साहित्याचे प्रयोजन
साहित्याचे प्रयोजन काय, ह्या प्रश्नाची चर्चा प्राचीन काळापासून आजतागायत अनेक लेखक, समीक्षक, वाङ्मयमीमांसक यांनी केली आहे. ह्या प्रयोजनांची चर्चा लेखकसापेक्ष व वाचकसापेक्ष म्हणजेच साहित्याचा निर्मितिव्यापार व आस्वादव्यापार अशा दोन्ही अंगांनी वारंवार होत राहिली आहे. प्रसिद्घी, यश, कीर्ती, मानसन्मान, धनप्राप्ती, मतप्रचार, सामाजिक सुधारणा, दुष्ट रुढींचा नाश, हितोपदेश, राष्ट्रभक्ती व देवभक्ती अशी नानाविध प्रयोजने लेखकांनी मनाशी बाळगून प्राचीन काळापासून आजतागायत साहित्यनिर्मिती केली आहे. काही प्रयोजने विशिष्ट काळ, परिस्थिती यांना अनुलक्षून प्रभावी ठरतात. उदा., पारतंत्र्य काळात स्वातंत्र्यप्राप्ती हाच एकमेव वा प्रधानहेतू मनाशी बाळगून अनेक साहित्यिकांनी लेखन केले. मराठीमध्ये शि. म. परांजपे, स्वातंत्र्यवीर सावरकर, साने गुरुजी प्रभृती लेखकांनी आपली लेखणी देशकार्यासाठीच राबवली; पण साहित्यनिर्मितीचा स्थल-काल-परिस्थितिनिरपेक्ष विचार केला, तर उच्च कोटीच्या अलौकिक आनंदाची प्राप्ती हेच साहित्याचे सार्वकालीन, सर्वदूर, सर्वत्र आढळणारे प्रयोजन असल्याचे दिसून येते. असा सर्जनशील आनंद लेखकाला निर्मितीसाठी, तर वाचकाला आस्वादासाठी प्रवृत्त करतो. सर्जनशीलतेच्या पातळीवर उच्च दर्जाची कलात्मक निर्मिती साधणे, हे लेखकाच्या आनंदाचे निधान होय. आत्माविष्कार व आत्मशोध ह्या प्रेरणाही लेखकाला लिखाणासाठी उद्युक्त करतात.
साहित्याचे प्रयोजन हे जसे लेखकाच्या दृष्टीने तसेच वाचकाच्या दृष्टीनेही प्रतिपादिले जाते. वाचक साहित्याचे वाचन कशासाठी करतो, ह्या प्रश्नाचे उत्तर शोधतानाही समीक्षकांनी विविध उपपत्ती, प्रणाली मांडल्या आहेत. चार घटका मनोरंजन, विरंगुळा, दैनंदिन जीवनातील ताणतणावापासून सुटका, स्वप्नरंजन, उद्बोधन, जिज्ञासातृप्ती, ज्ञान व माहिती मिळविणे, दैनंदिन समस्यांवर तोडगा शोधणे, अशा अनेकविध कारणांनी वाचक साहित्याकडे वळत असतात व काही प्रमाणात त्यांना साहित्याकडून वरील प्रकारचे समाधान लाभतही असते; तथापि वाचकाच्या ठायी साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी सहृदयता असेल व त्याची वाङ्मयीन अभिरुची विकसित, संपन्न व प्रगल्भ झालेली असेल, तरच त्याला दर्जेदार व श्रेष्ठ प्रतीच्या साहित्याच्या आस्वादातून उच्च कोटीचा अलौकिक आनंद मिळू शकतो, लौकिक व्यवहारनिरपेक्ष सौंदर्याची प्रचीती येते. त्याच्या जीवनविषयक जाणिवा समृद्घ होऊन आयुष्याचा नवा अर्थ प्रत्ययास येतो. साहित्यात मानवी जीवनाचे प्रतिबिंब पडत असते. व्यक्तिगत रीत्या प्रत्येकाचे अनुभव तसे मर्यादितच असतात; पण श्रेष्ठ साहित्यिकाने निर्मिलेल्या उच्च दर्जाच्या साहित्यकृतीतून मानवी मनाचे व जीवनाचे विस्तृत, वैविध्यपूर्ण, सर्वांगीण व परिपूर्ण दर्शन घडते. अशा साहित्याच्या परिशीलनातून वाचकाच्या अनुभूतीच्या कक्षा विस्तारत जातात. त्याला कल्पनेच्या पातळीवर अनेकविध प्रकारचे अनुभव घेता येतात. त्याला पूर्वपरिचित असलेल्या अनुभवांच्या साहित्यातील दर्शनातून पुनःप्रत्ययाचा; तर सर्वस्वी अपरिचित असलेल्या अनोख्या, अद्भुत, अज्ञात, नावीन्यपूर्ण अशा अनुभवांच्या साहित्यातील दर्शनातून नवप्रत्ययाचा अलौकिक आनंद मिळतो. मानवी जीवनाची अफाट व्याप्ती व खोली तसेच व्यामिश्र, बहुआयामी, नानाविध परिमाणे त्याला साहित्याच्या परिशीलनातून जाणवतात. जीवनातील गुंतागुंतीच्या गहनगूढ समस्यांवर उद्बोधक प्रकाश पडतो. मानवतेचे अधिष्ठान असलेल्या नैतिक, सामाजिक, सांस्कृतिक मूल्यांची नव्याने जाणीव होते व त्याची एकूण मानवी जीवनाविषयीची जाण समृद्घ, प्रगल्भ बनते. कोणत्याही सर्जनशील साहित्यातून त्या त्या मानवसमूहाच्या भाषेतील व संस्कृतीतील सूक्ष्मता आणि प्रगल्भता व्यक्त होत असते; मनुष्य आणि भौतिक-आधिभौतिक जग यांच्यातील संबंधांची अभिव्यक्ती होत असते. सर्जनशील साहित्य हा खरेतर एक ज्ञानगर्भ व्यवहार असतो आणि साहित्यसमीक्षा व वेगवेगळे साहित्यसिद्घांत आपापल्या परीने वेगवेगळ्या उपपत्ती व अर्थनिर्णयनप्रणाली मांडून ह्या ज्ञानात्म सर्जनशील व्यवहाराचा उलगडा करण्याचाच प्रयत्न करीत असतात. अशा वेगवेगळ्या भूमिकांतून व दृष्टिकोनांतून जगभरातल्या वाङ्मयांचे भाषिक इतिहास लिहिण्याचे प्रयत्नही आजवर वेळोवेळी झालेले आहेत. विशिष्ट भाषेतील समग्र वाङ्मयकृतींचा आणि वाङ्मयविषयक घडामोडींचा एका विवक्षित दृष्टिकोनातून केलेला पद्घतशीर व परंपराधिष्ठित ऐतिहासिक अभ्यास म्हणजे वाङ्मयेतिहास. साहित्याचा हा इतिहास विशिष्ट समाजाच्या वाङ्मयीन संचिताचा व त्याचबरोबर सामाजिक-सांस्कृतिक दस्तऐवजाचा ऐतिहासिक आलेख असतो. मानवी संस्कृती समृद्घ करणाऱ्या ललित व वैचारिक साहित्यास लाभलेल्या वैविध्यपूर्ण व व्यापक परिमाणांची कल्पना अशा वाङ्मयेतिहासातून व साहित्यसमीक्षेतून येऊ शकते.
No comments:
Post a Comment