Friday, December 12, 2025

विमानप्रवास...!

लहानपणी एखाद्या विमानाचा अथवा हेलिकॉप्टरचा आवाज आला की आम्ही घरातून पळत जाऊन आकाशात बघत असू. गल्लीत एखादी कार आली की तिच्यामागे धावत जात. त्यावेळी सगळी मुले घरात किंवा गल्लीत असत. विमानात बसू, कार चालवू असे स्वप्नही पडले नव्हते, पण दिवस काही घर बांधून राहत नाहीत. नोकरी लागूनही सुरुवातीची किमान पंधरा वर्षे पगार अत्यंत कमी असल्याने ही स्वप्ने पंधरा-वीस वर्षानंतरच पूर्ण झाली. लग्न, घर, गाडी, विमानप्रवास, परदेशवारी अशी जुन्या माणसांची मोजकी स्वप्नं असत. आता स्वप्ने वाढलेली आहेत.

भारतातील सर्व प्राध्यापकांनी बेमुदत संप केला ते वर्ष होतं २०१३. त्याच वर्षी दिल्ली येथे प्राध्यापकांचा मोर्चा होता. अचानक मी जायचे ठरल्याने जाताना रेल्वे व येताना विमान असा प्रवास ठरला. गोवा ते दिल्ली या निजामुद्दीन एक्सप्रेसने बेळगावहून ३६ तास प्रवास करून पहाटे सहाला दिल्ली येथे पोहोचलो. मोर्चा होता अकरा वाजता. तोपर्यंत दिल्लीतील काही ठिकाणे पाहिली. मोर्चा केला. पहाडगंज या भागातील एका रेस्टॉरंटमध्ये राहिलो. दुसऱ्या दिवशी मेट्रोने प्रवास करून लोटस टेम्पल पाहिले. राजीव गांधी चौकातील कबुतरांचे थवे आकर्षक होते. नंतर भारतातील सर्वात मोठ्या दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलो. विमानतळ असा असतो, इतका भव्य दिव्य ? चित्रपटातही त्याचे दर्शन व्यवस्थित घडत नाही. मुळात दिल्ली, विजापूर ही मुगल-आदिलशाही शहरे सपाट प्रदेशावर वसलेली आहेत. तेथे टेकड्याही अगदीच तुरळक आहेत. विमानतळ पाच हजार एकरावर पसरलेला आहे. या विमानतळावर तीन terminal आहेत. शंभरच्या आसपास gate (प्लॅटफॉर्म) आहेत. टर्मिनल तीनवर domistic gate 78 व international gate 26 आहेत. वर जाणारे व सरळ रेषेत रस्त्यासारखे जाणारे सरकते जिने (elevators), चकचकीत ब्रॅण्डेड कंपन्यांची दुकाने, विविध शिल्पे सारे काही वेगळेच विश्व होते. दिल्लीहून विमान निघाले. टेकऑफ घेताना थोडी धडधड वाढली. पहिलाच विमान प्रवास होता. पुन्हा ते गुजरात येथे अहमदाबादला सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर लँडिंग झाले. फिर दिल की धडकन बढ गयी. पुढे ते पुन्हा टेकऑफ घेऊन गोव्याला लँड झाले, म्हणजेच ती दिल्ली-गोवा व्हाया अहमदाबाद अशी फ्लाईट होती. एकाच प्रवासात दोनदा लँडिंग व टेकऑफ झाले. अर्थात दाबोलिम गोवा विमानतळ पाहिला पण तो तसा छोटा आहे. आपणासारख्या सामान्य माणसांच्या दृष्टीतून दिल्ली, मुंबई सारख्या विमानतळांची वर्णने करण्यास कित्येक पाने खर्च करावी लागतील. असो. 


