Friday, December 29, 2023

अडगळीत गेलेले शब्द....!

अडगळीच्या खोलीत गेलेले शब्द

ऑफिस मधून घरी आलो तर मुलगी क्राफ्ट चा पसारा मांडून अस्ताव्यस्त मांडी घालून काहीतरी  करत होती.
म्हंटलं "काय गं अशी फतकल मारून बसलीस मधेच!”
तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह?
फतकल ??? 

मध्ये बहिणीकडे गेलो असताना भाचीला म्हंटलं, "माझी बॅग जरा खुंटीला लटकवून ठेव.” तर फिदीफिदी हसली,
म्हणते "शी s s खुंटी ?"
What’s that?”

आता काय सांगू तिला. माझा जन्म आमच्या वाड्यात झाला, त्यामुळे खुंटी, कोनाडा, फडताळ, ओगराळ, रोळी, घंगाळं,
ओटी, परसदार, माडी, पोटमाळा हे रोजच्या वापरातील शब्द होते.

किती उशीर झाला रे शिऱ्या, दिवा “मालव” आता. असं आज्जी हमखास म्हणायची. कोकणात दिवा दवड म्हणतात.
जेवताना आजी नेहमी “गोविंद” (एक घास) काढून ठेवायची.

हल्ली…..
वाती “वळायच्या” नसतात तर विकत मिळतात.
जेवणाचं “पान” वाढायचे नसते तर serve करायचे असते.
भात वाढ म्हणायचे नसते तर भात दे म्हणायचे असते.
देवघरातील वात “शांत” करायची नसते तर विझवायची असते.

चंदनाचे खोड आणि सहाणे ची जागा रेडिमेड गंधाच्या खडूने घेतलीय. पिंजरीची जागा टिकली न घेतलीय. बुश शर्ट ची जागा टी शर्ट ने घेतलीय. नऊवारी लुगड्याची जागा शिवलेल्या “saree” नं घेतलीय.

खाण्याची “बशी” नसते तर प्लेट/डिश असते.
चहाची बशी हा प्रकार तर इतिहास जमा झालाय.
थालीपीठ थापायला पळसाचे/केळीच पान नसतं तर प्लास्टिक शीट असते. ते भाजायला बिडाची काहिल जाऊन नॉनस्टिक तवा आलाय. कात्रीची सीझर झालीय, तर शिवण यंत्र sewing machine झालंय.

मूळात शीर्षक दिसताच लक्षात येते की ‘अडगळ’ हा शब्दच अडगळीत गेला आहे. पूर्वी प्रत्येक घरात एक अडगळीची खोली असायची. सगळ्या नको असलेल्या, परंतु कधीतरी कामास येणार्‍या वस्तू तेथे जाऊन पडायच्या... 

जुनी घरे आठवताच तसे शब्द खूपच आठवायला लागतात. ओटी, ओसरी, पडवी, परसू, माजघर, बळद, कोठीघर हे शब्द विसरायला झाले आहेत.  ‘वळचण’ हा असाच एक अडगळीत गेलेला शब्द. वळचण म्हणजे छपराचा भिंतीच्याही पुढे आलेला भाग. ऊन-पावसापासून घराचे संरक्षण होण्यासाठी तो तसा ठेवलेला असायचा.

घराची वळचण ही गुरा-ढोरापासून आगंतुकापर्यंत सगळ्यांचं विसाव्याचं ठिकाण होतं. कोणीही तेथे विश्रांती घ्यावी असं.
पागोळं म्हणजे काय? वळचणीवर पाऊस पडल्यानंतर बहुतेक पाणी ‘पन्हळी’ तून जमिनीत जातं. पण तरीही बरेच चुकार थेंब पन्हळीतून न येता इकडून तिकड़ून खाली येतात; ती पागोळी.

‘फडताळ’… फडताळ म्हणजे भिंतीतील कपाट. खुंटी, कोनाडे, देवड्या हे असेच अडगळीत गेलेले शब्द.
जुन्या घरातील न्हाणीघर (बाथरूम) असंच. ऐसपैस चुलाण्यावर पंचवीस-तीस लिटरचा हंडा तापत असायचा. दगडी चौरंग, अंग घासायला ‘वज्री’, ‘घंगाळ’ असायचे. तेही असेच कालबाह्य झाले.

