

व्यंजन

१. स्वर : ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. वर्णामुळे स्वर हे पूर्ण उच्चाराची मानली जातात. मराठी भाषेत अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ऌ, लॄ, ए, ऐ, ओ, औ असे एकूण बारा स्वर आहेत. वरील स्वरांचे एकूण तीन प्रकार पडतात.


ऱ्हस्व स्वर

दीर्घ स्वर

संयुक्त स्वर

१. ऱ्हस्व स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. उदा. अ, ॲ, इ, ऋ, ऌ, उ

२ दीर्घ स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. उदा. आ, ऑ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ

स्वरांचे इतर प्रकार :

१ सजातीय स्वर : एकाच उच्चार स्थांनामधून जाणार्या:स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. उदा. अ-आ, ॲ-ऑ, उ-ऊ, ऋ-ॠ, ऌ-लॄ, ए-ऐ, ओ-औ, 

२. विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. उदा. अ-ई, उ-ए, ओ-ऋ

३ संयुक्त स्वर : दोन स्वर मिळून तयार होणाऱ्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. असे ४ स्वर आहेत.

ए – अ+इ/ई ऐ – आ+इ/ई ओ – अ+उ/ऊ औ – आ+उ/ऊ

२ स्वरादी : ज्याचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात. स्वर + आदी – स्वरादी दोन स्वरादी – अं, अः . स्वरादीमध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो.

स्वरादीचे एकूण तीन प्रकार आहेत.

अनुस्वार,

अनुनासिक,

विसर्ग

क. अनुस्वार – स्वरावर किंवा अक्षरावर मागाहून स्वार होणारा वर्ण किंवा स्वरानंतर होणारा उच्चार म्हणजे अनुस्वार होय. जेव्हा हा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो तेव्हा त्याला अनुस्वार असे म्हणतात. उदा. गंगा, चंचल इत्यादी.

ख. अनुनासिक – जेव्हा अनुस्वाराचा उच्चार ओझरता होत असेल तेव्हा त्या उच्चाराला अनुनासिक असे म्हणतात. उदा. घरांत, जेव्हां, फुफ्फुसांतील, आम्हांला, टपालहंशील, हंहंहं, हांहांहां, हूं का चूं, हुंकार, इत्यादी.

ग. विसर्ग – विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे असा होतो. विसर्गाचा उच्चार होत असतांना स्वराच्या उच्चारानंतर ह-हा-हि-ही-हु-हू सारखा उच्चार होतांना हवेचे किंचित विसर्जन होते म्हणून यास विसर्ग असे म्हणतात. याचे चिन्ह लिहून दाखविताना अक्षराच्या पुढे दोन टिंबे देतात. मराठीत विसर्गयुक्त शब्द जवळजवळ नाहीत. (दुःख, क:पदार्थ ह्यांतली विसर्गसदृश चिन्हे विसर्ग नाहीत!) आहेत त्यांपैकी हे दोन :- उदा. स्वत:, मन:शाती, नि:स्पृह, निःश्वास, निःशंक, इत्यादी.

३.व्यंजन : एकूण व्यंजन ४१ आहेत. ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मूर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात.

व्यंजने पाच प्रकारची आहेत.

स्पर्श व्यंजन (३२)

अर्धस्वर व्यंजन (४)

उष्म, घर्षक व्यंजन (३)

महाप्राण व्यंजन (१)

स्वतंत्र व्यंजन (१)

जिव्हामूलीय उदा. दु:ख:, कःपदार्थ: यांमधील विसर्गासारखे चिन्ह.