मग भूतानला गेलो. भूतान छोटा, गरीब पण समाधानी देश आहे. हिमालयाच्या कुशीतील हा रम्य देश. बटाटा ही या देशाची मुख्य शेती तर हायड्रोपाॅवर आणि पर्यटन हे या देशाचे उत्पादन आहे. जगातील दहापैकी एक धोकादायक विमानतळ म्हणजे पारो. जाताना फ्लाईट नव्हती. आम्हाला duronto express या रेल्वेचे तिकीट हवे होते. ती एक शाही रेल्वेसेवा आहे. पण ती मिळाली नाही, मग पुण्याहून आझाद हिंद एक्सप्रेस मिळाली. ती ३६ तासांनी हावडा कलकत्ता येथे पोहोचली. हावडा हे भारतातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन आहे. ३६ फूट उंचीचे सर्वात उंच छत आहे. तर एकूण २६ प्लॅटफॉर्म आहेत. आमच्याकडे एक दिवस असल्याने कलकत्ता पाहिले. हावडा ब्रिज व अथांग हुगळी नदी, रेल्वे म्युझियम, कालीमाता मंदिर, मार्बलचा भव्य व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल इत्यादी पाहिले. ६४ एकरातील हा हॉल लॉर्ड कर्झनने १९०६ ते १९२१ या काळात बांधला. बंगाली रसगुल्ला, मालपुवा यांची लज्जत न्यारीच..! एक दिवस तेथे थांबून मग लाटागुडी, सिलिगुडी पाहिली. जेथे हत्ती मोर आहेत असे जंगलातील शहर म्हणजे सिलिगुडी. हिमालयातून उगम पावणाऱ्या निळ्या-खळाळत्या पाण्याच्या तिस्ता नदीच्या काठाने भारतातल्या सीमेवरील जलपाईगुडी या शहरातून भूतानमध्ये प्रवेश केला. भूतान, दार्जिलिग, सिक्कीम व गंगटोक करून परत पश्चिम बंगालमधील बागडोगरा विमानतळावरून सरळ पुणे विमानतळावर पोहोचलो. पुणे विमानतळ आंतरराष्ट्रीय असले तरी छोटे आहे. बागडोगरा हे देशांतर्गत विमान सेवा देणारे छोटे विमानतळ आहे. प्रवेशद्वारातील शिवाजी महाराजांचा ब्राझचा पुतळा तसेच पंढरीच्या वारीचे चित्र आणि मलखांबांची शिल्पे आपले लक्ष वेधून घेतात. पुणे विमानतळाला आता संत तुकाराम विमानतळ असे नाव देण्याचे प्रस्तावित आहे. कारण हा विमानतळ लोहगाव येथे आहे. लोहगाव हे ठिकाण संत तुकारामांचे आजोळ असून तेथे अनेकदा संत तुकाराम कीर्तन करण्यास येत असत.

पुन्हा एकदा दिल्ली पाहण्यास पुण्याहून गेलो. दिल्ली-पुणे केवळ दोन तासाचे अंतर. दोन दिवस दिल्ली, आग्रा ही प्रसिद्ध ठिकाणे पाहिली. कुतुबमिनार, जामा मशिद, लाल किल्ला, इंडिया गेट, ताजमहल...! मग पुणे एअरपोर्ट परिचयाचेच होऊन गेले. 

पुढे केरळला जाताना अडचण आली. मुंबई-कोचीन या रत्नागिरीहून जाणाऱ्या रेल्वेचे बुकिंग दोन महिने अगोदर सुद्धा मिळाले नाही. मग द्राविडी प्राणायाम करावा लागला. लक्झरीने कोल्हापूर-बेंगलोर केले. बेंगलोरच्या कैम्पेगौडा विमानतळाहून कोची(न) गाठले. बेंगलोर विमानतळाचे सध्या नूतनीकरण सुरू आहे. बेंगलोर, दिल्ली, मुंबई, कलकत्ता, मद्रास शहरे मोठी व विमानतळही मोठे आहेत. २००१ मध्येच बेंगलोर शहर दोन दिवस फिरून पाहिले होते. कोचीन हे प्रथमतः पोर्तुगीज व डच यांनी हस्तगत केले. याच कोचीन एअरपोर्टवर २०१५ मध्ये blind landing घडले होते. त्यावर आधारित Runway 34 हा अजय देवगण अभिनित चित्रपटही आहे.