गृहिणीची कुंकवाची पेटी, त्यातील आरसा, फणी, करंडा, मेणाच्या डाबल्या सहित गडप झाली. सामान्य स्त्रीला शृंगारासाठी एवढं साहित्य पुरेसं व्हायचं. आता व्हॅनिटी बॉक्सेस आल्या. प्रसाधनं त्याच्यात, डोळ्यात व दुकानात मावेनाशी झाली. लहान मुलीच्या वेण्या घट्ट लोकरीच्या धाग्याने बांधल्या जायच्या, त्याला ‘आगवळ’ म्हणायचे. हाही शब्द अडगळीतच गेलेला.

स्वयंपाकघरातील चूल गेली त्याचबरोबर चूल, वैल, निखारे हे शब्दही गेले. स्वयंपाकघरातील सतेली, तपेली, कथली, रोवळ्या, गंज हे शब्द आठवेनासे झाले. ओगराळं हा शब्दही असाच अडगळीत गेलेला. पंचपाळे, चौफुले, कावळे हे सगळे हरवले. देवघराबरोबर सहाण, गंधाची थाटी गायब.

‘काथवट’ हा शब्द तर इतिहासजमा झालेला. काथवट म्हणजे लाकडी परात, हिंदीतली ‘मन चंगा तो कथोटी में गंगा’ ही म्हण त्यावरूनच आलेली.

कपड्यांचा विचार करताना तठव, जाजम, बसकर, सुताडे सगळे हरवून गेलेले. सोवळ्यात नेसण्याचा पितांबर हा शब्द ऐकू येतो, पण उत्तरवस्त्र ‘पाभरी’ हरवून गेली. सोवळ्यात नेसण्याची ‘धाबळी’ सोवळ्याबरोबर कालबाह्य झाली.

सोन्याचे भाव गगनाला भिडले आणि जुने सोन्याचे अलंकार विसरले गेले. कोठीघरातील कोठय़ा आहेत; पण कणग्या, ढोल्या - ज्यात भरपूर धान्य भरलेले असायचे त्या गडप झाल्या. सूप खुंटीवरून बाउल मधे आलं.

एखाद्या वर्षी जेव्हा शेतात खूपच भरपूर धान्य येईल तेव्हा अडीअडचणीसाठी अंगणात मोठेमोठे ‘पेव’ खणून त्यात ते धान्य साठविले जाई. एकेका पेवात कमीत कमी दहा-दहा पोते साठविले जाई.

जेवण्याची पितळी, वाटकावन, बसकर, मडक्यांची उतरंड, फुंकणी, उखळ, मुसळ, खल आणि बत्ता, जातं, खुंटा, पावशेरा, शेर, मण, गुंज, आतपाव, छटाक वगैरे गायब झाले.
बदलत्या काळाबरोबर पिकदानी सोडून सगळीकडे बिनधास्त आणि बिनदीक्त पान, पानपराग आणि माव्याच्या पिचकाऱ्या टाकणे हा जणू आता हक्क झाला आहे.

‘अ’ अडकित्त्याचा हळूहळू हद्दपार होऊ घातला आहे.
उंचीवर घर असेल तर घरात प्रवेश करण्यासाठी उताराचा रस्ता असायचा, त्याला चोप म्हणत असत.. घरात प्रवेश केल्यावर लगेचच दोन्ही बाजूला बैठक असायची, तिला ढाळज किंवा ढेळज म्हणत.. ही पण अडगळीतील नावे आहेत …

लाइट आले आणि अनेक तर्‍हेचे दिवे गडप झाले.
काळानुसार आणि गरजेनुसार असे अनेक शब्द गडप होत असतात तसेच खूप नवेनवे शब्दही वापरात येत असतात. भाषा ही सतत समृद्धच होत असते. विकास आणि प्रगती ही सतत चालूच राहणार आहे, फक्त गेल्या अर्धशतकात पूर्वी प्रचलित असलेल्या पण विसरल्या गेलेल्या शब्दांची सहज आठवण झाली म्हणून हा सारा शब्दप्रपंच, इतकेच…! 

