Tuesday, January 28, 2025

मराठी भाषा : रोजगाराच्या संधी

' मराठी भाषा : रोजगाराच्या संधी ' 

कोल्हापूर जिल्हा 

डॉ.अनिल गवळी 
(माजी अधिष्ठाता, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) 

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाचा मराठी विभाग आणि कोल्हापूरचे महावीर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे. यामध्ये ३६ जिल्हे ३६ व्याख्याने या अंतर्गत 'मराठी भाषा : रोजगाराच्या संधी' या विषयावर मार्गदर्शन होत आहे. या उपक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उषा पाटील, महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी संदीप साबळे आणि शरद यादव तसेच शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे आणि महाविद्यालयाच्या मराठी विभागातील सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्रहो....

भाषा म्हणजे विचार, मत आणि भावना एकमेकांशी व्यक्त करण्यासाठी अथवा मनाशीच व्यक्त करण्यासाठी केलेला संवाद होय. माणूस बोलतो त्या पाठीमागे सामाजिक संकेत असतात. ध्वनि, अक्षरे व शब्द यांची रचना असते. इंग्रजीमध्ये २६ ध्वनी आहेत तर मराठीमध्ये ५२ ध्वनी आहेत. प्राणी सुद्धा बोलतात, त्याच्यामध्ये हत्ती, मोर कुत्रा इतकेच काय मधमाश्याही बोलतात. मात्र हरीण वाघाचा आवाज काढू शकत नाही. मनुष्य मात्र सर्वांच्या नकला करू शकतो. जर लिपीच नसती तर काय झाले असते ? त्यावेळी हावभावाची भाषा होती. अर्थात भाषा ही देणगी नाही. ती शिकावी लागते. त्याचप्रमाणे जगभरात सहा हजार भाषा आहेत. भारतामध्ये साधारण आजमितीला बोलीभाषेसह आठशे भाषा शिल्लक आहेत. महाराष्ट्रामध्ये ६५ भाषा आहेत. त्याच्यामध्ये कोल्हापुरी, चंदगडी, सोलापुरी, मालवणी अशा बोलीभाषा आहेत. भाषांचे सर्वेक्षण झालेले आहे. त्याचे दोन मोठे प्रयत्न आहेत. १८९८ ते १९२८ या कालखंडामध्ये जॉर्ज अब्राहम गिअर्सन या आयरिश व्यक्तीने पहिले भाषिक सर्वेक्षण केले होते; दुसरे म्हणजे 'भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण'. बडोद्याचे गणेश देवी यांनी भारतातील एकूण आठशे भाषा व बोलीभाषा यांचे संकलन केलेले आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा १७ वा खंड आहे. फॅमिलीज ऑफ लँग्वेजेस म्हणजे भाषाकुल असतात. इंडो युरोपियन हा सर्वात मोठा गट आहे. याच्यामध्ये संस्कृत, मराठी,  इंग्रजी,हिंदी, स्पॅनिश, रशियन, पोर्तुगीज, फ्रेंच, जर्मन, जापनीज, डच अशा उत्तम उत्तम भाषा येतात. जगामध्ये मेंडोरीन ही चिनी तिबेटियन भाषा गटातील एक नंबरची भाषा आहे. त्यानंतर स्पॅनिश, इंग्रजी हिंदी या भाषांचा क्रम लागतो. मराठी ही पंधराव्या-सोळाव्या क्रमांकाची भाषा असून जगभरामध्ये एकूण १४ कोटी लोक मराठी भाषा बोलतात. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आणि मराठी भाषेतील रोजगाराच्या संधी का सांगायच्या ? आपणास वाटते की हळूहळू आपली मराठी कोणी बोलणार नाही. पण भाषा टिकवणे हे आपलेच काम आहे. १४ कोटी लोक बोलतात म्हणजे मराठी भाषा नष्ट होणार नाही. तसेच ती पहिल्या वीस क्रमांकात येणारी भाषा असल्याने टिकून राहणारी भाषा आहे. अगदीच उदाहरण द्यायचे तर कॅनडासारख्या देशांमध्ये इंग्रजी आणि फ्रेंच यांच्या बरोबरीने तिसरी भाषा पंजाबी भाषा आहे. जी भाषा बोलणाऱ्या समाजास व्यवसाय देऊ शकत नाही, स्वतःचे मत मांडू शकत नाही, स्वतःचे व्यक्तिमत्त्व उभारण्यास अपुरी पडते ती भाषा समाज सोडून देतो असे म्हटले जाते. मराठीचे तसे नाही. २१ व्या शतकाच्या अखेरीपर्यंत जगभरात ३०० भाषा राहतील त्यात आपली मराठी ही एक भाषा असेल. मराठी समाज व समाज माध्यमावर ती राज्य करते. महाराष्ट्राच्या राजकारणाची व न्यायालयाची भाषा इंग्रजी बरोबरच मराठी आहे. ती अतिशय सर्जक व सुंदर आहे. तिला अडीच हजार वर्षाची बोलीची व साहित्याची परंपरा आहे; म्हणून ती अभिजात आहे. 'अवघाचि संसार सुखाचा करीन' असे म्हणणारे ज्ञानेश्वर अथवा 'लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा' असे म्हणणारे तुकाराम या भाषेचे पाईक आहेत. या भाषेतील संधी आपण जाणून घेऊ या....

