Monday, January 30, 2023

देवनागरी लिपी

ही बऱ्याच भारतीय भाषांची प्रमुख लेखनपद्धती आहे. मराठी
बोडो, अंगिका,  मैथिलीरोमानीहिंदी इत्यादी भाषा देवनागरीत लिहिल्या जातात. देवनागरी लिपी एकंदरीत देशातल्या व देशाबाहेरच्या एकूण १९४ भाषांसाठी वापरली जाते. 
मराठी, संस्कृत, हिंदी, कोंकणी, गुजराती, काश्मिरी, सिंधी, नेपाळी आणि रोमानीसारख्या या व इतर काही भारतीय मुळे असलेल्या भाषांची प्रथम लिपी ही देवनागरी आहे. देवनागरी लिपी ही अबुगिडा लेखनपद्धतीमध्ये मोडते. जगातल्या बहुसंख्य लिपींप्रमणे देवनागरीदेखील डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. देवनागरी लिपीचा विकसनकाल हा बराच मोठा असून ह्या लिपीचा ख्रिस्तपूर्व ५०० मध्ये असलेल्या ब्राह्मी लिपीपासून आताची देवनागरी लिपीचा विकास झालेला आहे. साधारणत: इसवी सनाच्या बाराव्या शतकात स्थिरावलेल्या लेखनपद्धतीस देवनागरी असे नांव उपयोजिण्यास आरंभ झाला असावा. प्रत्येक शब्दावर एक रेषा ओढली जाते. तिला शिरोरेषा म्हणतात. तिच्यामुळे लेखन नीटनेटके व सुंदर दिसते. ही एक ध्वन्यात्मक लिपी आहे व त्यामुळे इतर लिप्यांपेक्षा (रोमन, अरबी, चिनी इत्यादी) अधिक वैज्ञानिक आहे. मराठी देवनागरी लिपीला बालबोध लिपी म्हणतात. (बालबोध नसलेली दुसरी मराठी लिपी म्हणजे मोडी लिपी.)

जगातील विविध भाषांतील बहुतांश शब्द किंवा ध्वनी देवनागरी लिपीमध्ये जवळजवळ जसेच्या तसे लिहिता येऊ शकतात आणि रोमन किंवा इतर लिप्यांपेक्षा देवनागरीत सहज लिहिलेल्या शब्दांचा तुलनात्मकदृष्ट्या हुबेहूब उच्चार करता येतो. या लिपीत एकूण ५२ अक्षरे आहेत, ज्यात १६ स्वर आणि ३६ व्यंजने आहेत. अक्षरांचा क्रमसुद्धा वैज्ञानिक आहे. स्वर-व्यंजन, कोमल-कठोर, अल्पप्राण-महाप्राण, अनुनासिक-अन्तस्थ-उष्म इत्यादी वर्गीकरणही वैज्ञानिक आहे.

भारत तसेच आशिया मधील अनेक लिप्यांचे (उर्दू सोडून) संकेत देवनागरीपेक्षा वेगळे आहेत. पण उच्चारण व वर्ण-क्रम इत्यादी देवनागरीसारखेच आहेत. त्यामुळे लिप्यंतरण करणे सोपे जाते. देवनागरी लेखनाच्या दृष्टीने सरळ, सुंदर आणि वाचनाच्या दृष्टीने सुपाठ्य आहे. देवलोक आणि नागरलोक या संबंधी विविध प्रकारच्या लेखनासाठी उपयोजिली जाणारी लिपी, ती देवनागरी लिपी होय.

