Wednesday, September 25, 2024

झारीतील शुक्राचार्य


शुक्राचार्य हे भृगु ऋषी व त्यांची एक पत्नी दिव्या यांचे सुपुत्र. ही दिव्या हिरण्यकश्यपची कन्या होती तर भृगु हे ब्रह्मदेवाचे पुत्र म्हणून भृगुचे पुत्र म्हणून यांस भार्गव असेही म्हणतात.

शुक्र व बृहस्पती, हे दोघे अंगिरा ऋषींकडे शिकत असताना ऋषी अंगिरा हे बृहस्पती यांच्याकडे जास्त लक्ष देत कारण त्यांची इच्छा होती की बृहस्पती याने शुक्रापेक्षा जास्त ज्ञानी होऊन देवांचे गुरू बनावे व त्यात ते यशस्वी झाले.

शेवटी खिन्न होऊन शुक्राने कोणासही अंतर न देणाऱ्या परमपिता विश्वेश्वर महादेवांना मदत मागितली. तेव्हा त्यांनी अंगिराचे वंशज असलेल्या गौतम ऋषींकडे जाण्यास सांगितले व शुक्र तेथे गेले, तेव्हा कोणत्याही भेदभावाशिवाय गौतम ऋषींने त्यांना शिकवले.

तेव्हा शुक्र याने आता आपले सामर्थ्य दाखवायला म्हणून आपल्या आजोळच्या लोकांना सक्षम बनवून त्यांच्या उद्धारासाठी त्यांचे गुरूपद स्वीकारले. त्याने कधी आपल्या शिष्यांना मात्र वाईट उपदेश केले नाहीत पण ते शेवटी असुरच, म्हणून त्यांनी पापं केलीत. शुक्राचार्य मात्र कुप्रसिद्ध ठरले.असुरांपासून सुरक्षेसाठी म्हणून देवराज इंद्राने आपली कन्या जयंती हिचा विवाह यांच्याशी करून दिला होता.

देवांना अमृतकुंभ दिल्याने असुरांचा पक्ष कमकुवत झाला हे पाहून तपश्चर्या करून शुक्राने महादेवांकडून संजीवनी विद्याच शिकून घेतली. गुरू शुक्राचार्य यांनी कठोर तपश्चर्या केली आणि शिवाचे आशीर्वाद घेतले. त्यांना शिवाने "मृत्यु संजीवनी" हा मंत्र शिकवून संकल्प सोडला. शुक्राचार्य यांना एक हजार वर्षे हे अनुष्ठान करावे लागले. या काळात केवळ धुरावरच जगावे लागले. शुक्राचार्यांनी शिवाचा मंत्र मिळावा म्हणून हा विधी सुरू केला.

ही विद्या मात्र कोणत्याही ऋषीस वा इतर देवास ठाऊक नसल्याने असुर युद्धात देवांवर मात करू लागले तेव्हा बृहस्पतीपुत्र कच यास देवांनी शुक्राचार्यांकडे ही विद्या शिकायला पाठविले. शुक्राचार्य तिकडे विद्या शिकत असतांना, इकडे देवतांनी शुक्राचार्यांच्या योजना जाणून घेतल्या. गुरु शुक्राचार्य दूर असताना आणि दैवी मंत्र प्राप्त करण्यापूर्वी देवांनी राक्षसांचा नाश करण्याचा निर्णय घेतला. गुरु शुक्राचार्य यांनी सांगितल्यानुसार, शुक्राचार्य यांचे वडील भृगु ऋषी त्यांच्या आश्रमात राहत होते.