प्रथमत: भारतासारख्या बहुभाषिक देशात अनेक भाषा आपणाला शिकाव्या लागतील. जगातील इतरही महत्त्वाच्या भाषा शिकाव्या लागतील. आपण मराठी भाषिक आहोत म्हणजेच आपणाला मराठी बरोबरच हिंदी, पंजाबी, गुजराती या भाषा येतात असे गृहीत धरावे लागेल. त्याचबरोबर फ्रेंच, रशियन, इंग्रजी, जापनीज, जर्मन, स्पॅनिश यापैकी दोन भाषा आपणाला शिकाव्याच लागतील. म्हणजेच साधारण मराठीसह चार ते पाच भाषा आपणाला शिकाव्या लागतील. त्यामुळे आपणाला मराठीतील व इतर भाषेतील रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. त्यात सर्वात महत्त्वाचे क्षेत्र आहे ते अनुवादाचे. जगभरामध्ये अनुवादाचे काम सुरू आहे. त्याच्यामध्ये विशेषतः भारतात साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, राज्य मराठी विकास संस्था त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे भाषा संचालनालय अथवा मराठी भाषा विभाग हे काम करतात. याचबरोबर खाजगी प्रकाशने सुद्धा भरपूर आहेत. तेथे वेगवेगळ्या उत्तम उत्तम पुस्तकांचे अनुवाद केले जातात. याशिवाय भारतभरामध्ये अनेक राज्यांच्या राज्यभाषा आहेत, तेथे वेगवेगळ्या भाषांमध्ये दैनिकात येणाऱ्या जाहिराती, येणाऱ्या बातम्या, लेख यांचे सुद्धा भाषांतर अथवा अनुवाद करावा लागतो. बऱ्याच वेळेला दोन देशातील उद्योग जेव्हा आयात अथवा निर्यात होतात त्यावेळी त्या उद्योगातील लहान सहान गोष्टी किंवा एखादा कारखाना उभा करावयाचा असेल तर त्या कारखान्याचे विविध विभाग (पार्ट्स) यांची नावे याबद्दलही अनुवादकाचे काम करावे लागते. जगभरातील पर्यटक गोव्याला येतात.  तेथे फाईव्ह स्टार, सेव्हन स्टार हॉटेलमध्ये फ्रेंच, रशियन, इंग्रजी अशा भाषांमध्ये मेनू कार्ड ठेवावे लागते. तेथेही अनुवादक म्हणून काम करता येते. ऑनलाइन अनुवादकाचे काम संदीप नूलकर करतात. त्यांची 'Mind it', 'शब्दांशब्दांत' ही पुस्तके जर आपण जाणून घेतली तर अनुवादकाचे काम किती महत्त्वाचे हे लक्षात येईल. संदीप नूलकर लँग्वेज इंडस्ट्री एक्सपर्ट, स्क्रिप्ट रायटर, सब टायटल राईटर म्हणून प्रसिद्ध आहेत.