केरळहून परत येताना तिरुअनंतपूरम विमानतळावरून हैदराबाद येथील राजीव गांधी विमानतळावर आलो. हैदराबाद एअरपोर्ट खूप छान आहे. तेथून connected flight ने पुणे गाठले. या कनेक्टेड फ्लाईटचे कधीकधी घोटाळे होतात. एकदा मी व माझा छोटा मुलगा काश्मीरला चाललो होतो. मुंबई-दिल्ली-श्रीनगर व परत श्रीनगर-दिल्ली-मुंबई अशी कनेक्टेड फ्लाईट होती. मुंबईला दोन दिवस अगोदर गेलो. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह, मंत्रालय, कसाब आला ते ठिकाण पाहिले. वरळी सी फेस टॅक्सीतून पार केला. मुंबई एअरपोर्ट पाहण्याची उत्कंठा होतीच. तीन तास अगोदर जावे लागायचे. हा अतिभव्य विमानतळ आहे. तेथे प्रवेश करतानाच त्याच्याभोवती आपली कार फिरून जाताना त्याची भव्यता लक्षात येते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने हा विमानतळ आहे. प्रवेशद्वारातच महाराजांचा पुतळा आहे. भारतातील सर्वात व्यस्त असणाऱ्या या विमानतळावरून दररोज सरासरी एक हजार उड्डाणे होतात. तेथे अकराची फ्लाईट एक वाजता निघाली. एसटीप्रमाणे विमानही उशिरा निघाले. पुढे दिल्लीची कनेक्टेड फ्लाईट अर्थातच चुकली. श्रीनगरला जाणारे चाळीस प्रवासी दिल्लीत विमानतळावरच अडकले. मग विमान कंपनीच्या काऊंटरवर हुज्जत घालून, टूर कंपनीला फोन करून दोन गटात पुढच्या दोन फ्लाईटने प्रवासी उशीरा श्रीनगरला पोहोचले. झेलम नदीच्या काठी काश्मीरचे खोरे वसलेले आहे. बारामुल्ला, कुपवाडा, श्रीनगर असे तीन जिल्हे येथे महत्त्वाचे आहेत. मोगल बादशहांनी बांधलेल्या शालिमार आणि निशांत गार्डन अतिशय रम्य आणि विस्तीर्ण आहेत. दाल लेकमधील शिकारा आणि चार चिनार गार्डन जिथे अनेक चित्रपटांचे चित्रिकरण झालेले आहे, ते पाहण्यासारखेच आहे. सफरचंदाच्या बागा आणि केशरची शेती तसेच चिनार, पाइन, देवदार, चेरी, विलो असे वृक्ष सर्वत्र दिसतात. विलोच्या झाडापासून क्रिकेटची बॅट तयार करतात. श्रीनगर छोटे विमानतळ आहे. परत येताना कनेक्टेड फ्लाईट वेळेवर मिळाल्या. श्रीनगर ते कन्याकुमारी असा भारताच्या नकाशावर सरळ उभ्या रेषेत हायवे आहे. याच हायवेवरती केव्हाही विमान लँड करता यावे इतके एका ठिकाणी रुंदीकरण केलेले आहे.

पुणे-दुबई हे अंतर तीन तासाचे. दुबई एअरपोर्ट ऐसपैस पसरलेला व श्रीमंत आहे. अबुधाबी, दुबई, शारजाह अशी सात संयुक्त अरब अमिरात राष्ट्रे (UAE) एकत्र आली आहेत. ही छोटी छोटी शहरेच आहेत. त्यामुळे शेजारचे अबुधाबीही पाहिले. पाकिस्तानी लोकांना मुंबईचे आकर्षण आहे तर मुंबईच्या लोकांना (भारतीयांना) दुबईचे...! वर्णन करण्यापेक्षा दुबई प्रत्यक्ष पहावीच. आठ-आठ असे सोळा पदरी रस्ते, रस्त्यावर सर्वत्र कार दिसतात. मालवाहतुकीची वाहने खूप कमी, टू व्हीलर नाहीत. कुठेही हॉर्न ऐकू येणार नाही. ट्रॅफिक पोलीस दिसणार नाही. अपघात नाहीत. सोन्याची चप्पल, पर्स, गाऊन इतकेच काय सोन्याची नाणीही. जगातील सर्व दुबईत आणण्याचा अट्टाहास येथील राजेशाहीचा आहे. पहिला आयफोन दुबईत येतो मग इतरत्र..! टेस्ला कार दुबईत आहे. दुबईवर स्वतंत्र असं लिहावे लागेल.