त्या वेळी राक्षसांनी अशी इच्छा प्रगट केली की, त्यांनी त्यांची शस्त्रे सोडून दिली आहेत आणि शांततापूर्ण जीवन जगायचे आहे. देवावर हल्ला करणे हे अन्यायकारक आहे. देवतांना मात्र यावर विश्वास नव्हता. त्यांनी शुक्राचार्य व भृग ऋषी दोघेही दूर असतांना दानवांवर हल्ला केला. तेव्हा राक्षसांनी त्यांची पत्नी दिव्या यांना त्यांच्या मदतीला येण्याची विनंती केली. तिच्या गूढ शक्तींना घाबरून इंद्र व इतर देवांनी विष्णूला विनंती केली की दिव्याला पराभूत करा. तिने इंद्र व विष्णूची राख करते असे सांगून मंत्र जपायला लागली, तेव्हा विष्णूने सुदर्शन चक्र सोडले आणि दिव्याचा शिरच्छेद केला.

जेव्हा भृगु ऋषी आश्रमात परत आले, जेव्हा त्यांनी आपल्या पत्नीचा मृतदेह पाहिला, तेव्हा त्यांनी विष्णूला शाप दिला. विष्णू एका महिलेच्या हत्येसाठी दोषी ठरला असल्यामुळे त्याला वारंवार पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल. यामुळे विष्णूच्या अवतारांना आधार मिळाला. त्यानंतर भृगुने आपल्या दैवी शक्तींचा वापर करून मस्तकावर हात ठेऊन तिला नवीन जीवन दिले.

राक्षसांशी अपयशी ठरल्यानंतर इंद्राने आपले लक्ष शुक्राचार्याकडे वळवले. त्याने आपली मुलगी जयंतीला शुक्राचार्य यांचे मन मोहून टाकावे किंवा तिच्या सेवेत त्यांना जिंकून घ्यावे या सूचनांसह पाठविले. जयंतीने ऋषीना मोहित करण्याचा प्रयत्न यशस्वी न झाल्याने तिने भक्तीने गुरुसेवा सुरू केली. तिने एक सहस्त्र वर्ष शुक्राचार्य यांची भक्तिभवाने सेवा केली.

जेव्हा तपश्चर्याचा काळ संपला तेव्हा शिव प्रकट झाले, त्यांनी शुक्राचार्य यांना मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत केले जाईल, असा "मृत्यूसंजीवनी मंत्र" दिला.आपले ध्येय साध्य झाल्यावर त्यांनी बाजूला पाहिले तर, त्यांचे लक्ष जयंतीकडे वेधले गेले. त्यांनी जयंतीला निस्वार्थी मार्गाने सेवा केल्याबद्दल वरदान मागायला सांगितले. तेव्हा जयंतीने आपण स्वइच्छेनुसार मला आपली पत्नी म्हणून स्वीकारा, अशी विनंती केली. शुक्राचार्य यांनी स्वेच्छेने ते मान्य केले.

जेव्हा शुक्राचार्य तपाला बसले असतांना, इंद्राने इकडे एक योजना आखली. राक्षसांना आपले गुरु घोर तपश्चर्या करीत होते, हे माहीत नव्हते. इंद्राने आपले गुरू बृहस्पती यांना सांगितले की, दुरात्मे शुक्राचार्याची अपेक्षा करीत आहेत, परंतु त्यांना शुक्राचार्य जयंतीसमवेत राहत होते हे माहीत नव्हते. इंद्राने बृहस्पतीला गुरु शुक्राचार्याचे रूप घेऊन त्यांच्या आश्रमात बसावे, त्यावेळेस आम्ही राक्षसावर आक्रमण करून त्यांना ठार करू, अशी विनंती केली. त्यानुसार गुरू बृहस्पती आश्रमात राक्षसांसोबत राहायला लागले. देवांनी राक्षसांवर आक्रमण करून, सर्व राक्षसांना ठार केले.

