Wednesday, August 20, 2025

वाचण्यासारखे काही....

ग्रंथालयांशिवाय लंडनची कल्पना करणेही अशक्य आहे. इथल्या एका ग्रंथालयात ‘चांभार’ (The Chamars : George W. Briggs) हे पुस्तक आहे, यावर एखाद्या परदेशी अभ्यासकाने १९२० मध्ये पुस्तक लिहावे ! केवळ एका जातीबद्दल नाही तर आपल्याकडच्या सगळ्या जातींवर, जिल्ह्यांवर इंग्रजी अभ्यासकांनी अभ्यासपूर्ण अशी प्रदीर्घ मांडणी केली आहे, नोंदी ठेवल्या आहेत. इतर कोणी नोंदी केल्या असतील, तर तेही संग्रही ठेवले आहे. एखाद्या साध्या विषयाने खुणावले की त्यात बुडी मारायची आणि निष्ठेने संशोधन करायचे, हा इंग्रज माणसाचा स्वभाव आहे.

इंग्रजांनी जगावर राज्य केले, याची कारणे अनेक असतील. 'दस्ताऐवजीकरण’ त्यापैकी महत्त्वाचे. ज्यांच्यावर राज्य करायचे, तो परिसर-संस्कृती पार कोळून प्यायची, ही त्यांची खासियत. 'डॉक्युमेंटेशन’ हे इंग्रजांचे बलस्थान.

पृथ्वी सूर्याभोवती फिरते, असे युरोपात कोपर्निकसनंतर गॅलिलिओ सांगू लागला, तेव्हा त्याला नजरकैदेत राहावे लागले. त्याच कालावधीत संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेल्याची वार्ता आपल्याकडे पसरवली जात होती. मात्र नंतर युरोपातल्या ‘रेनेसॉं’ने तिथले जगच बदलून गेले. रेनेसॉं हा युरोपच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा काळ. अंधश्रद्धा, धार्मिक कट्टरता यांना त्यामुळे धक्का बसला. विज्ञान, विवेक, स्वतंत्र विचार यांना प्रोत्साहन मिळाले. माणसाच्या विचारविश्वाला नवे आयाम मिळाले. याचा सर्वाधिक फायदा इंग्लंडने करून घेतला. 

शिस्तबद्ध अभ्यासाची सवय असल्याने इंग्रज माणसाने अनेक कठीण विषय समजून घेतले. साम्राज्यविस्ताराच्या वाटा शोधल्या. साम्राज्य टिकवण्याचे मार्ग शोधले. प्रशासनावर पकड मिळवली. साहित्य-कला-संस्कृतीचा आवाका मिळवला. एखाद्या विषयाच्या मुळाशी जाऊन तो विषय समजून घेणे, व्यवस्थित नोंदी करणे, गॅझेट्स तयार करणे आणि तर्कसंगत निष्कर्षांपर्यंत पोहोचणे ही त्यांना सवयच लागली. आजही आपल्याकडच्या अनेक घटनांवर, मुद्द्यांवर इंग्रजी अभ्यासक अभ्यासपूर्ण पुस्तके लिहितात. 

इंग्रजांनी तेव्हा अवघा भारत मोजला, भूमापन केले. त्यानंतर आजतागायत आपल्याला ते जमलेले नाही. अठराव्या शतकात इंग्रजांनी हा खंडप्राय देश मोजला. ‘The Great Arc : The Dramatic Tale of How India Was Mapped and Everest Was Named' हे पुस्तक वाचले की हा पूर्ण प्रवास समजतो. हे पुस्तकही ब्रिटिश इतिहासकार जॉन की यांनी लिहिले आहे. विल्यम लॅम्ब्टन नावाचा इंग्रज अधिकारी या भूमापनासाठी आपले सर्वस्व देतो. रानावनात ऊन-वारा-पावसात काम करताना सत्तराव्या वर्षी तिथेच मरण पावतो. त्याची समाधी आजही वर्ध्याजवळ हिंगणघाटला आहे. 

लॅम्ब्टन गेल्यावर त्याचा सहकारी जॉर्ज एव्हरेस्ट ही सूत्रे हातात घेतो. वयाच्या ५६व्या वर्षांपर्यंत अहोरात्र त्यासाठी काम करतो. अभ्यास करतो, तहानभूक विसरून देशभर फिरून सर्वेक्षणे करतो. माउंट एव्हरेस्टला त्याचे नाव द्यावे, एवढे उत्तुंग काम उभे करतो. या धांदलीत लग्न करायचे मात्र राहून जाते. ५६व्या वर्षी एव्हरेस्ट लंडनला परततो. तिथे पबमध्ये बीअर पिताना एका सुंदरीच्या प्रेमात पडतो. २३ वर्षांच्या तरूण मैत्रिणीशी लग्न करतो. सहा मुलांचा बाप होतो ! आपले लोक सार्वजनिक कारणासाठी झोकून देऊन असा अभ्यास करणार नाहीत. पबमध्ये जाऊन छान दारू पिणार नाहीत. ५६व्या वर्षी प्रेमात वगैरेही पडणार नाहीत !

