भारत तसेच आशिया मधील अनेक लिप्यांचे (उर्दू सोडून) संकेत देवनागरीपेक्षा वेगळे आहेत. पण उच्चारण व वर्ण-क्रम इत्यादी देवनागरीसारखेच आहेत. त्यामुळे लिप्यंतरण करणे सोपे जाते. देवनागरी लेखनाच्या दृष्टीने सरळ, सुंदर आणि वाचनाच्या दृष्टीने सुपाठ्य आहे. देवलोक आणि नागरलोक या संबंधी विविध प्रकारच्या लेखनासाठी उपयोजिली जाणारी लिपी, ती देवनागरी लिपी होय.
आपले विचार शब्दांच्या किंवा कोणत्याही माध्यमातुन व्यक्त करण्याचे कार्य भाषा करते. तत्त्व: कुठलीही भाषा कोणत्याही लिपीत लिहिता येते. प्रत्यक्षात हे बरेचसे जमले तरी पूर्णपणे शक्य होत नाही. भाषेची लिपी त्या त्या भाषेतून उच्चारलेल्या शब्दांच्या लिखाणासाठी असते. एखाद्या भाषेत जर विशिष्ट उच्चार नसतील तर तिच्या लिपीतही ते दाखवणाऱ्या अक्षरखुणा नसतात. इंग्रजीत ख, च, छ, ठ, फ, घ, ढ, भ, ष, ळ हे उच्चार नाहीत. तमिळमध्ये ख, ग, घ, छ, ज, झ, ठ, ड, ढ, थ, द, ध, फ, ब, भ, श, स, ह ही अक्षरे लिहिता येत नाहीत, पण यांच्यापैकी काही उच्चार आहेत. त्यामुळे लिप्यंतरावर मर्यादा पडतात. उदाहरणार्थ मराठीतला 'पाटील" हा शब्द रोमन लिपीत Patil असा लिहिला जातो. त्याचा उच्चार पतिल/पतिळ/पॅतिल/पॅतिळ/पातिल/पातिळ/पाटिळ असा काहीही होऊ शकतो. देवनागरी लिपीत जगातल्या बहुसंख्य भाषांचे बहुतेक उच्चार जवळजवळ अचूक लिहिण्याची क्षमता असल्याने, तुलनात्मक दृष्ट्या या दृष्टिकोणातून देवनागरी ही एक उत्कृष्ट लिपी समजली जाते.
मराठीमध्ये वापरला जाणारा संगणक हा शब्द देवनागरी लिपीत `संगणक' असा तर रोमन लिपीत 'sanganaka' असा लिहितात. तसेच त्याला इंग्रजी भाषेतला समानार्थी शब्द computer हा देवनागरीतून कम्प्यूटर किंवा कॉम्प्यूटर असा लिहिला आणि यशस्वीरीत्या वाचलाही जाऊ शकतो.
0 0 0
No comments:
Post a Comment