शंकराचे वरदान घेऊन, जेव्हा शुक्राचार्य परत आले, तेव्हा एका दांभिक मनुष्याने त्यांची जागा घेतल्याचे पाहून ते अस्वस्थ झाले. त्यांनी लगेच संजीवनी मंत्राने राक्षसांना जिवंत केले. बृहस्पतीने शुक्राचार्य यांची इतकी अचूक प्रतिकृती तयार केली की खरा शुक्राचार्य कोण हे सांगणे त्या राक्षसी भुतांना ओळखू आले नाही. शेवटी भुतांनी शुक्राचार्य यांचाच पाठलाग केला.

गुरु शुक्राचार्य यांना हा अपमान सहन करता आला नाही, विशेषतः त्यांच्या फायद्यासाठी त्यांनी घेतलेल्या हजार वर्षांच्या तपश्चर्येनंतर राक्षस त्यांना ओळखू शकले नाही. शुक्राचार्य क्रोधाने लालबुंद झाले. त्यांनी तत्काळ असुरांना शाप दिला की ते देवतांवर कधीही विजय मिळवू शकणार नाहीत. इंद्राने एक दीर्घ श्वास घेतला आणि बृहस्पतीने त्याचे खरे रूप स्वीकारले. राक्षसांना समजले की ते फसवले गेले होते, परंतु आता त्यांना कसलीही साथ मिळाली नाही. या कथेत गुरु शुक्राचार्य यांनी राक्षसांना नेहमीच आधार दिला होता. देवता आणि भुते यांच्यामधील युद्धात, त्याने आपल्या ज्ञानाच्या सामर्थ्याने मृत राक्षसांना पुन्हा जिवंत केले. 

यानंतर, बृहस्पतींनी आपला मुलगा कच याला शुक्राचार्यांच्याकडे मृत-संजीवनी विद्या शिकण्यासाठी पाठविले. शुक्राचार्य यांनी कच याला आपला विद्यार्थी म्हणून स्वीकारले, पण इतर राक्षसांना ते आवडले नाही. जसजसा काळ वाढत गेला तसतसे कच शुक्राचार्य कन्या देवयानीच्या प्रेमात पडला. यामुळे भुतांना आणखी त्रास झाला. एके दिवशी शुक्राचार्य यांच्या अनुपस्थितीत भुतांनी कचाचा वध केला. या बातमीने देवयानी खूप अस्वस्थ झाली. आपल्या मुलीच्या विनंतीनुसार ऋषी शुक्राचार्य यांनी “मृत-संजीवनी” ज्ञानाच्या सहाय्याने कचाला पुन्हा जिवंत केले. तिथून कच आणि देवयानी यांच्यात प्रेम दिवसेंदिवस वाढत गेले. न्या देवयानी हिला कच आवडायचा म्हणून, त्यांनी आपल्या मुलीच्या-देवयानीच्या आग्रहावरून शिकविणे सुरू केले. पण असुर वारंवार यात व्यत्यय आणून कचाला ठार करत व शुक्राचार्य पुन्हा जिवंत करत. शेवटी असुरांनी त्यास मारून त्याच्या अस्थींची पूड मदिरेत घालून चक्क शुक्राचार्यांनाच पाजली.पुन्हा मुलीच्या हट्टाखातर त्यांनी त्यास जिवंत केले पण त्यात तो त्यांचे पोट फाडून बाहेर आला व शुक्र स्वतः जीव गमावून बसले. आता कचाला ही विद्या आपोआप आली व त्याने गुरूस संजीवनीने पुन्हा प्राण दिले.

देवयानीने कचाला आता लग्नासाठी विचारले पण त्याने आता आपण बहीणभाऊ आहोत असे म्हटल्याने देवयानीने त्यास शाप दिला. तिने ययाती राजाशी लग्न केले. ययातीने शर्मिष्ठेशी दुसरे लग्न केलेले बघून रागावून शुक्राने त्यास वार्धक्याचा शाप दिला होता.

झारीतील शुक्राचार्य कसे झाले  ? 