'असा लुटला भारत'  (The Theft of India) हे आणखी एक महत्त्वाचे पुस्तक. '१४९८ ते १७६५ पर्यंतची युरोपियन देशांनी भारताची केलेली लूट' असे या पुस्तकाचे उपशीर्षक आहे. सरिता आठवले यांनी अनुवाद केला असून मेहता प्रकाशनने ते प्रकाशित केले आहे. दुसरे महत्त्वाचे पुस्तक म्हणजे 'अराजक' (The Anarchy) हे होय. 'ईस्ट इंडिया कंपनी : एका व्यापारी कंपनीचा जुलमी कारभार' असे याचे उपशीर्षक असून विल्यम डॅलरिंपल हा लेखक आहे. रेश्मा कुलकर्णी यांनी मराठीत अनुवाद केलेल्या पुस्तकाचे प्रकाशक मेहता आहेत.

कलकत्ता (कालिकत, कोझिकोडे) मलबार, मद्रास, सुरत, मुंबई, कोचीन, कोरोमंडल, गोवा, चितगाव, पाँडिचेरी, बंगाल इत्यादी ठिकाणी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फेंच यांनी व्यापारासाठी वसाहती केल्या. या सर्वांच्या व्यापारासाठी ईस्ट इंडिया कंपनी होत्या. मन मानेल तसा व्यापार आणि लूट करून पैसा मिळवणे हाच त्यांचा उद्देश होता.

पोर्तुगीजांनी अमेरिकेतून इकडे टोमॅटो, बटाटे, अननस, सीताफळ, पपई, निवडुंग, पेरू, पॅरान फ्रूट, काजू, शेंगदाणे, रताळी, मका, मिरची, रातांबा, अल्फाॅन्सो आंबा, तंबाखू, झेंडू (मेक्सिको) भारतात आणले, हे आश्चर्याचे वाटते. गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी दीड हजार खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल उभारले होते. ते अल्बुकर्कने स्थापन केले होते. तेथेच गोव्याला सेंट कॅथेड्रेल चर्च बांधले गेले. भारतातून सोरा (potassium nitrate), नीळ, काळी मिरी, कापड, मसाले युरोपियन प्रदेशात नेले जात. 

त्या काळातील शिवाजीराजे, संभाजीराजे आणि कान्होजी आंग्रे यांचे उल्लेख 'असा लुटला भारत' या पुस्तकात येतात. औरंगजेब, मीर जाफर (बंगाल), चंदासाहेब (कर्नाटक) यांचे उल्लेख आहेतच. १६६२ मध्ये पोर्तुगीजांनी चार्ल्स दुसरा याला मुंबई बेट आंदण दिले. त्याने पोर्तुगालच्या ब्रगांझा घराण्यातील कॅथरीनशी विवाह केला होता.

इंग्रजांनी १६७२ ला मॉरिशसचे डोडो हे पक्षी मारले. त्यांचे एक्सपेरिमेंट नावाचे जहाज तेथे गेले होते. नंतर मॉरिशसमध्ये डोडो पक्षीच नामशेष झाला. इंग्रज थॉमस रो यांने १६१६ मध्ये जहांगीर बादशहाला इंग्लिश घोडागाडी, उंची मद्य व दोन मॅस्टिप जातीचे कुत्रे भेट दिले. हे कुत्रे अतिशय क्रूर असतात. दोन सेवक त्यांना पालखीतून फिरवायला आणि दोन त्यांच्यांवरच्या माशा उडवण्यासाठी होते. त्या काळात साधारण श्रीमंत माणसाकडेही वीस गुलाम असत. विशेषतः ते मलबारमधून विकत घेतले जात. स्त्रियांच्याकडे दासी व पुरुषांच्याकडे गुलाम असत. मात्र तत्काळात भारतात रोगराई, अन्याय, अत्याचार, दुष्काळ, शेतसारा, मद्यपान यामुळे लोकसंख्येचा दर सतत खालावत होता. भारत प्रचंड गरीब होता. इंग्रज, डच, पोर्तुगीज आणि फ्रेंचांनी या भारताची जवळ जवळ तीनशे वर्षे लूट केली.

याशिवाय जोनाथन गिल हॅरिसचे 'द फर्स्ट फिरंगीज' हे पुस्तकही वाचण्यासारखे आहे. रेखा देशपांडे यांनी त्याचा अनुवाद केलेला आहे. अना फेल्ड हाऊस यांचे 'नदी आणि स्त्रीत्व' हे पुस्तक विजया देव यांनी अनुवादित केले आहे. ही दोन्ही पुस्तके पद्मगंधा प्रकाशनने प्रकाशित केलेली आहेत. टोनी जोसेफ यांचे 'द अर्ली इंडियन्स' आणि युवा नोआ हरारी यांचे 'सेपियन्स' (मानवजातीचा संक्षिप्त इतिहास) ही दोन्ही पुस्तके आपल्या ज्ञानात अधिकच भर घालतात. अशी खूप पुस्तके आहेत पण त्यांच्याविषयी आणखी केव्हातरी...!


(सुरुवातीच्या 'चांभार' या पुस्तकाबद्दलचा मजकूर संजय आवटे यांचा आहे.)
                                     🪴

No comments:

Post a Comment