राजस्थानचे जयपूर विमानतळ राजेशाही थाटाचे आहे. मारवाड व मेवाड अशा दोन भागात राजस्थान पहावा लागतो. अर्थात दोनदा. बिकानेरची गजक मिठाई छान आहे. पण तेथेच सतीची मंदिरे आहेत. प्रचंड संख्येने एकत्रित अनेक स्त्रिया सती गेल्याच्या खुणा (त्यांच्या हातांची शिल्पाकृती छाप) जागोजागी दिसतात. राजस्थानचा खेजडी वृक्ष प्रसिद्ध आहे, त्याच्या सांगरी या फळांची भाजी करतात. याच वृक्षाला आपल्याकडे शमीचे झाड म्हणतात, ज्यावर पांडवांनी आपली शस्त्रे वर्षभर लपवली होती. जोधपूरला काळविटांचे अभयारण्य आहे. श्रीलंकेत ज्याप्रमाणे हत्तींचे अभयारण्य आहे तसेच बिकानेरमध्ये उंटांसाठी नॅशनल रिसर्च सेंटर (ICAR) आहे. राजस्थान व लडाखमधील उंट आहेेेत. भारतात किमान चार Elephant Sanctuaries आहेत, पैकी जयपुर मधील एलिफंटास्टिक (Elefantastic) खूप छान आहे. पुणे ते जयपूर अथवा जोधपूर असे जाता येते. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राचे पुणे हे जंक्शन विमानतळ आहे. 

मुंबईहून मॉरिशसला जावयास सहा तास लागतात. अर्थात दोन तासापेक्षा जास्त प्रवासात जेवणाच्या वेळी जेवण असतेच पण जेवणापूर्वी व नंतर सर्व प्रकारची पेयेसुद्धा असतात. प्रत्येक प्रवाशांच्यासमोर स्क्रीन असते. गाणी, चित्रपट पाहता येतात. Tata Vistaraचे विमान होते. रतन टाटाच्या मृत्यूपूर्वी २०२४ मध्ये ही कंपनी बंद झाली. ती एअर इंडियात विलीन झाली. मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईस येथे सर शिवसागर रामगुलाम एअरपोर्ट आहे. हे देशाच्या पहिल्या पंतप्रधानांचे नाव. अगदी छोटे विमानतळ, ते सुद्धा एकच. या बेटाची लोकसंख्या फक्त तेरा लाख. २०४० किलोमीटर वर्ग क्षेत्रफळ. दरडोई उत्पन्न वार्षिक बारा लाख रुपये आहे. येथे पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना खूपच मानाचे स्थान आहे. अलीकडे शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला आहे. स्वच्छ सुंदर निसर्गरम्य बेट आहे. अर्थात चोहीकडे निळ्याशार नितळ पाण्याचे समुद्रकिनारे आहेत. भारतीय लोक खूप आहेत. त्यामुळे हनुमान, गणेश, काळभैरव, महादेव, कालीमाता, विठ्ठल यांची मंदिरे आहेत. ऊस हे प्रमुख उत्पादन. साखर आफ्रिकेला निर्यात होते. येथेही हॉर्नचा आवाज ऐकू येत नाही. अपघात नाही. येथला बदकासारखा राष्ट्रीय पक्षी 'डोडो' नष्ट झाला आहे. तो फ्रेंच-पोर्तुगीज यांनी मारून खाल्ला. आता फक्त नावालाच शिल्लक आहे. 