श्रीविष्णूंचा वामन अवतार व दानशूर बळी राज्याची एक पौराणिक कथा प्रस्तुत करीत आहे. त्यातून "झारीतील शुक्राचार्य" म्हणजे आयत्या वेळेस अडथळा आणणाऱ्या व्यक्तीस हे म्हणणे लागू पडते.

एकदा बळी नावाचा एक राजा यज्ञयाग करून एवढा पुण्यवान बनला होता, की त्रिभुवन म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांवर तो राज्य करणार होता. म्हणजे थोडक्यात, इंद्राची जागा घेणार होता. म्हणून सर्व देवांनी मिळून श्रीविष्णूंना विनंती केली की, काही करून बळी राजाचा हा यज्ञ पूर्ण होण्याआधी उपाय करा. तेव्हा श्रीविष्णू बटू वामन रूप धारण करून त्याच्याकडे याचक म्हणून गेले. (बटू म्हणजे नुकतीच मुंज झालेला आठ ते दहा वर्षांचा मुलगा) त्यांनी बळीकडे तीन पावले भूमी मागितली. ‘तीन पावले भूमीच का?’ असे बळी राजाने विचारता त्यानं सांगितलं, संध्या करायला बसण्यासाठी जेवढी भूमी लागेल तेवढी भूमी. ती स्वत:ची असावी एवढय़ाचसाठी.’’

बळी राजाने ती लगेच देतो म्हणून मान्य केलं. कारण त्यानं आतापर्यंत प्रत्येक याचक तृप्त केला होता, अशी त्याची ख्याती होती. त्रिभुवनाचा राजा होऊ शकणाऱ्या बळीराजाला तीन पावलं भूमी म्हणजे अगदीच सामान्य गोष्ट होती. मग वामनरूपी विष्णूंनी त्याला संकल्प सोडण्यास सांगितलं. त्यासाठी त्यानं झारीतील पाणी सोडताना त्यातून पाणीच येईना. (झारी म्हणजे तोटी असणारा छोटा तांब्या) तेथे उपस्थित असलेल्या दैत्यगुरू शुक्राचार्यानी विष्णूला ओळखलं होतं. ते बळीराजाचा यज्ञ पूर्ण होऊ देणार नाहीत हे त्यांना समजलं. म्हणून त्यांनी बळीराजाला ‘संकल्प सोडू नको,’ असंही सांगितलं. पण बळी राजानं त्यांचं म्हणणं ऐकलं नाही; कारण याचक संतुष्ट व्हावा असं त्याचं व्रत होतं. म्हणून मग असा संकल्प पूर्ण होऊ नये म्हणून शुक्राचार्य सूक्ष्मरूप घेऊन झारीच्या तोंडाशी जाऊन बसले. म्हणजे याचकाला तृप्त करणं, या चांगल्या कामात त्यांनी अडथळा आणला.

दानाचा संकल्प सोडण्यासाठी झारीच्या तोटीतून पाणी का येत नाही हे वामनाच्या लक्ष्यात आले. त्यांनी दर्भाची एक काडी घेतली आणि झारीच्या तोटीत खुपसली. ते दर्भ शुक्राचार्याच्या डोळ्यात घुसले आणि त्यांनी एक डोळा गमावला. (म्हणून शुक्राचार्यांना 'एकाक्ष' असेही म्हणतात.) डोळ्याला जखम झाल्यामुळे सूक्ष्मरूप घेतलेले शुक्राचार्य झारीतून बाहेर आले आणि त्यांनी त्यांचे मूळ रूप धारण केले. शुक्राचार्य बाहेर आल्याने झारीतील अडथळा दूर झाला आणि बळीराजाने विधिपूर्वक संकल्प सोडून वामनाला तीन पावले जमिनीचे दान दिले.

म्हणून तेव्हापासून चांगल्या कामात ऐनवेळी अडथळा आणणाऱ्या माणसाला ‘झारीतला शुक्राचार्य’ असे म्हणतात.

                                       🪴