Thursday, July 23, 2026

राहून गेलेल्या गोष्टी....


            खरं तर आपणाला आयुष्यात खूप काही करायचे असते, मात्र आपण आपल्या इच्छेप्रमाणे ते करू शकत नाही. अनेक गोष्टींचे अडथळे येतात. नोकरी करणाऱ्या माणसांचे तर खूपच अवघड होते. जेव्हा नोकरीची शेवटची काही वर्षे उरतात तेव्हा आपण राहून गेलेल्या गोष्टी करू लागतो, पण आता काही नव्या गोष्टी शिकण्याचे वय निघून गेलेले असते. इच्छाशक्ती खूप असते पण आता नव्या गोष्टी चटकन जमत नाहीत.

असं वाटण्याचं वय असतं विसावं वर्ष..! मला फोटोग्राफी आवडायची, फोटो काढावेत असे वाटायचे. त्यामुळे मी नोकरी लागताच लगेचच तीनशे रुपयांचा kodak कंपनीचा रोल कॅमेरा घेतला. त्यातून अनेक फोटो काढले. हे फोटो माझ्या संग्रहात आजही आहेत. विशेषतः गडहिंग्लज येथील नदीवेश येथे छान गवताळ जागा होती. तेथील दृश्य खूपच मनोहर असायचे..! पुन्हा नंतर canon चा लेन्सचा कॅमेरा घेतला. हा दहा हजार रुपयांचा होता. तुलनेने महागच होता त्यावेळी. अर्थात त्यात कॅमेरारोल ऐवजी मायक्रोचीप होती. खूप फोटो काढले. काही फोटो सकाळ फोटोग्राफी स्पर्धेसाठी पाठवले. तो कॅमेराही दोनदा दुरुस्त केला पण शेवटी खराबच झाला. नंतर शंभर रुपयात विकून टाकला. आता मोबाईल आल्याने खूपच सोपे झाले आहे. उत्तरेकडील हिमालयाच्या लेह लडाख मधील पर्वतरांगांचे आणि दक्षिणेकडील केरळ श्रीलंकेच्या निसर्गसौंदर्याचे खूप फोटो टिपता आले. 

चित्रे काढण्याची हौस मात्र पुरती जिरली आहे. अनेक रंगपेट्या व कागद खराब झाले. पण ते काही जमले नाही. एका कोर्ससाठी प्रयत्नही केले. पण चित्रकला माझ्यावर प्रसन्न झालीच नाही. त्यामुळे जगभरातील उत्तमोत्तम चित्रे पाहिली. अगदी पाब्लो पिकासो, मकबूल फिदा हुसेन ते दीनानाथ दलाल, राजा रविवर्मा यांच्यापर्यंतची चित्रे पाहिली. 

जाणत्या वयातच मला हिमालयाकडे जावे असे वाटायचे. पुस्तकातून भव्य दिव्य हिमालयाचे वर्णन वाचल्यानंतर हे आकर्षण अधिकच वाढत गेले. पण ते शक्य झालेच नाही. हिमालयाची माझी कल्पना खूपच रोमांचक होती. एकटेच हिमालयाच्या पर्वतरांगात जायचे, फिरायचे, तेथेच राहायचे. घरी परत यायचे नाही. पण काय करणार ? शिक्षण संपल्यावर एकाच दिवसाच्या अंतराने नोकरी लागली. मग ही इच्छा थोडीफार पूर्ण झाली जेव्हा मी काश्मीर, लेह लडाख, हिमाचल अशा सहली केल्या तेव्हा...! तेथला उत्साहवर्धक निसर्ग, खळखळ वाहणाऱ्या निळ्याभोर पाण्याच्या नद्या, नद्यातील गोल, पांढरट, राखाडी दगडगोटे आणि आजूबाजूचे उंचच्याउंच डोंगर, खोल दऱ्या... सारेच अद्भुत..! त्या डोंगरातून आकाशाला गवसणी घालणारी पाईन, देवदारची झाडं, चिनारचे वृक्ष..!

'हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी 
दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी !

बघ निळसर पाणी झेलमचे झुळझुळे 
हे गवत नव्हे गे पिवळे केशर मळे 
ही किमया केवळ घडते प्रीतीमुळे 
उघडे डोंगर आज हिमाचे मुगुट घालिती शिरी

रुसलीस उगा का जवळी ये ना जरा 
गा गीत बुल्बुला माझ्या चितपाखरा 
हा राग खरा की नखर्‍याचा मोहरा 
कितीवार मी मरू तुझ्यावर किती करू शाहिरी

हर रंग दाविती गुलाब गहिरे, फिके
तुज दाल सरोवर दिसते का लाडके 
पाण्यात तरंगे घरकुलसे होडके 
त्यात बैसुनी मधुचंद्राची रात करू साजिरी'  

हे 'मधुचंद्र' या चित्रपटातील मराठी गाणे आणि राजेश खन्ना आणि आशा पारेख यांचे 'आन मिलो सजना' चित्रपटातील 'अच्छा तो हम चलते है, फिर कब मिंलोगे?' या गाण्यातील चार चिनार, शालीमार आणि निशांत या बादशाही बागा, सर्वत्र दिसणारी बर्फाळ शिखरे. हिमालयात जाण्याचे माझे स्वप्न जणू पूर्ण झाले; पण तेथे राहता येत नाही याचे केवढे दुःख आहे. आद्य शंकराचार्यांनी भारतभर भ्रमंती केली मात्र शेवटी ते श्रीनगर येथील एका उंच टेकडीवर राहिले. तेथे शंकराचार्यांचे मंदिर आहे. त्यांना केवळ बत्तीस वर्षाचे आयुष्य लाभले. असो. 

कराओके आता आले, पण गाणी गाण्याचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही. गाता आले नाही पण गाण्यांच्या कितीतरी कार्यक्रमात गाणी ऐकली. कोल्हापुरात तर हौशी कलाकारांचा भरणा आहेच पण पुण्या, मुंबईचे कलाकारही येथे कला सादर करतात. कारण येथे रसिक आहेत. महिन्यातून किमान सहा ते आठ कार्यक्रम असतातच. जवळजवळ सगळेच कार्यक्रम विनामूल्य प्रवेशाचे असतात. 

एमपीएससीमधून स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय नोकरी करण्याची धमक आणि अभ्यास माझ्याकडे होता. अर्थात प्राध्यापकाची आदर्श नोकरी लागल्याने एमपीएससी मागे पडली. पण अभ्यास केला होताच. पूर्वपरीक्षेचा फॉर्मही भरला होता, पण परीक्षा दिली नाही. मग नेट जेआरएफचा फॉर्म भरून पहिल्या प्रयत्नांत परीक्षा उत्तीर्ण झालो. पगार चार हजार आणि फेलोशिप आठ हजार असूनही नोकरी सोडली नाही. फेलोशिप घेतली नाही. आजही केबीसी मधील अमिताभ बच्चनच्या कितीतरी प्रश्नांची उत्तरे सहज येतात. एमपीएससीची परीक्षा दिली नाही पण त्या परीक्षा देणाऱ्या मुलांना तीन वर्षे शिकवले. 

इतिहास विषय प्रचंड आवडीचा. सरांच्या आग्रहाने मराठी विषय घेतला, मग पुढे इतिहासाची व्याख्याने ऐकली. पुस्तके वाचली. पुस्तके विकत घेतली. विज्ञान, पर्यावरण प्राणीवृक्ष यांचे जीवन याचीही आवडती पुस्तके घेतली. प्रदर्शने पाहिली. व्याख्याने ऐकत गेलो. जंगलात फिरत आहे. अर्थातच घरात मराठीच्या जोडीने इतिहास, विज्ञान, पर्यावरण याची पुस्तके आहेतच. अजून खूप आहे, पण आता एवढेच..! 

चित्रकला जमली नाही म्हणून फोटो काढले. 
गाणे गाता आले नाही म्हणून गाण्यांना कान दिला.
🪴

No comments:

Post a Comment