परत मुंबई-कोलंबो विमानतळाच्या भेटी, अर्थातच श्रीलंकेमुळे झाल्या. कोलंबो साधा विमानतळ आहे. श्रीलंका गरीब पण निसर्गाने समृद्ध देश आहे. सुंदर रस्ते, खळाळत्या नद्या, घनदाट जंगल, प्रवाळाचे खडे, हत्ती यामुळे हा देश ओळखला जातो. भात, केळी, नारळ, सुपारी हेच उत्पन्न आहे. बाकी फारशी प्रगती नाही. श्रीलंकेतील Pinawala Elephant Orphanage पाहण्यासारखे आहे. श्रीलंकेची सहल अविस्मरणीयच होती. कोलंबोचा समुद्रकिनारा, सर्वत्र घनदाट जंगल, सुंदर वळणदार रस्ते, खळाळत्या स्वच्छ पाण्याच्या नद्या सारेच नयनरम्य होते. आम्ही गेलो दक्षिण श्रीलंकेत जेथे हिंदी महासागर आणि अरबी समुद्र एकत्र येतो त्या समुद्री पाण्यापर्यंत..! कोलंबो, गले, मारले, कॅंडी, नाॅवरा इलिया, डेम्बुला, बेनटोटा ही ठिकाणे आणि अनाथ हत्तींचा Pinnawala Elephant Orphanage पाहिला. Ramboda Waterfall प्रचंड होता. गोल्डन टेम्पल व १५३ बुद्ध मूर्तींची गुहा आश्चर्यचकित करते. सगळ्यात भारी Sigiriya Rock Fort.... आम्ही फक्त सहाजणच वर गेलो, रायगडसारख्या चौदाशे पायऱ्या..! चौदाव्या शतकातील एका राजाची राजधानी. मग gorge lack, turtle hatchery, अशोक वाटिका, स्पाइस गार्डन, व्हिक्टोरिया गार्डन या गोष्टी होत्याच.

आता परत पुणे-दिल्ली-लेह (कुशोक बकुला रिम्पोची एअरपोर्ट) असा प्रवास सुरू आहे. सारा प्रवास रात्रीचा...! रात्री दहा ते बारा पुणे नंतर दिल्ली विमानतळावरून Terminal 3 वरुन दिल्ली ते लेह असे हिमालयाच्या पर्वतरांगावरून उड्डाण...! सकाळी लवकर पाचवीसला उगवणारा सूर्य पूर्णपणे तळपत होता. त्याखाली आमचे विमान, त्याखाली ढगांचे पुंजकेच्या पुंजके, त्यातून हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगा आणि खोल दऱ्यातून वाहणारे खळाळते पाणी असे दृश्य विमानातून मनाला मोह घालत होते. लेह पांढऱ्या दगडमातीने आणि हिमालयातील टेकड्यांनी वेढलेले एक छोटे शहर आहे. आता अद्ययावत नवीन विमानतळ बांधकाम सुरू आहे.

ऑक्टोबरच्या शेवटी व नोव्हेंबरच्या सुरुवातीला (२०२५) अंदमानला भेट दिली. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून अंदमानच्या पोर्ट ब्लेअर राजधानीत सलग तीन सव्वातीन तास प्रवास होता. नारळीच्या फांद्या व हिरव्यागार वृक्षराजीने झाकलेले अंदमान हे बेट विमानातून खूप छान दिसते. ही छोटी छोटी पाचशे सत्तर बेटे आहेत. निळ्याशार पाण्याचे समुद्रकिनारे आणि त्या पाण्यातील विविध आकाराची कोरल, रंगीबेरंगी मासे पाहताना एका वेगळ्याच दुनियेत आपण पोहोचतो. तेथील बेटांना आता भारतीय नावे दिलेली आहेत. रॉस आयलँडचे आता नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप, हॅवलॉकचे स्वराज्यदीप तर पोर्ट ब्लेअर विमानतळाचे वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव झालेले आहे. छोटाच एअरपोर्ट आहे..! हॅवलॉकचा राधानगर हा जगातील सातपैकी सर्वात स्वच्छ निळ्याशार पाण्याचा व सुरक्षित समुद्रकिनारा आहे. सेल्युलर जेल व तेथील लाईट साऊंड शो पाहण्यासारखा आहे.