आपले विचार शब्दांच्या किंवा कोणत्याही माध्यमातुन व्यक्त करण्याचे कार्य भाषा करते. तत्त्व: कुठलीही भाषा कोणत्याही लिपीत लिहिता येते. प्रत्यक्षात हे बरेचसे जमले तरी पूर्णपणे शक्य होत नाही. भाषेची लिपी त्या त्या भाषेतून उच्चारलेल्या शब्दांच्या लिखाणासाठी असते. एखाद्या भाषेत जर विशिष्ट उच्चार नसतील तर तिच्या लिपीतही ते दाखवणाऱ्या अक्षरखुणा नसतात. इंग्रजीत ख, च, छ, ठ, फ, घ, ढ, भ, ष, ळ हे उच्चार नाहीत. तमिळमध्ये ख, ग, घ, छ, ज, झ, ठ, ड, ढ, थ, द, ध, फ, ब, भ, श, स, ह ही अक्षरे लिहिता येत नाहीत, पण यांच्यापैकी काही उच्चार आहेत. त्यामुळे लिप्यंतरावर मर्यादा पडतात. उदाहरणार्थ मराठीतला 'पाटील" हा शब्द रोमन लिपीत Patil असा लिहिला जातो. त्याचा उच्चार पतिल/पतिळ/पॅतिल/पॅतिळ/पातिल/पातिळ/पाटिळ असा काहीही होऊ शकतो. देवनागरी लिपीत जगातल्या बहुसंख्य भाषांचे बहुतेक उच्चार जवळजवळ अचूक लिहिण्याची क्षमता असल्याने, तुलनात्मक दृष्ट्या या दृष्टिकोणातून देवनागरी ही एक उत्कृष्ट लिपी समजली जाते. 

मराठीमध्ये वापरला जाणारा संगणक हा शब्द देवनागरी लिपीत `संगणक' असा तर रोमन लिपीत 'sanganaka' असा लिहितात. तसेच त्याला इंग्रजी भाषेतला समानार्थी शब्द computer हा देवनागरीतून कम्प्यूटर किंवा कॉम्प्यूटर असा लिहिला आणि यशस्वीरीत्या वाचलाही जाऊ शकतो.

                                                                    0 0 0

Saturday, January 28, 2023

लेखकाचे भूत

गेल्या डझनभर वर्षांत भारतभर लेखक अमाप उत्पन्न झाले. त्यांना इंटरनेटजन्य लेखन-वाचन मंचांनी लेखक, वाचक, प्रचारक, विचारक, समीक्षक, परीक्षक, निरीक्षक, तत्त्वज्ञ, मर्मज्ञ, सर्वज्ञ, मीमांसक, अभ्यासक, संशोधक वगैरे विशेषणांनी ओळख प्राप्त झाली. त्यांना जे मंच मिळाले, त्यांना सोशल मीडिया असं म्हटलं जात असलं तरी प्रत्यक्षात ते अवघे ‘कम्युनल’ असतात. ‘सोसायटी’पेक्षा ‘कम्युनिटी’ हे नाते त्यांना बांधून ठेवते.

लेखकांची एवढी उत्पत्ती म्हणजे केवळ मोठं लोकशाहीकरण, किती थोर विकेंद्रीकरण, अशी स्तुती करत या मंचांच्या मालकांनी आपली अफाट धन केलीय. पण थोड्याच दिवसांत ही लोकशाही अगदी भारतीय समाजव्यवस्थेप्रमाणे जात, पोटजात, धर्म, पंथ, गोत्र, गाव, जिल्हा, प्रदेश, भाषा, लिंग, वर्ग, पक्ष, गट, संघटना, शिक्षण, देवदेवता, नेते, राजकीय विचारसरणी, आदर्श, चाहते वगैरे छोट्या छोट्या घोळक्यांत खांडोळी झालेली आढळून येते.

बा लेखका, या लढाईत तू कुठायंस कळलं का तुला? तू शिकार करायचा तो ससाही होतोस अन् ज्याच्याकडून ती करायची तो शिकारी कुत्राही तूच. आपली शेपटी चावायला गरगरा फिरणारा एखादा कुत्रा पाहिलास कधी? स्वत:कडे पाहिलंस तर तुला समजेल की, या प्रचंड धुमश्चक्रीत लेखका, तुझा पुरेपूर वापर केला गेलेलाय. जखमी कोण कोण झालं? अरे, तूच लेका तूच! मारामारीच्या धुंदीत तुझं तुलाच उमजेना की, रक्तबंबाळ आपणच झालोयत.