राष्ट्रीयकृत बँकांच्या परीक्षा अथवा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजी भाषेचा पेपर असतो. तसेच काही वेळेला मराठी भाषेचाही पेपर असतो. या पेपरमधील प्रश्नांची तयारी करण्यासाठी मराठी भाषेचे व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असते. एमपीएससी व यूपीएससीला अनुक्रमे मराठी व इंग्रजी पेपर असतो. त्यात निबंधलेखन, कल्पनाविस्तार, म्हणी व वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करणे यासारखे प्रश्न असतात. 'पी हळद हो गोरी', 'अगं अगं म्हशी मला कुठे नेशी', 'हातच्या काकणाला आरशा कशाला?', 'आपलेच दात आपलेच ओठ'  यासारख्या म्हणींचा अर्थ विद्यार्थ्यांना सांगता येत नाही हे आजचे वास्तव आहे. भाषा विषय कच्चे असल्यामुळे त्या अभ्यासपत्रिकेचे गुण कमी मिळतात व एकूण गुणांकन कमी आल्यामुळे त्या विद्यार्थ्याचे मेरीट कमी येते तसेच भाषिक कौशल्याची कमतरता असल्याने तो मुलाखतीला उत्तमपणे सामोरा जाऊ शकत नाही. अर्थात महाराष्ट्रातील  मराठी भाषिकांचे इंग्रजी कच्चे असते तसेच बारावीपर्यंतचे शालेय मराठी सुद्धा तितकेसे पक्के होत नाही;  याकरिता उत्तम शब्दसंग्रह असणे, चांगली वाक्यरचना करता येणे आणि भाषिक संकल्पना पक्क्या करणे महत्त्वाचे असते. व्यक्तिमत्त्व (Personality) आणि व्यक्तिमहत्त्व (Importance of Person) यातील फरक विद्यार्थ्यांना कळत नाही. तो समजला पाहिजे. हळूहळू भाषिक संकल्पना पक्क्या केल्या पाहिजेत. वृत्तपत्रात आणि प्रकाशन व्यवसायामध्ये सुद्धा यासाठीच मुद्रित शोधक हवे आहेत. त्यांना शब्दांची उत्तम जाण पाहिजे. त्यांचे शालेय व्याकरण पक्के असावयास हवे. तत्सम व तद्भव शब्दांची त्यांची ओळख असावयास हवी. हल्ली चांगले मुद्रितशोधक मिळत नाहीत. त्याचबरोबर मराठी लघुलेखक (Shothand writer) सुद्धा मिळत नाहीत. जिल्हा ते मंत्रालय स्तरावर विविध अधिकाऱ्यांकडे असे पद असते. अर्थात तेथे शुद्धलेखन व वाक्यरचना यांना महत्त्व आहेच. असा काही कोर्स आहे याची कल्पना मराठीच्या विद्यार्थ्यांना नसते. कार्पोरेट क्षेत्रातही आता अनुवादक, मुद्रित शोधक व लघुलेखकांना संधी आहे. त्या ठिकाणी पत्रव्यवहार करण्याकरिता भाषेची जाण असणाऱ्या व्यक्ती मिळत नाहीत. पत्राचा मसुदा तयार करता येत नाही. त्याचबरोबर शुभ संदेश देणे, जाहिरात तयार करणे, उत्तम लेख तयार करणे, वीणा वर्ल्ड  अथवा केसरी सारख्या ट्रॅव्हल कंपन्यांची लेखवजा जाहिरात करणे या गोष्टी सुद्धा कार्पोरेट क्षेत्रामध्ये होत असतात. हल्ली राजकारणातही उत्तम बोलणाऱ्या व्यक्तीस वक्ता म्हणून मागणी येत आहे. सध्या दिल्लीच्या निवडणुका होत आहेत;  अशा वेळी हिंदी भाषेवर मांड असणाऱ्या मुलामुलींना मागणी आहे. उमेदवारांची भाषणे लिहून देण्याचे काम अशा व्यक्ती करू शकतात. केंद्राच्या अनेक जाहिराती प्रथमत: इंग्रजीत किंवा हिंदीत असतात पण नंतर त्या त्या राज्यातील भाषेत अनुवादित केल्या जातात. दैनिकांमध्ये छापल्या जातात. या अनुवादाचे कामसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. वृत्तवाहिन्यावर बातमी देणे किंवा वाचणे अशा पद्धतीने दृकश्राव्य काम करताना आपणाला उत्तम भाषा अवगत असणे महत्त्वाचे आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीवर या पद्धतीने काम चालते. त्याचबरोबर तेथे विविध चॅनेलवर  नाट्यलेखन, कथा मालिका लेखन, पटकथा लेखन, गीत लेखन, कॉपीराईटर अथवा संहिता लेखन, जिंगल्स लेखन, पोस्टरची निर्मिती, प्रसिद्धीपत्रक लेखन, उद्घोषणा अशी विविध भाषाविषयक कामे करता येतात. याचबरोबर शासनाची जनसंपर्क कार्यालये असतात तेथे भाषा आणि पत्रकारिता असे अभ्यासक्रम केल्यास आपणाला उत्तम संधी मिळू शकते.