वंडूर येथील महात्मा गांधी मरीन नॅशनल पार्कमध्ये एकूण सतरा बेटांचा समूह आहे. तेथे needle, finger, seafan, honeycomb, sun, bubble, black अशी कोरल बघायला मिळतात. Jolly boux हा आयलँड दरवर्षी १६ नोव्हेंबरपासून सहा महिने सुरू असतो व सहा महिने बंद असतो. अंदमानमध्ये क्षेत्रीय मानव विज्ञान संग्रहालय (anthropological), Naval Marine  Museum (Samudrika) ही संग्रहालये खूप छान आहेत. तेथील Chatham Government  Saw Mill प्रसिद्ध आहे. जपानी लोकांच्या ताब्यात ती होती. ब्रिटिशांनी १९४३ मध्ये तेथे बॉम्ब हल्ला केला. १९१८ मध्ये दुर्गाप्रसाद (०७/०१/१९०० ते ३०/०५/१९७३) हा वन अधिकारी सेवेत होता. त्याला १९४२ ला चाथम आरा नष्ट करण्यास ब्रिटिश सरकारने सांगितले, पण त्याने ती नष्ट केली नाही. अंदमान येथे Jarawa ang, Onge, Sentinelese, Shompens या जातीचे आदिवासी राहत होते. Sentinelese या आदिवासींच्या वीस झोपड्या अगदी एका कॉलनीप्रमाणे एकत्र जोडलेल्या असतात. दक्षिण अंदमान येथे पश्चिमेला ते राहतात. सध्या त्यांची लोकसंख्या फक्त ३९ (२०२० मध्ये) आहे. भारतात नागालँडमध्ये नागा, मेघालयमध्ये Khasi आणि आसाममध्ये Bodo तर साऊथ आफ्रिकेमध्ये Kung हे आदिवासी राहत होते.


भारतात छोटे-मोठे पाचशेच्या आसपास विमानतळ आहेत. मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर, अहमदाबाद, गोवा, जयपूर, पोर्ट ब्लेअर, अमृतसर हे सर्वात व्यस्त विमानतळ आहेत. विविध कंपन्यांची विमाने आहेत. आता संजय घोडावत ग्रुपची स्टार विमानसेवाही समाविष्ट झालेली आहे. दिल्ली (DEL), दुबई (DXB), मॉरिशस (MRU) अशी सांकेतिक नावे असतात. अर्थात हे सारे प्रत्यक्ष अनुभवावे असेच आहे. अजून खूप पल्ला गाठावयाचा आहे. वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थी मित्र डाॅ. संदीप भुयेकर आहे. दिल्ली विद्यापीठात डाॅ. तेजस चव्हाण आहे. त्यामुळे वाराणसी, इजिप्तचे कैरो, लंडनचे हिथ्रो तशीच थायलंड, सिंगापूर, मलेशिया येथील एअरपोर्ट पहावयाचे आहेत. शताब्दी आणि वंदे भारत या एक्सप्रेस रेल्वेमधून प्रवास करायचा आहे. अरुणाचल प्रदेशातील Zero Valley त महिनाभर राहायचे आहे. भारतातील ते प्रदूषणरहित, स्वच्छ, सुंदर आणि निसर्गरम्य गाव आहे. भारताचा नायगारा म्हणजे जगदळपूरचा चित्रकूट धबधबा ऑगस्टमध्ये व ऑक्टोबरमध्ये असा दोनदा बघायचा आहे. तो छत्तीसगड या राज्यात आहे. यादी खूप मोठी आहे, मग तिला wish list म्हणा नाहीतर bucket list म्हणा...!
                                                              🪴🪴🪴

No comments:

Post a Comment