ते तर झालंच, पण इज्जत? तिच्या तर चिंध्या चिंध्या झाल्या की रं बाबा! तुझा तो लेखकीय बाणा भावनांच्या भरात तू बाजूला ठेवलास अन जातीच्या, लोकप्रियतेच्या, भक्तांच्या आणि वाचकांच्या चिथावण्यांच्या आहारी गेलास. ते भुरटे प्रकाशक बघतोयसना ना? लेखक घडवल्याची घमेंड मिरवणारे ते भुक्कड? सावध रे बाबा, सावध. फुकटची दारू व सामीष खमंग जेवण यांसाठी ते तुझ्यासारख्या अनेक लेखक-कवींना उचकवत असतात कुणा कुणा विरोधात. लेखकाकडून पैसे घेऊन पुस्तकं खपवणाऱ्यांची एक टोळी निरनिराळ्या रूपांनी लेखकाला घेराव घालते. त्याला फशी पाडते, वश करते.

लेखकाला लुबाडून आपली जिंदगी फुलवणारे असे ‘मेंटर पब्लिशर’ रग्गड उगवलेत बाबा देशात! हे परप्रकाशित लुच्चे लेखकाला झुलवत ठेवतात. कसं? ‘तुमचं पुस्तक अमूकढमूक पुरस्कारासाठी पाठवलंय, समितीतला तो माझ्या बैठकीतला आहे, त्याला मी बोललोय! अमूकतमूक संस्थेचे अध्यक्ष आपल्याच जातीचे आहेत, ते कन्सीडर नक्की करतील तुमचं पुस्तक’, अशा बाता मारून हे बिनकामाचे, बिनकण्याचे लाचार लोक लेखकाला आजन्म ‘मामा’ बनवत राहतात.

तुझं पुस्तक खूप गाजलं. विशेषत: नव्या पिढीला ते भावलं. लगेच विद्यापीठीय टोळ्या ते पुस्तक कोणत्या ना कोणत्या अभ्यासक्रमात चिकटवण्याच्या तयारीला लागतात. त्यातले काही चतुर तुझ्याभोवती घोळू लागतात. ते तुला असं भासवू लागतात की, केवळ त्यांच्या खटपटीनंच तुझा असा पुस्तकी अवतार हजारो विद्यार्थ्यांसाठी पूजनीय, वंदनीय होणार आहे. तेव्हा तुझी कृपादृष्टी आमच्यावरही पडावी! तुझे खिसे मोकळे होऊ लागतात. तुझा वेळ या टोळीच्या मनोरंजनासाठी खर्च होऊ लागतो.

असंही होऊ शकतं बरं का : तुझ्या मनात कुणी भरवतं की, ‘तुमचं पुस्तक खरंच खूप भारीय, पण ते अमूक लेखकाच्या राजकीय दबावापुढं मागं पडतंय अन् त्याचंच पुस्तक अभ्यासक्रमाला लागतंय’. मग तू पेटून उठतोस. चेकाळतोस. तुझा बराचसा वेळ आपल्या पुस्तकाच्या लॉबिंगमध्ये जाऊ लागतो. मग एक जण पुढं येईन सांगतो की, ‘आम्ही बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये मंजुरी देऊ. पण त्या पुस्तकाची स्वस्त आवृत्ती (विद्यार्थ्यांना परवडेल अशी) काढायची परवानगी तुम्ही आणावी’. झालं! बा लेखका, तुझ्या या अभ्यासक्रमिक अवताराच्या आगमनासाठी तुझा आटापिटा आरंभतो आणि तुझ्या तो विचारी, प्रगल्भ वगैरे लेखक आसुसलेला, आतुर आणि हावरट कधी बनतो, कळतही नाही.

                                                     जयदेव डोळे