विविध भारतीय भाषा आणि परभाषेतील चित्रपट आणि मालिकांसाठी डबिंगचा मजकूर अथवा संवाद तयार करण्यासाठी सुद्धा उत्तम भाषा अभ्यासक लागतात. हे संवाद आपणास मराठीतून, हिंदीतून किंवा आपणास येणाऱ्या भाषेतून तयार करण्याची संधी असते. भारतामध्ये विशेषत: दक्षिण भारतातील तामीळ, तेलगू भाषेतील चित्रपट मराठी हिंदी व इतर भाषांमध्ये येताना अशा तऱ्हेचे डब अथवा अनुवादित संवाद तयार करता येतात. याचबरोबर चित्रपटांमध्ये संवादाबरोबरच चित्रपटाच्या पडद्यावर खालील बाजूला ज्या भाषेत चित्रपट डब केलेला आहे, त्या भाषेतील संवाद सबटायटल म्हणून दिले जातात. त्याचेही  लेखन शुद्धलेखनानुसार व शब्दांच्या योग्य क्रमानुसार करावे लागते. याचबरोबर आपणाला छोट्या मोठ्या गावांमध्ये पुस्तक विक्री केंद्र स्थापन करता येते. कारण आता  अनेक लोक लिहीत आहेत, वाचणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे. घरोघरी जाऊन अथवा ऑनलाईन पद्धतीने आपण पुस्तकांची विक्री करू शकतो. अलीकडे मराठीमध्ये भयकथा, रहस्यकथा, कुटुंबकथा कमी कमी होत आहेत. अशा कथा लोकांना आवडतात. असे लेखन आपण करू शकतो. बालसाहित्यही लिहू शकतो.  पर्यावरण विषयक लेखनाला सुद्धा आता महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे असे लेखन करणे आणि  त्याचबरोबर असे लेखन  विविध समाज माध्यमावरती देणे शक्य आहे. युट्युब चॅनेल, ब्लॉग फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावरती हे लेखन आपण देऊ शकतो. उत्तम ललित लेखक होणे सुद्धा महत्त्वाचे आहे. ललित लेखन करणे, नाटक-कादंबरी सारखे लेखन करणे आपणाला जमले तर पैसा आणि समाधान या दोन्ही गोष्टी मिळू शकतात. प्रकाशन व्यवसाय तर उत्तमच आहे. लोकप्रिय लेखकांची पुस्तके प्रकाशित करून आपण त्यातून आपला उदरनिर्वाह सहज करू शकतो.

न्यायालयात मराठीतूनही निकाल दिले जातात, त्यामुळे त्या ठिकाणी निकाल तयार करणे, टिप्पणी घेणे याशिवाय संगणकावर मजकूर टायपिंग करणे अशा तऱ्हेच्या कामासाठी मराठी भाषेचे अभ्यासक लागतात. अशी पदेही त्या ठिकाणी असतात. प्रशासनामध्ये सुद्धा विविध पदे असतात. विशेषतः भाषा संचालनालय, राज्याचे व प्रत्येक जिल्ह्याचे माहिती व जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी मराठीचा माणूस लागतो. महाराष्ट्र राज्याचे बालभारतीचे कार्यालय आहे. त्या ठिकाणी संपादक, व्यवस्थापक या पदावर काम करता येते. महाराष्ट्र राज्याची अथवा महाराष्ट्र शासनाची लोकराज्य, शेतकरी अशी मराठी मासिक आहेत. त्यांच्यामध्ये लेखन करता येते, संपादन करता येते. सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत चाललेला आहे. यामध्ये आपण मराठी भाषेचा अर्थातच वापर करू शकतो. त्या ठिकाणी खूप मोठ्या संधी आहेत. संगणकावरील विविध आज्ञा मराठीमध्ये आणता येतात. विविध मराठी संकेतस्थळे आणि ॲपची निर्मिती आपणाला करता येते. या आधारे आपण वेगवेगळी माहिती सामान्य माणसांपर्यंत पोहचवू शकतो. त्याचप्रमाणे युट्युब आणि फेसबुकवर आपण महाराष्ट्रातील विविध प्रदेशाची, भाषेची, संस्कृतीची, परंपरांची माहिती देऊ शकतो. कोकण, मराठवाडा, वऱ्हाड, देश असे विविध प्रांत महाराष्ट्रामध्ये असल्याने तेथील प्रादेशिक व सांस्कृतिक माहिती आपणाला याद्वारे देता येते. स्वानंदी सरदेसाई हिचे युट्युब वरील मराठी बोलणे आणि तिने दिलेली माहिती ऐकल्यास, पाहिल्यास हे आपल्या लक्षात येईल. 