काही अडगळीत मावळत चाललेले मराठी शब्द

तांबडं, कडूसं, येरवाळी, इदुळा, आवसं, पारुख, घटका, पळे, औंदा, यंदा, परूस, टिच, इत, हात, वाव, काखवाव,  मैल, फर्लांग, मोगली, कुड, बारव, आड, कनिंग, कनगुलं, डुरकुलं, झाप, डालगं, दुरडी, परडी, टोपलं, तिकाटनं, मेडकं, आडू, वलन, वासा, भानुसा, खुराडा, आंगण, वटा, रांजण, सारवण, पोतारा, वळचण, पागोळ्या, कलवड, सूरपारंबा, विटी-दांडू, लोम्पाट, हुतुतू, शिवनाभानी, दस्ताडपुगडं, लंगडी, जिबल्या, चुळचुळमुंगळा, आकरा टोकरा, आईचं पत्र हरवलंय, माचाळ, पोहरा, कोरड्यास, कालवण, घासलेट, टकूचं, कुंची, शेलकाट, पैरण, बाराबंदी, आंगरटं, छाटण, मुडासं, पटका, टोपी, लुगडं, चोळी, पोलकं, फडका, गवन,  कांबळ, वाकळ, घोंगडं, लेपाटं, पासोडी, रकटं, चादर, वाकी, मासोळी, बाळी, भिकबाळी, बुगडी, बिंदली, कुडकी, वजरटीक, सर, कमरपट्टा, करदुडा, तोडा, वाळा, औत, कुळव, फरांडी, डुबं, तिफण, चाडं, नळं, जानवळं, इळत, इडी, दिंड, फाळ, फारुळं, रुमणं, शीवळ, जु, कुरडिकं, खिळ, सापती, कुळव, पास, दातुळ, काडवान, आवूड, बराड, काकरी, मुरडान, तास, आडतास, वसान,  दोरकांड, दावं, कानी, कासरा, चऱ्हाट, चिलबल, बिरडं, येटान, बुटयेटान, आक्री, आक, तुंबा, आरा, पुट्टा, कुनी, धाव, डोंबाळा, घोडकं, ढकली, खुटला, पाटली, शिड्या, मुंगा, खोडकी, ढोणगी, चारबैली, सहाबैली, हाताळी, वेसण, म्होरकी, चौरी, माचाटी, झुली, मुंगसं, चावऱ्या, छकडा, नळा, राखोळी, वळती, आटोळा, गोफण, पिचका, बुजगावणं, कुडी, गांजवा, चुकारी, उतार्‍या, अर्धली, करडू, ताटली, परात, तंबुलं, लोटकं, तवली, भगोनं, हांडा, घंगाळं, चरवी, गुंडगी, चमचा, वग्राळं, पळी, चाटू, कावळा, वाडगा, परात, पितळी, वाटी, तांब्या, पेला, गडू, गडवा, चंबू, किटली, खिसनी, गाळणी, शेवगा, झाऱ्या, सांडशी, चिमटा, काठवट, बेलणं, उखळ, ठोंबा, मुसळ, सूप, जातं, खुटा,  पाटा, वरवंटा, कंदिल, चिमणी, टाक, दौत, शाई, पत्र, टिप कागद, इळा, खुरपं, कोयतं, नारगत, भाला, खलबत्ता, शेम्ब्या, झूल, वाळंन, फुकारी, दिवळी, फरताळ, तुळई, किलचान, हालकडी, आडू, सवनं, माचाड, वरवटा, बाजवा, आड्याळं, दंड्याळं, लाखान, मिट्या, आसूड, इळत, वडवान, मोट, नाडा, सोंदुर, चाक, कणा, कणंपट्टी, चाकपट्टी, फावडं, घमेलं, कुऱ्हाड, कुदळ, सांगुळा, थारुळा, हौद, हेळ, मोगळा, पाचुंदा, पलान, दंड, आटवनी, आवातनं, न्याहारी, वानवळा, भलरी, काढणी, मळणी, बडवणी,  बुचाड, खळं, माजनं, ढवरा, भंडारा, रास, मदान, वावडी, हातनी, वाफा, सरी, वरंबा, सारा, वसारी, आमुनं, इर्जिक, सांगड, पैरा, शेम्ब्या, झूल, चंगाळं, फुकारी, मोगा, मोरवा, झाकणी, सुगाड, शेर, आटवा, चिपटं, मापटं, कोळवं, नीळवं, खंडी, मण,पसा, वंजळ, भारा, उतरंड, ढेपन, आळी, चावडी,  गावपांढर, शीव, गावकूस.

विचार करा यातील किती शब्द आजकल वापरले जातात व आपल्या पुढील पिढीपर्यंत किती शब्द पोचतील.
                                                               
                                       🪴

No comments:

Post a Comment