वाई येथील मराठी विश्वकोश मंडळामध्ये मराठी विश्वकोशातील विविध शब्द, त्यांचे अर्थ त्याचबरोबर त्या शब्दांच्या भोवती असणारे संदर्भ, कथा, गोष्टी यांचे संपादन केले जाते. त्या ठिकाणी जाणकार मराठी तरुण मुलांनाही सहाय्यक संपादक म्हणून भरती केले जाते. महाराष्ट्र शासनामार्फत ही पदे भरली जातात; तसेच ऑनलाईन विकिपीडियावर सुद्धा आपण मराठीतून लेखन करू शकतो. विकिपीडियातील अनेक नोंदी अपूर्ण आहेत, त्याच्यामध्ये आपण भर घालू शकतो. मात्र त्या नोंदी कशा करायच्या, त्या प्रामाणिकपणे कशा करायच्या याबद्दलचे प्रशिक्षण वर्ग आहेत अथवा याबद्दलची माहिती घ्यावी लागेल. मात्र एखाद्या गोष्टीबद्दल, घटनेबद्दल, शब्दाबद्दल अथवा व्यक्तिबद्दलची माहिती, शहराबद्दलची, प्रदेशाबद्दलची, पीकपाण्याबद्दलची, हवामानाबद्दलची माहिती आपण विकिपीडियावर भरू शकतो. जणू हा जागतिक माहितीकोश असतो तेथेही आपणाला आर्थिक कमाई होऊ शकते. 

हल्ली अनेक उत्तम प्रकाशक प्रकाशन संस्था मराठीसाठी संपादकाची, संपादनाची जागा ठेवत आहेत. उदाहरणार्थ तमीळ भाषेतील सलमा हिचे 'मध्यरात्रीनंतरचे तास' हे आत्मकथन कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ हिने अनुवादित केलेले आहे. त्याचे संपादन कविता महाजन यांनी केलेले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी संपादकाचे मानधन आपणाला मिळू शकते. सूत्रसंचालक आणि निवेदकांनाही हल्ली खूप मागणी आहे. आपल्या आजूबाजूला कार्यक्रमांची रेलचेल आहे. या ठिकाणी या लोकांना अत्यंत महत्त्व येते. याशिवाय वैचारिक निबंध, लेख, शोधनिबंध, नाटक कथा, भाषण, एकांकिका यांचे परीक्षक म्हणूनही आपणाला काम करता येते. यातून आपणास योग्य ते मानधन मिळू शकते.

भाषा येणाऱ्या व्यक्तीला अगदी अमेरिकेतही नोकरी करता येते. इंग्रजी बरोबरच स्पॅनिश आणि चायनीज भाषा येत असेल तर अमेरिकेमध्ये नोकरीच्या अधिक संधी आहेत. जपानी भाषा येणाऱ्यांना जपानमध्ये अधिक संधी आहेत. अर्थातच भाषेची जाण असणाऱ्या व्यक्तींना आपण भेटले पाहिजे. भाषेमध्ये काय काय करता येईल यासाठी आपण या मोठ्या लोकांची मते जाणून घेतली पाहिजेत. अशोक सराफ, सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर, संदीप नूलकर, सुरेश वांदिले याबरोबरच राज्य मराठी विकास संस्थेतील विविध सहकारी, राज्य मराठी भाषा विभागातील विविध अधिकारी यांना भेटून आपण कोणकोणत्या संधी आहेत हे जाणून घेतले तर मराठीसारख्या भाषेमध्ये अनेक संधी आहेत हे आपल्या लक्षात येईल. आपल्या महाविद्यालयातील भाषा विषयाच्या शिक्षकांना सुद्धा आपण सातत्याने भेटले पाहिजे.  अशा तऱ्हेचे अभ्यासक्रम देणाऱ्या अनेक संस्था आहेत. हे अभ्यासक्रम दीर्घकाळाचे नसतात तर तीन महिन्याचे, सहा महिन्याचे अथवा एक वर्षाचे असे अभ्यासक्रम विविध संस्थांमध्ये तसेच ऑनलाइन उपलब्ध आहेत. या सर्वांसाठी आपणाला मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो.

(महावीर महाविद्यालयात मंगळवार दि. २८ जानेवारी, २०२५ रोजी दिलेले व्याख्यान) 
          
                                      🪴

No comments:

Post a Comment